Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दर्शन द्वारकाधीशाचे आणि सोमनाथाचे

Webdunia
शनिवार, 6 एप्रिल 2024 (08:01 IST)
सोळा कलांनी परिपूर्ण असलेल्या द्वारकाधीशाचे दर्शन घेण्याची माझी फार दिवसाची इच्छा होती. माझे मानस माझ्या मुलाने जाणले होते. अखेर द्वारकाधीशानेही माझी हाक ऐकली. जवळ जवळ 10-15 वर्षापासून मी त्याच्या दर्शनाची आस धरली होती. पण त्या राजाधीराजाला माझ्या हांके कडे लक्ष देण्यास वेळच नसावा किंवा --- असो! काही ना काही अडचणी येत होत्या आणि जाणे जमत नव्हते. भगवंताने जेव्हां माझी हाक ऐकली तेव्हा त्याने मला त्याच्या चरणाकमळापाशी येण्याची परवानगी दिली. 
 
त्याच्याच आदेशानुसार आम्ही दोघे, चि. अमोलकडे मुंबईला पोहोचलो. चि. अमोलने 31 डिसेंबरपर्यंत सर्व कार्यक्रम आखून ठेवला होता. आरक्षण करून ठेवले होते. मग आम्ही मुलगा सून व नातवासोबत मुंबईहून अहमदाबाद एक्सप्रेसने निघालो. अहमदाबादला सकाळी पोहोचलो. गांधीनगर येथील 'केन्द्रीय सुरक्षाबल' ह्याच्या केंद्रीय सरकारी विश्रामगृहात थांबलो. स्नान, नाश्ता आटोपून गांधीनगरला असलेले स्वामी नारायण मंदिर पाहायला गेलो. या मंदिराला 'अक्षरधाम' असे म्हणतात. मंदिराचा परिसर अत्यंत स्वच्छ आहे. 
 
आम्ही ह्या पवित्र परिसरात शिरलो आणि जादूची कांडी फिरावी त्या प्रमाणे काहीसे मनाचे झाले. मन दिपून गेले. डोळे आश्चर्यचकीत झाले. देवळातल्या प्रथमदर्शनी भागात दुतर्फा कारंजाची सजावट आहे. ती पाहिली आणि 'ताजमहल'ची आठवण झाली. दुपारी सुद्धा कारंजावर दिवे लागले होते आजूबाजूला सुंदर हिरवळ आणि बाग आहे. ते दृष्य पाहात पाहात आम्ही मंदिरात प्रवेश केला तेथील भारदस्त लाकडी खांब्याचे कोरीव काम पाहून मन भारावून गेले. वास्तुशास्त्राच्या कल्पनेचे कौतुक वाटले. जवळ जवळ 15 फूट उंचीचे नारायण स्वामींची पिवळी पिवळी धम्म मूर्ती मनाचा ताबा घेते. ही मंगलमय मूर्ती तांब्याची असून त्यावर सोन्याचे पॉलिश आहे. मूर्ति अत्यंत रेखीव आहे. त्याच प्रमाणे सजीव वाटते. 
 
देव्हार्‍यातून बाहेर पडून डाव्या बाजूने वळले की खाली उतरण्यास पायर्‍या आहेत. पायर्‍या उतरून गेलो की मोठी मोठी दालने आहेत. पहिल्या दालनात एक मोठा संगमरवरी दगड आहे. त्यात एक सुंदर मूर्ती कोरली आहे, त्या मूर्तीच्या एका हातात हातोडा व दुसर्‍या हातात छन्नी आहे. ते पाहून ती मूर्ती आपल्याला संदेश देते असे वाटते. कोणता संदेश? मानव हा एक र्निर्विकार दगड आहे. विवेक आणि वैराग्य ह्या छन्नी-हातोड्याने माणसाने स्वत:चे आयुष्य स्वत: घडवावे, असा संदेश आपल्याला मिळतो. 
 
हा संदेश घेऊन आम्ही वाट चालू लागलो तर दर्शन घडले ते आकाशाचे. निळे काळे आकाश! आकाशातील नक्षत्र ग्रह तारे तारे यांचा खेळ पाहात पाहात पुढे चालावे तर दाट जंगल दिसू लागले, किर्र झाडी. त्यात पशुपक्षी वावरतांना दाखविले आहेत. हे सारे दगडांचे बनविले असून तेथील दृश्य मनोहर आहे. ह्या जंगलात स्वामी नारायणांची पांढर्‍या दगडाची मूर्ती आहे. स्वामी तपाला बसलेले आहेत ते पाहून वाटले की निर्जीवाला सजीवत्व प्राप्त झाले आहे. 
 
चालताना पुढल्या दालनात केव्हा प्रवेश केला कळलेच नाही. या दालनात सर्वत्र अंधार. पडद्यावर चार खाणीतील चार प्राणी दाखविले आहेत ते पाहून 'पृथ्वीवरील विविध प्राण्यांच्या देहांचे वैज्ञानिक पृथ:करण करून एक पेशीय देह उत्क्रांत होत होत मानवी देहाची निर्मिती झाल्याची, उत्क्रान्तीवादाची नवीन दृष्टी जगाला देणार्‍या, डार्विनच्या सिद्धान्ताची आठवण झाली. मानवी जीवनांत जगण्याची चाललेली धडपड, विज्ञानाची होत असलेली प्रगती, त्यापासून होणारे फायदे तोटे, त्यावर उपाय म्हणून अध्यात्मिक जीवनाची दिशा दाखविणारे संत, मानवी जीवनाचे ध्येय सांगणारे योगी, सोंगी भोगी सार्‍यांची जीव जगण्याची धडपड, निसर्गाचा प्रकोप, एक न दोन अनेक चित्र आपल्याला त्या पडद्यावर दाखविले जातात. 
 
श्रीकृष्णाने अर्जुनाला दाखविलेले 'विश्वरूप' आपण पाहात आहोत असे वाटते. त्यागुरुशिष्याच्या स्मृतिला आपण नतमस्तक होतो. मला तरी तसे काहीस वाटले. पुढे पाउले चालत होती एकदम महाभारत काळात पोहोचल्याचा भास झाला चौंसराचा डाव मांडून बसलेले कौरव पांडव, द्रौपदी वस्त्र-हरणाचा प्रसंग, सर्व सजीव मूर्तीच्या माध्यमातून दाखविले आहे. पुढे रामायणातील प्रसंग रंगविले आहेत. शेवटचा देखावा तर अतिशय बोलका आपले देहभान हरविणारा! स्वामी नारायण स्वत: सिंहासनावर विराजमान झाले आहेत त्यांच्या डाव्या बाजूला त्यांचे खास दरबारी सरदार आसनस्थ झाले आहेत, उजव्या बाजुला गाणार्‍यांचा संघ बसला आहे ह्या सार्‍यामूर्ती प्रत्यक्ष हावभाव करीत गात आहेत. 
 
राजे नारायण स्वामी त्यांच्या गाण्याला दाद देत आहेत. एक सरदार नम्रपणे हात जोडून राजांना प्रश्नविचारीत आहे. महाराज हातातील फुलाचा सुवास घेऊन उत्तर देत आहेत. ह्या सार्‍या मूर्ती निर्जीव आहेत हे आपण विसरूनच जातो. भारावलेल्या मनाने आपण जेव्हां बाहेर पडतो, तेव्हां वेगळेच काही भव्य दिव्य पाहिल्याचा आनंद मिळतो व आनंदाची जाणिव होते. कोणी म्हणेल हे का द्वारकेचे दर्शन? पर सर्वाभूती असलेल्या त्या द्वारकाधीशाचेच हे दर्शन नाही का?
 
अहमदाबादचे वैभव पाहिले. तेथील अदालजचा कुबा पाहिला. पुढे विशाळात जेवण घेतले. विशाळाचे वैशिष्ठय हे की तेथे निसर्गाच्या ‍सानिध्यात टेबल खुर्चीशिवाय जेवण मिळते. तेही खास गुजराथी पद्धतीचे. पुढे राजकोटला कूच केले. राजकोटला रात्री मुक्काम झाला. तेथील सर्किट हाऊस म्हणजे पूर्वीचा राजवाडाच. नंतर द्वारकेचा रस्ता धरला. रस्त्यात रिलायंस गॅस कंपनी बाहेरूनच पाहिली. दुपारी 12 वाजता द्वारकेला पोहचलो.
 
प्रथम राजाधीराज द्वारकाधीशाचे दर्शन घेतले. नंतर गोमती समुद्राला मिळते ते प्रेक्षणीय स्थळ पाहिले. गोपीतलाब, नागेश्वराचे मंदिर पाहिले. नागेश्वर हे द्वारकावनातील प्रसिद्ध ज्योर्तिलिंग बाराज्योर्लीलिंग पैकी आहे. नंतर ओखा बेटाला गेलो. परत येताना रुक्मिणी मंदिर पाहिले. समुद्र मार्गाने द्वारकेला परत आलो. रात्रीची आरती साधण्याकरता आम्ही देवळात गेलो. गर्दी तुफान होती. रेटारेट करीत द्वारकाधीशा जवळ आलोत. पुजार्‍याने डोक्यावर मोर‍पिसाचा पंखा ठेवला हातावर प्रसाद दिला. देवाचे डोळे भरून दर्शन घेतले. सत्यभामाचे मंदिर पाहिले. रात्री द्वारकेला मुक्काम केला. 
 
सकाळी पुन्हा द्वारकाधीशाचे दर्शन घेऊन शंकराचार्याचे दर्शन घेतले. सत्यभामाचे मंदिर पाहिले. द्वारका सोडून पोरबंदरला जाताना माधवपूर नांवाचे गांव आहे तेथे समुद्र व भद्रा नदीचा संगम आहे. गरम पाण्याचे कुंड आहे. तेथेच मूल द्वारका आहे असे म्हणतात पण आम्हाला मूल द्वारका म्हणून वेगळेच दर्शन दाखविले, हा सर्व परिसर अविकसीत आहे. ह्या भागाला प्रभासपट्टन असे म्हणतात हा सौराष्ट्राच्या समुद्रकिनार्‍यावर असून त्याच्या दक्षिणेला समुद्र उत्तरेला सुपीक जमीन, पश्चिमेला रेगिस्थान व पूर्वेला मोकळी जागा आहे. ह्या प्रभास क्षेत्रातच सोमनाथाचे भव्य दिव्य मंदिर आहे. ह्या मंदिराचा व तीर्थस्थानाचा विकास झाला आहे. मंदिर स्वच्छ असून वातावरण मंगलमय आहे. सकाळीच सोमनाथाच्या दर्शना करून आमची वाटचाल सुरू होती. इ.स. 1300 ते 1707 पर्यंत वारंवार ह्या देवस्थानावर हल्ले झालेत. पण तरीही त्याचे महत्व वाढत गेले. ते मंदिर कसे आहे अशी उत्सुकता वाढत होती. पुराणात म्हटले आहे.
 
'सूर्य बिम्ब सम प्राख्य', एवं समाकारंअहि मेखलामंडितम्'। 
कुक्कुटांड समानं तद् भूमि मध्ये व्यवस्थितम्'।।
श्री सोमनाथाचा आकार सर्पाच्या वेढ्यांनी अवगुंठीत झाला असून तो सूर्य किरणाच्या प्रभे प्रमाणे देदिप्यमान आहे. तो कोंबडीच्या अंड्‍याच्या आकाराचा असून जमिनीत स्थिर आहे. आकाशातील चंद्राने त्याला अलगद उचलून ब्रह्मशिलेवर त्याची स्थापना केली. असे म्हणतात. अनेकवार हल्ले होऊनही शिवलिंग जसेच्या तसेच होते पण महमूद गझनीने मात्र 1026 मध्ये शिवलिंगाची मोडतोड केली त्यांनतर बरेचदा ह्या शिवलिंगाची मोडतोड झाली व पुन्हा जीर्णोद्धारही बरेचदा झाला. 1786 मध्ये इंदौरच्या महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी सोमनाथाचे शिवलिंग पुन्हा एकदा स्थापन केले असे म्हणतात. 
 
ह्या मंदिराबद्दल अनेक दंतकथा आहेत. त्याला पौराणिक व ऐतिहासिक पुरावेही आहेत. महमूद गझनीने ह्या मंदिरावर हल्ला करून ह्यातील सोने, हिरे, माणिके लुटून नेले. महमूद गझनीशी हिंदुराजांनी खूप लढा दिला. त्यांनी पराकष्टाने आपल्या देवळाचे सुनामुलीचे रक्षण करण्याचा प्रयत्न केला पण त्यांना यश ‍आले नाही पण महमूद गझनीच्या सौन्याचे खूप नुकसान झाले. तरी त्याने देवकालीन मालमत्ता पळविलीच! त्या नंतर माळवा, अजमेर, जुनागढ, गुजराथ इत्यादी राजानी मंदिराचा जीर्णोद्धार केला. 
 
शिवलिंगाची प्रतिष्ठापना केली. गुजराथचा राजा भीमसोलंकी ह्याने हे मंदिर कच्या दगडाने बांधले होते पण नंतर राजाभोज, बिसल देव चौव्हाण, इत्यादिनी त्याचे पुन:निर्माण केले. आज जे सोमनाथ मंदिर आम्ही पाहिले त्याची काळजी 'सोमनाथ मंदिर ट्रस्ट' घेत आहे. सौराष्ट्राचे मुख्‍य मंत्री श्री उच्छंगराम नवलशंकर ढेबर यांनी 19-4-1940 मध्ये उत्खनन केले. त्यानंतर भारत सरकार पुरातत्व विभागाने उत्खनन करून ब्रह्मशिलेवर शंकराचे ज्योर्तिलिंग स्थापन केले. सौराष्ट्राचे भूतपूर्व राजा दिग्विजय सिंहने 8/5/1950 मध्ये मंदिराची आधार शिला ठेवली 11/5/51 ला भारताचे पहिले राष्ट्रपति राजेन्द्र बाबू यांनी मंदिरात ज्योर्तिलिंग स्थापन केले. नविन ज्योर्तिलिंग 1962 मध्ये सुरू झाले. याचे उद्‍घाटन 17/5/70 ला श्री सत्य साईबाबांच्या हस्ते झाले. येथे दारावर सरदार वल्लभभाई पटेलांचा पुतळा आहे. त्यांनी ह्या कार्यात खूप मदत केली असे म्हणतात.
 
असा पूर्व इतिहास असलेले हे सोमेश्वराचे मंदिर आहे. ते पाहून आम्ही प्रभावित झालो. त्याच वेळेला बलरामाने नागलोकात प्रवेश केला ते ठिकाण पाहिले. श्रीकृष्णाचे भालुका क्षेत्र, पांडवगुहा हे पाहात पाहात आम्ही सासण गावी रात्री आलो. तेथे मुक्काम केला. नंतर गीर फॉरेस्ट, गिरनार पर्वत, जुनागडचा किल्ला पाहिला व राजकोटला पोहोचलो. राजकोट येथेही 'नारायण स्वामी मंदिर' आहे. ते पाहिले मग रामकृष्णाश्रम पाहिला व रात्री सौराष्ट्र एक्सप्रेसने मुंबईला रवाना झालो. सकळी 8 वाजता मुंबईला सुखरूप पोहोचलो.
 
- कमल जोशी
नागपूर

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

आयुष्मान खुरानाने त्याच्या पहिल्या लाईव्ह सिंगिंग परफॉर्मन्सचे श्रेय अरिजीत सिंगला दिले

भूल भुलैया 3 ने सिंघम अगेनला टाकले मागे, चार आठवड्यात 247 कोटींची कमाई

एआर रेहमानसोबतच्या नात्याच्या अफवांवर मोहिनी डे यांनी मौन सोडले

फोर्स ऑफ नेचर: द ड्राय 2 आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झाला

अनुपमा'च्या सेटवर विजेचा धक्का लागल्याने कॅमेरा असिस्टंटचा मृत्यू, निर्माता म्हणाले-

सर्व पहा

नवीन

अजय देवगण आणि काजोलच्या 'इश्क' चित्रपटाला 27 वर्षे झाली पूर्ण

भारतातील पाच असे स्थळ जिथे अप्रतिम सुपरमून दिसतो

अटक टाळण्यासाठी राम गोपाल वर्मा घरातून गायब,व्हिडिओ जारी केला

सन ऑफ सरदारच्या प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या मुलाचे वयाच्या 18व्या वर्षी निधन

ब्रम्हाजी मंदिर पुष्कर राजस्थान

पुढील लेख
Show comments