Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुख्यमंत्री ठरला नाही तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होईल का?

Webdunia
शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2019 (14:49 IST)
नि
वडणुकीचे निकाल लागून एक आठवडा होऊनसुद्धा भाजप शिवसेनेचं सत्तावाटप आणि मुख्यमंत्रिपदाचा तिढाही अद्याप सुटलेला नाही. भाजप मोठा पक्ष ठरला असला तरी शिवसेना सत्तेचं समसमान वाटप आणि अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाच्या आपल्या मागणीवर ठाम आहे.
 
"शिवसेना मुख्यमंत्रिपदाची मागणी करत असल्यामुळे हा तिढा निर्माण झाला आहे. येत्या आठवड्याभरात राज्यात सरकार स्थापन न झाल्यास राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते," असं वक्तव्य अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी (1 नोव्हेंबर) केलं.
 
ते म्हणाले, "राज्यात ७ नोव्हेंबरपर्यंत सरकार स्थापन न झाल्यास राज्यात राष्ट्रपती शासन लागू होऊ शकतं. महाराष्ट्राला आपण पुरोगामी महाराष्ट्र असं संबोधतो. पुरोगामी महाराष्ट्रात अशा प्रकारची स्थिती यापूर्वीही कधी उद्भवली नव्हती आणि यापुढेही उद्भवणार नाही."
 
तसंच राज्यात महायुतीतच सरकार स्थापन होईल, असा विश्वास मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केला.
हा धमकावण्याचा प्रकार
मुनगंटीवार यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि आमदार नवाब मलिक यांनी हा धमकावण्याचा प्रकार असल्याचं म्हटलं.
 
ते सांगतात, "शिवसेनेनं जर ठरवलं तर त्यांचा मुख्यमंत्री होऊ शकतो, ते अशक्य नाही. पण देवेंद्र फडणवीस यांना राज्यपाल निमंत्रित करतील. सत्तास्थापन झाल्यानंतर बहुमत सिद्ध करण्यात जर ते अपयशी ठरले तर पर्यायी सरकार आम्ही स्थापन करू. पण ज्या पद्धतीने सुधीर मुनगंटीवार सांगतायेत की भाजपचं सरकार स्थापन झालं नाही, तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागेल, मला वाटतं हा कुठे तरी धमकावण्याचा प्रकार आहे.
 
मलिक पुढे म्हणाले, "लोकशाहीमध्ये लोकांनी निवडून दिलेल्या लोकांनी सरकार स्थापन करणे गरजेचे असते. ते होत नसेल तर पर्यायी सरकार स्थापन होईल. लोकशाहीत अशा प्रकारच्या धमक्या देणं योग्य नाही. विधिमंडळ सस्पेंड करून ठेवण्याचा प्रयत्न भाजप करणार असेल तर महाराष्ट्रातील जनता ते स्वीकारणार नाही."
 
यामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. महाराष्ट्रात खरंच राष्ट्रपती राजवट लागू होईल का, याचा उत्तर शोधण्याचा प्रयत्न बीबीसी मराठीने केला आहे.
 
राज्यघटनेत नेमकी काय तरतूद
राष्ट्रपती राजवटीच्या तरतूदीबाबत बीबीसी मराठीने राज्यघटनेचे तज्ज्ञ उल्हास बापट यांच्याशी संवाद साधला.
 
बापट सांगतात, विधानसभेतील सध्याच्या संख्याबळानुसार भाजप-शिवसेना मिळून सहज सत्ता स्थापन करू शकतात. पण ते दोघे एकत्र आले नाहीत तर कुणालाच बहुमत नाही, अशी स्थिती राज्यात निर्माण होईल.
 
सरकार स्थापन करण्यासाठी 288 पैकी 145 संख्याबळ पाहिजे असतं. पण यामध्ये उपस्थित असलेले सदस्य आणि मतदान करणारे सदस्य अशा प्रकारचं बहुमत आवश्यक असतं, असा नियमही आहे.
 
समजा, राष्ट्रवादी काँग्रेस सभागृहात गैरहजर राहिल्यास बहुमताची संख्या 115 च्या आसपासच येऊ शकते. अशा परिस्थितीत भाजप सहज बहुमत सिद्ध करू शकतं.
 
कोणालाच बहुमत सिद्ध करता आलं नाही तर राज्यघटनेच्या भाग 18 मध्ये राज्यात आणीबाणीच्या तरतुदी आहेत. कलम 352 अंतर्गत राष्ट्रीय आणीबाणी आहे. युद्ध किंवा परकीय आक्रमण या परिस्थितीत ही आणीबाणी लागू होते. कलम 360 खाली आर्थिक आणीबाणी आहे. तर कलम 356 अंतर्गत राज्यातील आणीबाणीच्या तरतुदी आहेत.
 
सरकार स्थापन झालं नाही तर काय होईल?
 
या आणीबाणीला राष्ट्रपती राजवट आपण म्हणतो. पण घटनेत अशा प्रकारचा शब्द नाही. घटनेत त्याला 'फेल्यूअर ऑफ कॉन्सिट्यूशनल मशिनरी इन द स्टेट' असे शब्द तिथे वापरण्यात आले आहेत.
 
राज्यात सरकार बनू शकत नाही, असा राज्यपालांनी अहवाल दिल्यास किंवा राष्ट्रपतींना राज्यातील सरकार योग्य प्रकारे घटनेनुसार काम करत नसल्याचं आढळल्यास ते राष्ट्रपती राजवट लागू करतात.
 
असं झाल्यास राज्याची कार्यकारी सत्ता राष्ट्रपतींकडे जाते. विधानसभेचं कार्य संसदेकडे जातं. न्यायव्यवस्थेवर याचा कोणताही परिणाम होत नाही. दोन महिन्याच्या आत याला संसदेची संमती आवश्यक असते. सहा महिने ते जास्तीत जास्त एक वर्ष ही राष्ट्रपती राजवट लागू ठेवता येऊ शकते.
 
एक वर्षांनंतर राष्ट्रपती राजवट लागू ठेवायचं असेल तर निवडणूक आयोगाची परवानगी लागते. ती परवानगी मिळाली तरी तीन वर्षं ही घटनेने घातलेली मर्यादा आहे. तीन वर्षांपेक्षा जास्त काळ राष्ट्रपती राजवट कोणत्याही परिस्थितीत लागू ठेवता येऊ शकत नाही.
 
भाजपची शिवसेनेला धमकी?
घटनेत तरतूद असली तरी राष्ट्रपती राजवटीचा उपयोग करू नये, ते डेड लेटर असेल, असं डॉ. बाबासाहेब आंबेडकर घटना समितीमध्ये म्हणाले होते. पण प्रत्यक्षात 125 पेक्षा जास्त वेळा राष्ट्रपती राजवट भारतात लागू झालेली आहे.
 
सध्या राष्ट्रपती राजवट लागू झाल्यास राज्यपालांच्या हातात संपूर्ण सत्ता जाईल. आता राज्यपाल हे पूर्णपणे पंतप्रधानांच्या अखत्यारीत राहून काम करतात. राज्यपालांची नेमणूक पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती करतात. राष्ट्रपती त्यांना काढूही शकतात. त्यामुळे सध्या राष्ट्रपती राजवट आली तरी भाजपचीच सत्ता असणार आहे. त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू करणार, अशी धमकीही त्यांनी दिली असेल, असं बापट यांना वाटतं.
 
राष्ट्रपती राजवटीनंतरही सत्ता स्थापनेची संधी
राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर राज्यपाल राजकीय पक्षांना बहुमत सिद्ध करण्यासाठी बोलावू शकतात. सर्वांत जास्त संख्या असलेल्या किंवा बहुमताचा आकडा शक्य असलेल्या राजकीय पक्षांनाही राज्यपाल बोलावू शकतात. त्यांना ठराविक मुदत देऊन बहुमत सिद्ध करण्यास सांगितलं जातं.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

पुढील लेख
Show comments