Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आदित्य ठाकरे दसरा मेळाव्यात का बोलले नाहीत?

Webdunia
गुरूवार, 6 ऑक्टोबर 2022 (20:05 IST)
मयांक भागवत
शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यात आदित्य ठाकरेंनी भाषण केलं नाही. आदित्य युवासेना अध्यक्ष असूनही त्यांनी बोलणं टाळल्यामुळे, ते का बोलले नाहीत? यावर राजकीय वर्तुळात आणि शिवसैनिकांमध्ये चर्चा आहे.
 
शिंदेंनी भाजपसोबत सत्ता स्थापन केल्यापासून आदित्य ठाकरे हे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांविरोधात आक्रमक भूमिका घेत आहेत.
 
असं असून देखील ते दसरा मेळाव्यात बोलले नाहीत त्यामुळे अनेकांनी भुवया उंच केल्या आहेत.
 
आदित्य ठाकरेंबाबत विचारल्यानंतर शिवसेना जनसंपर्कप्रमुख हर्षल प्रधान म्हणाले, "दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंना ऐकणं हा मुख्य हेतू असतो. त्यांना ऐकण्यासाठी लोक दूरून येतात. त्यामुळे त्यांना जास्त वेळ मिळावा असा प्रयत्न असतो."  
 
निष्ठा यात्रेच्या निमित्ताने आदित्य ठाकरे राज्यभरात फिरले. नेते, कार्यकर्ते, जनसामान्यांच्या भेटी घेतल्या. त्यांना पाहण्यासाठी मोठी गर्दी जमतेय. मग, दसरा मेळाव्यात त्यांनी बोलणं का टाळलं? आम्ही राजकीय विश्लेषकांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला. 
 
शिवाजी पार्कवर आदित्य ठाकरेंनी बोलणं टाकलं? 
यंदाचा दसरा मेळावा अनेक अर्थांनी खास होता. एकनाथ शिंदेंचं बंड, भाजपसोबत स्थापन केलेले सरकार. दुखावले गेलेले उद्धव ठाकरे.
 
त्यात शिंदेंनी शिवसेना आमचीच असा केलेला दावा. त्यामुळे खरी शिवसेना कोणाची? हा दोन्ही गटात वाद सुरू झाला. 
 
दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे यांच्यावर उद्धव ठाकरे काय बोलणार? हे ऐकण्यासाठी लोक उत्सुक होतेच. त्यासोबतच आदित्य ठाकरेंबाबतही लोकांमध्ये आकर्षण होतं. याचं कारण म्हणजे निष्ठा यात्रा. 
 
शिंदेंच्या बंडानंतर आदित्य ठाकरे राज्यभर फिरले. त्यांच्या निष्ठा यात्रेला सामान्यांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसून आला. गद्दार, 50 खोके अशी आक्रमक भूमिका त्यांनी शिंदे गटाविरोधात लावून धरली. त्यामुळे ते काय बोलणार, याकडे युवा वर्गाचं लक्ष होतं. पण, आदित्य ठाकरे दसरा मेळाव्यात काहीच बोलले नाहीत. 
 
याबाबत विचारलं असता शिवसेनेचे जनसंपर्कप्रमुख हर्षल प्रधान म्हणाले, "दसरा मेळाव्याला लोक उद्धव ठाकरेंचे विचार ऐकण्यासाठी येतात. त्यांना ऐकणं हा शिवसैनिकांचा मुख्य हेतू असतो. त्यामुळे उद्धव ठाकरेंना बोलण्यासाठी जास्त वेळ मिळावा हे पाहून नियोजन केलं जातं." 
 
दसरा मेळाव्यात आमदार भास्कर जाधव, उपनेत्या सुषमा अंधारे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आंबादास दानवे आणि माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची भाषणं झाली. त्यानंतर आदित्य ठाकरे बोलतील अशी अपेक्षा होती. पण, उद्धव ठाकरे थेट भाषणाला उभे राहिले. 
 
हर्षल प्रधान पुढे सांगतात, "आदित्य ठाकरेंना वेळ मिळाला असता तर ते नक्कीच बोलले असते. ते सद्यस्थितीत राज्यभर फिरतायत. लोकांशी चर्चा करतायत." 
बाळासाहेब असताना उद्धव ठाकरेंचं दसरा मेळाव्यात भाषण झालं? 
मुंबईचं शिवाजी पार्क मैदान राज्यभरातील शिवसैनिकांसाठी 'शिवतीर्थ'. याच मैदानातून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या शब्दांची तोफ विरोधकांवर अनेक वर्षं चालली. बाळासाहेबांनी शिवसेना नेते आणि कार्यकर्त्यांना शिवाजी पार्कमधूनच राजकीय दिशा दिली. 
 
शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याला शिवसैनिक विचारांचं सोनं म्हणतात. 
 
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दिवाकर रावते म्हणाले, "दसरा मेळाव्यात पक्षाचं ध्येय-धोरण ठरवलं जातं. पक्ष, कार्यकर्त्यांना दिशा दिली जाते. वर्षातून एकदाच होणाऱ्या या मेळाव्यात पक्षातील प्रमुख नेता आपले विचार मांडतो." 
 
बाळासाहेब ठाकरे हयात असेपर्यंत दसरा मेळाव्याला कायम त्यांनीच संबोधित केलं होतं. त्यावेळी उद्धव ठाकरे बाळासाहेबांसोबत शिवाजी पार्कवर उपस्थित दिसायचे. पण, त्यांनी कधीच दसरा मेळाव्यात भाषण केलं नाही.  
 
दिवाकर रावते पुढे सांगतात, "या आधीच्या दसरा मेळाव्यात बाळासाहेब बोलत. त्यानंतर आता उद्धव ठाकरे बोलतात."
 
आदित्य ठाकरेंनी दसरा मेळाव्यात भाषण का केलं नाही? यावर विचारल्यांतर ते म्हणतात, "दसरा मेळावा पक्षातील प्रमुख नेत्याचे विचार ऐकण्याचं व्यासपीठ आहे. आदित्य ठाकरे आत्तापर्यंत कधीच दसरा मेळाव्यात बोलले नाहीत."
 
बाळासाहेबांच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्याची परंपरा पुढे नेली. पण, आदित्य ठाकरे मेळाव्याला उपस्थित असूनही बोललेले नाहीत. 
 
शिंदे गटातील आमदार आक्रमक म्हणून आदित्य बोलले नाहीत? 
एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर आदित्य ठाकरेंनी आक्रमक भूमिका घेतली. त्यांच्या वक्तव्यामुळे शिंदे गटाचे आमदार, नेते नाराज झाले. त्यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधणं सुरू केलं. 
 
बीकेसीतील सभेत शिंदे गटातील अनेक नेत्यांनी थेट आदित्य ठाकरेंवर टीका केली. गुलाबराव पाटील म्हणाले, "उद्धव साहेबांना आमच्यावर टीका करण्याचा अधिकार आहे. पण, त्यांचं 32 वर्षांचं पोट्टं आमच्यावर बोलतं. हे आम्ही सहन करणार नाही, मग आम्हीदेखील बोलू."
 
तर, महापालिकेतून मिळणाऱ्या खोक्यांवर युवराज मोठे झालेत अशी टीका आदित्य ठाकरेंच्या 50 खोक्यांच्या आरोपाला उत्तर देताना खासदार राहुल शेवाळे यांनी केली. 
 
शिंदे गटातील नेत्यांच्या आरोपांवर आदित्य उत्तर देतील अशी अपेक्षा होती. पण त्यांनी बोलणं टाळलं.
 
राजकीय विश्लेषक सुधीर सूर्यवंशी म्हणाले, "बीकेसीतील रॅलीत आदित्य यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले. बहुदा त्यांचं उत्तर ते इतर रॅली किंवा सभेच्या माध्यमातून नंतर देतील." 
 
आदित्य यांनी बोलायला हवं होतं? 
आदित्य ठाकरे युवा सेनेचे अध्यक्ष आहेत. युवावर्गात त्यांच्याबाबत लोकांमध्ये आकर्षण आहे. मग दसरा मेळाव्याच्या मोठ्या व्यासपीठावरून त्यांनी बोलायला हवं होतं? 
 
राजकीय विश्लेषक मृणालिनी नानिवडेकर म्हणाल्या, "राज्यातील डेमोग्राफिक डिव्हिडंड (जनसांख्यिकीय लाभांश) पाहाता आदित्य ठाकरेंनी बोलायला हवं होतं." त्यांच्याबद्दल लोकांमध्ये आकर्षण आहे. लोकांसाठी ते औत्सुक्याचा विषय नक्कीच आहेत. 
 
सुधीर सुर्यवंशी आदित्य ठाकरे का बोलले नसतील याची कारणं सांगताना म्हणतात, 
 
उद्धव ठाकरे दसरा मेळाव्याचं आकर्षण होते. त्यांच्यावरून लक्ष हटू नये म्हणून आदित्य यांनी नाव मागे घेतलं असावं 
शिवसेनेने बहुदा ही रणनिती आखली आहे की राजकीय लढाई उद्धव ठाकरेंनी लढायची आणि इतर मुद्यांवर आदित्य ठाकरेंनी आक्रमक व्हायचं
आदित्य बेरोजगारी, युवा, शिक्षण अशा मुद्यांवर बोलून युवावर्गातील मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतायत. त्यामुळे ते दसरा मेळाव्यात बोलले नसतील
राजकीय जाणकार सांगतात की, "घराणेशाहीचा आरोप ठाकरेंवर सतत होतो. त्यामुळे दसरा मेळाव्याला उद्धव आणि आदित्य दोघांनी बोलण्याऐवजी इतर नेत्यांना बोलण्यासाठी संधी देण्यात आली असावी."

Published By -Smita Joshi

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

पुढील लेख
Show comments