Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बिहार निवडणूक: उद्धव ठाकरे आणि नितीश कुमार यांचा राजकीय पट सारखाच?

Webdunia
मंगळवार, 29 सप्टेंबर 2020 (12:43 IST)
नामदेव अंजना
बिहार विधानसभा निवडणुकीच्या घोषणा झाल्या आहेत. तीन टप्प्यांत होणाऱ्या या निवडणुकांचा निकाल 10 नोव्हेंबर रोजी लागेल.
 
नितीश कुमार यांचा जनता दल यूनायटेड (जदयू) आणि भारतीय जनता पक्ष एकत्र निवडणुकांना सामोरं जाणार आहेत, तर त्यांच्यासमोर प्रमुख विरोधक लालू प्रसाद यादव यांचा राष्ट्रीय जनता दल (राजद) असेल. राजदचं सध्या नेतृत्व तेजस्वी यादव करत आहेत.
 
नितीश कुमार हे मधले काही महिन्यांचा कालावधी वगळल्यास 2005 सालापासून सलग बिहारचे मुख्यमंत्री आहेत.
 
मात्र, यंदा त्यांच्यासाठी बिहारची निवडणूक आणखी आव्हानाची ठरणार आहे. कारण केवळ जिंकणंच नव्हे, तर जागांच्या बाबतीतही वरचष्मा राखणं नितीश कुमार यांना महत्त्वाचं असेल. अन्यथा, जदयूच्या जागा कमी झाल्यास भाजप मुख्यमंत्रि‍पदावर दावा करण्याची शक्यता राजकीय विश्लेषक वर्तवतात.
 
या चर्चांमुळेच नितीश कुमार यांच्या राजकीय कोंडीची म्हणूया किंवा राजकीय सद्यस्थितीची तुलना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी केली जात आहे.
 
याचं एक प्रमुख कारण असं आहे की, नितीश कुमार यांचा जदयू NDA मधील घटकपक्ष आहे, तर काही महिन्यांपूर्वीपर्यंत उद्धव ठाकरे यांची शिवसेनाही NDA मधील घटकपक्ष होती. त्यामुळे सत्तासमीकरणं जुळवताना भाजप दोन्हीकडे महत्त्वाचा घटक राहिला आहे.
 
इथेच नितीश कुमार आणि उद्धव ठाकरे यांच्यात राजकीयरीत्या काही साम्यस्थळं दिसून येतात. ही साम्यस्थळं त्या त्या राज्यांच्या संदर्भांनुसार काहीशी बदलतात, मात्र स्थिती सारखी दिसून येते. याच साम्यस्थळांचा आपण या बातमीतून आढावा घेणार आहोत.
 
उद्धव ठाकरे आणि नितीश कुमारांच्या आधाराने भाजपची वाढ?
उद्धव ठाकरे यांचा शिवसेना आणि नितीश कुमार यांचा जदयू हे दोन्ही पक्ष मूळचे NDA मधील आहेत. त्यापैकी शिवसेना NDA तून बाहेर पडली, तर नितीश कुमार मधले काही वर्षे वगळता पुन्हा NDA मध्येच आहेत.
 
विशेष म्हणजे, दोन्ही पक्षांनी ज्यावेळी NDA मध्ये प्रवेश केला, तेव्हा दोन्ही ठिकाणी भाजप कमकुवत होती आणि हे दोन्ही पक्ष ताकदवान होते. मात्र, आताची राजकीय स्थिती बदललीय.
 
याबाबतच वरिष्ठ पत्रकार अभिजीत ब्रह्मनाथकर सांगतात, "अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणींच्या काळात भाजपनं पहिल्यांदा नितीश कुमार यांच्या समता दलासोबत आणि नंतर जेदयूसोबत युती केली. त्यावेळी भाजप कमकुवत होता आणि नितीश कुमार यांची प्रादेशिक ताकद जास्त होती."
 
बिहारसारखीच स्थिती महाराष्ट्रात होती, असं अभिजीत ब्रह्मनाथकर सांगतात. ते म्हणतात, "1990 च्या निवडणुकीला शिवसेनेची ताकद होती. शिवसेनेकडे हिंदुत्ववादी चेहरा म्हणून बाळासाहेब ठाकरे होते. भाजपकडे तेवढी ताकद नव्हती."
 
मात्र, "गेल्या 20 वर्षांत नितीश कुमार आणि भाजप एकत्र आहे, इकडे शिवसेना आणि भाजपही 24 वर्षे एकत्रच होते. या जवळपास दोन दशकांमध्ये राजकारणाचा इतिहास, भूगोल आणि गणित बदललंय. त्यामुळे बिहार आणि महाराष्ट्राचं सर्वात मोठं साम्य म्हणजे नरेंद्र मोदींच्या उगमानंतर भाजपच्या महत्वकांक्षा दोन्ही ठिकाणी वाढल्या. त्यात नेमकी दोन्ही ठिकाणी प्रादेशिक पक्षांची ताकद राहिली नाही."
 
बिहार आणि महाराष्ट्रात भाजपच्या वाढलेल्या ताकदीची कल्पना नितीश कुमार आणि उद्धव ठाकरेंना वेळोवेळी आल्याचे बिहारमधील ज्येष्ठ पत्रकार मणिकांत ठाकूर सांगतात.
 
विरोधकांसोबत सत्तास्थापनेचे प्रयत्न
मणिकांत ठाकूर म्हणतात, "नितीश कुमार आणि उद्धव ठाकरे यांच्यात बऱ्याच समान गोष्टी सापडतात. दोन्ही ठिकाणी भाजप शांतपणे या प्रादेशिक पक्षांसोबत चालत राहिली. मात्र, आपली ताकद हळूहळू वाढवतही राहिली."
 
ते पुढे सांगतात, "भाजपची वाढणारी ताकद आणि आपल्या स्वतंत्र राजकारणासमोरील धोक्याची घंटा लक्षात घेता दोन्ही पक्षांनी वेळोवेळी पावलं उचलली. 2014 साली पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदी यांना विरोध करत नितीश कुमार यांनी NDA ला राम राम केला, मात्र ते पुन्हा तिथेच आले. उद्धव ठाकरे यांनी आताच तेच केलं आहे. त्यांच्या बाहेर पडण्याची कारणं वेगळी असली तरी तेही आता बाहेर पडले आहेत."
 
नितीश कुमार असो वा उद्धव ठाकरे हे NDA तून बाहेर पडल्यानंतर आपल्या विरोधकांच्याच मांडीला मांडी लावून बसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे दोघांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केले गेले.
 
अभिजित ब्रह्मनाथकर सांगतात, "नितीश कुमार हे बिहारमधील विश्वासू चेहरा होते. मात्र, 2015 ला नरेंद्र मोदींना विरोध करत ते बाहेर पडले आणि ज्यांना आयुष्यभर विरोध केला त्या लालूप्रसाद यादवांच्या मांडीला मांडी लावून त्यांना बसावं लागलं. तिथूनच पहिल्यांदा नितीश कुमार यांच्या प्रतिमेला तडा गेला. बिहारमध्ये विरोधक म्हणूनच त्यांना 'पलटूराम' म्हणतात."
 
"महाराष्ट्रातही असचं झालं. मुख्यमंत्र्याच्या अभिलाषेनं शिवसेना आणि उद्धव ठाकरेंना पछाडलं आणि ज्यांना आयुष्यभर विरोध केला, त्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून बसले. या दोन समानता प्रामुख्याने दिसतात," असं ब्रह्मनाथकर म्हणतात.
 
बिहारमध्येही भाजप मुख्यमंत्रि‍पदावर दावा करेल?
महाराष्ट्रात 2014 साली जास्त जागा आल्यनं भाजपनं मुख्यमंत्रि‍पदावर दावा केला आणि देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीही झाले. 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजपमधील मुख्यमंत्रि‍पदावरून झालेला वाद टोकाला गेला आणि अखेर शिवसेनेनं युती तोडून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत घरोबा केला. मात्र, हे बिहारमध्ये होऊ शकतं?
 
ब्रह्मनाथकर म्हणतात की, महाराष्ट्रात भाजप दुय्यम होता, तसा बिहारमध्येही आहे. तिथेही मुख्यमंत्रिपद मिळावं, ही भाजपची इच्छा आहे आणि त्यात गौण काहीच नाही. बिहार-उत्तर प्रदेशात असं म्हटलं जातं की, जिसकी जितनी हिस्सेदारी, उसकी उतनी भागिदारी. याचप्रमाणे पाहिल्यास भाजपची आता हिस्सेदारी वाढलीय.
 
मणिकांत ठाकूर या गोष्टीला 'राजकीय संधीचं पाऊल' म्हणतात. ते म्हणतात, राजकीय फायदा पाहून सर्वच पक्ष असे निर्णय घेत असतात.
 
"राजकीय पक्षांचं निश्चित काही सांगता येत नाही. निकालानंतरच्या आकडेवारीनुसार कुणी कुठेही जाऊ शकतं. बिहारमध्ये जदयूपेक्षा जास्त जागा आल्यास भाजप मुख्यमंत्रि‍पदावर दावा करणारच नाही, असं ठाम सांगता येत नाही" असं ठाकूर म्हणतात.
 
बिहार भाजपचा चेहरा कोण?
महाराष्ट्रात 2014 च्या आधी गोपीनाथ मुंडे महाराष्ट्र भाजपचा चेहरा होते. मात्र, त्यांचं अकाली निधन झालं. पुढे 2014 साली सत्ता आल्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. मात्र, 2014 आधी मुख्यमंत्रि‍पदासाठी फडणवीसांच्या नावाची कुठेच चर्चा नव्हती.
 
बिहारमध्येही अशीच काहीशी स्थिती आहे. बिहारमध्ये राज्याचं नेतृत्व करण्याची वेळ आल्यास आजच्या घडीला भाजपने कुठलाच चेहरा ठरवला नाहीय.
 
सुशीलकुमार मोदी हे बिहारमधील भाजपचे नेते आहेत, मात्र त्यांच्या नेतृत्त्वावर प्रश्न उपस्थित केले जातात.
 
मणिकांत ठाकूर म्हणतात, "सुशीलकुमार मोदींचा स्वतंत्र चेहरा नाहीये. कारण सुशीलकुमार हे कायमच नितीशकुमार यांच्या मागे फिरताना दिसतात. काही मुद्द्यांवर नितीश कुमार यांच्या विरोधात बोलण्याचे धाडस त्यांनी दाखवलं असतं, तर ते वेगळा चेहरा ठरले असते. मात्र, तसं होत नाही. शिवाय, बिहार भाजपमध्येही सगळेच जण सुशीलकुमार मोदींना नेते मानत नाही."
 
तर अभिजीत ब्रह्मनाथकर म्हणतात, "सुशीलकुमार मोदी हे भाजपचे बिहारमधील चेहरा नाहीत. किंबहुना, प्रचारात सुद्धा त्यांची ही शेवटची निवडणूक असेल. निवडणुकीसंदर्भातल्या कार्यकारिणीत भाजपनं सुशीलकुमार मोदींना एका छोट्या समितीत घेतलंय. हे त्याचेच संकेत आहेत. सुशीलकुमार मोदी निर्णयप्रक्रियेत नाहीत. ते नितीशकुमार यांच्या जवळचे आहेत."
 
चेहरा न दिल्यानं भाजपला फायदा होतो, असं अभिजीत ब्रह्मनाथकर सांगतात. "जास्त गट-तट असतात, तेव्हा भाजप चेहरा देत नाही. महाराष्ट्रात 2014 सालीही दिला नव्हता. सगळ्या गटातटांना आशा द्यायची असते की तुमच्यापैकी कुणीही होऊ शकतो," ही रणनिती यामागे असल्याचे ब्रह्मनाथकर म्हणतात.
 
'भाजपसाठी NDA मधील मित्रपक्ष ओझं'
सर्वांत शेवटी महत्त्वाचा प्रश्न उरतोच, तो म्हणजे नितीश कुमार असो किंवा उद्धव ठाकरे यांसारख्या ताकदवान मित्रपक्षांना भाजप आता इतकं गांभीर्यानं का घेत नाही? नितीश कुमार यांच्या नेतृत्वात भाजप बिहारमध्ये लढत असली, तरी तेच मुख्यमंत्री असतील, असं कुठलाही भाजप नेता स्पष्टपणे बोलत नाही.
 
शिरोमणी अकाली दलाच्या निमित्तानं शिवसेनेनंतर भाजपनं मोठा पक्ष NDA मधून गमावला. याबाबतचं अभिजीत ब्रह्मनाथकर म्हणतात, भाजपला मुळातच NDA चे मित्रपक्ष ओझं झालंय.
 
"शिरोमणी अकाली दलासोबत 13 पैकी 3 जागा लोकसभेच्या लढायचे आणि 117 पैकी 13 विधानसभेच्या जागा लढायचे. तसंच, महाराष्ट्रात 117 आणि 171 हा फॉर्म्युला 2019 मध्ये कसं चालेल, हे सेनेच्या नेतृत्त्वाने समजूनच घेतलं नाही. हीच गत नितीशकुमार यांच्याबाबतही झाली. 2000-2001 च्या काळात नितीश कुमार ताकदवान होते. मोदींच्या उगमानंतर भाजपची मतांची टक्केवारी वाढलीय. मग हे प्रादेशिक पक्ष समजूनच घेत नाही," असं अभिजीत ब्रह्मनाथकर म्हणतात.
 
महाराष्ट्रात शिवसेना ज्यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत घरोबा करण्याच्या हालचाली करू लागली होती, तेव्हा दिल्लीतील कुणाही भाजप नेत्याने हस्तक्षेप केला नाही. तेच 2015 साली नितीश कुमार यांच्याबाबत आणि काल-परवा शिरोमणी अकाली दलाबाबत भाजपनं केलं.
 
"जया-ममता-समता (जयललिता, ममता बॅनर्जी आणि समता म्हणजे नितीश कुमार यांचा आधीचा पक्ष) यांच्यासोबत काही बिनसलं, तर प्रमोद महाजन शिष्टाई करायला जायचे. ते मोदी-शहा काळात होत नाही. कारण स्वबळावरच वाढता येईल, ही रणनिती आताच्या भाजपची दिसून येते. प्रादेशिक मित्रपक्षांच्या जोरावर आपल्याला वाढता येणार नाही, अशी धारणा भाजपचा दिसून येते," असं अभिजीत ब्रह्मनाथकर सांगतात.
 
किंबहुना, मणिकांत ठाकूर म्हणतात, "भाजपचे कार्यकर्ते मोठ्या कालावधीपासून अशी मागणी करत आहेत की, जदयूची सोबत सोडून स्वबळावर लढावं. मात्र, दिल्लीतील भाजपच्या नेत्यांनी ही मागणी कधीच स्वीकारली नाही. स्वबळावर लढल्यास बिहारमधील जातीय समीकरणात आपण टिकू शकणार नाही. जदयू आणि राजद हे जातीय समीकरणाच्या राजकारणात वाकबगार असल्याचं भाजपला आजवर वाटत आलंय."
 
म्हणजेच, मुख्यमंत्रिपदावरून महाराष्ट्रात जे उद्धव ठाकरे यांच्याबाबत झालं, ते उद्या नितीश कुमार यांच्याबाबत होणार नाही, याची खात्री राजकीय तज्ज्ञांना वाटत नाही.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी संजय राऊतच्या आरोपांना उत्तर दिले म्हणाले-

Pan 2.0 project : PAN 2.0 लागू झाल्यानंतर जुने पॅन कार्ड अवैध होणार का?

LIVE: ठाणे : दोन दिवसांपासून बेपत्ता तरुण, झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला

महाराष्ट्रात शपथविधी सोहळा या दिवशी होऊ शकतो

गोल्डी बरार आणि रोहित गोदाराने नाईट क्लबबाहेर झालेल्या दोन बॉम्बस्फोटांची जबाबदारी घेतली

पुढील लेख
Show comments