Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नाग : फण्यावर ऑपरेशन करून डॉक्टरांनी नागाला दिलं जीवदान

नाग : फण्यावर ऑपरेशन करून डॉक्टरांनी नागाला दिलं जीवदान
, शुक्रवार, 10 जानेवारी 2020 (17:00 IST)
एखाद्या जखमेवर टाके घालून ऑपरेशन करण्याचा डॉक्टर जेव्हा सल्ला देतात, तेव्हा बऱ्याची जणांची घाबरगुंडी उडताना आपण पाहतो. मात्र, मुंबईत असाच अनुभव चक्क एका नाग्याच्या वाट्याला आला. इथल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी एका जखमी नागाला वाचवण्यासाठी त्याच्यावर टाके घालून त्याचं ऑपरेशन केलं.
 
नागाच्या फण्यावरच टाके घालून डॉक्टरांनी त्याला वाचवलं. दोन दिवस हॉस्पिटलमध्ये आराम केल्यावर आता नागाला सुखरुप जंगलात सोडण्यात आलंय.
 
जंगली प्राण्यांना जखमी झाल्यावर बहुतेकदा उपचारांविना प्राणांना मुकावं लागतं. प्राण्यांचे असे मृत्यू ही नित्याचीच बाब झाली आहे. मात्र, 4 जानेवारीला रायगड जिल्ह्यातल्या पेण विभागाच्या वनक्षेत्रपालांना जखमी अवस्थेत आढळलेला नाग नशीबवान ठरला.
 
पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश पेठे नागावर उपचार करताना.
तर झालं असं की, पेणच्या वनक्षेत्रपालांनी रात्री 8 वाजता गंभीर जखमी अवस्थेत असलेला एक नाग संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वैद्यकीय दवाखान्यात आणला. इथले पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश पेठे आणि बचाव पथकाचे सदस्य वैभव पाटील यांनी त्या नागाची लगेचच तपासणी केली.
webdunia
नागाच्या तोंडापासून 6 इंच लांबीवर 2.5 इंचाची जखम होती. त्यापुढे 1 इंचाची अजून एक जखम होती. या जखमेजवळचे स्नायूही दुखावले होते. जखम मोठी असल्याने नागावर तत्काळ शस्त्रक्रिया करणं गरजेचं होतं.
 
जखम मोठी असल्याने नागावर तत्काळ शस्त्रक्रिया करणं गरजेचं होतं.
कसं झालं ऑपरेशन?
याबाबत अधिक माहिती देताना संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे पशुवैद्यकीय अधिकारी शैलेश पेठे सांगतात की, "नागाची स्थिती नाजूक झाली होती. त्याला आम्ही भूल म्हणजेच लोकल अनेस्थेशिया देऊन बेशुद्ध केलं. त्यानंतर जखम स्वच्छ करुन त्यावर टाके घातले. त्यानंतर पुढचे 2 दिवस नागाचं ड्रेसिंग केलं. 9 जानेवारीला जखम पूर्णपणे भरल्यानंतर नागाला पेणचे वनक्षेत्रपाल प्रसाद गायकवाड, वनपाल कान्हा चौधरी, वनरक्षक शिवराज उगले यांच्याकडे सुपुर्द करण्यात आलं. नागाची तब्येत चांगली असून तो पुन्हा सुखरुपपणे जंगलात गेला आहे."
 
बरा झालेला हा नाग आता फणा काढू शकतोय. तसंच, त्याला आता सरपटून पुढे जाणंही सहज शक्य होतंय. मुंबईतल्या या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासह नजिकच्या वनक्षेत्रात जखमी अवस्थेतले अनेक प्राण्यांवर असे उपचार केले जातात. बऱ्याचदा प्राण्यांचा जीव वाचवण्यात यश येतं, असंही डॉ. पेठे यांनी यावेळी स्पष्ट केलं.
 
APCCF वाईल्ड लाईफ वेस्ट झोन या संस्थेनं आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर या घटनेची हकिकत पोस्ट केली आहे. नागावर शस्त्रक्रिया झाल्याचं कळल्याने अनेकांनी या पोस्टवर प्रतिक्रिया देताना या कार्याला दाद दिली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Chhapaak: दीपिका पादुकोणच्या रूपाने बॉलिवुडला आवाज मिळालाय का?