Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नाझिया हसन : 15व्या वर्षी बॉलिवूड गाजवलेली पाकिस्तानी गायिका, राज कपूरनी केला होता सिनेमा ऑफर

Webdunia
गुरूवार, 26 ऑगस्ट 2021 (22:54 IST)
ताहीर सरवर मीर
मुनीजा बशीर हसन यांनी अभिनेत्री झीनत अमान यांच्याशी मुलीची ओळख करून दिली. मात्र ड्रॉइंग रूममध्ये ठेवलेल्या गिटारबद्दलच्या झीनत यांच्या उत्सुकतेमुळं आपल्या मुलीचं भवितव्य उजळेल याची कदाचित त्यांना कल्पनाही नव्हती.
 
झीनत अमान लंडनमध्ये मुनीजा यांच्या घरी आल्या तेव्हा गिटार पाहून त्यांनी विचारलं, "ही कोण वाजवतं?"
 
"माझी दोन्ही मुलं नाझिया आणि झोहेब यांना संगितात रुची आहे, असं मी सांगितलं. नाझिया त्यावेळी घरीच होत्या. त्यांनी जेव्हा गाणं ऐकवलं तेव्हा ते झीनत यांना खूप आवडलं. त्या म्हणाल्या नाझिया फार छान गाते, तिचा आवाज वेगळा आहे,'' असं मुनिजा यांनी सांगितलं.
 
"दुसऱ्या दिवशी झीनत अमान यांनी मला फोन केला. निर्माते फिरोझ खान एक चित्रपट तयार करत असून त्यासाठी ते नव्या आवाजाच्या शोधात आहेत. मला वाटतं त्यांना नाझिया यांच्यासारख्या आवाजाचा शोध आहे, असं त्यांनी मला सांगितलं.
 
मी अनेकदा नकार दिला. पण झीनत अमान यांनी हट्ट धरला. त्यानंतर मी नाझियाच्या वडिलांशी बोलायचं ठरवलं. नाझियाचे वडील आणि त्यांचं कुटुंबीय पारंपरिक विचारांचे आहेत. त्यांचं मन वळवण्यासाठी मला जरा कसरत करावी लागली. पण आमच्या घरात एकमेकांशी चर्चा करता येईल असं वातावरण कायम राहिलं,'' असं मुनिजा म्हणाल्या.
 
'कुर्बानी' चित्रपटातून मिळाला पहिला ब्रेक
"मला चांगलं आठवतं. नाझिया शाळेच्या गणवेशात होती. अर्धी सुटी घेऊन ती स्टुडिओत गेली. त्याचवेळी तिच्याकडून, 'आप जैसा कोई मेरी ज़िंदगी में आए, तो बात बन जाए' हे गाणं रेकॉर्ड करून घेतलं होतं. त्यानंतर जे घडलं तो इतिहास होता," असं त्यांनी सांगितलं.
 
नाझिया हसन यांनी हे गाणं अभिनेता दिग्दर्शक फिरोझ खान यांच्या 'कुर्बानी' चित्रपटासाठी गायलं होतं. तर त्याचे संगीत संयोजक बिदु होते. त्यांनी या गाण्याची प्रेरणा अमेरिकन गायक लू रॉल्सच्या प्रसिद्ध 'यू विल नेव्हर फाइंड' गाण्यातून घेतली होती.
 
या चित्रपटातील इतर सर्व गाणी भारताचे प्रसिद्ध संगीतकार कल्याणजी आनंदजी यांनी आशा भोसले, मोहम्मद रफी आणि इतर प्रसिद्ध गायकांकडून गाऊन घेतली होती. पण 1980 मध्ये सर्वोत्कृष्ट गायिकेचा पुरस्कार नाझिया हसन यांनाच मिळाला होता.
 
15 व्या वर्षी फिल्मफेअर पुरस्कार
मुनिजा हसन यांच्या मते, हे गाणं रेकॉर्ड केल्यानंतर नाझिया अभ्यासात व्यस्त झाल्या. एखाद्या भारतीय चित्रपटासाठी गाणं गायल्याचं त्यांच्या लक्षातही राहिलं नव्हतं.
 
चित्रपट प्रदर्शित झाला आणि गाणं लोकप्रिय झालं त्यावेळी एक दिवस राज कपूर यांचा फोन आला. "फिल्मफेअर कमिटीनं यंदाचा सर्वोत्कृष्ट गायिकेचा पुरस्कार नाझियाला देण्याचा निर्णय घेतला आहे. तुम्ही तो स्वीकारायला येऊ शकता का?" असं त्यांनी विचारलं.
 
नाझिया यांनी ज्या वयात सर्वोत्कृष्ट गायिकेचा फिल्मफेअर पुरस्कार जिंकला होता तशी किमया पुरस्काराच्या 66 वर्षांच्या इतिहासात परत कोणाला करता आली नाही. मुंबईच्या ज्या हॉटेलमध्ये नाझिया हसन थांबल्या होत्या, त्याठिकाणी भारतीय पत्रकारांची कायम ये-जा सुरू होती.
 
नाझिया यांना राज कपूर यांच्या हस्ते पुरस्कार मिळाला. त्यानंतर बॉलिवूडमध्ये 'शो मॅन' अशी ओळख असलेल्या राज कपूरसह चित्रपट क्षेत्रातील प्रत्येक यशस्वी प्रोडक्शन हाऊसनं नाझिया यांना गाण्यासाठी ऑफर दिल्या. त्यांना ब्लँक चेकसह ऑफर मिळाल्या. पण त्यांनी सर्वांना नकार दिला.
 
नकाराचं कारण नाझिया यांचं कुटुंब होतं. त्यांच्या कुटुंबात शो बिझनेस किंवा ग्लॅमरला कमी लेखलं जात नसलं तरी त्याला शिक्षणापेक्षा अधिक महत्त्वही नव्हतं.
 
प्रसिद्ध अभिनेत्री बेबी तबस्सुम यांच्याबरोबरची नाझिया यांची टीव्हीवरील मुलाखत त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची उत्कृष्ट झलक देणारी आहे.
 
या मुलाखतीत नाझिया यांची कौटुंबिक पार्श्वभूमी, त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील प्रामाणिकपणा आणि आत्मविश्वास हे सर्व स्पष्टपणे झळकतं. तबस्सुम यांच्या खोडकर प्रश्नांवर नाझिया लाजत होत्या. त्या प्रश्नाचं छोटंसं पण अगदी स्पष्ट आणि थेट उत्तर देत होत्या.
 
मुलाखतीच्या सुरुवातीलाच तबस्सुम यांनी म्हटलं की, तुमच्या आवाजात कोणत्याही संगीताविना तुमचं गाजलेलं गाणं ऐकायला आवडेल.
 
त्यानंतर टीव्हीवर नाझियाचा चमकता चेहरा दिसू लागतो. नाझियाच्या मोठ्या डोळ्यांमध्ये प्रश्नार्थक भाव होते. खात्री म्हणून त्यांनी 'आप जैसा कोई' असं विचारलं आणि नंतर लक्षपूर्वकपणे गाणं गायलं.
 
त्यानंतरचा प्रश्न होता, "नाझिया! तुमच्यामध्ये ग्रेस आहे. मी तुम्हाला पाहत होते तेव्हा तुमच्या आवाजात ज्या पद्धतीची लचक आहे आणि तुम्ही गाण्याच्या रिदमवर ज्या पद्धतीनं थिरकत होत्या, त्यावरून तुम्ही डान्सही शिकला असेल असा विचार करत होते." त्याचं उत्तर देताना नाझिया यांनी "नाही" असं म्हटलं.
 
तबस्सुम यांनी खोडकरपणे म्हटलं, "म्हणजे ही सर्व 'कलाकारी' न शिकताच आली आहे?" त्यावर नाझिया यांनी 'कलाकारी' शब्दाचा पुनरुच्चार केला. त्यांना तबस्सुम यांचा प्रश्न बहुधा लक्षात आला नाही.
 
त्यावर तबस्सुम यांनी त्यांचं म्हणणं समजावून सांगितलं. "तुम्ही गाणं न शिकता एवढं चांगलं गात आहात. जर शिकला तर अधिक छान होईल."
 
त्यावर नाझिया यांनी म्हटलं, "मी शाळेच्या अभ्यासामुळं अद्याप शिकले नाही, कारण अभ्यासातून वेळ मिळत नाही. शाळा किंवा कॉलेज संपल्यानंतर मी बघेन," असं उत्तर त्यांनी दिलं.
 
अनाथ मुलांना मदत
नाझियानं अमेरिकेतून ग्रॅज्युएशन केल्यानंतर लंडनमधून बिझनेस लॉची पदवी मिळवली.
 
"शिक्षणानंतर नाझिया यांनी संयुक्त राष्ट्रांच्या विविध योजनांसाठी काम केलं. शिवाय त्यांनी जागतिक महिला नेतृत्व योजना आणि राजकीय प्रकरणांच्या विभागातही महत्त्वाच्या भूमिका बजावल्या. त्या मुलांचे अधिकार आणि शिक्षणासंदर्भात युनिसेफच्या ब्रँड अँबेसेडरही होत्या," असं नाझिया हसन यांचे लहान भाऊ आणि बिझनेस पार्टनर झोहेब हसन यांनी सांगितलं.
 
"त्या अत्यंत हुशार, संवेदनशील आणि उच्च विचार असलेल्या होत्या. त्या नेहमी लोकांचा आणि विशेषतः असहाय्य मुलांना असलेल्या कमतरतांबाबत विचार करायच्या."
 
त्यांच्या मते, "त्या खूप लहान असताना त्यांचा वाढदिवस साजरा करत होत्या. पण त्या जेव्हा 14 वर्षांच्या झाल्या आणि आईनं त्यांच्या वाढदिवसाची तयारी केली तेव्हा त्यांनी लंडनमध्ये किती मुलांना बोलवायचं असं विचारलं. त्यावर नाझिया वाढदिवस साजरा करायला मी काही लहान मुलगी नाही, असं म्हणाल्या."
 
"आईला खूप आश्चर्य वाटलं आणि आई म्हणाली, तू केवळ 14 वर्षांची झाली आहेत. तू स्वतःला एवढी मोठी का समजत आहेत. नाझिया म्हणाल्या, मी सांगेल तसा माझा वाढदिवस साजरा करशील का? आईनं होकार दिला. त्यावर नाझिया म्हणाल्या हा केक आणि सगळे गिफ्ट अनाथ मुलांना द्या. तसंच घडलं आणि नाझिया जोपर्यंत या जगात होत्या, तोपर्यंत त्यांनी वाढदिवस अशाच प्रकारे साजरा केला."
 
"2000 मध्ये नाझिया यांनी जगाचा निरोप घेतला. आणि तेव्हापासून आम्ही लंडन, कराची आणि जगभरातील इतर ठिकाणी नाझियाचा वाढदिवस त्यांनी सांगितला तशाप्रकारेच साजरा करतो," असं झोहेब म्हणाले.
 
"नाझिया खरं तर माझ्यापेक्षा केवळ दीड वर्षांनी मोठी होती. पण कधी-कधी मला असं वाटायचं की ती माझी मोठी बहीण नसून माझी आईच होती. आई सांगते की, नाझिया अडीच वर्षांची असताना आजीनं तिला लाल बूट गिफ्ट केले होते. ते बूट नाझियाला प्रचंड आवडले होते. ती ते बूट घालत नव्हती तर हातात उचलून घ्यायची," असंही त्यांनी सांगितलं.
 
"तेव्हा मी एक वर्षाचा होतो आणि अंथरूणावर पडलो होतो. नाझिया माझ्या बाजूने चकरा मारत होती. मी उठून तिच्याबरोबर खेळावं असं तिला वाटत होतं. पण एवढ्या कमी वयात मी नाझियाचा हट्ट पुरवू शकत नव्हतो हे स्पष्टच होतं. त्यामुळं तिनं लाल बूट अंथरुणावर ठेवले होते. 'मी माझी सर्वांत महत्त्वाची वस्तू देत आहे, आता तरी उठ,' असं तिला वाटत होतं!" असं झोहेब यांना त्यांच्या आईनं सांगितलं.
 
मोठ्या बहिणीच्या आठवणींना उजाळा देताना झोहेब यांनी आणखी एका घटनेचा उल्लेख केला.
 
14 देशांच्या टॉप टेन चार्टमध्ये नाझिया आणि झोहेब
नाझिया आणि झोहेब यांच्या जोडीनं दक्षिण आशियामध्ये आधुनिक संगीतात क्रांती आणली होती.
 
या परिसरातील पॉपच्या संस्थापकांमध्ये या दोघांचं नाव घेतलं जातं. भावा-बहिणीच्या या जोडीनं संगीत क्षेत्रात 50 वर्षांपासून प्रचलित असलेल्या परंपरेला बदलून टाकलं.
 
साल 1931 मध्ये पहिला बोलपट 'आलम आरा'पासून 1980 पर्यंत जेवढे काही प्रयोग झाले, त्यात नाझिया हसन यांचा आवाज आणि सोबत वाद्य वाजवण्याचा अनुभव हे जगावेगळं संगीत ठरलं होतं.
गायक जव्वाद अहमद यांच्या मते, "भारतातलं एसडी बर्मन आणि किशोर कुमार यांचं 'मेरे सपनों की रानी' आणि पाकिस्तानातील 'को को कोरिना' हे सोहेल राणा यांनी अहमद रुश्दींकडून गाऊन घेतलेलं गाणं ही या भागातल्या पॉप संगीताची सुरुवात समजली जातात. पण नाझिया, झोहेब आणि बिदु यांनी संगीताची परंपराच बदलून टाकली. या तिघांनी दिलेल्या संगीताच्या शैलीला चाहते आणि माध्यमांनी 'नाझिया झोहेब पॉप म्युझिक' असं नाव दिलं.
 
नाझिया आणि झोहेब यांनी एकत्र पाच अल्बम तयार केले. त्यात पहिला 'डिस्को दीवाने' हा अल्बम 1981 मध्ये आला होता. त्यात दहा गाण्यांचा समावेश होता. ते सर्व सुपरहिट होते. नाझिया आणि झोहेब यांचा हा पहिला अल्बम रिलीज होण्याच्या एक दिवस आधी, एकट्या मुंबईत एक लाख प्रती विकल्या गेल्या होत्या.
 
'डिस्को दिवाने' नं प्रदर्शित झाल्यानंतर 15 दिवसांत प्लॅटिनम टायटल जिंकलं. तीन आठवड्यांत तो डबल प्लॅटिनम बनला. हा अल्बम पाकिस्तान, भारत, ब्राझील, रशिया, दक्षिण आप्रिका, फिलिपाईन्स, मलेशिया, इंडोनेशिया, लॅटिन अमेरिका, कॅनाडा, ब्रिटन, वेस्ट इंडीज आणि अमेरिकेसह 14 देशांच्या टॉप टेन चार्टमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचलं. जगभरात याच्या एक कोटी 40 लाख प्रति विकल्या गेल्या होत्या. तो त्यावेळचा विक्रम होता.
 
त्यांचा दुसरा अल्बन होता 'बूम बूम' तोही सुपरहिट ठरला. त्यानंतर 1992 मध्ये तिसरा अल्बम 'यंग तरंग', चौथा अल्बम 'हॉटलाईन' आणि 1992 मध्येच पाचना अल्बम कॅमेरा रिलीज झाला होता.
 
नाझिया आणि झोहेब यांच्या गाण्यांचे व्हीडिओ समोर आले. त्यानंतर पाश्चिमात्य संगीत क्षेत्रात म्युझिक अल्बमबरोबर व्हीडिओ तयार करण्याची परंपरा सुरू झाली. त्यानंतर भारत-पाकिस्तानसह आशियाई वंशाचे अमेरिकन आणि ब्रिटिश तरुण यांनी या हा ट्रेंड स्वीकारला आणि म्युझिक बँड तयार केले.
 
नाझियाचे बोल आणि झोहेबची चाल
नाझिया आणि झोहेब यांना एकदा एक प्रश्न विचारण्यात आला होता. तुमचं संगीत पूर्णपणे पाश्चिमात्य नाही आणि ते पूर्णपणे पूर्वेकडीलही नाही. मग तुम्ही फ्युजन केलं का?
 
त्यावर नाझिया म्हणाल्या होत्या. "आम्ही तर सहजपणे आमच्या मनाचं ऐकत होतो. आमच्या मनात जे येईल ते लोकांपर्यंत पोहोचवत होतो. लोकांनी त्याला पसंती दिली."
 
तुम्ही काम कसं करता असं त्यांना विचारण्यात आलं होतं. त्यावर ते म्हणाले, "आम्ही भाऊ बहीण आहोतच पण मित्रही आहोत. आम्ही वाद घालतो, भांडतोही आणि त्याचप्रकारे संगीतही तयार करतो."
 
नाझिया आणि झोहेब यांच्या जोडीत बोल लिहायचं काम नाझियाचं होतं, तर चाल तयार करण्याचं काम झोहेबचं होतं. नाझियालाही चाल तयार करता येत होती. पण त्याबाबत निर्णय घेण्याचा म्हणजे ती वापरायची की नाही, याचा अधिकार झोहेब यांच्याकडे असायचा.
 
पहिले गुरू 'सोहेल अंकल'
नाझिया हसन संगताकडं ओढा वाढण्याचं श्रेय संगीतकार सोहेल राणा यांना द्यायच्या. सोहेल राणा कराची टीव्हीवर 'संग संग चलते रहना' हा मुलांचा संगीत कार्यक्रम चालवत होते. तेव्हा झोहेबसह त्यांनी त्या शोमधूनच गायला सुरुवात केली होती.
 
"आम्ही दोघे या शोमध्ये कायमस्वरुपी नव्हतो. पण आम्ही लंडनहून कराचीला यायचो तेव्हा आम्ही या शोमध्ये सहभागी होत होतो."
 
निर्मात्या सुल्ताना सिद्दीकी यांनी या कार्यक्रमात आधी नाझिया यांना घेतलं होतं, त्यानंतर झोहेब यांनाही प्रवेश देण्यात आला असं, मुनिजा बशीर सांगतात.
 
"नाझिया हसनला आठवून मला अभिमान वाटत आहे. मी पहिल्या वेळी नाझियाला भेटलो तेव्हा ती सहा ते सात वर्षांची होती. ती खूपच हुशार आणि सुंदर मुलगी होती. मी जी चाल तिला सांगायचो ती चाल नाझिया लगेचच पाठ करायची. माझ्या कार्यक्रमातील सर्वोत्तम दोन-तीन मुलांपैकी ती एक होती," असं सोहेल राणा यांनी बीबीसीबरोबर बोलताना सांगितलं.
 
"नाझिया आणि झोहेबनं माझी गाणी पाठ केली होती. ती दोघं माझ्यासाठी माझी 'आजा चाँद न जा' आणि 'गाये जा कोयल कू कू, कू कू' ही दोन गाणी अगदी आनंदानं गात होते," असंही राणा म्हणाले.
 
निर्मळ व्यक्ती
नाझियाबद्दल बोलायचं तर मोठं मन असलेली ती छोटीशी मुलगी होती, असं नाझिया यांच्या आई वडिलांशी घनिष्ट संबंध असलेले माजी केंद्रीय मंत्री आणि सिनेटर जावेद जब्बार म्हणाले.
 
"ती प्रचंड हुशार होती. महान कलाकार असण्याबरोबरच चांगली व्यक्तीही होती. त्यांच्यात जाणून घेण्याची आणि शिकण्याची क्षमता होती. जगात घडणाऱ्या घटनांबाबत त्यांना जाणीव होती."
 
"सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्यामध्ये मानवाचं भलं करण्यासाठी खूप काही करण्याची इच्छा होती. त्यांनी अगदी लहानशा जीवनात मानव जातीच्या भल्यासाठी खूप काही केलं होतं. आपण ते विसरायला नको. त्यांना स्मरणात ठेवतानात आपण त्यांचं कामही पुढं सुरू ठेवायला हवं," असंही ते म्हणाले.
 
'गोल्डन व्हॉइस' साठी माझा पर्याय 'आई'
नाझिया हसन जीवनाच्या अंतिम दिवसांमध्ये फुफ्फुसांच्या कॅन्सरचा सामना करत या जगातून निघून गेल्या.
 
जेव्हा त्यांचं निधन झालं, तेव्हा त्यांचा एकमेव मुलगा अरीज हसन केवळ दोन-अडीच वर्षांचा असेल. आईबद्दल अत्यंत पुसट आठवणी असल्याचं अरीज सांगतात. "ती मला तेव्हा प्राणी संग्रहालयात घेऊन गेली होती."
 
"माझ्या आईला 'गोल्डन व्हॉइस' आणि 'पॉप म्युझिक च्या पायोनियर' या नावांनीही ओळखलं जातं. माझ्याकडे त्यांच्यासाठी एकच नाव आहे. ते म्हणजे 'आई'. ती माझी आई होती. जोपर्यंत ती या जगात राहिली त्यांनी केवळ मानव जातीच्या भल्याचा विचार केला आणि मानवाचं जगणं अधिक सुंदर व्हावं यासाठी प्रयत्नही केले. मीही हा प्रयत्न कायम ठेवेल."

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Look Back Entertainment: या टीव्ही कलाकारांचा 2024 मध्ये घटस्फोट झाला, अनेक वर्षांचे नाते संपवले.

Border 2 Release Date:सनी देओलचा 'बॉर्डर 2' या दिवशी रिलीज होणार

Pushpa 2 OTT Release: पुष्पा 2'चित्रपट OTT वर प्रदर्शित होणार नाही

एका मुलाच्या प्रेमात करीना कपूरने तोडले घराचे कुलूप, नंतर तिच्या आईने तिला बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवले

चेंगराचेंगरी प्रकरणी हैदराबाद पोलिसांनी 'अल्लू अर्जुन'ला पाठवले समन्स

सर्व पहा

नवीन

अभिनेता अल्लू अर्जुन मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांची भेट घेणार

New Year 2025 : नवीन वर्ष साजरे करा महाराष्ट्रातील या अद्भुत ठिकाणी

Look Back Entertainment: या टीव्ही कलाकारांचा 2024 मध्ये घटस्फोट झाला, अनेक वर्षांचे नाते संपवले.

Christmas 2024: सांताक्लॉजचे गाव लॅपलँड

Border 2 Release Date:सनी देओलचा 'बॉर्डर 2' या दिवशी रिलीज होणार

पुढील लेख
Show comments