Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जळगावमध्ये शिवसेनेचा महापौर, भाजपला धक्का

जळगावमध्ये शिवसेनेचा महापौर, भाजपला धक्का
, गुरूवार, 18 मार्च 2021 (15:43 IST)
जळगावच्या महापौर पदाच्या निवडणुकीत शिवसेनेनं भाजपचा पराभव केला आहे.
 
शिवसेनेच्या जयश्री महाजन यांची महापौरपदी निवड झाली आहे.
 
शिवसेना नेते आणि मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, "जळगाव महानगरपालिकेच्या महापौरपदी निवड झालेल्या शिवसेनेच्या जयश्रीताई महाजन, तसंच उपमहापौरपदी निवड झालेले कुलभूषण पाटील जी यांचं मनापासून अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा."
 
तर शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी म्हटलं, "जळगावमध्ये युती करतो म्हणून भाजपनं आमच्याशी वार्ता केलेली होती. पण त्यांनी आमच्या नेत्याचा शब्द फिरवला. आजचा निकाल म्हणजे भाजपसाठी 'टांगा पलटी, घोडे फरार' असं आहे. आज शिवसेनेनं विजयाचा तुरा महापालिकेवर रोवण्याचं काम केलं आहे."
 
आज जळगाव महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी ऑनलाईन पद्धतीनं मतदान झालं. काही नगरसेवकांनी ठाणे, मुंबई येथून मतदान केलं.
भाजपचे नगरसेवक शिवसेनेत
जळगाव महापौर आणि उपमहापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापलं होतं. कारण ऐन निवडणुकीच्या आधी भाजपचे तब्बल 24 नगरसेवक नॉट रिचेबल म्हणजेच संपर्कात नसल्याचं समोर आलं होतं.
 
महत्त्वाचे म्हणजे भाजपकडून व्हिप जारी करण्याआधीच नगरसेवक अज्ञातस्थळी रवाना झाले होते. त्यामुळे शिवसेनेने भाजपचे नगरसेवक पळवल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
 
नेमकं प्रकरण काय आहे?
 
2014 मध्ये देवेंद्र फडणवीस सरकार येईपर्यंत जळगाव महानगरपालिकेवर सुरेश जैन यांच्या गटाचे वर्चस्व होतं. पण तत्कालीन फडणवीस सरकारच्या वेळेस पालिकेवर भाजपची सत्ता आली.
 
75 पैकी 57 जागा भाजपने जिंकल्या. दोन टर्ममध्ये भाजपचा महपौर असेल असं ठरल्याने महापौर भारती सोनावणे यांचा कार्यकाळ 17 मार्च रोजी संपणार आहे. तेव्हा दुसऱ्या टर्मच्या महापौर पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. ही निवडणूक 18 मार्च रोजी होईल असं ठरलं. पण त्याआधीच भाजपचे 24 नगरसेवक अज्ञातस्थळी रवाना झाल्याच्या बातम्या आल्या.
 
'नगरसेवक आमच्या संपर्कात'
ऐन महापौर निवडीआधी भाजपचे तब्बल 24 नगरसेवक संपर्कात नसल्याने भाजपचे महापौरपद धोक्यात आलं होतं.
जळगाव महानगरपालिकेत महापौर निवडीसाठी 38 मतांची गरज होती.
 
शिवसेनेचे 15 नगरसेवक आहेत. एमआयएमचे 3 नगरसेवक आहेत. भाजपचे 57 नगरसेवक असून यापैकी 24 नॉट रिचेबल होते.
 
दुसऱ्या बाजूला शिवसेनेने मात्र भाजपचे 20 हून अधिक नगरसेवक आपल्या संपर्कात असल्याचा दावा केला होता.
 
शिवसेनेचे नगरसेवक जय उर्फ बंटी जोशी यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं होतं, "आम्ही कोणाचेही नगरसेवक पळवले नाहीत. ते स्वत: आमच्याकडे आले आहेत. 20 हून अधिक नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत. ते सध्या जिल्ह्याच्या बाहेर आहेत. 18 तारखेला ते शिवसेनेच्या बाजूने मतदान करतील."
 
"शिवसेनेचाच महापौर होईल. यासाठी 38 नगरसेवकांची आवश्यकता आहे. आमचे 15 नगरसेवक असून एमआयएमचे तीन नगरसेवक आमच्यासोबत आहेत. शिवाय, भाजपचे 20 हून अधिक नगरसेवक आमच्यासोबत आहेत," असंही जय जोशी यांनी सांगितलं होतं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोरोना: पुणे जिल्हा पुन्हा कोरोनाचा हॉटस्पॉट होतोय का?