Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ओमिक्रॉनची लाट सौम्य आहे, तरीही त्याची भीती का बाळगावी?

Webdunia
शुक्रवार, 24 डिसेंबर 2021 (08:48 IST)
ओमिक्रॉन या कोरोना व्हायरसच्या नव्या व्हेरिएंटची लाट सौम्य आहे, असं यूकेत प्रसिद्ध झालेल्या काही प्राथमिक अभ्यासातून समोर आलं आहे.
 
सुरुवातीच्या काही दाखल्यामधून असं दिसतंय की, इतर व्हेरिएंटच्या तुलनेत या व्हेरिएंटची लागण झालेल्या लोकांना दवाखान्यात दाखल करण्याची गरज कमी भासतेय. जवळपास 30 ते 70 टक्के लोकांना दवाखान्यात दाखल होण्याची गरज भासत नाहीये.
 
पण तरीही काळजीचं कारण आहे. कारण ओमिक्रॉन व्हेरिएंट जरी सौम्य असला तरी ज्या प्रमाणात लोकांना याची लागण होते, तेवढी मोठी संख्याचं हॉस्पिटल्सवरचा ताण वाढवू शकते.
कोव्हिड टास्क फोर्सचे डॉ संजय ओक बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले,
 
"हा व्हायरस जरी सौम्य स्वरूपाचा असला तरी ज्यांना को-मॉर्बिडीटी आहेत त्यांच्या बाबतीत गंभीर परिणाम होऊ शकतात आणि मृत्यू होऊ शकतात. सुरुवातीला ओमिक्रॉनमुळे मृत्यू होत नाही असं वाटत होतं, पण आता पाश्चात्य देशांमधून येणाऱ्या बातम्यांमुळे मृत्यूही ओमिक्रॉनमुळे होऊ शकतात हे कळलेलं आहे, अर्थात त्यांची संख्या डेल्टाच्या तुलनेत कमी आहे. पण ज्या प्रमाणात लोकांना लागण होतेय, ते प्रमाण तिपटीने जास्त आहे."
 
यूकेत पहिल्यांदाच एका दिवसात एक लाखाहून जास्त केसेस रिपोर्ट झालेल्या आहेत.
ओमिक्रॉन नक्की किती धोकादायक आहे यावर आणखी अभ्यास केला जातोय. यातून जे निष्कर्ष निघतील ते जगातल्या विविध देशांना आपण काय उपाययोजना कराव्यात हे ठरवायला मदत करतील.
 
हा व्हेरिएंट सौम्य असला तरी काळजी घ्यायला हवी, असं आयएमएचे माजी अध्यक्ष डॉ अविनाश भोंडवे सांगतात.
ते म्हणतात, "विषाणूच्या एकदंर लाईफ सायकलमध्ये त्याचं स्वरूप बदलण्याची शक्यता असते, त्यामुळे सध्याच्या काळात जरी हा विषाणू सौम्य वाटला तरी त्याचं स्वरूप बदलू शकतं. येत्या काळात ओमिक्रॉनची लक्षणं बदलू शकतात त्यामुळे आपल्याला काळजी घ्यावी लागेल, लसीकरण करावं लागले आणि प्रतिबंधात्मक उपायही पाळावे लागतील."
 
स्कॉटलंडमध्ये एक अभ्यास सध्या केला जातोय. कोरोना व्हायरसमुळे किती लोकांना संसर्ग झाला आणि त्यातल्या किती लोकांना दवाखान्यात अॅडमिट करावं लागलं. हा अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, जर ओमिक्रॉन व्हेरिएंटचं वागणं डेल्टा व्हेरिएंटसारखंच असलं तर त्याच्या अभ्यास गटाचं सँपल असलेल्या 47 लोकांना दवाखान्यात दाखल करावं लागेल. सध्या दवाखान्यात दाखल करावं लागणाऱ्या लोकांची संख्या आहे फक्त 15.
 
अभ्यासकांचं म्हणणं आहे की, हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंटची गरज भासणाऱ्या लोकांच्या संख्येत दोन तृतीयांश घट झाली आहे. पण या अभ्यासात हाय रिस्क गटातल्या लोकांची संख्या खूपच कमी आहे.
स्कॉललंडच्या सार्वजनिक आरोग्य संस्थेत कोव्हिड-19 विभागाचे संचालक असलेले डॉ. जीम मॅकमेनाईम म्हणतात की, 'हॉस्पिटल्सची गरज कमी भासतेय ही एक चांगली बातमी आहे.'
 
ते म्हणतात की, "दवाखान्यात दाखल होण्याची गरज का भासत नाहीये यावर अभ्यास होतोय. काही गाळलेल्या जागाही हा डेटा भरतोय पण आपण अगदीच निवांत, बिनधास्त व्हायला नको. काळजी घ्यायला हवी."
 
ओमिक्रॉन व्हेरिएंटचा पसरण्याचा वेग अतिशय जास्त आहे आणि जर केसेसची संख्या प्रचंड वाढली तर हा व्हेरिएंट तुलनेने सौम्य असूनही काही फायदा होणार नाही.
 
एडिंबरा विद्यापीठाचे प्रा. मार्क वुलहाऊस म्हणतात की, "एका व्यक्तीला संसर्ग झाला तर तो सौम्य असेल पण जर एकदम मोठ्या संख्येने लोकांना संसर्ग झाला तर मग याचा आरोग्य यंत्रणेवर नक्कीच ताण पडेल."
 
दरम्यान, दक्षिण आफ्रिकेत झालेल्या आणखी एका अभ्यासात ओमिक्रॉन व्हेरिएंट सौम्य असल्याचं समोर आलंय.
 
यात असं दिसलं की, जवळपास 70-80 टक्के लोकांना दवाखान्यात दाखल होण्याची गरज नाहीये. यात ओमिक्रॉन कुठे कुठे पसरला आहे आणि संसर्गाच्या मागच्या लाटांच्या तुलनेत या व्हेरिएंटचं वागणं कसं आहे याचाही यात अभ्यास केला गेला होता.
 
पण ज्या काही पेशंट्सला दवाखान्यात दाखल करावं लागलं त्यांनाही विशेष त्रास झाला नसल्याचं या अभ्यासात दिसून आलंय.
 
दक्षिण आफ्रिकेतल्या राष्ट्रीय संसर्गजन्य रोग संस्थेच्या प्रा. शेरिल कोहेन म्हणतात की, "आमच्याकडे आलेल्या डेटाचा एकत्रित अभ्यास सांगतो की इतर व्हेरिएंटच्या तुलनेत ओमिक्रॉन कमी गंभीर आहे."
 
ओमिक्रॉन सौम्य का?
ऑमिक्रॉन व्हायरस सौम्य का आहे याची मुख्यत्वेकरून तीन कारणं आहेत. एक कोरोना व्हायरसच्या या व्हेरिएंटच्या मुलभूत रचनेत बदल झालेला आहे.
 
दुसरं म्हणजे लसीकरण आणि आधीच्या संसर्गांमुळे लोकांची रोगप्रतिकारक क्षमता वाढली आहे.
लंडनच्या इंपिरियल कॉलजच्या तज्ज्ञांनी केलेल्या एका विश्लेषणात असं दिसून आलं की, ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या म्युटेशनमुळे तो डेल्टापेक्षा सौम्य आहे.
 
अभ्यासकांचं म्हणणं आहे की, ज्यांच्यात आधी कोरोना व्हायरसविरोधात कोणत्याही प्रकारची रोगप्रतिकारशक्ती नव्हती. त्या लोकांपैकी डेल्टाच्या तुलनेत ओमिक्रॉनमुळे दवाखान्यात अॅडमिट होणाऱ्यांचं प्रमाण 11 टक्क्यांनी कमी आहे.
 
आता लसीकरणामुळे लोकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढली आहे. मग या तुलनेत ओमिक्रॉनमुळे दवाखान्यात अॅडमिट होणाऱ्यांचं प्रमाण 25-30 टक्क्यांनी कमी होऊ शकतं. तर 40 टक्के लोकांना एका दिवसात हॉस्पिटलमधून सुट्टी मिळ शकते.
 
पण इंपिरियल कॉलेजचेच दुसरे प्राध्यापक इशारा देतात की "याचा अर्थ आता हा व्हायरस साध्या सर्दी-पडशापेक्षा जास्त गंभीर नाही' असं समजणं खूपच चुकीचं ठरेल.
 
जगभरातल्या वेगवेगळ्या प्रयोगशाळा ओमिक्रॉन सौम्य का यावर अभ्यास करत आहेत.
 
हाँगकाँग विद्यापीठातल्या एका अभ्यासात समोर आलंय की ओमिक्रॉन श्वासनलिकेला संसर्ग फार पटकन करतो, पण एकदा फुफ्फुसात गेला की कमजोर होतो. जर फुफ्फुसात तो कमजोर झाला तर संसर्ग झालेल्या व्यक्तीला अतिगंभीर धोका नसतो.
 
केंब्रिज विद्यापीठातल्या अभ्यासात समोर आलं की फुफ्फुसातल्या पेशींना निकामी करण्याची त्याची क्षमता कमी आहे. त्यामुळे लोक गंभीररित्या आजारी पडत नाहीत.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात

ही एक पिशवी घराच्या मुख्य दारावर लावा, पैशाशी संबंधित समस्या दूर होतील

पेल्विक हेल्थचा मुलाच्या आरोग्यावर काय परिणाम होतो,निरोगी कसे ठेवायचे ते जाणून घ्या

Relationship : परस्पर समंजसपणाने नाते जपा

अकबर-बिरबलची कहाणी : लाटा मोजणे

पुढील लेख