Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

प्राजक्त तनपुरे : पहिल्यांदा आमदार ते थेट राज्यमंत्री, असा आहे प्रवास

Webdunia
मंगळवार, 1 मार्च 2022 (20:43 IST)
FACEBOOK/PRAJAKT TANPURE
अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीचा मोर्चा आता राष्ट्रावदीचे नेते आणि राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंकडे वळला आहे. सोमवारी 28 फेब्रुवारीला प्राजक्त तनपुरेंच्या नागपूरमधील राम गणेश गडकरी साखर कारखान्याची मालमत्ता जप्त करण्यात आली.
 
प्राजक्त तनपुरे हे याआधीही अनेकदा चर्चेत राहिलेत. मात्र, कधी त्यांच्या राजकारणातील नातगोत्यांमुळे, तर कधी इतर कारणांमुळे. ही कारणं बऱ्याच अंशी सकारात्मक असत. मात्र, आता थेट ईडीच्या कारवाईमुळेच त्यांचं नाव चर्चेत आलंय.
 
अहमदनगर जिल्ह्याला तनपुरे हे आडनाव नवं नाही. गेल्या चार-पाच दशकांपासून नगरमधील राजकारणात तनपुरे आडनावाचा दबदबा कायम असल्याचे दिसून येतं.
मात्र, नगरबाहेरील लोकांना प्राजक्त तनपुरेंची पुरेशी माहिती नसते. हेच जाणून, प्राजक्त तनपुरेंच्या राजकारणाबद्दल आणि काही अंशी वैयक्तिक माहितीचा आढावा घेतला आहे.
 
प्राजक्त तनपुरेंच्या राजकीय प्रवासाची चर्चा करायची झाल्यास, फार वर्षं मागे जावं लागत नाही.
 
राहुरीचे नगराध्यक्ष आणि मग नगराध्यक्ष असतानाच 2019 साली विधानसभा निवडणूक लढवून, राज्याच्या विधानसभेत प्रवेश आणि आता सहा खात्यांचे राज्यमंत्री, असा अगदी एका हाताच्या बोटावर मोजता येईल, इतक्याच वर्षांचा राजकीय प्रवास आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
 
पण हे 'प्राजक्त तनपुरें'बद्दल म्हणता येईल, पण 'तनपुरें'बद्दल असं म्हणता येत नाही. कारण अहमदनगरच्या राजकारणात तनपुरे हे आडनाव गेली पाच-सहा दशकं आपला दबदबा राखून आहे.
 
आधी तनपुरेंच्या राजकीय पार्श्वभूमीचा आढावा घेऊ, मग प्राजक्त तनपुरेंच्या प्रवासाकडे येऊया.
 
'सामना' सिनेमा आणि तनपुरे कुटुंब
अहमदनगरमधील राहुरी तालुका आणि आजूबाजूचा परिसर हा तनपुरे कुटुंबाचं होमग्राऊंड आहे.
बाबूरावदादा तनपुरे हे 1962 आणि 1967 या दोन निवडणुकांमध्ये इथून आमदार होते. त्यापूर्वी म्हणजे 1954 साली स्थापन झालेल्या राहुरी साखर कारखान्याची स्थापना करण्यात बाबूरावदादा तनपुरेंचा मोठा वाटा होता.
 
सहकार क्षेत्रात बाबूरावदादांचा आजही आदरानं उल्लेख केला जातो.
 
या कारखान्याचा चित्रपटसृष्टीशीही संबंध आहे. कम्युनिस्ट चळवळीतले ज्येष्ठ नेते कॉ. गंगाधर पाटलांनी त्यांच्या लेखात सांगितलेला किस्सा म्हणजे, राहुरी साखर कारखान्याच्या सहकार चळवळीचा आधार 'सामना' चित्रपटाच्या कथेला आहे. किंबहुना, या चित्रपटातील दृश्य हे या कारखान्यातच चित्रित केलं आहेत.
 
1967 सालचं काँग्रेसचं अधिवेशन राहुरी साखर काखान्यावर झाल्याची आठवणही कॉ. गंगाधर पाटील नोंदवतात. या अधिवेशनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणावर बाबूरावदादा तनपुरेंच्या राजकारणाची छाप पडण्यास मदत झाल्याचं ते सांगतात.
 
अशी आहे राजकीय पार्श्वभूमी
हे बाबूरावदादा म्हणजे प्राजक्त तनपुरेंचे आजोबा. प्रसाद तनपुरे हे प्राजक्त तनपुरेंचे वडील.
 
प्रसाद तनपुरे हेही राजकारणात अनेक वर्षे सक्रीय होते. एकदा खासदार आणि पाचवेळा आमदार अशी मोठी कारकीर्द त्यांनी संसदीय राजकारणात घालवली.
 
ज्येष्ठ पत्रकार शैलेंद्र तनपुरे सांगतात की, "बाबूरावदादा तनपुरे हे सहकारमहर्षीच होते. सहकार क्षेत्रातून आलेले ते राजकारणी होते, मात्र प्रसाद तनपुरे हे फार आक्रमक नाहीत. त्यांच्या तुलनेत प्राजक्त तनपुरे महत्वाकांक्षी दिसतात. राजकारणात पुढे जाण्याची इच्छा त्यांच्या स्वभावात दिसून येते."
 
आजोबा बाबूरावदादा तनपुरे आणि वडील प्रसाद तनपुरे यांच्याकडून प्राजक्त तनपुरेंना राजकीय वारसा मिळालाय.
एवढंच नव्हे, अनेकांना सहसा माहित नसलेला आणखी एक वारसा प्राजक्त तनपुरेंना आहे.
 
राहुरीच्या माजी नगराध्यक्षा डॉ. उषा तनपुरे या प्राजक्त तनपुरेंच्या आई.
 
या डॉ. उषा तनपुरे दिवंगत नेते राजारामबापू पाटील यांच्या कन्या होय. म्हणजेच, महाराष्ट्राचे विद्यमान जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे डॉ. उषा तनपुरेंचे सख्खे भाऊ आणि प्राजक्त तनपुरेंचे सख्खे मामा होय.
 
प्राजक्त तनपुरेंचा प्रवास
अशाप्रकारे वडिलांसह आईच्या कुटुंबातून राजकारणाचा आणि सहकाराचा वारसा घेऊन प्राजक्त तनपुरे राजकारणात आले आहेत.
 
13 सप्टेंबर 1976 जन्मलेले प्राजक्त तनपुरे हे उच्चविद्याविभूषित आहेत.
 
2000 साली पुणे विद्यापीठातून बी. ई. मेकॅनिकल केल्यानंतर अमेरिकेतील टल्सा विद्यापीठूतून एम. एस. पूर्ण केलं.
 
घरातच राजकारणाचे धडे गिरवलेल्या प्राजक्त तनपुरेंनी सुरुवात बालेकिल्ल्यातूनच केली. राहुरी नगरपरिषदेच्या निवडणुकीत थेट जनतेतून ते निवडून गेले आणि नगराध्यक्ष झाले.
 
त्यावेळी म्हणजे फडणवीस सरकारनं थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडीचा निर्णय घेतला होता. हा प्रकार नंतर बदलण्यात आला.
 
तनपुरे नगराध्यक्ष असतानाच 2019 च्या विधानसभा निवडणुका लागल्या आणि राहुरी मतदारसंघातून राष्ट्रवादीनं त्यांना उमेदवारी दिली.
 
प्राजक्त तनपुरेंसमोर भाजपकडून शिवाजीराव कर्डिलेंचं आव्हान होतं. याआधीच्या निवडणुकीत म्हणजे, 2014 साली प्राजक्त तनपुरेंच्या आई डॉ. उषा तनपुरेंना कर्डिलेंनी पराभूत केलं होतं. त्यावेळी डॉ. उषा तनपुरे शिवसेनेकडून लढल्या होत्या.
 
मात्र, 2019 च्या निवडणुकीत प्राजक्त तनपुरेंनी भाजपच्या शिवाजीराव कर्डिलेंना तब्बल 23 हजार मतांनी पराभूत केलं.
 
पहिल्याच निवडणुकीत प्राजक्त तनपुरे जिंकले आणि विधानसभेत पोहोचले. त्यानंतर राज्याच्या राजकारणातील समीकरणं बदलली आणि महाविकास आघाडीचं सरकार आलं. या सरकारमध्ये प्राजक्त तनपुरेंना उच्च शिक्षण, ऊर्जा यांसह एकूण सहा खात्यांचं राज्यमंत्रिपद मिळालं.
 
आजोबा दोनवेळा आमदार, वडील एकवेळा खासदार आणि पाचवेळा आमदार, तरीही तनपुरेंच्या कुटुंबात मंत्रिपद आलं नव्हतं. मात्र, प्राजक्त तनपुरेंना पहिल्याच आमदारकीत राज्यमंत्रिपद मिळालं.
 
नगरकडे राष्ट्रवादीनं अधिक लक्ष दिलंय का?
ज्येष्ठ पत्रकार शैलेंद्र तनपुरे सांगतात की, "आशुतोष काळे, नीलेश लंके, रोहित पवार, प्राजक्त तनपुरेंसारख्या नगरमधील नेत्यांना राष्ट्रवादीनं पुढे आणण्याचं कारण म्हणजे, या जिल्ह्यातले पवारसमर्थक मानले गेलेले कोल्हे कुटुंब आणि काँग्रेसमधील विखे कुटुंब भाजपकडे गेलं. त्यामुळे राष्ट्रवादीनं आपला वरचष्मा राखण्यासाठी या तरुण नेत्यांना पुढे आणणं सहाजिक होतं."
 
तर अहमदनगरमधील वरिष्ठ पत्रकार अशोक निंबाळकर सांगतात की, पुण्यानंतर शरद पवारांचं नगरवर विशेष प्रेम दिसून येतं. नगरच्या भूमीवर सहकाराची बिजं पेरली गेली असतील म्हणून असेल किंवा पूर्वी कम्युनिस्टांचं वर्चस्व असलेल्या नगरमध्ये नंतर काँग्रेसनं आपली ताकद राखल्यामुळे असेल, हा जिल्हा आधी कम्युनिस्ट, नंतर काँग्रेसकडे झुकलेला दिसत आलाय."
पण यापुढे जात शैलेंद्र तनपुरे सांगतात की, "नगरमध्ये सध्याचं राजकारण विचारधारा किंवा राजकीय पक्षांपेक्षा कुटुंबाकेंद्रित अधिक झाली आहेत. पक्ष हा दुय्यम मुद्दा बनलाय. थोरात, जगताप, कोल्हे, काळे, तनपुरे अशी कुटुंबं आपापले क्षेत्र राखण्याकडेच झुकलेली दिसून येतात. पक्ष हा मुद्दा या सगळ्यांसाठी दुय्यम ठरत असल्याचं दिसून येतं."
 
ईडीच्या कारवाईचा प्राजक्त तनपुरेंना फटका बसेल का?
ईडीच्या कारवाईनंतर प्राजक्त तनपुरे काहीसे घाबरल्याचे दिसून येतात, कारण त्यांना अशा अडचणींची अद्याप सवय नाही, असं शैलेंद्र तनपुरे सांगतात. मात्र, ते यामुळे मागे पडतील, असं शैलेंद्र तनपुरेंना वाटत नाही.
 
हेच मत वरिष्ठ पत्रकार अनुरिद्ध देवचाके मांडतात. मात्र, ते त्याही पुढे जात म्हणतात की, "आता ज्या प्रकारे ईडीच्या चौकशा होत आहेत, त्या पाहता प्राजक्ता तनपुरेंबाबत कुठलं नेरेटिव्ह तयार होणार नाही. आणि तसंही लोकांनी राजकीय नेत्यांबाबत अशा चौकशा ग्राह्यच धरल्याचं दिसतं."
 
राजकारणात असं होतंच असतं, अशी एक मानसिकता लोकांमध्ये दिसून येते, असं अनिरुद्ध देवचाके म्हणतात.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Paush Month लक्ष्मीचा वास हवा असल्यास पौष महिन्यात घरामध्ये हा शंख स्थापित करावा

कातरवेळ म्हणजे नेमकी कोणती? या दरम्यान काय करावे?

गुरु ग्रहाचे रत्न कोणते? राशीनुसार जाणून घ्या कोणासाठी शुभ

हिवाळ्यात गुळासोबत ही एक गोष्ट खा, आरोग्याला खूप फायदा होईल

Beauty Tips : घरी बनवलेल्या नारळाच्या क्रीमचा उपयोग, त्वचा होईल मऊ

पुढील लेख
Show comments