Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ऋषी सुनक : बँकर ते पंतप्रधान, भारतीय वंशाच्या व्यक्तीची सर्वोच्च पदी झेप

Webdunia
मंगळवार, 25 ऑक्टोबर 2022 (00:28 IST)
- जाह्नवी मुळे
कन्झर्व्हेटिव्ह पार्टीचे संसदेतील सदस्य ऋषी सुनक हे युकेचे नवे पंतप्रधान होणार आहेत. ऋषी सुनक हे भारतीय वंशाचे पहिले युकेचे पंतप्रधान असतील
 
युनायटेड किंगडमचे मावळते पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांच्या मंत्रीमंडळात सुनक हे अर्थमंत्री होते. पण जॉन्सन यांना राजीनामा द्यावा लागल्यानंतर दिल्यानंतर त्यांच्या कॉन्झर्वेटिव्ह पक्षाचं आणि देशाचं नेतृत्व करण्यासाठी चुरस सुरू झाली होती.
 
सुनक त्यात सुरुवातीपासून आघाडीवर होते. मात्र, लिझ ट्रस यांनी या शर्यतीत बाजी मारली. मात्र, लिझ ट्रस यांनी आणलेली नवी कर प्रणाली वादात सापडल्यानंतर त्यांना त्यांच्याच पक्षातून विरोध सहन करावा लागला होता. त्यानंतर त्यांनीही राजीनामा दिला.
 
मग पुन्हा एकदा ऋषी सुनक पंतप्रधानपदाच्या शर्यतीत उतरले. यावेळच्या शर्यतीतून आधी यूकेच्या पंतप्रधान पदाच्या शर्यतीतून बोरिस जॉन्सन यांनी माघार घेतली, त्यानंतर कॅबिनेट मंत्री पेनी मोरडाऊंट यांनीही माघार घेतली. त्यामुळे ऋषी सुनक यांची पंतप्रधानपदी बिनविरोध निवड झाली.
 
ऋषी सुनक यांची आजवरची वाटचाल कशी होती? हे जाणून घेऊया. घेण्याआधी मुळात ब्रिटिश पंतप्रधानांची निवड कशी होते, त्याची माहिती करून घेऊयात.
 
ब्रिटनचे पंतप्रधान कसे निवडले जातात?
जगातली एक महत्त्वाची अर्थव्यवस्था आणि भारताशी असलेलं ऐतिहासिक-सांस्कृतिक नातं यांमुळे युकेमधल्या निवडणुकांविषयी भारतातही एरवी उत्सुकता असते. पण युकेचा पंतप्रधान होण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत?
 
भारतात जसं लिखित राज्यघटना किंवा संविधान आहे, तसं युकेमध्ये नाही. पण तिथेही पंतप्रधान होण्यासाठी आधी तुम्ही खासदार असणं आवश्यक असतं. युकेमध्ये खासदारकीसाठी निवडणूक कोण लढवू शकतं? याविषयीची माहिती त्यांच्या संसदेच्या वेबसाईटवर दिली आहे.
 
त्यानुसार, खासदारकीसाठी पात्रता अशी ठरते:
 
उमेदवाराचं वय 18 वर्ष पूर्ण असायला हवं.
तो किंवा ती ब्रिटिश नागरिक असायला हवा म्हणजे इंग्लड-स्कॉटलंड-वेल्स-नॉर्दन आयर्लंडचा नागरिक असायला हवा.
रिपब्लिक ऑफ आयर्लंड तसंच कॉमनवेल्थ देशांचे नागरिक असलेली व्यक्तीही ब्रिटनच्या खासदारकीची निवडणूक लढवू शकते. पण त्यांच्याकडे युकेमध्ये अनिश्चित काळासाठी राहण्याची परवानगी असायला हवी.
या व्यक्तीचा जन्म युके किंवा कॉमनवेल्थमध्येच झालेला असावा, अशी सक्ती मात्र नाही.
त्यामुळेच न्यूयॉर्कमध्ये जन्मलेले बोरीस जॉन्सन युकेचे पंतप्रधान बनू शकले.
 
युकेमध्ये संसदेच्या खालच्या सभागृहात म्हणजे हाऊस ऑफ कॉमन्समध्ये ज्या पक्षाचे किंवा आघाडीचे सर्वाधिक खासदार असतात, त्यांचा नेता पंतप्रधान बनू शकतो. पक्षाचा नेता निवडण्याची प्रत्येक पक्षाची पद्धत मात्र वेग वेगळी असू शकते.
 
2019 च्या निवडणुकांमध्ये कॉन्झर्वेटिव्ह म्हणजे हुजूर पक्षाचा विजय झाला होता. हा पक्ष टोरी या टोपण नावानंही ओळखला जातो आणि सध्या त्यांच्याकडेच बहुमत आहे. 2019 साली बोरीस जॉन्सन यांच्याकडे पक्षाचं नेतृत्त्व होतं, पण त्यांच्या राजीनाम्यानंतर नवा पक्षनेता निवडण्याची प्रक्रीया सुरू आहे. त्यासाठी पक्षांतर्गत निवडणूक घेतली जाते आहे.
 
कॉन्झर्वेटिव्ह पक्षनेतेपदासाठी पक्षातल्या किमान 20 खासदारांचा पाठिंबा असलेले उमेदवार उभे राहू शकतात. यंदा सुरुवातीला ऋषी सुनक यांच्यासह पेनी मॉरडंट, लिझ ट्रुस, सुएला ब्रेव्हरमन, केमी बाडनोक, टॉम टुगेंडेट, नदीम झहावी, जेरेमी हंट असे आठजण शर्यतीत होते.
 
एक एक टप्प्यानंतर यातले कमी मतं मिळालेले उमेदवार गळत जातात. मग अंतिम दोन उमेदवारांतून पक्षनेता निवडण्यासाठी देशभरातले पक्षाचे नोंदणीकृत सदस्य मतदान करतात. सध्या या पक्षात एकूण 1,60,000 पेक्षा जास्त सदस्य आहेत.
 
पाच सप्टेंबरपर्यंत या पक्षांतर्गत निवडणुकीचा निकाल लागणं आणि नव्या नेत्याची निवड होणं अपेक्षित आहे आणि तोवर बोरीस जॉन्सन हंगामी पंतप्रधानपद सांभाळत आहेत.
 
ऋषी सुनक कोण आहेत?
ऋषी सुनक यांचा जन्म इंग्लंजच्या साऊदम्पटनमध्ये झाला होता. त्यांच्या रूपानं पहिल्यांदाच एक भारतीय आणि दक्षिण आशियाई वंशाचा खासदार युकेच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आहे.
 
सुनक यांचे वडील यशवीर केनियातून तर आई उषा टांझानियातून ब्रिटनला येऊन स्थायिक झाली होती. पण ते मूळचे ब्रिटिशकालीन भारतातल्या पंजाब प्रांतातले आहेत. यशवीर डॉक्टर होते आणि उषा फार्मसी चालवायच्या. पण ऋषी सुनक फायनान्स आणि गुंतवणूक क्षेत्राकडे वळले.
 
त्यांनी विंचेस्टर कॉलेज या खाजगी शाळेतून शालेय शिक्षण घेतलं. त्यानंतर ऑक्सफोर्ड विद्यापीठातून तत्त्वज्ञान (फिलॉसॉफी), राजकारण (पॉलिटिक्स) आणि अर्थशास्त्रात (इकॉनॉमिक्स) उच्च शिक्षण घेतलं. त्यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून एमबीएचं शिक्षण घेतलं.
 
सुनक यांनी गोल्डमन सॅक्स या इन्व्हेस्टमेंट बँकेसाठी विश्लेषक म्हणून कामही केलं होतं. त्यानंतर स्वतःच्या गुंतवणूक कंपन्याही काढल्या.
 
ऋषी सुनक यांच्या वेबसाईटनुसार फिट राहण्यासोबतच त्यांना क्रिकेट, फुटबॉल आणि सिनेमे बघायला आवडतं.
 
राजकारणात त्यांचा प्रवेश तसा अलीकडचाच. 2014 साली ते रिचमंड (यॉर्क्स) मतदारसंघातून संसंदेवर निवडून गेले. 2017 आणि 2019 सालच्या निवडणुकांमध्येही त्यांनी ही जागा यशस्वीपणे लढवली आणि वेगानं अर्थमंत्री (चॅन्सेलर ऑफ एक्सचेकर) पदापर्यंत प्रवास केला.
 
अर्थ मंत्रीपद हे ब्रिटिश सरकारमध्ये दुसरं महत्त्वाचं पद मानलं जातं. ऋषी सुनक अशा महत्त्वाच्या पदी पोचणारे पहिले भारतीय वंशाचे राजकारणी आहेत.
 
ऋषी सुनक यांनी युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याच्या बाजूने प्रचार केला होता. कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाचे उदयोन्मुख नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं.
 
इतिहास रचला
2008 मध्ये बराक ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले होते. अगदी त्याच पद्धतीने ऋषी सुनक यांची ब्रिटनच्या पंतप्रधान पदी निवड झालीय. आणि त्यांच्यासाठी हा ऐतिहासिक क्षण असल्याचं बऱ्याच तज्ञांना वाटतं. ऋषी सुनक यांच्या आधी दक्षिण आशियाई वंशाचे बरेच नेते सर्वोच्च पदांवर बसलेत. यात प्रिती पटेल ब्रिटनच्या गृहमंत्री बनल्या, तर सादिक खान लंडनचे महापौर बनले.
 
मात्र आजवर कोणीही पंतप्रधान पदाच्या शर्यतीत नव्हतं. राजकीय तज्ञांच्या मते, ऋषी सुनक यांना मिळालेलं यश आशियाई समुदायांच्या यशाशी निगडीत आहे. तसेच सुनक यांचा उदय ब्रिटीश समाजात असलेलं वैविध्य दाखवून देतो.
 
डॉ. नीलम रैना या मिडलसेक्स विद्यापीठात शिकवतात. त्या सांगतात, "इथल्या संसदेत भारताच्या तुलनेत धार्मिक आणि वांशिक अल्पसंख्याक समुदायांना जास्त प्रतिनिधित्व दिलं जातं. पण सुनक हे आशियाई समुदायातून येतात, त्यामुळे ही ऐतिहासिक गोष्ट आहे."
 
ऋषी हे भारतीय वंशाच्या तिसऱ्या पिढीचं प्रतिनिधित्व करतात. सुनक यांचे आजी-आजोबा फाळणीपूर्व भारतातील पंजाबच्या गुजरांवाला शहरातून आफ्रिकेत स्थलांतरित झाले. आज हे शहर पाकिस्तानात आहे. त्यानंतर त्यांचे आजी आजोबा इंग्लंडमधील साउथम्प्टन शहरात येऊन स्थायिक झाले. ऋषी सुनक यांचा जन्म इथंच 1980 सालात झाला. ते याच शहरात वाढले.
 
ब्रिटनमधील सर्वात श्रीमंतांमध्ये गणती
ऋषी सुनक हे खूप श्रीमंत आहेत असं ब्रिटनच्या लोकांना वाटतं. आणि कदाचित याच कारणामुळे ते लोकांपासून दुरावत गेले. नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणानुसार ब्रिटनमधील 250 श्रीमंत कुटुंबांमध्ये सुनक यांचा नंबर लागतो. पण ते जन्मजात श्रीमंत आहेत का?
 
तर याची माहिती साउथॅम्प्टनमध्येच मिळू शकते. कारण सुनक तिथंच वाढले. आम्ही तिथल्या काही लोकांना भेटलो जे सुनक यांना लहानपणापासून ओळखतात. आजही सुनक त्यांच्या संपर्कात आहेत.
 
साउथॅम्प्टनमध्ये हिंदू समुदायाचं वैदिक सोसायटी टेम्पल नावाचं खूप मोठं मंदिर आहे. या मंदिराच्या संस्थापकांमध्ये ऋषी सुनक यांच्या कुटुंबातील सदस्यांचा समावेश आहे. याच मंदिराच्या अवती भोवती ऋषी सुनक यांचं बालपण गेलं.
 
75 वर्षांचे नरेश सोनचाटला ऋषी सुनक यांना लहानपणापासून ओळखतात. ते सांगतात, "ऋषी जेव्हा लहान होता तेव्हा या मंदिरात यायचा. त्याच्यासोबत त्याचे आई वडील, आजी आजोबा असायचे."
 
कॉर्पोरेट क्षेत्रात महत्वाच्या पदावर काम करणारे संजय चंदराणा वैदिक सोसायटी हिंदू मंदिरचेही अध्यक्ष आहेत. मागच्या महिन्यात ऋषी सुनक यांनी मंदिराला भेट दिली तेव्हा ते सुनक यांना भेटले. सुनक यांनी मंदिरातल्या सर्व लोकांची भेट घेतली.
 
तेव्हाची आठवण सांगताना संजय सांगतात, "ते रोट्या बनवत होते. त्यांच्या रोट्या गोलाकार येत होत्या म्हणून मी त्यांना विचारलं घरी पण तुम्हीच स्वयंपाक करता का? तर ते म्हटले, हो मला स्वयंपाक करायला आवडतं. मग मी त्यांना विचारलं की, तुम्ही बाल विकासचे विद्यार्थी आहात, तर इथल्या बालविकासच्या मुलांना भेटायला तुम्हाला आवडेल का? यावर त्यांनी हो म्हटलं आणि आम्ही तिकडे गेलो."
 
ऋषी सुनक यांचे वडील यशवीर सुनक डॉक्टर आहेत तर आई उषा सुनक या केमिस्टचे दुकान चालवायच्या. ते आजही साउथॅम्प्टनमध्येच राहतात. सुनक यांचं कुटुंब धार्मिक आहे. त्यांच्या कुटुंबात शिक्षण आणि करिअरला जास्त महत्व देतात. म्हणून त्यांच्या वडिलांनी सुनक यांना एका प्रायव्हेट शाळेत शिकवलं.
 
कोणत्या वादांमुळे सुनक चर्चेत आले होते?
कोव्हिडच्या साथीच्या सुरुवातीला सुनक यांच्या लोकप्रियतेचा आलेख चढता राहिला. पण काहीवेळा त्यांच्या धोरणांवर टीकाही झाली. सुनक यांचं नाव वादातही सापडलं होतं.
 
स्टॅनफर्ड विद्यापीठात शिकत असताना सुनक यांची अक्षता मूर्ती यांच्याशी ओळख झाली. अक्षता ही भारतीय उद्योगपती नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांची कन्या आहे. अक्षता यांनी लग्नानंतर आपलं नागरिकत्व बदललेलं नाही आणि त्या युकेच्या कायमस्वरूपी रहिवासी नाहीत. टॅक्स चुकवण्यासाठी त्यांनी असं केलं असल्याची टीका झाली, पण अक्षता यांनी त्यानंतर कर भरण्यास सहमती देत त्या वादावर पडदा टाकला.
 
सुनक अर्थमंत्री पदावर असताना काही काळ त्यांच्याकडे ग्रीनकार्डही म्हणजे अमेरिकेतला स्थायी रहिवासी दाखला होता असंही समोर आलं, ज्यावर काहींनी आक्षेप घेतला होता.

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

पुढील लेख
Show comments