Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

माईसाहेब आंबेडकर यांचं बाबासाहेबांच्या निधनानंतर 'कसोटीपर्व' का सुरू झालं?

Webdunia
शुक्रवार, 14 एप्रिल 2023 (07:49 IST)
नामदेव अंजना
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुसऱ्या पत्नी डॉ. सविता (माईसाहेब) आंबेडकर यांचा या आठवड्यात (27 जानेवारी) जन्मदिन होता. माईंच्या शब्दात सांगायचं तर, बाबासाहेबांच्या निधनानंतर त्यांचं आयुष्य म्हणजे एक 'कसोटीपर्व' होतं. बाबासाहेबांना मारल्याचा त्यांच्यावर संशय का व्यक्त करण्यात आला? त्याचा त्यांच्यावर काय परिणाम झाला? माईंना पुन्हा सार्वजनिक जीवनात यायला कुणी मदत केली? माईसाहेब आंबेडकरांच्या जीवनातले काही महत्त्वाचे प्रसंग टिपणारा हा लेख.
 
1947 सालातील डिसेंबरचा महिना. भारताला स्वातंत्र्य मिळून चार-साडेचार महिने लोटले होते. भारताच्या राज्यघटनेच्या निर्मितीची धुरा खांद्यावर घेतलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर दिल्लीतून मुंबईत काही कामानिमित्त आले होते.
 
मुंबईत आल्यावर बाबासाहेब विलेपार्ले येथील एस. राव या आपल्या उच्चशिक्षित मित्राला नेहमी भेटायला जात असत. इथेच एस. राव यांच्या मुलींची मैत्रीण डॉ. शारदा कबीर बाबासाहेबांना पहिल्यांदा भेटल्या.
 
या काळात बाबासाहेब डायबेटीस, न्युरायटीस, संधिवात, रक्तदाब अशा आजारांनी त्रस्त होते. मुंबईतील गिरगाव येथील डॉ. मालवणकर यांच्या क्लिनिकमध्ये ते नियमित तपासणी करत असत. या क्लिनिकमध्ये डॉ. शारदा कबीरही काम करत होत्या. उपचारादरम्यान त्यांची बाबासाहेबांशी विविध विषयांवर चर्चा होत असे. त्यातून ओळखही वाढत गेली.
बाबासाहेबांबद्दल शारदा यांना प्रचंड आदर होता. त्यांनी त्यांच्या आत्मकथेत लिहिलंय, "डॉक्टरसाहेबांच्या सहवासात मला त्यांच्या ऐतिहासिक कार्याची जवळून प्रचिती आली आणि मी अक्षरश: दिपून गेले होते."
 
बाबासाहेबांच्या दुसऱ्या लग्नाची गोष्ट
1947 सालच्या डिसेंबर महिन्यातच बाबासाहेब क्लिनिकमध्ये आले असताना म्हणाले, "माझे लोक व सहकारी मला आग्रह करीत आहेत की सहचारिणी करा, परंतु मला माझ्या आवडीची, योग्यतेची व अनुरूप स्त्री मिळणे फार कठीण आहे. माझ्या कोट्यवधी लोकांसाठी मला अधिक जगायला पाहिजे व जगण्यासाठी माझ्या लोकांच्या आग्रहाचा गंभीरपणे विचार करणे क्रमप्राप्त आहे. अशा सुयोग्य स्त्रीचा शोध घेणे मी तुमच्यापासून सुरू करतो."
 
माईसाहेबांनी 'डॉ. आंबेडकरांच्या सहवासात' या आपल्या आत्मकथेत ही आठवण लिहून ठेवली आहे.
बाबासाहेबांनी शारदा कबीर यांना लग्नाची मागणी घातली. मात्र त्यांनी सोबत हेही सांगितलं की, आपल्या वयातील फरक आणि माझी प्रकृती यामुळे तू नकार दिलास तरी मला बिलकुल दु:ख होणार नाही.
 
यानंतर शारदा कबीर गोंधळात पडल्या. काय उत्तर द्यावं त्यांना कळलं नाही. त्यांनी वेळ मागून घेतला. तोपर्यंत बाबासाहेब पुन्हा दिल्लीत निघून गेले होते. दरम्यान शारदा यांनी डॉ. मालवणकर यांच्याशी याबाबत चर्चा केली. तसंच स्वतःच्या भावाचाही सल्ला मागितला.
 
शारदा कबीर यांचे थोरले बंधू म्हणाले, "म्हणजे तू भारताची कायदेमंत्रीण होणार तर. अजिबात नकार देऊ नकोस. पुढे जा."
बाबासाहेबांबद्दल उपचारादरम्यान निर्माण झालेला जिव्हाळा, त्यांच्याबद्दल असलेली काळजी, प्रेम या सर्व गोष्टींचा विचार करता शारदा कबीर यांनी होकार कळवला. 15 एप्रिल 1948 रोजी दिल्लीत 15-20 निमंत्रितांच्या उपस्थितीत नोंदणी पद्धतीने डॉ. बाबाबासाहेब आंबेडकर आणि डॉ. शारदा कबीर यांचं लग्न झालं.
 
शारदा कबीर या कृष्णराव विनायकराव कबीर आणि जानकीबाई कबीर या मूळच्या रत्नागिरीतील राजापूर तालुक्यातील दांपत्याच्या पोटची मुलगी. सारस्वत ब्राह्मण कुटुंबातील शारदा यांचा जन्म 27 जानेवारी 1912 रोजी झाला. घरात शारदा मिळून एकूण आठ भावंडं.
 
लग्नानंतर 'शारदा कबीर'च्या 'सविता आंबेडकर' झाल्या. मात्र, बाबासाहेबांसाठी त्या कायम 'शरू'च राहिल्या, तर अनुयायांसाठी 'माईसाहेब' बनल्या.
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सहवास माईसाहेबांना नऊ वर्षेच लाभला. बाबासाहेबांच्या संघर्षात त्या साथी बनल्या. मात्र बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतरही त्यांना संघर्ष चुकला नाही. या काळाला माई 'कसोटीपर्व' म्हणायच्या.
 
माईंनी त्यांच्या आत्मकथेत लिहिलंय, "डॉ. आंबेडकरांच्या परिनिर्वाणानंतर मला ज्या अग्निदिव्यातून जावे लागले, त्याचा मी विचार करते तेव्हा, माझ्या डोक्यात असा विचार येतो की, मला वैधव्याच्या वणव्यात जो वनवास भोगावा लागला तसाच अन्याय डॉ. आंबेडकरांच्या हयातीत कोणा स्त्रीच्या नशिबी आला असता तर डॉ. आंबेडकर त्या स्त्रीच्या हक्कासाठी धावून गेले असते आणि खंबीरपणे तिच्या पाठीशी उभे राहिले असते."
 
बाबासाहेबांच्या निधनानंतर काही दिवसातचं हे 'अग्निदिव्य' सुरू झालं. निमित्त ठरलं बाबासाहेबांच्या परिनिर्वाणाचं. परिनिर्वाण झालं की घडवलं गेलं, असा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रश्न उपस्थित केला गेला आणि या प्रश्नाचा रोख होता माईसाहेब आंबेडकरांकडे.
 
बाबासाहेबांना मारल्याचा माईंवर आरोप
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्लीत निधन झालं. यानंतर बाबासाहेबांच्या मृत्यूबद्दल काहींनी संशय व्यक्त केला. अनेकांनी तर थेट माई आंबेडकरांवरच आरोप केले. यामुळे माई प्रचंड भीतीच्या वातावरणात जगू लागल्या.
 
माई आंबेडकर त्यांच्या आत्मकथेत लिहितात, "संपूर्ण समाजात माझ्याविरुद्ध वातावरण तयार व्हावे म्हणून साहेबांच्या मृत्यूबद्दल जाणूनबुजून संशय निर्माण केला गेला. समाजात माझ्याविरोधात जाणीवपूर्वक विष पेरले गेले."
 
माईंविरोधातलं वातावरण अत्यंत चिंताजनक आणि भीतिदायक होतं. माईंनी लिहिलंय की त्यांना मारण्यासाठी मुंबईहून दिल्लीपर्यंत तीन माणसं पाठवण्यात आली होती. त्या तिघांची नावंही त्यांनी दिली आहेत. पण या तिघांनाही उपरती झाली आणि माई वाचल्या.
दलित समाजातील तेव्हाच्या राजकीय नेत्यांना डॉ. आंबेडकरांच्या मृत्यूबद्दल संशय वाटत होता. त्यांनी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि केंद्रीय गृहमंत्री गोविंद वल्लभ पंत यांच्या भेटी घेतल्या. 19 खासदारांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मृत्यूच्या चौकशीसाठी पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना पत्रही दिलं.
 
आधी केंद्र सरकारने आरोपांकडे दुर्लक्ष केलं, मात्र खासदारांनी पत्र दिल्यानंतर चौकशीसाठी दिल्लीचे डेप्युटी इन्स्पेक्टर-जनरल ऑफ पोलीस सक्सेना यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीनं मेडिकल बोर्डाच्या निष्कर्षाच्या आधाराने अहवालात म्हटलं, "कुठल्याही तऱ्हेच्या संशयास जागा नसताना असे सिद्ध झालेले आहे की, डॉ. आंबेडकरांचा मृत्यू हा नैसर्गिक कारणांमुळे झालेला आहे. म्हणून कुठल्याही गैरप्रकाराबद्दल संशय घेण्यास कुठलाही पुरावा उपलब्ध नाही."
 
या अहवालानंतरही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मृत्यूबाबत शंका व्यक्तच केल्या गेल्या. लोकसभेत 9 डिसेंबर 1957 रोजी खासदार बी. सी. कांबळे यांनी डॉ. आंबेडकरांच्या मृत्यूच्या चौकशी अहवालाबाबत प्रश्न विचारला होता. त्या प्रश्नाला तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री गोविंद वल्लभ पंत यांनी उत्तर दिलं. पोलिसांचा गुप्त अहवाल जाहीर करणं योग्य होणार नसल्याचं सांगत त्यांनी त्यातील माहिती सभागृहासमोर समोर ठेवली.
 
"डॉ. आंबेडकरांच्या मृत्यूबाबत संशय घेण्यास जागा नाही. त्यांचा मृत्यू नैसर्गिक कारणामुळे झाला आहे. या अहवालात डेप्युटी इन्स्पेक्टर-जनरल ऑफ पोलीस यांनी मुंबईचे हृदयरोगतज्ज्ञ डॉ. तिरोडकर आणि डॉ. तुळपुळे यांची साक्षही नोंदवली आहे," असं गोविंद वल्लभ पंत यांनी लोकसभेत सांगितलं.
 
इतकं सारं स्पष्ट झाल्यानंतरही बाबासाहेबांच्या मृत्यूबद्दल शंका घेतल्या जातच राहिल्या. माईंचं नाव घेऊनही आरोप अधूनमधून होत होते. त्यामुळे त्यांनी सार्वजनिक आयुष्यापासून फारकत घेतली.
 
आंबेडकर आधीच म्हणाले होते, 'आपल्यानंतर शरूचे काय होईल?'
21 फेब्रुवारी 1948 या तारखेला बाबासाहेबांनी माईंना लिहिलेलं पत्र बोलकं आहे. या दोघांचं लग्न ठरल्यानंतर आणि लग्नाच्या दोन महिन्यांआधी हे लिहिलं होतं.
 
या पत्रात बाबासाहेब लिहितात, "एका जीवात्म्याने दुसऱ्या जीवात्म्यास पाहिले, समान शील ओळखले आणि मिठी मारली. ही मिठी कधीतरी सुटेल का? मृत्यूशिवाय ही मिठी कोणी मोडू शकणार नाही, अशी राजाची खात्री आहे. दोघांनाही एकाच काळी मृत्यू यावा, अशी राजाची फार मोठी इच्छा आहे. शरूनंतर राजाचा सांभाळ कोण करणार? म्हणून राजाला आधी मरण यावं असं वाटतं."
 
माईसाहेबांनी आपल्या आत्मकथेत हे पत्र प्रसिद्ध केलं आहे. या पत्रात बाबासाहेबांनी स्वत:चा 'राजा', तर माईसाहेबांचा 'शरू' असा उल्लेख केलेला आढळतो.
या पत्रात बाबासाहेब पुढे लिहितात, "दुसऱ्या दृष्टीने राजाच्या मृत्यूनंतर शरूचं काय होईल, या प्रश्नाने राजाच्या मनाला शांतता नाही. सार्वजनिक कार्यास वाहून घेतल्यामुळे राजाने कसलाच द्रव्यसंग्रह केला नाही. पोटापुरता व्यवसाय, या पलीकडे शरूच्या राजाला काही करता आले नाही. शरूच्या राजाला पेन्शन नाही, शरूचा राजा निरोगी असता तर काही विपदा नव्हती, परंतु रोगपीडित असल्यामुळे संशय वाटतो आणि शरूचे काय होईल, याची आठवण झाली म्हणजे मन उद्विग्न होते. भगवान बुद्ध यातून काहीतरी मार्ग काढील, असा शरूच्या राजाला विश्वास वाटतो."
माई त्यांच्या आत्मकथेत या पत्राच्या अनुषंगाने लिहितात, 'बाबासाहेबांची विवंचना नि भीती किती रास्त होती, याचा दाहक अनुभव मी गेली 30 वर्षे घेतलेला आहे. साहेबांचं द्रष्टेपणही यातून प्रत्ययास येते. माझ्यात काही दोष असता तर बाबासाहेबांनी गांधी-नेहरू यांसारख्यांची कधी गय केली नाही, तर माझी का केली असती काय?'
 
उलट परिनिर्वाणाच्या काही तास आधी बाबासाहेबांनी 'दि बुद्ध अँड हिज धम्म' ग्रंथाच्या प्रस्तावनेत माझा कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला, असंही माई लिहितात.
 
संपत्तीवरून माईसाहेब आणि भैय्यासाहेबांमध्ये वाद
बाबासाहेबांच्या निधनानंतर जसा त्यांच्या मृत्यूवरून वाद झाला, तसा संपत्तीवरूनही झाला. आपल्या मृत्यूनंतर वारसदारांनी कोर्टात जाऊ नये, म्हणून बाबासाहेबांनी मृत्युपत्र तयार केलं होतं आणि ते दिल्लीतून मुंबईला जाऊन मृत्युपत्राची नोंदणी करणार होते, असं माई लिहितात.
 
मात्र साक्षीदारांच्या सह्या नसल्यानं त्याची अधिकृत नोंदणी करण्यात आली नव्हती. त्यामुळे त्या मृत्युपत्राच्या सत्यतेबद्दल संशय होता. पुढे हे प्रकरण कोर्टात गेलं. एका बाजूला सविता म्हणजे माई आंबेडकर तर दुसऱ्या बाजूला यशवंत म्हणजे भैयासाहेब आंबेडकर. भैयासाहेब हे सामाजिक कार्यकर्ते आणि राजकारणी होते - ते बाबासाहेब आणि त्यांच्या पहिल्या पत्नी रमाबाई आंबेडकर यांचे पुत्र.
पण बाबासाहेबांची संपत्ती किती होती? तर मुंबईतील राजगृह, दिल्लीतील लहानसा प्लॉट, तळेगावचा लहानसा प्लॉट आणि त्यावरील दोन खोल्या. माईंनी आत्मकथेत लिहिलं आहे की कोर्टात यशवंत आंबेडकरांनी सांगितलं की, "माझ्या वडिलांचे दुसरे लग्न झालेच नाही आणि मी एकुलता एक मुलगा नि एकमेव वारस आहे, तेव्हा त्यांची सारी इस्टेट मलाच मिळाली पाहिजे."
 
हे ऐकून न्यायाधीश सी. बी. कपूर अस्वस्थ झाले आणि ते संतापून यशवंत आंबेडकरांना म्हणाले, "Do you want me to believe that Dr. Ambedkar was in habit of keeping mistress? I have worked with Dr. Ambedkar and I have got very high regards for him." (डॉ. आंबेडकरांचे विवाहबाह्य संबंध होते, असं तुम्ही मला सांगत आहात का? मी त्यांच्यासोबत काम केलं आहे आणि मला त्यांच्याबद्दल अतीव आदर आहे.)
 
'डॉ. आंबेडकरांच्या सहवासात' या आत्मकथेत याबद्दल माईसाहेबांनी विस्तृतपणे लिहिलं आहे.
 
आधी न्या. सी. बी. कपूर आणि नंतर जेव्हा संपत्तीचं प्रकरण मुंबईतील कोर्टात पाठवण्यात आलं तेव्हा, न्या. कोयाजींनीही आपापसात समेट घडवून आणण्यावर भर दिला आणि संपत्तीचा वाद मिटवला.
 
यातील न्या. सी. बी. कपूर हे बाबासाहेब केंद्रीय कायदेमंत्री असताना कायदा मंत्रालयात जॉईंट सेक्रेटरी होते, तर न्या. कोयाजींचाही आंबेडकरांशी संबंध आला होता. त्यामुळे हे दोघेही आंबेडकरांना मानत होतं. आंबेडकर कुटुंबीयांच्या संपत्तीचा वाद सार्वजनिक होऊ नये, असं मनोमन त्यांना वाटत होतं.
 
बाबासाहेबांच्या संपत्तीच्या वादातली यशवंत (भैयासाहेब) आंबेडकर यांची बाजू जाणून घेण्यासाठी आम्ही त्यांचे पुत्र आनंदराज आंबेडकर यांच्याशी संपर्क साधला. आनंदराज आंबेडकर म्हणाले, "बाबासाहेबांचे दोन्ही वारस (माईसाहेब आणि भैय्यासाहेब) आता हयात नाहीत. त्यामुळे आता या प्रकरणावर बोलणे उचित ठरणार नाही."
 
नेहरूंची ऑफर माईसाहेबांनी नाकारली
बाबासाहेबांच्या निधनानंतर पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी माईसाहेबांना सरकारी हॉस्पिटलमध्ये 'मेडिकल ऑफिसर'ची नोकरी देण्याची, तसंच राज्यसभेवर घेण्याची इच्छा व्यक्त केली होती.
मात्र माई आंबेडकरांनी नेहरूंनी दिलेल्या या दोन्ही ऑफर्स नाकारल्या.
या गोष्टीचा संबंध त्या बाबासाहेबांच्या भूमिकेशी जोडतात. त्यांनी लिहिलंय, "डॉ. साहेबांनी आमच्या लग्नानंतर मला नोकरी सोडायला लावली. त्यांच्यानंतर त्यांच्या इच्छेला तोडणे मला योग्य वाटले नाही. तसंच, राज्यसभेवर खासदार म्हणून जाण्याची मी तयारी दर्शवली असती तर काँग्रेसच्या दावणीला जाण्यासारखे झाले असते आणि डॉ. आंबेडकरांच्या तत्त्वाविरुद्ध झाले असते."
 
पुढे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन आणि इंदिरा गांधींनीही राज्यसभेची ऑफर दिली होती, असं माई लिहितात. त्यांनी तेव्हाही नकार दिला.
 
"ज्या काँग्रेसविरोधात माझे महान पती आयुष्यभर लढले, त्याच काँग्रेसमध्ये त्यांच्या निधनानंतर जाणे माझ्या मनाला पटूच शकत नाही आणि माझ्या पतीच्या तत्त्वांशी मी कधीही प्रतारपण करू शकत नाही," असं त्यांनी आत्मकथेत लिहिलंय.
 
मुंबईत राहताना माईसाहेब ओळख का सांगत नव्हत्या?
बाबासाहेबांच्या निधनानंतर माई दिल्लीतच थांबल्या. दिल्ली-हरियाणा सीमेलगत मेहरौली नावाच्या ठिकाणी त्या एकट्या राहत होत्या.
 
माई दिल्लीतून ज्यावेळी मुंबईत स्थायिक व्हायला आल्या, तेव्हा त्या त्यांचे थोरले भाऊ वसंत कबीर यांच्या निवासस्थानी राहायला गेल्या. दादरमधल्या गोखले रोडवर पोर्तुगीज चर्चसमोर कबीर कुटुंबीय राहत होते. आठ-बाय-दहाच्या आकाराचं हे घर होतं.
 
आंबेडकरांच्या मृत्यूविषयी ज्या पद्धतीने सर्वत्र शंका उपस्थित केल्या जात होत्या, त्या पाहता स्वत:ची ओळख न सांगता राहणं माईंना योग्य वाटत होतं.
 
माईंचे निकटवर्तीय राहिलेले विजय सुरवाडेंनी बीबीसी मराठीला याबाबत विस्तृतपणे सांगितलं:
 
माईसाहेब पोर्तुगीज चर्चसमोरील कबीर कुटुंबीयांच्या घराबाहेर रोज संध्याकाळी खुर्चीत बसून मासिकं वाचत बसायच्या. त्यांच्या दिनक्रमाचा हा भाग बनला होता. त्या माईसाहेब आहेत, हे कुणाला माहीत नव्हते.
याच रस्त्यानं डी. डी. बाविस्कर येत जात असतं. बाविस्कर हे गृहस्थ भैयासाहेब आंबेडकरांचे निकटवर्तीय होते. बाविस्करांना भैयासाहेब भावासारखे मानायचे. सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर ते चैत्यभूमीच्या देखरेखीचं काम पाहत असत.
 
बाविस्करांनी एकदा माईसाहेबांना तिथे वृत्तपत्र वाचताना पाहिलं. खरंतर ते काही दिवस त्यांना पाहत होते. मात्र एक दिवस धाडस करून त्यांनी जाऊन विचारलं, 'तुम्ही माईसाहेब आंबेडकर आहात ना?'
 
बाहेर जे वातावरण होतं, ते पाहता माईंनी सुरुवातीला बाविस्करांना आपली खरी ओळख सांगितली नाही. मात्र नंतर काही दिवस बाविस्कर सातत्यानं माईसाहेबांशी संवाद साधू लागल्यानं त्यांनी अखेर ओळख सांगितली. माई आंबेडकर सार्वजनिक आयुष्यात सक्रिय होण्यास बाविस्करांची भेट महत्त्वाची मानली जाते.
माई जेव्हा पुन्हा जगासमोर आल्या...
बाबासाहेबांच्या निधनानंतर पसरलेल्या शंकांमुळे माई सगळ्यांसमोर येण्यास धजावत नव्हत्या.
 
माई सगळ्यांसमोर पहिल्यांदा आल्या त्या भैयासाहेब आंबेडकरांच्या एकसष्ठीच्या कार्यक्रमातून. या कार्यक्रमाचे मुंबईत आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते शंकरराव चव्हाण.
 
दलित पँथरचे सहसंस्थापक आणि लेखक ज. वि. पवार यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं की, "माईसाहेबांनी मला विनंती केली की मला समाजाच्या पुढे यायचं आहे. आम्ही या कार्यक्रमाचं निमित्त साधलं. भैयासाहेबांचीही त्यासाठी परवानगी घेतली. भैयासाहेबांनी भाषणात माईसाहेबांचा उल्लेख करायचा असं ठरलं होतं."
ज. वि. पवार पुढे सांगतात, "या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर माईसाहेब, मीराताई (भैय्यासाहेबांच्या पत्नी), कुसुमताई (शंकरराव चव्हाण यांच्या पत्नी) या तिघीजणी पहिल्या रांगेत होत्या. भैयासाहेब ज्यावेळी भाषणासाठी उभे राहिले, तेव्हा सगळ्यांनी कान टवकारले होते. ते कधी माईसाहेबांचं नाव घेतील का हे ऐकण्यासाठी. मात्र भैयासाहेबांनी समोरील लोकांच्या प्रतिक्रियेची भीती मनात आली असावी, म्हणून त्यांनी नाव घेणं टाळलं."
 
कार्यक्रम संपल्यानंतर माईंनी माझे कान पकडल्याचं ज. वि. पवारांचे सांगतात. पुढे अहमदाबादमध्ये दलित पँथरच्या सभेत माईसाहेब पहिल्यांदा नावानिशी आणि जाहीरपणे सगळ्यांसमोर आल्या, असं ते पुढे सांगतात.
 
दलित पँथरमध्ये माईसाहेबांचा तसा सक्रिय सहभाग नसला, तरी पुढे 1977 साली ज्यावेळी भैयासाहेबांनी मुंबईतून लोकसभेची निवडणूक लढवली, तेव्हा माईंनी राजा ढाले आणि ज. वि. पवार यांच्या सोबतीने प्रचारात आघाडी घेतली होती. भैयासाहेबांच्या प्रचाराच्या प्रत्येक सभेत माई प्रामुख्यानं उपस्थित राहत असत.
 
एकूणच 1972-73 नंतर माईसाहेब आंबेडकर महामहाराष्ट्रात दिसू लागल्या आणि सर्वांसमोर येऊ लागल्या.
 
दलित पँथर, रिडल्स, नामांतर, अयोध्या
1972 साली स्थापन झालेल्या 'दलित पँथर'ला मानसिक बळ देण्यासाठीही माईसाहेब पुढे आल्याचं वैशाली भालेराव सांगतात. त्यांनी 'डॉ. माईसाहेब आंबेडकरांच्या सहवासात' नावाचं चरित्र लिहिलं आहे.
 
भालेराव सांगतात, "सत्तरीनंतर दलित समाजात आशेचा नवा किरण उदयास आला तो दलित पँथरच्या रूपानं. आधुनिक विचारसरणी असणारे, नव्या ध्येयांनी प्रेरित झालेले, बंड पुकारणारे, अन्यायविरुद्ध आवाज उठवणारे हे तरुण होते. राजा ढाले यांच्या नेतृत्वात पँथर उभी राहिली होती."
 
दलित पँथरने माईसाहेबांची मार्गदर्शनपर सभा-संमेलने आयोजित केली. त्यामुळे माईसाहेबांना मुख्य प्रवाहात येण्यासाठी मोठा मार्ग मिळाला, असंही वैशाली भालेराव सांगतात.
पुढे मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या आंदोलनात तर माईसाहेब अगदी पुढाकार घेत होत्या. या काळात माईसाहेबांना तुरुंगावसही भोगावा लागला.
 
1987 साली ज्यावेळी महाराष्ट्र सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 'रिडल्स इन हिंदुइझम' हा ग्रंथ प्रकाशित केला. त्यावेळी महाराष्ट्रात वाद झाला. राम आणि कृष्णाबाबतच्या उल्लेखामुळे काही हिंदू संघटनांनी या ग्रंथाच्या प्रकाशनावर आक्षेप घेतला.
 
ग्रंथ प्रकाशित व्हावा आणि होऊ नये, यासाठी दोन्ही बाजूंनी आंदोलने-प्रतिआंदोलने सुरू झाली. सामाजिक तणावही निर्माण झाला होता.
 
'रिडल्स इन हिंदुइझम' ग्रंथ प्रकाशित व्हावा म्हणून अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात 'रिडल्स समर्थन परिषद' भरवण्यात आली होती. त्यावेळी माई आंबेडकर या परिषदेत सहभागी झाल्या होत्या.
अयोध्या प्रकरणात माईसाहेबांनी 1993 साली कोर्टात दाखल केलेली याचिका चर्चेचा विषय ठरली होती.
 
उत्तर प्रदेशातल्या अयोध्येच्या ठिकाणी सापडलेल्या पुरातन अवशेषांचा दाखला देत हिंदूंनी रामजन्मभूमीचा दावा केला. तर मुस्लिमांनी इथे बाबरी मशीद होती म्हणून ही जागा आमची असा दावा केला. या दोन्ही दाव्यांना माईंनी विरोध केला. माईसाहेबांचं म्हणणं होतं की साकेत नामक बुद्धस्तूपाचे पुरातन ऐतिहासिक पुरावे आढळले असल्यानं ती जागा बौद्धांस मिळावी.
 
माईसाहेबांनी या मागणीसाठी फैजाबाद कोर्टात याचिकाही दाखल केली होती. अर्थातच, कोर्टात हे प्रकरण खूप लाबलं आणि आता तर अयोध्येतील जमिनीचा निर्णय काय लागला आहे हे सर्वश्रुतच आहे.
 
बाबासाहेबांच्या 'भारतरत्न'चा स्वीकार आणि सिंबॉयसिसमधील 'स्मृतिविहार'
"1984 ची संध्याकाळ मला आजही आठवते. एक ट्रक भरून सामान 26, अलिपूर रोड, नवी दिल्ली येथून पुण्यात सिंबॉयसिस संस्थेत आलं. असेंब्ली हॉलमधील दोन गेस्टहाउसच्या खोल्यांमध्ये ते सामान उतरवून गेले." पुण्यातल्या सिंबॉयसिस शिक्षण संस्थेच्या मानद संचालिका डॉ. संजीवनी मुजुमदार बीबीसी मराठीला आठवण सांगतात. डॉ. बाबासाहेबांच्या दैनंदिन वापरातील अनेक वस्तू माईसाहेबांनी पुण्यातील सिंबॉयसिस संस्थेत ठेवण्यास दिल्या होत्या.
 
सिंबॉयसिस संस्थेचे डॉ. मुजुमदार यांचे भाऊ ठाण्यातील न्यायालयात न्यायाधीश होते. ठाण्याच्या कोर्टात माईसाहेबांच्या बहिणीचे जावई ठाकूर वकील होते. एकदा बहिणीसोबत चर्चा सुरू असताना, ठाकूर यांनी सिंबॉयसिसच्या डॉ. मुजुमदारांचा संदर्भ दिला. पुढे ठाकूरांनीच मध्यस्थी केली आणि बाबासाहेबांच्या मौल्यवान वस्तू सिंबॉयसिस संस्थेपर्यंत पोहोचल्या.
सिंबॉयसिस संस्थेत बाबासाहेबांच्या या वस्तूंच्या संग्रहलयाला 'स्मृतिविहार' असं नाव देण्यात आलं आहे.
 
1990 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मरणोत्तर 'भारतरत्न' घोषित झाला, तेव्हा भारताचे तत्कालीन राष्ट्रपती व्यंकटरमण यांच्या हस्ते माईसाहेबांनीच हा सन्मान स्वीकारला. हा पुरस्कारही माईसाहेबांनी सिंबॉयसिस संस्थेतील स्मृतिविहारात ठेवण्यासाठीच सुपूर्द केला.
 
या स्मारकात एका फलकावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी माईसाहेबांबद्दल काढलेले उद्गार लिहिण्यात आलेत : "The Successful rekindling of this dying flame is due to the medical skill of my wife and Dr. Malvankar. I am immensely grateful. They alone have helped me to complete the work." ("माझ्या विझणाऱ्या प्राणज्योतीला हे तेज प्राप्त झालं आहे त्याचं श्रेय माझी पत्नी आणि डॉ. मालवणकरांना जातं. मी त्यांचा ऋणी आहे. माझं कार्य त्यांच्यामुळे पूर्ण होऊ शकलं.")
माईसाहेब बऱ्याचदा सिंबॉयसिस संस्थेला भेट देत. त्यांच्या शेवटच्या भेटीबद्दल सांगताना डॉ. संजीवनी मुजुमदार भावनिक होतात: "तो दिवस आठवतोय. त्या खूप थकल्या होत्या. संस्थेच्या पायऱ्या त्यांना चढता येत नव्हत्या. शेवटी खुर्चीत बसवून त्यांना आम्ही वर आणलं. प्रत्येक पायरी चढताना त्या आम्हाला 'जय भीम' म्हणायला सांगत होत्या. संस्थेतील बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार घालताना सुद्धा त्या गहिवरल्या होत्या."
 
आम्हाला वाटलं नव्हतं, ही भेट माईसाहेबांची शेवटची असेल, असं डॉ. मुजुमदार सांगतात. माईसाहेबांचं 23 मे 2003 रोजी मुंबईतील जेजे रुग्णालयात निधन झालं.
 
शेवटच्या दिवसांत माईसाहेबांच्या मदतीसाठी महाराष्ट्र सरकारनं मदतनीस महिला दिली होती. आंबेडकर कुटुंबीय, तसंच रामदास आठवले, विजय सुरवाडे अशी मंडळी माईंच्या देखभालीसाठी आपापल्या परीने मदत करत असत.
मात्र माईसाहेबांना आपल्या हयातीत ज्या आरोपांना, वेदनांना सामोरं जावं लागलं, त्याची मोजदाद नाही, असं म्हणत विजय सुरवाडे दु:ख व्यक्त करतात.
 
माईसाहेब आंबेडकर यांच्याच वाक्यात शेवटी सांगायचं तर - "मला फक्त एवढेच म्हणायचे आहे की, आपल्या राजकीय स्वार्थासाठी व नेतृत्वाच्या लोभासाठी त्यांनी आंबेडकर वारसांना पद्धतशीरपणे डावलले. पण सर्व नेते शेवटी आपापसातील नेतृत्वासाठी झगडून संपले. विशेष म्हणजे, या राजकीय स्वार्थासाठी माझा राजकीय बळी देण्यात आला, हे ऐतिहासिक सत्य आहे."
 
या लेखासाठीचे संदर्भ :
 
डॉ. आंबेडकरांच्या सहवासात - डॉ. सविता भीमराव आंबेडकर (आत्मचरित्र)
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सावलीचा संघर्ष (चरित्र) - विजय सुरवाडे
डॉ. माईसाहेब आंबेडकरांच्या सहवासात (चरित्र व आठवणी) - वैशाली भालेराव
माईसाहेबांचे निकटवर्तीय विजय सुरवाडे यांच्याशी बातचीत
दलित पँथरचे सहसंस्थापक आणि लेखक ज. वि. पवार यांच्याशी बातचीत
सिंबॉयसिस संस्थेच्या मानद संचालिका डॉ. संजिवनी मुजुमदार यांच्याशी बातचीत

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

पुढील लेख