Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

प्रजासत्ताक दिन ट्रॅक्टर रॅली : शेतकऱ्यांनी कशी केली आहे तयारी?

प्रजासत्ताक दिन ट्रॅक्टर रॅली : शेतकऱ्यांनी कशी केली आहे तयारी?
, मंगळवार, 26 जानेवारी 2021 (08:16 IST)
-खुशहाल लाली
कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी दिल्लीत 26 जानेवारीला शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅलीचं आयोजन केलं आहे. दिल्लीत सव्वा लाख ट्रॅक्टर या रॅलीसाठी येणार असल्याचा अंदाज आहे. दिल्लीच्या परिघात ही रॅली होणार आहे. दोन दिवस ही रॅली चालणार असल्याचं शेतकरी नेते सांगत आहेत.
 
पंजाबमध्ये काही शेतकरी असे आहेत ज्यांच्याकडे एकहून अधिक ट्रॅक्टर आहेत. ते आपले सर्व ट्रॅक्टर या रॅलीसाठी घेऊन येत आहेत.
 
पंजाबच्या जालंधर जिल्ह्यातील पधियाना गावातील शेतकरी अमरजीत सिंह बैन्स यांनी त्यांचे तीन ट्रॅक्टर या रॅलीसाठी पाठवले आहेत.
 
बैंस यांच्याकडे सात ट्रॅक्टर, चार कार आणि जीप आहे. मात्र दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला मदत करण्यासाठी त्यांनी आपले चार ट्रॅक्टर आणि दोन इतरं वाहनं विकली.
 
बीबीसी पंजाबीशी बोलताना त्यांनी म्हटलं, "माझी शेती 20 हेक्टरच आहे, पण ट्रॅक्टरची मला आवड आहे. माझ्याकडे एकाच कंपनीचे वेगवेगळ्या मॉडेलचे ट्रॅक्टर आहेत. ही माझी आवड होती, पण आता संघर्ष ही माझी प्राथमिकता आहे.
 
अमरजीत सिंह यांचं उदाहरण हे कृषी कायद्याचा विरोध करत असलेल्या शेतकऱ्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी पुरेसं आहे.
 
पधियाना प्रमाणे पंजाबच्या इतर गावातूनही अशी उदाहरणं पाहायला मिळतील. शेतकरी ट्रॅक्टर परेडची तयारी कशी करत आहेत, हे त्यातून दिसून येतं.
 
दिल्लीला किती ट्रॅक्टर येणार आहेत?
शेतकरी नेते राजिंदर सिंह दीपसिंहवाला यांनी बीबीसी पंजाबीशी बोलताना म्हटलं की, ट्रॅक्टरची नेमकी संख्या सांगणं अवघड आहे, कारण शेतकरी संघटनांशी संबंधित नसलेले शेतकरीही मोठ्या संख्येनं दिल्लीला येत आहेत.
 
आपल्याला मिळालेलया माहितीनुसार अमृतसर-दिल्ली राष्ट्रीय महामार्गावर दोन रांगा करून येणाऱ्य ट्रॅक्टरची लाइन ही अंबालापासून लुधियानापर्यंत लागली होती, असा दावा शेतकरी नेते बलदेव सिंह सिरसा यांनी माध्यमांशी बोलताना केला.
 
भारतीय शेतकरी संघटना दोआबाचे महासचिव सतनाम सिंह साहनी यांनी म्हटलं की, 23 जानेवारीला फगवाडा सब- डिव्हिजनकडून 2500 ट्रॅक्टर पाठविण्यात आले आहेत. दोआबा जालंधर, होशियारपूर, कपूरथला आणि शहीद भगतसिंह नगर इथून आधीच दोन हजार ट्रॅक्टर निघाले आहेत.
 
बलजित सिंह संघा यांनी दिलेल्या माहितीनुसार काला संघिया शहरातून 25 ट्रॅक्टर रवाना झाले आहेत, जे किसान परेडमध्ये सहभागी होतील.
 
भारतीय किसान युनियन (एकता-उग्राहां) राज्य महासचिव सुखदेव सिंह कोकरी यांनी सांगितलं की, आम्ही शेतकऱ्यांना सकाळी 11 वाजता दिल्लीला जाण्यासाठी डबवाली आणि खनौरी इथं जमायला सांगितलं होतं, मात्र शेतकरी सकाळी आठ वाजताच दिल्लीसाठी रवाना झाले.
 
भारतीय किसान युनियन (एकता-उग्राहां)नं 30 हजार ट्रॅक्टर दिल्लीला पाठवले आहेत. 200 ते 300 ट्रॅक्टर्सचे छोटे-छोटे गटही पंजाबची सीमा ओलांडून दिल्लीकडे येत आहेत.
 
अखिल भारतीय किसान सभेचे नेते सुखजिंदर महेसरी यांनी दिलेल्या माहितीनुसार मोगा, फरीदकोट, फिरोजपूर, फाजिल्का, श्री मुक्तसर साहिब, मानसा आणि बठिंडा जिल्ह्यातून 50-50 ट्रॅक्टरचे गट दिल्लीला रवाना झाले आहेत.
 
जालंधरमधील दोआबा किसान संघर्ष समितीचे जिल्हा अध्यक्ष हर्षिलंदर सिंह यांनी संघटनेनं 700 ट्रॅक्टर पाठवल्याचं म्हटलं आहे. 23 जानेवारीला 300 ट्रॅक्टर पाठवण्यात आले होते आणि उरलेले दोन दिवसांत पाठवल्याचं त्यांनी सांगितलं.
 
हरियाणा पंजाब एकता मंचाचे अध्यक्ष सतीश राणा यांनी हरियाणातून दोन लाख ट्रॅक्टर रॅलीत सहभागी होतील अशी माहिती बीबीसीशी बोलताना दिली. हे ट्रॅक्टर शिस्तीत दिल्लीत पोहोचावेत आणि शेतकऱ्यांच्या खाण्या-पिण्याची तसंच इतर खर्चांची योग्य सोय व्हावी यासाठी खाप पंचायती प्रयत्न करत असल्याचं राणा यांनी सांगितलं.
 
प्रत्येक संघटना स्वतःचे आकडे सांगत आहे आणि संघटनेच्या बाहेरचेही खूप लोक ट्रॅक्टर मार्चमध्ये सहभागी होत आहेत. त्यामुळे नेमका आकडा सांगता येणं कठीण आहे.
 
ट्रॅक्टर कसे तयार केले गेले आहेत?
एखाद्या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी तयारी करावी, त्यापद्धतीने शेतकऱ्यांनी आपापले ट्रॅक्टर बनवून घेतले आहेत. जालंधर दोआबाच्या किसान संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष हर्षिलेंदर सिंह यांनी म्हटलं की, त्यांच्या भागातून जे ट्रॅक्टर दिल्लीला आले आहेत त्यामध्ये असेही काही ट्रॅक्टर आहेत, ज्यामध्ये ट्रकचं इंजिन लावलं गेलं आहे. या ट्रॅक्टरची किंमत आठ लाख रुपये आहे आणि त्यावर आठ लाख रुपये खर्च झाला आहे.
 
जीराच्या एका मॅकेनिकनं रिमोट कंट्रोलच्या मदतीनं एक ट्रॅक्टर डिझाइन केला आहे. हा ट्रॅक्टर ड्रायव्हरशिवाय काही किलोमीटरपर्यंत चालवला जाऊ शकतो.
 
अनेक ट्रॅक्टरवर लोखंडाचे बॉक्स लावले आहेत, जेणेकरून पाण्याचे फवारे, अश्रूधूर किंवा लाठीचार्ज झाला तर बचाव करता येईल. सोशल मीडियावर अनेक व्हीडिओ व्हायरल होत आहे, ज्यात शेतकरी ट्रॅक्टर सजवताना दिसत आहेत.
 
ट्रॅक्टरांची क्षमता वाढविण्यात आली आहे. त्यांना क्रेनप्रमाणे बनवलं गेलंय.
 
एखाद्या युद्धभूमीवर जायचं असल्याप्रमाणे ट्रॅक्टर तयार करण्यात आले असले, तरी शेतकरी संघटनेचे नेते वारंवार हे आंदोलन अहिंसा आणि शांततापूर्ण मार्गानंच होईल, असं सांगत आहेत.
 
शेतकरी नेते बलबीर सिंह राजेवल यांनी शेतकऱ्यांना आवाहन केलं आहे की, कोणीही भडकविण्याचा प्रयत्न केला तरी शांत राहा आणि विघातक प्रवृत्तीचं कोणी मोर्चात नाही ना, याकडे लक्ष ठेवा.
 
शेतकऱ्यांचे झेंडे आणि चित्ररथ
प्रजासत्ताक दिनाला राजपथावर होणाऱ्या परेडमध्ये ज्याप्रमाणे वेगवेगळ्या राज्यांचे चित्ररथ सहभागी होतात, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीतही चित्ररथ असतील. हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशच्या धार्मिक आणि सामाजिक संस्कृतीचं दर्शन घडवणारे चित्ररथ या ट्रॅक्टर रॅलीत असतील. यासोबतच शेतकऱ्यांचं जीवन कसं असतं हे दाखवणारा चित्ररथही या रॅलीत असेल.
 
पीटीआय या वृत्तसंस्थेनं संयुक्त किसान मोर्चाच्या हवाल्यानं म्हटलं आहे की, जर ट्रॅक्टर परेडमध्ये एक लाख ट्रॅक्टर सहभागी झाले असतील, तर त्यांपैकी 30 टक्के ट्रॅक्टरवर चित्ररथ असतील.
 
या रॅलीत शेतकरी संघटनांच्या झेंड्यांसोबतच तिरंगा, खालसा प्रतीक आणि लाल झेंड्यांसह इतर झेंडेही पाहायला मिळतील. शेतकरी नेते राजिंदर सिंह यांनी म्हटलं आहे की, प्रत्येक संघटनेला त्यांच्या विचारधारेप्रमाणे झेंडा लावण्यचं स्वातंत्र्य आहे.
 
दिल्लीला जाणाऱ्यांसाठी व्यवस्था
अपेक्षेपेक्षा जास्त शेतकरी आपापले ट्रॅक्टर घेऊन दिल्लीला जात आहेत. जे शेतकरी संघटनेशी संबंधित नाहीयेत, ते पण ट्रॅक्टर रॅलीसाठी दिल्लीला जात आहेत.
 
उत्तर प्रदेशमधून शेतकऱ्यांना दिल्लीला जाण्यापासून रोखण्यासाठी पेट्रोल पंपाच्या मालकांना शेतकऱ्यांच्या ट्रकमध्ये इंधन न भरण्याची सूचना करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. दुसरीकडे पंजाब आणि हरियाणातल्या ग्रामस्थांनी दिल्लीला जाणाऱ्या शेतकऱ्यांसाठी इंधन आणि खाण्या-पिण्याचं सामान दिलं आहे.
 
कंडी किसान संघर्ष समितीचे उपाध्यक्ष जरनैल सिंह गढदीवाल यांनी सांगितलं की, एका ट्रॅक्टरमध्ये 15 हजारांचं डीझेल लागतं. सर्व व्यवस्था लोकच करतात. 'जेव्हा गोष्ट तुमच्या आत्मसन्माची असेल, तर आंदोलनासाठी कोणाच्याही बोलावण्याची वाट पाहिली जात नाही,' असं शेतकरी म्हणत आहेत.
 
ही रॅली शांततापूर्ण पद्धतीनं पार पाडण्यासाठी 2500 स्वयंसेवक तैनात करण्यात आले आहेत. त्यांना बॅच आणि आयडी कार्डही देण्यात आले आहेत. संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी माजी सैनिकांना विशेष जबाबदारी देण्यात आली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शरद पवार शेतकरी आंदोलनाचा चेहरा बनण्याचा प्रयत्न करत आहेत?