Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चीनी सायबर हल्ल्यामुळेच मुंबईमध्ये 12 ऑक्टोबरला लाईट गेले होते?

Webdunia
सोमवार, 1 मार्च 2021 (17:08 IST)
गेल्यावर्षी 12 ऑक्टोबरला मुंबई आणि उपनगरातला वीजपुरवठा काही तासांसाठी ठप्प झाला होता. ही तांत्रिक समस्या नव्हती, तर चीननं भारतावर केलेला सायबर हल्ला होता, असा दावा न्यू यॉर्क टाइम्स या वृत्तपत्रातील एका बातमीत करण्यात आला आहे.
 
जून 2020 मध्ये गलवान खोऱ्यात भारतीय आणि चिनी सैनिकांदरम्यान हिंसक झटापट झाली होती. त्यानंतर चारच महिन्यात मुंबईतला वीजपुरवठा ठप्प झाला होता.
 
महापारेषणच्या 400 KVच्या कळवा-पडघा GIS केंद्रात सर्किट-1ची देखभाल-दुरुस्ती सुरू होती. यावेळी सर्व भार सर्किट-2 वर होता. मात्र सर्किट-2 मध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबई आणि ठाण्यातील बहुतांश भागांमध्ये वीज गेली होती.
 
कोरोना काळात वीजपुरवठा बंद झाल्यामुळे हॉस्पिटल्सवर प्रचंड ताण आला होता. लोकल ट्रेनही बंद पडल्या होत्या.
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी या घटनेच्या चौकशीचेही आदेश दिले होते.
 
आता न्यूयॉर्क टाइम्सनं दिलेल्या बातमीनुसार ही घटना चीनकडून नियोजित केल्या गेलेल्या एका सायबर हल्ल्याचा भाग होती. भारतातील पॉवर ग्रिड ठप्प करणं हा या हल्ल्यामागचा उद्देश होता. गलवानमध्ये भारताकडून अधिक तीव्र हालचाल झाली तर संपूर्ण देशात पॉवर कट घडवून आणण्याचीही चीनची योजना होती.
 
अमेरिकन सायबर फर्म रेकॉर्डेड फ्युचरनं चिनी सायबर हल्ल्याचा खुलासा केला आहे. अर्थात, चीनचे बहुतांश मालवेअर सक्रीय झालेच नसल्याचंही रेकॉर्डेड फ्युचरच्या अभ्यासातून समोर आलं आहे.
 
रेकॉर्डेड फ्युचरचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर स्टुअर्ट सोलोमन यांनी स्पष्ट केलं की चिनी कंपनी रेड इकोनं सायबर हल्ल्याच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेऊन एक डझनहून अधिक पॉवर ग्रिड कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला होता.
 
महाराष्ट्र सरकारनं न्यूयॉर्क टाइम्समधील बातमीची दखल घेतली असून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सायबर विभागाकडून त्यासंबंधीचा अहवाल मागवला आहे, असं वृत्त एएनआयनं दिलं आहे.
 
नेमकं काय घडलं होतं?
12 ऑक्टोबर 2020 सकाळीच मुंबई शहरातल्या बहुतेक भागातली वीज गायब झाली होती. 10 वाजून 15 मिनिटांनी वीज पुरवठा बिघाडाच्या या प्रकरणाची नोंद शहराला वीज पुरवठा करणाऱ्या बाँबे इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट या कंपनीने घेतली होती.
 
तोपर्यंत मुंबई महानगर, पश्चिम आणि मध्य उपनगरं त्याचबरोबर ठाणे, डोंबिवली, कल्याण, भिवंडी या शहरांपर्यंत वीज पुरवठा खंडित झालेला होता आणि त्याचा फटका उपनगरी रेल्वेसेवा, शहरातील अत्यावश्यक सेवा, रस्त्यांवरील सिग्नल यंत्रणेलाही बसला होता.
 
पुढच्या दोन तासांमध्ये वीज पुरवठा पुन्हा सुरू करण्यात महावितरणला यश आलं. पण, मुंबईसारख्या औद्योगिक राजधानीत घडलेल्या या प्रकारामुळे काही तास सगळ्याच यंत्रणेचा गोंधळ उडाला होता.
 
महापारेषणच्या 400 KVच्या कळवा-पडघा GIS केंद्रात सर्किट 1ची देखभाल-दुरुस्ती सुरू होती. यावेळी सर्व भार सर्किट 2 वर होता. मात्र सर्किट 2 मध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबई आणि ठाण्यातील बहुतांश भागांमध्ये वीज गेली होती.
 
मुंबईला वीज पुरवठा कोण करतं?
मुंबई ही औद्योगिक राजधानी असल्यामुळे इथली विजेची औद्योगिक मागणीही मोठी आहे. त्यासाठीच 1873 साली मुंबईत बाँबे इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट या नावाने एक कंपनी स्थापन करण्यात आली.
 
मुंबईला अखंड विद्युत पुरवठा करणं आणि शहराअंतर्गत वाहतूक सेवा चालवणं हे तिचं मुख्य काम होतं. आताही शहरातील साडे दहा लाख घर आणि कार्यालयांना हीच कंपनी वीज पुरवठा करते.
 
पण, मुंबई शहर जसं विस्तारलं आणि उपनगरांची वाढ होत गेली तेव्हा विजेच्या वाढत्या मागणीसाठी सरकारी बरोबरच खाजगी कंपन्यांकडून वीज निर्मिती आणि पुरवठा वाढवण्याची गरज निर्माण झाली.
 
त्यातूनच 1990च्या दशकापासून मुंबई शहर आणि उपनगरांना वीज पुरवठा करण्यासाठी टाटा पॉवर, रिलायन्स या कंपन्यांशी करार करण्यात आले. यातील रिलायन्स कंपनीने आपला मुंबई शहराला करत असलेला वीज पुरवठा अलीकडेच म्हणजे 2018 मध्ये अदानी पॉवर या कंपनीला विकला आहे.
 
थोडक्यात म्हणजे या घडीला दक्षिण मुंबईत बेस्ट, पश्चिम आणि मध्य मुंबईत टाटा तसंच अदानी पॉवर या कंपन्यांकडून पुरवठा होतो. टाटा पॉवर कंपनी एक हजार मेगावॅट वीज निर्मिती करते जिचा पुरवठा ग्राहकांना आणि खासकरून शहरातली व्यापारी संकुल, कार्यालयं यांना होतो.
 
तर अदानी एनर्जी ही कंपनी मुंबई जवळ डहाणू इथं पाचशे मेगावॅट इतकी वीजनिर्मिती करते आणि तिचा पुरवठा घरगुती ग्राहकांना आणि व्यापारी कामांसाठीही होतो.
 
अशा पद्धतीने मुंबई शहराची विजेची गरज भागवण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून होतो.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Paush Month लक्ष्मीचा वास हवा असल्यास पौष महिन्यात घरामध्ये हा शंख स्थापित करावा

कातरवेळ म्हणजे नेमकी कोणती? या दरम्यान काय करावे?

गुरु ग्रहाचे रत्न कोणते? राशीनुसार जाणून घ्या कोणासाठी शुभ

हिवाळ्यात गुळासोबत ही एक गोष्ट खा, आरोग्याला खूप फायदा होईल

Beauty Tips : घरी बनवलेल्या नारळाच्या क्रीमचा उपयोग, त्वचा होईल मऊ

पुढील लेख
Show comments