Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोरोनाच्या काळातही राजकीय नेते 'टरबूज-खरबूज-चंपा'मध्ये गुंग

Webdunia
गुरूवार, 15 एप्रिल 2021 (19:27 IST)
महाराष्ट्रासह संपूर्ण भारतभरात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं आरोग्य व्यवस्थेची स्थिती किती गंभीर आहे हे दिसत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यभरात लॉकडाऊन सदृश्य नियम जाहीर केले. परंतु कोरोनाच्या या नियमांसाठी पंढरपूरचा अपवाद करण्यात आला आहे. हे नियम या मतदारसंघात लागू करण्यात आलेले नाहीत.
 
निवडणुकीसाठी जरी या पंढरपूर मतदारसंघात नियमावली लागू नसली तरी प्रचारामुळे इथं कोरोनाविरुद्धच्या लढाईचे सगळे नियम पायदळी तुडवले जात आहेत. यात कोणत्याही पक्षाचा अपवाद नाही. राष्ट्रवादीचे भगीरथ भालके तर भाजपचे समाधान आवताडे यांच्यात ही मुख्य लढत होतेय.
 
प्रचाराची पातळी काय दर्शवते?
देशभरात कोरोनाचा सर्वांत जास्त फटका महाराष्ट्राला बसला आहे. मुंबई, पुणे, नाशिकसारख्या मोठ्या शहरांप्रमाणे इतर सर्व जिल्ह्यांना याचा त्रास भोगावा लागत आहे. रेमडेसिव्हीर, ऑक्सिजन, लस अशा सर्व आवश्यक वस्तूंचा तुटवडा भासत आहे. परंतु शेजारच्या जिल्ह्यांमध्ये युद्धपातळीसारखी हातघाईची लढाई सुरू असताना सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर मतदारसंघात मात्र राजकीय नेत्यांनी केवळ निवडणुकीवर लक्ष केंद्रित केलं आहे.
 
ज्या स्थानिक प्रतिनिधींचं म्हणजे भारत भालके यांचं निधन कोरोनामुळे झालं त्यांच्या मृत्यूच्या कारणाचा विसर काही महिन्यांतच नेत्यांना आणि राजकीय कार्यकर्त्यांना पडला याबद्दल सर्वत्र आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
 
नेत्यांनी या परिस्थितीतही एकमेकांची उणीदुणी आणि वैयक्तिक टीकेवर भर दिलेला दिसतो. कोरोनाच्या या काळात प्रचारामध्ये विकासाचे, आरोग्याचे, आरोग्यसेवेचे मुद्दे येण्याऐवजी वैयक्तिक टीकेचे मुद्देच गाजत आहेत.
 
'टरबूज-खरबूज-चंपा'
 
या निवडणुकीसाठी होत असलेल्या प्रचाराकडे पाहिले असता राजकीय नेते नक्की कोणत्या मुद्द्यांना महत्त्व देतात असा प्रश्न पडू शकतो. पंढरपूरच्या शिवाजी चौक येथे झालेल्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा चंपा असा उल्लेख केला. तसेच त्यांच्यावर टीका करताना टरबूज-खरबूज असे शब्द वापरले आहेत.
 
चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करताना अजित पवार म्हणाले, "चंद्रकांत पाटील यांनी कधी कुठलीही संस्था काढलेली नाही, कुठलीही बँक किंवा कारखाना चालवलेला नाही, कुठलीही विकास सोसायटी किंवा मजूर सोसायटी चालवलेली नाही. टरबूज-खरबुज सोसायटी कधी काढली नाही. त्यांना ग्रामीण भागाच्या प्रश्नांशी काहीही देणघेणं नाही. नरेंद्र मोदी साहेबांच्या झंझावातामुळे त्यांना लॉटरी लागलेली आहे."
 
त्यानंतर अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्या नावाच्या आद्याक्षरांचाही उल्लेख केला आणि त्यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, "अजित अनंतराव पवार म्हणजे अअप तसंच चंद्रकांत पाटील म्हणजे चंपा असा शॉटफॉर्म होतो. हे कुणी जरी आले, तरी तुम्ही त्यांचं काहीही ऐकू नका. ते टिकाटिप्पणी करतील. पण तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका."
 
चंद्रकांत पाटील यांचे उत्तर
अजित पवार यांनी नावावरुन अशी टीका केल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनीही त्यांना उत्तर दिले आहे. "मला चंपा म्हणणं बंद करा अन्यथा मी सुद्धा पार्थ पवार आणि इतरांच्या नावांचे शॉर्टफॉर्म्स सांगेन", असं उत्तर त्यांनी दिलं आहे.
 
मतदान संपल्यावर खरी परीक्षा
राजकारण्यांना लोकांचं लक्ष अन्य ठिकाणी वळवण्यात यश आलं आहे असं मत सोलापूर येथील सकाळचे वरिष्ठ उपसंपादक संजय पाठक व्यक्त करतात.
 
बीबीसी मराठीशी बोलताना पाठक म्हणाले, "सर्व महत्त्वाचे मुद्दे, पंढरपूर मतदारसंघाचे मुद्दे बाजूला ठेवून लोकांचं लक्ष अशा प्रकारची टीका, कोट्या, विनोदांवर, प्रचारावर आणण्याचं काम राजकीय नेत्यांनी केलं आहे."
 
ते म्हणाले, "प्रचारसभेजवळ एखादं लग्न असेल तर तिथं फक्त 50 लोकांना परवानगी आहे. मात्र प्रचाराला हजारो लोक उपस्थित राहात आहेत. त्यांना कोणतेच नियम नाहीत. लोक तसेच मास्कविना, सोशल डिस्टन्सविना, सॅनिटायजरशिवाय इतरांमध्ये मिसळत आहेत."
 
संजय पाठक यांनी मतदानानंतरच्या स्थितीबद्दलही भीती व्यक्त केली. ते म्हणाले, "एकदा का मतदान संपलं की पंढरपूरची स्थिती समोर येईल. कित्येक लोकांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर येईल. तेव्हा आरोग्य व्यवस्था किती अपुरी आहे. तिथं किती बेड्स कमी आहेत, ऑक्सिजन, रेमडेसिवियरचा तुटवडा आहे हे लक्षात येईल."
 
प्रचारसभांचा धडाका पण सरकारचे दुर्लक्ष
8 आणि 9 एप्रिलला अजित पवारांनी पंढरपूर आणि मंगळवेढ्यात मोठ्या सभा घेतल्या. एकीकडे राज्यात कोरोनामुळे राजकीय आणि सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी असताना इतक्या मोठ्या प्रमाणावर या कार्यक्रमांसाठी गर्दी जमली होती.
 
आदल्या दिवशी अजित पवारांनी (8 एप्रिल) याबाबत दिलगिरीही व्यक्त केली होती. पण दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा तीच परिस्थिती बघायला मिळाली.
 
एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलंय. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्र्यांच्याच कार्यक्रमात सरकारी नियमांना केराची टोपली दाखवली.
 
हीच परिस्थिती भाजपच्या समाधान आवताडे यांच्या प्रचारसभेतही आढळली आहे. भाजपच्या प्रचारसभेत सहभागी झालेले रणजितसिंह मोहीते पाटील यांना तर कोरोनाची लागणही झालीये.
 
या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने बंद सभागृहात 50 तर खुल्या ठिकाणी 200 लोकांची परवानगी दिलीये. पण इथल्या प्रचारसभांना मोठी गर्दी होतेय, लोक मास्क घालत नाहीयेत, सॅनिटायझरची व्यवस्था नाहीये. सर्व पक्षांच्या प्रचारसभांत हेच चित्र आहे.
 
तर आता राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी पंढरपूर आणि मंगळवेढ्याचा दौरा करत आहेत.
 
कोरोनामुळे आमदार भारत भालके यांचं निधन झालं. त्यामुळे ही पोटनिवडणूक घेण्यात येतेय, पण सध्या कोरोनाविषयीच्या नियमांचे याठिकाणी सर्रास उल्लंघन होतंय. राज्यात कोरोनाचा उद्रेक झाला असताना मग सरकारी नियम हे फक्त सामान्य माणासांच लागू होतात का? हा प्रश्न उभा राहतो.
 
आतापर्यंत पंढरपूरमध्ये प्रचारसभेत कोरोना नियमांचं उल्लंघन केल्यानं 5 गुन्हे दाखल केल्याचं, निवडणूक अधिकारी भरत वाघमारे यांनी सांगितलंय.
 
"निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचं आयोजकांनी पालन करणं आवश्यक आहे. ते पाळले गेले नाही तर निवडणूक आयोगाचे स्थानिक अधिकारी संबंधीत आयोजकांवर गुन्हे दाखल करत आहेत," असं वाघमारे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ekadashi 2025 Wishes in Marathi एकादशीच्या शुभेच्छा मराठीत

Vasant Panchami 2025: वसंत पंचमीला एक अद्भुत योगायोग घडत आहे, ३ राशींना मिळणार अपार लाभ !

४ फेब्रुवारीपासून ३ राशींचे भाग्य चमकेल, गुरु चालणार सरळ

चमकदार त्वचा आणि निरोगी केसांसाठी हिवाळ्यातील 10 घरगुती उपाय जाणून घ्या

वर्तमानपत्रात गुंडाळलेली फळे अनेक आजारांना कारणीभूत ठरू शकतात जाणून घ्या

पुढील लेख