Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

विधानसभा निवडणूक 2019: शिवसेना आता अधिकृतपणे भाजपचा लहान भाऊ?

Webdunia
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019 (11:44 IST)
शिवसेना-भाजप युतीचा फॉर्म्युला दोन्ही पक्षांच्या उमेदवार यादीतून समोर आलाय. शिवसेना 124 आणि भाजप इतर मित्रपक्षांसह 164 जागा लढवणार आहे.
 
2014च्या विधानसभा निवडणुकांचा अपवाद वगळल्यास 1990 सालापासून शिवसेना आणि भाजप युती करून निवडणुका लढत आहेत. 1990 ते 2009 पर्यंत विधानसभांच्या सर्व निवडणुकांमध्ये जागावाटप पाहता अप्रत्यक्षपणे शिवसेना "मोठ्या भावा"च्या भूमिकेत राहिली आहे.
 
शिवसेनेच्या नेत्यांनीही आपणच मोठे भाऊ असल्याचे अनेकदा बोलून दाखवलं आहे. ज्येष्ठ पत्रकार योगेश पवार सांगतात, "लालकृष्ण अडवाणी कायमच शिवसेनेला उद्देशून म्हणायचे की 'वो (शिवसेना) राम है और हम लक्ष्मण है.' त्यामुळे एकेकाळी स्वत: भाजपच शिवसेनेला महाराष्ट्रात मोठा भाऊ मानायची, हेही खरंच आहे."
 
मात्र आता हे समीकरण बदलताना दिसतंय. यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या वाट्याला 124 जागा आल्यात. युतीच्या इतिहासात पहिल्यांदाच शिवसेनेला 150 पेक्षा कमी जागा दिल्या गेल्यात. त्यामुळं शिवसेना आता अधिकृतपणे 'लहान भाऊ' झालीय का, ही चर्चा सुरू झालीय.
 
बीबीसी मराठीनं शिवसेनेच्या आजवरच्या निवडणुकीतल्या जागांच्या आकडेवारीचा आणि विश्लेषकांच्या मदतीनं या बदलत्या धाकटे-थोरलेपणाचा आढावा घेतलाय.
 
शिवसेना 'लहान भाऊ' कशी होत गेली?
ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर सांगतात, "2009 साली भाजपला 46 जागा होत्या. 2014 साली भाजपनं स्वबळावर 122 जागा जिंकल्या, म्हणजे इतके दिवस ज्या भाजपचं महाराष्ट्रातील अस्तित्व शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरेंवर अवलंबून होतं, त्या भाजपनं 2014 मध्ये शिवसेनेसोबत युती न करता 2009च्या तुलनेत जवळपास तिप्पट यश मिळवलं.
 
"दुसरीकडे शिवसेनेची 2009 आणि 2014ची तुलना केली, तर 44 वरून केवळ 63 जागांवरच मजल मारू शकली होती. त्याचवेळी शिवसेना धाकटा भाऊ झाली होती."
 
शिवाय, प्रकाश अकोलकर सांगतात की 2014 सालीच शिवसेनेनंही आपण धाकटा भाऊ असल्याचा अप्रत्यक्षपणे स्वीकार केला.
 
"2014 साली स्वबळावर लढल्यानंतर शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीपेक्षा जास्त जागा मिळवल्या आणि विरोधी पक्षात गेली. एकनाथ शिंदे विरोधी पक्षनेते झाले. त्यानंतर महिन्याभरात शरणागती पत्कारून सरकारमध्ये सामिल झाली. अधिकृत विरोधी पक्षच सत्ताधारी पक्षात जाऊन बसला, तिथेच शिवसेनेने धाकटा भाऊ म्हणून स्वीकार केला होता," असं अकोलकर सांगतात.
 
भारतकुमार राऊत हे 'महाराष्ट्र टाइम्स'चे माजी संपादक, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आहेत. ते शिवसेनेचे राज्यसभा खासदारही होते. याविषयी त्यांच्याशी चर्चा केल्यावर ते सांगतात, "2014 सालच्या निवडणुकीत दोन्ही पक्ष वेगळे लढले आणि भाजपला शिवसेनेच्या जवळजवळ दुप्पट जागा मिळाल्या. त्यामुळं मोठा भाऊ कोण आणि लहान भाऊ कोण, याची रचनाच बदलली."
 
"शिवसेना-भाजप युतीचे फॉर्म्युले प्रमोद महाजन आणि बाळासाहेब ठाकरेंच्या बोलण्यातून ठरायचे. त्यात काही ठाम सूत्र नव्हतं. दोघेजण एकत्रित बसून चर्चा करायचे आणि दोन्ही पक्षांना ते मान्य व्हायचे," असं राऊत सांगतात.
 
प्रकाश अकोलकर म्हणतात, "भाजपला केंद्रात सत्ता हवी होती. त्यांना महाराष्ट्रातल्या सत्तेत रस नव्हता. जेव्हा प्रमोद महाजनांनी 171-117 फॉर्म्युला केला, त्यामागे त्यांना केंद्रातल्या सत्तेसाठी शिवसेनाचा पाठिंबा आणि महाराष्ट्रात पक्षविस्तार हा उद्देश होता."
 
शिवसेना महाराष्ट्रात शक्तिशाली होती आणि भाजप महाराष्ट्रात विस्तारू पाहत होती, असं भारतकुमार राऊत म्हणतात. "शिवसेनेला प्रतिष्ठा हवी होती तर भाजप केवळ शहरी, मध्यमवर्गीय आणि एका जातीपुरता पक्ष होता. त्यामुळं भाजपला पक्ष सर्वदूर न्यायचा होता. त्यामुळं दोन्ही पक्ष एकत्र आले. शिवसेना लोकांमध्ये पोहोचली होती, बाळासाहेब ठाकरेंकडे नेतृत्त्व होतं. भाजपकडे असं नेतृत्त्व नव्हतं. ही परिस्थिती 2009 सालापर्यंत चालली. मात्र 2009 साली बदललं.
 
"2009 साली पहिल्यांदा भाजपनं कमी जागा लढवून आमदार जास्त जिंकले. त्यावेळी खरं पारडं फिरलं. शिवसेनेमध्ये त्याआधीही चढाओढ होती, मात्र 2009 साली भाजपला शिवसेनेपेक्षा जागा जास्त मिळाल्या. त्यामुळं विरोधीपक्ष नेतेपद हक्कानं भाजपकडे आलं. त्यानंतर सर्वच सूत्र बदलत गेले," असं राऊत सांगतात.
 
शिवसेना कुठे कमी पडली?
"शिवसेना संघटना म्हणून कमी पडली नाही. संघटना म्हणून शिवसेना मजबूत होती. भाजप दरम्यानच्या काळात त्यांची संघटना वाढवत होती. शिवसेना धोरणांमध्ये कमी पडली. इलेक्टिव्ह मेरिट (निवडून येण्याची क्षमता) वाढवण्याची गोष्ट शिवसेनेला जमली नाही," असं निरीक्षण भारतकुमार राऊत नोंदवतात.
 
प्रकाश अकोलकर सांगतात, "शिवसेनेचा हात धरून प्रमोद महाजनांनी महाराष्ट्रात भाजपचा विस्तार केला. त्याचवेळी भाजपचा हात धरून शिवसेना मात्र आपला फारसा विस्तार करू शकली नाही."
 
"शिवसेनेनं कायमच विरोधाचं राजकारण केलंय, 1995 ते 1999चा काळ वगळता. तो बाज शिवसेना कायम राखू शकली नाही. मग सत्तेत राहून विरोधीपक्षाचं राजकारण करायचं ठरवल्याचं दिसतं. ते जनतेला पटल्याचं वाटत नाही. या निवडणुकीत सेनेच्या या भूमिकेचा खरा फैसला होईल," असंही प्रकाश अकोलकर सांगतात.
 
ते पुढे सांगतात, "शिवसेनेनं अपमानास्पदरीत्या युती केलीय. कुठेही 50 टक्क्यांचा फॉर्म्युला लागू झाला नाहीय. 126 जागांवर पूर्ण लक्ष केंद्रित करून जास्तीत जास्त जागा निवडून येण्याचं पाहावं लागणार आहे."
 
महाराष्ट्रातील निवडणुकांमधील सेना-भाजप युतीचा इतिहास
1989 साली भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत महाराष्ट्रात शिवसेनेसोबत युती करण्याचा निर्णय घेतला. शिवसेना-भाजप युतीच्या निर्णयामुळं महाराष्ट्रात आधी काँग्रेस आणि नंतर स्थापन झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला एकत्रित आव्हान हे दोन्ही पक्ष देऊ लागले.
 
1984च्या लोकसभा निवडणुकीला शिवसेना आणि भाजप युती म्हणून सामोरं गेली असली तरी महाराष्ट्रात फारशी चमक दाखवता आली नव्हती. मात्र त्यानंतर 1990 साली महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका झाल्या. या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष युती करून रिंगणात उतरले.
 
1990 ते 2009 सालापर्यंत शिवसेना-भाजप हे दोन्ही पक्ष युतीत किती जागा लढल्याची आणि जिंकल्याची आकडेवारी सुहास पळशीकर आणि सुहास कुलकर्णी यांच्या 'सत्तासंघर्ष' या पुस्तकात देण्यात आली आहे.
 
भाजपच्या तुलनेत महाराष्ट्रात शिवसेनेची ताकद पाहता, त्यावेळी जागावाटपही त्याप्रमाणेच करण्यात आलं होतं. 1990च्या निवडणुकीत शिवसेनेनं 183 तर भाजपनं 105 जागा लढवल्या होत्या.
 
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत युतीचा जागावाटपाचा हाच फॉर्म्युला 1995च्या निवडणुकीतही तसाच ठेवण्यात आला. मात्र, पुढे निवडणूकनिहाय महाराष्ट्रात युतीच्या फॉर्म्युल्याची आकडेवारी बदलत गेल्याचं लक्षात येतं आणि तिथेच शिवसेनेच्या 'लहान भाऊ आणि मोठा भाऊ'ची गोष्ट उलगडते.
 
1999 साली शिवसेनेनं 171 मधून मित्रपक्षांना 10 जागा सोडल्या होत्या. 2004 साली शिवसेनेनं मित्रपक्षांना 8, तर भाजपनं 6 जागा सोडल्या होत्या. तर 2009 साली शिवसेनेनं मित्रपक्षांना 9 जागा सोडल्या होत्या.
 
2014 साली भाजप आणि शिवसेनेनं युतीच्या इतिहासात पहिल्यांदाच स्वबळाचा नारा दिला आणि 25 वर्षांनंतर पहिल्यांदाच दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे रिंगणात उतरले.
 
भाजपनं स्वबळावर 260, तर शिवसेनेनं 282 जागा लढवल्या. मात्र 2014 साली भाजपनं लढवलेल्या 260 पैकी 122 जागा, तर शिवसेनेनं लढवलेल्या 282 पैकी 62 जागा जिंकल्या.
 
यंदा म्हणजे 2019 साली भाजप आणि शिवसेना पुन्हा युतीत लढत असून, भाजप 164 जागा (मित्रपक्षांच्या 18 जागा पकडून), तर शिवसेना 124 जागा लढवत आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

12 Jyotirlingas: १२ ज्योतिर्लिंग आणि १२ राशींचा काय संबंध आहे? तुम्ही कोणत्या ज्योतिर्लिंगाशी संबंधित आहात हे जाणून घ्या?

घरात तुळशीचे रोप स्वतःच उगवले तर शुभ की अशुभ जाणून घ्या

स्वामी विवेकानंदांचे शिकागो येथील ऐतिहासिक भाषण, जे ऐकून टाळ्यांचा कडकडाट होत होता

ढपोरशंख म्हणजे काय? मनोरंजक कथा, मुलांना नक्की ऐकवा छान गोष्ट

जर हिवाळ्यात तुमचे हात पाय थंड पडत असतील तर या युक्त्या करा

पुढील लेख
Show comments