Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीला सोनिया गांधी आणि राहुल गांधी का आले नाहीत?

Webdunia
शनिवार, 30 नोव्हेंबर 2019 (09:09 IST)
रजनीश कुमार
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या पाठिंब्यावर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. 28 नोव्हेंबरला ठरलेल्या या शपथविधी सोहळ्याचं काँग्रेस नेतृत्वाला विशेष निमंत्रण द्यायला शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी दिल्लीही गाठली.
 
मात्र शिवाजी पार्कावर ना काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, ना माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, ना राहुल गांधी उपस्थित होते. या अनुपस्थितीमुळे शिवसेनेला पाठिंबा देऊनही काँग्रेस त्यांचा सामना करणं टाळत आहे का, असा प्रश्न विचारला जात आहे.
 
भाजप प्रवक्ते GVL नरसिंह राव यांनी ट्वीट करून म्हटलं, "उद्धव ठाकरेंची गळाभेट घेणं गळफास लावून घेण्यासारखं होईल, या विचारानं राहुल गांधी घाबरले आहेत? सत्तेसाठी शिवसेना हवी आहे. मात्र काँग्रेस-UPAसाठी अस्पृश्य आहे. आपल्या साम्राज्याचे गुलाम म्हणून चालतील, पण मित्र-साथीदार म्हणून नाही. कुमारस्वामींचा सन्मान केला, उद्धव यांचा अपमान केला. हा बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान आहे."
 
आणखी एका ट्वीटमध्ये नरसिंहा राव यांनी म्हटलं, "महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे 'गोडसे भक्त' उद्धव ठाकरे यांचं अभिनंदन. तुम्ही आणि तुमच्या आमदारांनी सुलतानशाहीप्रति निष्ठा व्यक्त केली आहे. ही शरणागती 'सामना'चं नाव 'सोनियानामा' करून पूर्ण करा. तुमच्या दर्जाहीन वृत्तपत्राचं अर्थशून्य संपादकीय त्यांना सहन होणार नाही."
 
उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर अनेकदा अत्यंत खोचक शब्दात टीका केली आहे. उदाहरणार्थ -
 
राहुल गांधी मूर्ख आहेत. राहुल यांना बराच वेळ मिळाला. मात्र ते स्वतःला सिद्ध करू शकले नाही.
मणिशंकर अय्यर दिसले तर मी त्यांना जोड्याने हाणेन.
तुमचे नेते बँकॉकला गेले आहेत. तेव्हा काँग्रेस नेत्यांनी घरी बसावं.
काँग्रेसच्या तिकिटावर कुणीच निवडणूक लढू इच्छित नाही. राहुल यांच्या शब्दावर सोनिया गांधीदेखील विश्वास ठेवत नाहीत.
 
राहुल गांधी यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे.
उद्धव ठाकरेंनी 28 नोव्हेंबरला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तेव्हा माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यासह सोनिया गांधी आणि राहुल गांधींनी त्यांचं अभिनंदन केलं.
 
मुंबईच्या शिवाजी पार्कवर झालेल्या शपथविधी समारंभाला येण्याचं निमंत्रण उद्धव ठाकरेंनी मनमोहन सिंग आणि सोनिया गांधी यांच्यासोबतच राहुल गांधींनादेखील पाठवलं होतं. मात्र ते या कार्यक्रमाला आले नाहीत.
राहुल गांधी यांनी उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे, "तुम्ही मला आमंत्रण दिलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो. शपथविधी कार्यक्रमाला मी येऊ शकलो नाही, याची मला खंत आहे.
"भाजप लोकशाही खिळखिळी करण्याचं काम करत आहे. अशा परिस्थितीत हे आघाडी सरकार स्थापन होत आहे. हे सरकार धर्मनिरपेक्षता, स्थिरता आणि गरिबांसाठी काम करेल, अशी आशा मला आहे."
 
आदित्य ठाकरे यांनी स्वतः भेटून सोनिया गांधींना शपथविधीचं आमंत्रण दिलं होतं. मात्र, त्यादेखील आल्या नाही. त्यांनीही येऊ न शकल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. "भाजपमुळे देश संकटात असताना शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र आले आहेत," असं म्हटलं आहे.
 
सोनिया गांधींनी लिहिलं आहे, "असामान्य परिस्थितीत आपण एकत्र आलेलो आहोत. राजकीय वातावरण विषारी झालं आहे. अर्थव्यवस्था कोलमडली आहे आणि शेतकरीही संकटात आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात किमान समान कार्यक्रमावर एकमत झालं आहे. त्यावर तिन्ही पक्ष मिळून काम करतील, याबाबतीत मी निश्चिंत आहे."
 
काँग्रेसची धर्मनिरपेक्षता विरुद्ध शिवसेनेचं हिंदुत्व
शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या किमान समान कार्यक्रमात 'धर्मनिरपेक्षता' या शब्दाचा समावेश करण्यात आला आहे. शिवसेनेने तो मान्य केला आहे.
 
मात्र, 2015 साली शिवसेनेचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी राज्यघटनेतून 'धर्मनिरपेक्ष' हा शब्द काढून टाकण्याची मागणी केली होती, हे विशेष.
 
मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळाची बैठक घेतली. बैठकीनंतर त्यांची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत एका पत्रकारानं त्यांना विचारलं, की आता शिवसेना धर्मनिरपेक्ष झाली आहे का, यावर उद्धव ठाकरे जरा संतापले आणि म्हणाले "राज्यघटनेत जे आहे ते आहे".
 
सोनिया गांधी यांच्या पत्रावरून स्पष्ट होतं, की काँग्रेस शिवसेनेसोबत मनापासून गेलेली नाही तर भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी ही तडजोड करण्यात आली आहे.
काँग्रेसपुढे आज सर्वात मोठं आव्हान भाजप आहे. शिवसेनेची भाजपसोबत असलेल्या मैत्रीची जागा आता शत्रुत्वाने घेतली आहे. तिकडे राष्ट्रवादी काँग्रेसलादेखील महाराष्ट्रात भाजपकडूनच आव्हान देण्यात येत होतं. म्हणजे या तिन्ही पक्षांचा एकच समान शत्रू होता - भाजप. आणि म्हणूनच वेगळी विचारसरणी असूनदेखील दोन्ही काँग्रेसने शिवसेनेसोबत हातमिळवणी केली.
 
उद्धव ठाकरे यांनीही चिरंजीव आदित्य ठाकरे यांना गांधींना आमंत्रण देण्यासाठी मुंबईहून दिल्लीला पाठवलं होतं. त्यामुळे या महाराष्ट्र विकास आघाडीत शिवसेना किंवा काँग्रेस किती सहजपणे रुळतील, असा प्रश्न पडतो.
 
काँग्रेसची साथ घेतल्यामुळे शिवसेनेला आता हिंदुत्वाच्या मुद्द्यावर नरमाईची भूमिका घ्यावी लागणार आहे, ही गोष्ट तर नक्की झाली आहे. इथे मुख्यमंत्रिपदाची खुर्ची शिवसेनेकडे आहे आणि त्यामुळे त्यांनाच वाकावं लागणार आहे. यापुढे असे अनेक प्रसंग येतील जेव्हा हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेची कोंडी होऊ शकते.
 
गोडसे प्रकरणावरून उद्भवलेला वाद
नुकतंच, भाजप खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी नथुराम गोडसे यांना देशभक्त म्हटलं, त्यावर राहुल गांधींनी "भारतीय संसदेच्या इतिहासातील दुःखद दिवस" असं ट्वीट केलं होतं.
 
मात्र, यावर सहमत होणं शिवसेनेसाठी सोपं नाही.
 
राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोन पक्षांमध्ये विचारसरणीवरून वाद नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्मच काँग्रेसमधून झाला आहे. त्यांच्यावेगळं होण्याचं कारण हे वैचारिक नव्हतं. राजकीय महत्त्वाकांक्षा हे होतं. आता तर स्वतः शरद पवार यांची महत्त्वाकांक्षाही संपली आहे.
 
दुसरं म्हणजे, भाजपची ताकद बघता दोन्ही काँग्रेसने एकत्र असावं, हेही गरजेचं आहे.
 
राज्यात भाजपच्या उदयापासूनच इथला मराठा स्वतःला उपेक्षित मानू लागल्याचं बोललं जात होतं. तिकडे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपची साथ आपल्यासाठीही तोट्याचीच ठरू लागल्याचं शिवसेनेलाही वाटू लागलं होतं. प्रादेशिक मुद्देही मागे पडू लागले होते. महाराष्ट्रात शिवसेनेसाठी मराठी अस्मितेचं राजकारण महत्त्वाचं आहे. मात्र, भाजपसोबत सत्तेत आल्यापासून हे मुद्दे अप्रासंगिक ठरू लागले होते.
 
आजच्या घडीला भाजपविरोधात सर्व विरोधकांना एकत्र आणणं, हे सोनिया गांधी आणि काँग्रेस यांच्यापुढचं सर्वात मोठं आव्हान आहे. राहुल गांधींच्या हातात काँग्रेसची धुरा होती, तेव्हा हे होऊ शकलं नाही.
 
लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. आता पक्षाची धुरा सोनिया गांधी यांच्या हातात आहे आणि त्या महाराष्ट्रात तरी भाजपला सत्तेपासून दूर राखण्यास यशस्वी ठरल्या आहेत.
 
ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी ट्वीट करून म्हटलं आहे, "सोनिया गांधी आणि मनमोहन सिंह यांनी उद्धव ठाकरे यांच्या शपथविधी सोहळ्यात उपस्थित न राहून एक संधी गमावली आहे. दोघेही शपथविधी सोहळ्यात सहभागी झाले असते तर विरोधकांना एका व्यासपीठावर आणण्यास काँग्रेस कटिबद्ध आहे, असा संदेश गेला असता."
 

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

पुढील लेख
Show comments