Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांच्याबाबत मवाळ भूमिका का घेतली होती?

Webdunia
शुक्रवार, 22 जानेवारी 2021 (23:05 IST)
महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंडे यांच्यावर करण्यात आलेला बलात्काराचा आरोप तक्रारदार महिलेने मागे घेतलाय.
 
मुंडेंवर बलात्काराचा आरोप झाल्यानंतर भाजपमध्ये दोन गट तयार झालेले पाहायला मिळाले. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राजीनाम्याची मागणी केली. तर, मुलांची माहिती लपवली म्हणून किरीट सोमय्यांनी निवडणूक आयोगात तक्रार केली.
 
एकीकडे भाजप नेते मुंडेंविरोधात आक्रमक भूमिका घेताना दिसत होते. मात्र, दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी "पोलिसांनी तात्काळ सत्य समोर आणलं पाहिजे" अशी वेगळीच भूमिका घेतली.
 
भाजपचे नेते मुंडे विरोधात आक्रमक होत असताना, फडणवीसांनी संयमाची भूमिका घेण्याचं कारण काय? हे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
 
मुंडे-फडणवीस मैत्री जगजाहीर
राजकीय विश्लेषकांच्या मते देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडे यांची अत्यंत घनिष्ठ मैत्री देवेंद्र फडणवीसांच्या संयमी भूमिकेचं प्रमुख कारण आहे.
 
धनंजय मुंडे आणि फडणवीस यांच्या राजकारणाचा अभ्यास करणारे मुक्त पत्रकार अनिरुद्ध जोशी सांगतात, "राजकीय पटलावर मुंडे-फडणवीस विरोधात दिसत असले तरी, मित्र म्हणून एकमेकांच्या अत्यंत जवळ आहेत. बहुधा याच विश्वासामुळेच देवेंद्र फडणवीस यांनी संयमाची भूमिका घेतली."
 
"धनंजय मुंडेंवर बलात्काराचे आरोप झाल्यानंतर भाजपत उभी फूट दिसून आली. देवेंद्र यांनी मात्र मवाळ भूमिका घेतली. चंद्रकांत पाटील यांनी राजीनाम्याची मागणी केली आणि ती फसली. भाजपतील फुटीमुळे हे प्रकरण पुढे टिकणार नाही हे तेव्हाच स्पष्ट झालं होतं," असं ज्येष्ठ पत्रकार संजय जोग सांगतात.
 
भाजप युवा मोर्चापासून मुंडे-फडणवीस मैत्री
धनंजय मुंडे पूर्वाश्रमीचे भाजपचे युवा नेते. साधारणत: 2000-2004 च्या काळात मुंडे भाजपच्या युवा मोर्चाचे अध्यक्ष होते. युवा मोर्चात असताना त्यांची देवेंद्र फडणवीस यांच्याशी ओळख झाली.
 
धनंजय मुंडेंच राजकारण जवळून पाहाणारे बीडचे पत्रकार उद्धव मोरे सांगतात, "धनंजय मुंडे भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष असताना देवेंद्र फडणवीस उपाध्यक्ष होते. आता पक्ष भलेही वेगळे असतील. पण, त्यांचे वैयक्तिक संबंध अत्यंत जिव्हाळ्याचे आहेत."
 
"युवा मोर्चात फडणवीस-मुंडे एकत्र काम करायचे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस अनेकवेळा नागपुरहून परळीला येत असत. तेव्हापासून दोघांमध्ये चांगला संपर्क आहे," असं परळीच्या स्थानिक राजकारणावर लक्ष ठेवणारे स्थानिक रहिवासी कैलाश तांदळे सांगतात.
 
'विधानसभेसाठी मुंडेंनी लावून धरलं फडणवीसांच नाव'
1990 च्या दशकात देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय कारकिर्द सुरू केली. वयाच्या 27व्या वर्षी 1997 मध्ये फडणवीस महापौर बनले. त्यानंतर दोन वर्षांत त्यांनी विधानसभेची पहिली निवडणूक लढवली.
 
कैलाश तांदळे पुढे सांगतात, फडणवीसांचा महापौर ते आमदार होण्याचा प्रवास परळीतून सुरू झाला असं म्हटलं तर अयोग्य ठरणार नाही.
 
"युवा मोर्चात सहकारी असल्याने धनंजय मुडेंनी विधासभेसाठी देवेंद्र फडणवीसांचं नाव लावून धरलं. फडणवीसांना तिकीट मिळण्यात मुंडे यांची महत्त्वाची भूमिका होती," असं ते पुढे सांगतात.
 
गोपीनाथ मुंडेंमुळे संबंध दृढ झाले
देवेंद्र फडणवीस आणि घनंजय मुंडे यांच्या राजकारणाला जवळून पाहणारे राजकीय विश्लेषक सांगतात, या दोन्ही नेत्यांमधला महत्त्वाचा दुवा म्हणजे भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे. गोपीनाथ मुंडे यांच्यामुळेच यांचे संबंध अधिक दृढ झाले.
 
 पत्रकार अनिरुद्ध जोशी सांगतात, "गोपीनाथ मुंडे विधानसभेत असताना देवेंद्र फडणवीस त्यांच्या जवळचे होते. विधानसभेत एखाद्या विषयावर महत्त्वाची नोट बनवण्यासाठी, माहिती देण्यासाठी फडणवीस कायम गोपीनाथ मुंडेंच्या सोबत रहायचे."
 
"धनंजय मुंडे, गोपिनाथ मुंडेंच्या कुटुंबातीलच. त्यामुळे गोपिनाथ मुंडे यांच्यासोबत ते कायमच असायचे. तेव्हापासूनच मुंडे-फडणवीस एकमेकांची शैली चांगले ओळखतात. त्यांचे संबंध अधिक दृढ झाले आहेत," असं ते पुढे सांगतात.
 
महाजन-मुंडे-फडणवीस घराण्याचे संबंध
राजकीय विश्लेषक सांगतात, 1980 च्या सुमारास जेव्हा प्रमोद महाजन नागपूरला येत. तेव्हा त्यांचा मुक्काम देवेंद्र फडणवीसांच्या घरीच असायचा. प्रमोद महाजन यांनी देवेंद्र फडणवीसांना लहानपणापासून पाहिलं होतं.
 
"देवेंद्र फडणवीस यांना महापौर बनवण्यात गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांची महत्त्वाची भूमिका होती," असं फडणवीसांना जवळून ओळखणारे नागपूरचे पत्रकार सांगतात.
 
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भाजप युवा मोर्चाच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांनी राजकारणात पाउल ठेवलं होतं. धनंजय मुंडे देखील भाजपच्या संघटनांमधून युवा मोर्चाचे पदाधिकारी बनले होते.
 
धनंजय मुंडे यांच्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचा गोपीनाथ मुंडेसोबत चांगला कनेक्ट झाला.
 
तर, अनिरुद्ध जोशी म्हणतात, "मुंडे-फडणवीस घराण्यात घरचे संबंध आहेत. उमेदीच्या काळात मुंबईत आल्यानंतर देवेंद्र फडणवीस गोपीनाथ मुंडे यांच्याच घरी रहायचे."
 
नागपूर विधानसभा अधिवेशनात धनंजय मुंडेंसाठी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जेवणाचा डबा येतो, असं मुंडेंच्या जवळचे कार्यकर्ते सांगतात.
 
धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि...
2011 साली भाजपला सोडचिठ्ठी देत धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला. तर, दुसरीकडे भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस यांची राजकीय स्थिती भक्कम होत होती.
 
विरोधीपक्षात जाऊन मुंडे यांनी राजकीय मुद्यांवर भाजपच्या विरोधात भूमिका घेतली. पण, त्यांचे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचे वैयक्तिक संबंध कधीच या मैत्रीआड आले नाहीत.
 
मुंडेंच्या मैत्रीची फडणवीसांना राजकीय मदत झाली?
बीडच्या राजकारणात पंकजा विरुद्ध धनंजय हा संघर्ष सर्वांनाच माहिती आहे. गोपीनाथ मुंडेंचा राजकीय वारसदार कोण यावरून हा संघर्ष सातत्याने पाहायला मिळतो.
 
पंकजा आणि धनंजय मुंडे यांचं राजकारण जवळून पहाणारे वरिष्ठ पत्रकार सुशील कुलकर्णी सांगतात, "पंकजा मुडेंची राजकीय महत्त्वाकांक्षा नियंत्रित करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी धनंजय मुंडेंच्या मैत्रीचा आधार घेतला."
 
देवेंद्र फडणवीस गोपीनाथ मुंडेंच्या अत्यंत जवळचे मानले जायचे.
 
देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडे यांच्या मैत्रीबाबत बोलताना सुशील कुलकर्णी प्रमुख चार कारणं सांगतात,
 
1) धनंजय मुंडे गोपीनाथ मुंडेंच्या कुटुंबातील आहेत. गोपीनाथ मुंडेंच्या नावाचा अनादर न करता धनंजय जुना मित्र असल्याने त्यांनी मुंडेंसोबत संबंध अधिक वाढवले.
 
2) पंकजा, खडसे यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे मुद्दे धनंजय मुंडेंनी विधानपरिषदेत चांगलेच लावून धरले. देवेंद्र फडणवीस यांनी पंकजांना क्लिनचीट दिली. पण, फडणवीस यांना पक्षांतर्गत विरोधकांवर नियंत्रण ठेवता आलं.
 
3) पंकजांचं प्राबल्य कमी करण्यासाठी कोणतं बळ कामी येईल याची माहिती धनंजय मुंडेंना होती. याची देवेंद्र फडणवीसांना अप्रत्यक्ष मदत झाली.
 
4) 2019 च्या निवडणुकीआधी पंकजा मुंडेंचा विरोध असूनही परळीत भूमिगत गटार योजना नगसविकास विभागाने मान्य केली. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून नगरविकास विभागाचे प्रमुख होते. याचा फायदा धनंजय मुंडेंना झाला.
 
फडणवीस-पवार शपथविधी
2019 मध्ये देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या शपथविधीची माहिती धनंजय मुडेंना होती असा आरोप झाला. मुंडे यांनी आपल्याला काहीच माहिती नसल्याचा दावा केला होता.
 
पण, शपथविधीला जाण्याआधी अजित पवारांसोबत असलेल्या आमदारांची बैठक धनंजय मुंडेंच्या घरी झाली होती, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.
 
शरद पवारांच्या आवाहनानंतर मुंडे रात्री उशीरा यंशवंतराव चव्हाणमध्ये सुरू असलेल्या पक्षाच्या बैठकीस उपस्थित राहीले होते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

पुढील लेख
Show comments