Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आलिया म्हणते रणबीर मला लिपस्टिक पुसायला लावतो, महिला म्हणतात ‘टॉक्सिक नवरा’

Webdunia
गुरूवार, 17 ऑगस्ट 2023 (20:16 IST)
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलेत.
 
आलियाचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे, ज्यात तिने लिपस्टिक विषयी बोलताना आपल्या नवऱ्याचा, रणबीर कपूरचा उल्लेख केलाय.
 
लाइफस्टाइल मॅगझिन वोग इंडियाच्या यूट्यूब चॅनलवर आलिया भट्टचा हा व्हीडिओ पोस्ट करण्यात आलाय. या व्हिडिओमध्ये आलिया भट्ट स्वतःचा मेकअप करते आणि परत तो काढते.
 
व्हीडिओमध्ये आलिया मेकअप कसा करायचा याविषयी काही टिप्स देत असते.
 
दरम्यान लिपस्टिक कशी लावायची यावर आलिया म्हणते, "मी लग्नात ही लिपस्टिक लावली होती. मला अशा पद्धतीच्या लिपस्टिकचा रंग खूप आवडतो. मी लिपस्टिक वेगळ्याच पद्धतीने लावते. मी लिपस्टिक ओठांवर फिरवत नाही तर लिपस्टिक एका ठिकाणी धरून त्यावर ओठ फिरवते. मला तशी लिपस्टिक लावणं चांगलं वाटतं."
 
आलिया पुढे सांगते, "मी ही लिपस्टिक माझ्या पद्धतीने लावते आणि नंतर काढून टाकते. कारण माझा नवरा (रणबीर) आणि मी जेव्हा एकमेकांना डेट करत होतो आणि नाईट आऊटसाठी जायचो तेव्हा तो मला लिपस्टिक पुसायला सांगायचा. कारण त्याला माझ्या ओठांचा नैसर्गिक रंग आवडतो."
 
या व्हीडिओमध्ये आलियाने आणखी एका ठिकाणी रणबीर कपूरचा उल्लेख केला आहे.
 
पापण्यांबद्दल बोलताना आलिया म्हणते, "माझ्या नवऱ्याच्या पापण्या खूप लांब आणि सुंदर आहेत. माझ्या मुलीचा जन्म झाला तेव्हा मी सगळ्यांत आधी तिच्या पापण्या कशा आहेत हे बघायला सांगितलं. आणि नशीब, तिच्या देखील पापण्या लांब आहेत."
 
आलियाने रणबीरविषयी जे काही सांगितलं त्यावर आलेल्या महिलांच्या प्रतिक्रिया
 
आलिया भट्टचा हा व्हीडिओ सुमारे 11 मिनिटांचा आहे. पण यातल्या काही सेकंदाच्या त्या लिपस्टिकच्या विषयावरून सोशल मीडियावर मात्र चर्चा सुरू झाली.
 
सोशल मीडियावर काही महिला रणबीरवर टीका करत आहेत तर काही जण याला त्यांची ही वैयक्तिक बाब असल्याचं म्हणत आहेत.
 
ब्रिटनच्या 'द इंडिपेंडंट' वृत्तपत्राच्या आशिया उपसंपादक रितुपर्णा चॅटर्जी लिहितात की, "यामुळे मी खूप अस्वस्थ झाले. स्त्रीच्या शरीरावर अशा पद्धतीचं नियंत्रण तिच्या जीवनाच्या इतर क्षेत्रांवर देखील परिणाम करू शकतं. महिलांनी काय घालायचं काय नाही हे पुरुष ठरवू शकत नाहीत. आलिया याविषयी आवाज उठवू शकते आणि मला आशा आहे की ती स्वतःसाठी उभी राहील."
 
श्री कर्णिक नामक युजर सोशल मीडियावर लिहितात, "लोक म्हणतायत की ही मोठी गोष्ट नाहीये ते मी समजू शकते. मलाही काही सेकंद तसंच वाटलं. पण तुमच्या जोडीदाराच्या आवडीनिवडींना प्राधान्य देणं आणि तुमच्या आवडीनिवडींमध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार देणं यात फरक आहे. मी कशी दिसते याविषयी माझ्या पतीने मला कधीच काही सांगितलं नाही आणि मला त्याच्याबद्दल कधीच विचारलं नाही. माझ्या मते हाच फरक आहे."
 
सलोनी मित्तल लिहितात, "आलिया काय बोलली ते मी समजू शकते कारण माझं मन देखील मला लिपस्टिक पुसण्यास सांगतं. मग ते केवळ लिप ग्लॉसच का असेना. मला लिपस्टिक पुसण्यास सांगणारा मित्र किंवा माणूस कधी भेटलाच नाही. हे सांगण्याचं काम माझ्या मनाने केलंय. अशा परिस्थितीत कोणी जर असं तुम्हाला सांगत असेल तर तो चुकीचा आहे असं म्हणता येणार नाही."
 
संजनी शाह लिहितात, "रणबीर कपूरने असं काही सांगण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये. त्याच्याकडे त्या सर्व गोष्टी आहेत ज्यामुळे तो टॉक्सिक आहे असं वाटतो."
 
अबिहा लिहितात, "आलिया संपूर्ण व्हीडिओमध्ये स्पष्टपणे सांगते की तिच्या पतीला तिच्या ओठांचा नैसर्गिक रंग आवडतो. लिपस्टिक आवडत नसेल तर त्यात काय चुकीचं आहे?"
 
शामिया लिहिते, "माझ्या नवऱ्यालाही मेकअप आवडत नाही, मग त्यात अडचण काय आहे? मला रणबीर कपूर आवडत नाही, पण राईचा पर्वत बनवण्याची काही गरज नाही."
 
आलियाच्या वक्तव्यावरून निर्माण झालेल्या वादावर बऱ्याच पुरुषांनी लिहिलंय की, विनाकारण वाद पेटवला जातोय, त्यात काही चुकीचं नाहीये.
 
महिलांविषयीच्या वक्तव्यामुळे बऱ्याचदा वादात अडकलाय रणबीर कपूर
रणबीर कपूरन आपल्या जोडीदाराला असं बोललाय हे काही पहिल्यांदाच घडलेलं नाहीये.
 
याआधी रणबीर कपूरने आलिया भट्टवर केलेली कमेंटही चर्चेत आली होती.
 
एका चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान दोन्ही स्टार्स लाइव्ह सेशन करत होते. तेव्हा आलिया एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणत होती की, आम्ही उगाच जाड होत नाही कारण...
 
तेवढ्यात रणबीर आलियाच्या गरोदरपणामुळे वाढलेल्या वजनाकडे बोट दाखवतो आणि म्हणतो, पण मला दिसतंय की कोणीतरी जाड झालंय...
 
यावर आलिया आश्चर्यचकित नजरेने त्याच्याकडे पाहते, तेव्हा रणबीर म्हणतो, गमतीने म्हणालो...
 
रणबीरच्या या कमेंटवर गदारोळ झाला होता. त्यानंतर रणबीर कपूरने एका पत्रकार परिषदेत यावर स्पष्टीकरण दिलं.
 
रणबीर म्हणाला, "मी ते गमतीने म्हणालो होतो, यावर आलियाही खूप हसली होती. पण माझ्या बोलण्याने कोणाचं मन दुखावलं असेल तर मी माफी मागतो. माझ्या म्हणण्याचा तो अर्थ नव्हता. माझा हजरजबाबीपणा वाईट आहे. कधी कधी ते माझ्यावर उलटतं."
 
मे 2023 मध्ये एका मुलाखतीत आलिया भट्ट म्हणाली होती, "मला माझ्या रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल. कारण माझ्या नवऱ्याला रागात आवाज वाढवलेला आवडत नाही. रणबीरला असं वाटतं की हे चुकीचं आहे आणि तुम्ही रागात असाल तरी तुम्ही दयाळू वागणं खूप महत्त्वाचं आहे."
 
काही काळापूर्वी करीना कपूरच्या टॉक शोमध्ये एका बोर्डवर फाटलेले कपडे दाखवून सेलिब्रिटी ओळखण्यास सांगितलं होतं. तेव्हा रणबीर म्हणाला होता- ही उर्फी जावेद आहे का?
 
करीनाने विचारलं असता रणबीरने हे कपडे बॅड टेस्ट असल्याचं म्हटलं होतं
 
आलिया भट्ट आणि रणबीर कपूरची प्रेमकहाणी
रणबीर कपूर आणि आलिया भट्टने एप्रिल 2022 मध्ये लग्न केलं होतं. नोव्हेंबर 2022 मध्ये आलियाने राहा या मुलीला जन्म दिला.
 
लग्नाआधी दोघेही अनेक वर्षे एकमेकांना डेट करत होते.
 
दोघांची पहिली भेट 2005 साली संजय लीला भन्साळीच्या सेटवर झाली होती. आलियाने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, तिला तेव्हा रणबीर कपूर आवडायचा.
 
2007 मध्ये रणबीर कपूरचा पहिला चित्रपट सावरिया रिलीज झाला होता. 1999 मध्ये अक्षय कुमार आणि प्रीती झिंटाच्या संघर्ष या चित्रपटात आलिया भट्ट बाल कलाकाराच्या भूमिकेत दिसली होती.
 
मुख्य अभिनेत्री म्हणून आलियाला 2012 साली करण जोहरच्या स्टुडंट ऑफ द इयर चित्रपटातून पहिला ब्रेक मिळाला.
 
रणबीर आणि आलियाने आतापर्यंत एकच चित्रपट सोबत केला आहे.
 
ब्रह्मास्त्र - भाग 1 शिवा नावाच्या या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान आलिया आणि रणबीर कपूर जवळ आल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.
 
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट दोघेही यशस्वी कलाकार आहेत.
 
रणबीर कपूरचे काही चित्रपट फ्लॉप ठरले असले तरी आलिया भट्टचे बहुतांश चित्रपट समीक्षकांच्या नजरेत किंवा बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले आहेत.
 
दोन्ही कलाकारांच्या ब्रह्मास्त्र या चित्रपटाने 400 कोटींहून अधिक कमाई केली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

15 व्या दिवशी देखील अल्लू अर्जुनच्या पुष्पा 2 ने केला 1500 कोटींचा टप्पा पार

Year Ender 2024 कमी बजेटमध्ये बनवलेले 5 चित्रपट, ज्यांनी यावर्षी चांगलीच धमाल केली

ऋचा चढ्ढाला पत्रकार व्हायचं होतं, पण अभिनेत्री झाली

यशराज फिल्म्स आणि पोशम पा पिक्चर्सच्या पहिल्या मोठ्या चित्रपटात आयुष्मान खुराना मुख्य भूमिकेत, समीर सक्सेना करणार दिग्दर्शन!

गुम है किसी के प्यार में' शोमध्ये शीझान खानची धमाकेदार एन्ट्री, महत्त्वाची भूमिका साकारणार

सर्व पहा

नवीन

संध्या थिएटर दुर्घटनेच्या वादात अभिनेता अल्लू अर्जुनच्या निवासस्थानाची तोडफोड

एकलिंगजी मंदिर उदयपुर

दिग्दर्शक आणि आर्ट डिझायनर सुमित मिश्रा यांचे निधन

अक्षय कुमार स्टारर वेलकमला17 वर्षे पूर्ण झाली, अनिल कपूरने जुने दिवस आठवत पोस्ट केली

पुष्पा 3 बाबत अल्लू अर्जुनने घेतला मोठा निर्णय

पुढील लेख
Show comments