Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नितीन देसाई : एनडी ते जयप्रभा मराठी माणसांनी उभारलेल्या स्टुडिओंचं पुढे काय झालं?

Webdunia
शुक्रवार, 4 ऑगस्ट 2023 (15:32 IST)
दादासाहेब फाळके ते नितीन चंद्रकांत देसाई असा 'चित्रपट स्टुडिओ'चा बराच मोठा बहुस्तरीय प्रवास.
मूकपटापासून व्हीएफएक्सपर्यंत ही शंभरपेक्षा जास्त वर्षांची वाटचाल आहे. चित्रपटाची रिळे ते सोशल मिडियातील रिल्स अशी त्यात बरीच घडामोड आहे.
 
या सगळ्यांत 'स्टुडिओची भूमिका' हा एक महत्त्वाचा फंडा. आणि त्यात एक महत्त्वाची गोष्ट, मराठी माणसाच्या मालकीचे स्टुडिओ किती?
 
आता चित्रपट स्टुडिओ म्हटल्यावर अनेकांना 'त्याच्या आतमध्ये' काय काय असतं आणि घडचं याचं विलक्षण कुतुहल. पण ते खरोखरच बहुस्तरीय आहे. शूटिंगपासून गॉसिप्सपर्यंत असा तो मोठाच प्रवास आहे. पण त्याला शेवट नाही.
 
आजच्या ग्लोबल युगात चित्रपटासह मालिका, रिअॅलिटी शो, गेम शो, जाहिराती, व्हीडिओ अल्बम, वेबसिरिज, रिल्स यांच्या निर्मितीत प्रचंड वाढ झाली असून त्याच्या निर्मितीसाठीच्या गरजाही वाढल्या आहेत.
 
शूटिंग स्पॉटपासून इनडोअर सेट उभारणे (मालिका असेल तर दीर्घकाळासाठीचा सेट) ते अगदी तांत्रिक सोपस्कारासाठी अधिकची गरज वाढत वाढत गेली.
 
आता संपूर्ण भारतात चित्रपट निर्मितीचे युग आहे. म्हणजेच एका भाषेतील चित्रपट अन्य काही भाषांत डब होणे. म्हणजेच स्टुडिओत काम वाढलयं असं वाटतं.
आपल्या देशातलं पहिलं स्क्रीनिंग मुंबईत 7 जुलै 1896 रोजी झालं. फ्रान्सच्या ल्युमिएर बंधूंनी 'अरायव्हल ऑफ द ट्रेन' हा लघुपट तेव्हा दक्षिण मुंबईतील वॉटसन हॉटेलमध्ये दाखवला. या लघुपटात एकमेव दृश्य होते, एक आगगाडी एका रेल्वे स्टेशनवर येऊन थांबते इतकंच. त्यानंतर विदेशातून अधूनमधून मूक लघुपट आपल्याकडे येऊ लागले.
 
दादासाहेब फाळके यांनी आपल्याकडचा पहिला चित्रपट 'राजा हरिश्चंद्र ' निर्माण केला तो 3 मे 1913 रोजी गिरगावातील कोरोनेशन चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. तो मूकपट होता आणि तेव्हापासून आपल्याकडे मूकपटाची निर्मिती सुरु झाली.
 
'राजा हरिश्चंद्र 'साठी दादासाहेब फाळके यांनी दादरला पूर्व बाजूच्या मथुरा भवनमध्ये या चित्रपटाच्या निर्मीतीसाठी स्टुडिओ उभारला. तेथे त्यानी तब्बल आठ महिने शूटिंग करीत हा चित्रपट पूर्ण केला.
 
सुरुवातीच्या काळात असेच पौराणिक मूकपट निर्माण होत. नाशिक शहरात फाळके यांच्या कंपनीने मूकपट निर्मिती सुरु केली. पुणे शहरात पाटणकर फ्रेन्डस अॅण्ड कंपनीने संतपट निर्मिती सुरु केली. कोल्हापूरला प्रभात फिल्म कंपनीची स्थापना झाली.
 
असं करता करता निर्मिती संस्था आणि शहरं वाढत गेली. प्रभात फिल्म कंपनीनेच व्ही. शांताराम दिग्दर्शित 'अयोध्येचा राजा' या आपल्या पहिल्या मराठी बोलपटाची निर्मिती केली.
 
1932 सालची ही गोष्ट आहे. 6 फेब्रुवारी 1932 रोजी हा बोलपट गिरगावातील मॅजेस्टिक थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. तत्पूर्वी अर्देशिर इराणी यांनी 'आलम आरा ' हा पहिला हिंदी बोलपट मुंबईत निर्माण केला. तो 14 मार्च 1931 रोजी गिरगावातील मॅजेस्टिक थिएटरमध्येच प्रदर्शित झाला. त्याची निर्मिती ग्रॅंड रोड परिसरातील ज्योती स्टुडिओत झाली.
 
आता चित्रपट बोलू लागला. मूकपटाचा काळ आता मागे पडू लागला आणि बोलपटाचं युग हळूहळू आकार घेऊ लागलं. त्या काळात मुंबई, पुणे, कोल्हापूर, मद्रास (आताचे चैन्नई), लाहोर (आता पाकिस्तानात), कलकत्ता (आताचे कोलकत्ता) ही चित्रपट निर्मितीची मुख्य केंद्र होती. फाळणीनंतर लाहोर पाकिस्तानला गेले.
 
1930 च्या दशकात प्रभात (पुणे शहरात), न्यू थिएटर्स ( कोलकत्ता) आणि बॉम्बे टॉकीज (मुंबईत) चित्रपट निर्मितीचा पाया रुजवला. बॉम्बे टॉकीजचा जन्म 1936 सालचा मुंबईतीलच. मालाडमध्ये त्यांचा स्टुडिओ होता. (आज फक्त बस स्टॉपला नाव देण्यापुरतं बॉम्बे टॉकीज आहे. आणि ओटीटीवरील 'ज्युबिली' ही बहुचर्चित वेबसिरिज याच बॉम्बे टॉकीजच्या हिमांशू रॉय आणि देविका राणी यांच्या नातेसंबंधांवर आधारित आहे याची चर्चा निर्माण करण्यात यश प्राप्त झालं आहे.)
 
चित्रपती व्ही. शांताराम यांनी 1943 साली मुंबईत परेल येथे राजकमल कलामंदिर स्टुडिओची स्थापना केली. आपण फक्त पटकथा आणि संवाद घेऊन जायचे, या स्टुडिओत शूटिंगपासून डबिंग, मिक्सिंग, रेकॉर्डिंग, अगदी लायब्ररी वगैरे सगळं करून तयार चित्रपट करून बाहेर यायचे अशी सुविधा.
आज राजकमल कलामंदिर स्टुडिओत एक मुख्य फ्लोअर कार्यरत असून अमिताभ बच्चन आणि दीपिका पादुकोण यांच्या अनेक जाहिरातपटांचं चित्रिकरण येथेच झाले आहे. संजय लीला भन्सालीने आपल्या देवदास, बाजीराव मस्तानी या भव्य चित्रपटांच्या तांत्रिक कारागिरीसाठी याच राजकमल कलामंदिर स्टुडिओला पसंती दिली.
 
चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शकांनी आपला स्वतःचा स्टुडिओ असावा असा दृष्टीकोन बाळगला. राज कपूरने 1948 साली चेंबुरला आर. के. स्टुडिओची स्थापना केली ( काही वर्षांपूर्वीच त्याची विक्री झाली आणि तो पाडला गेला... आता तेथे भव्य दिव्य दिमाखदार इमारत उभी आहे. याच्या विक्रीची निर्णय घेताना ॠषि कपूरने म्हटलं होतं, ‘काळजावर दगड ठेवून हा निर्णय घेतोय.’ त्याच्या एकूण बोलण्यातून सुचित होतं होते की आज स्टुडिओ कार्यरत ठेवणे अवघड जात आहे.)
 
कमाल अमरोही यांनी अंधेरीच्या महाकाली परिसरात भव्य कमालीस्थान स्टुडिओ उभारला. (कालांतराने तेथूनच जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड कार्यरत झाला. याही स्टुडिओची विक्री होणार असे वृत्त मध्यंतरी प्रसिद्ध झाले होते)
 
शशधर मुखर्जी यांनी अगोदर गोरेगावला फिल्मीस्तान (आजही हा स्टुडिओ कार्यरत आहे), तर अंधेरी पश्चिमेला आंबोली येथे फिल्मालय स्टुडिओ उभारला. याचा जेमतेम एक कोपरा शिल्लक आहे. उर्वरित जागी उत्तुंग इमारत उभी राहिलीय.
 
मेहबूब खान यांनी वांद्र्याला मेहबूब स्टुडिओ उभारला. (तो आजही कार्यरत आहे. देव आनंदचा अतिशय आवडता स्टुडिओ. म्हणून त्याच्या अनेक चित्रपटांचे मुहूर्त आणि शूटिंग येथेच रंगले). तर रामानंद सागर, शक्ती सामंता, प्रमोद चक्रवर्ती, एफ. सी. मेहरा आणि आत्माराम या पाच निर्मात्यांनी अंधेरी कुर्ला रोडवर नटराज स्टुडिओ उभारला.
 
दादरला चंदुलाल शहा यांचाच रणजित स्टुडिओ, या स्टुडिओची आठवण म्हणजे, उत्तुंग इमारतीवर नटराज म्हटलयं इतकंच. अन्यथा तो केव्हाच इतिहासजमा झाला आहे.
 
साकी नाकाजवळ हेमंत कदम या मराठी माणसाने चांदिवली स्टुडिओ उभारला, तो स्टुडिओ आजही कार्यरत आहे.
 
गुलशन रॉय यांचा त्रिमूर्ती स्टुडिओ दहिसर येथे सुरु झाला. (यातील नटराज स्टुडिओ इतिहासजमा झाला आहे तर फिल्मालयचा फक्त थोडासा भाग कार्यरत आहे), कांदिवलीचा बसरा, गोरेगावचा स्वाती स्टुडिओ इतरही लहान मोठे चित्रपट स्टुडिओ मुंबईत सुरु झाले ( एस्सेल, मोहन, ज्योती वगैरे) तर दादरचा रणजीत आणि रुपतारा, अंधेरीतील सेठ स्टुडिओ, मालाडचा बॉम्बे टॉकीज, तसेच आणखीन काही नावे सांगायची तर कारदार, श्रीकांत, वेस्टर्न, श्रीसाऊंड, सेन्ट्रल, प्रकाश, वसंत, आशा, मिनर्व्हा वगैरे वगैरे स्टुडिओ केव्हाच बंद पडले. अनेकांच्या खाणाखुणाही शिल्लक नाहीत.
 
अंधेरीतील सेठ स्टुडिओचं उदघाटन चेतन आनंद दिग्दर्शित 'कुदरत' ( 1980) या चित्रपटाने झाल्याचं आठवतंय. हा मुंबईतला पहिला आणि एकमेव वातानुकूलित स्टुडिओ होता. (तोही कालांतराने बंद झाला.) मानखुर्दचा एसेल स्टुडिओ सुरु आहे.
 
या स्टुडिओ वाटचालीत 1978 साली महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने गोरेगावला भव्य अशी दादासाहेब फाळके चित्रनगरी उभारण्यात आली. आज चित्रनगरीच्या प्रवेशद्वारापासून मराठी अथवा हिंदी मालिका अथवा वेबसिरिजचा भला मोठा सेट लागल्याचं दिसतं. चित्रनगरीचा पसारा आज विलक्षण वाढलाय.
 
विशेषत: आऊटडोअर्स स्थळं इतकी दूरवर आणि इतकी पसरलीत की एकाद्या सेटवर वाघ अथवा अन्य प्राणी येण्याच्या घटना घडताहेत.
 
चित्रपटासह मालिकांपासून वेबसिरिज, ओटीटीपर्यंत निर्मितीचं पीक आल्याने मनोरंजन क्षेत्राची पाळेमुळे आणखीन खोलवर आणि इतरत्र पसरली. दक्षिणेकडील स्थित्यंतर सांगायचे तर, चेन्नईत तमिळ, त्रिवेंद्रमला मल्याळम, बंगलोरला कन्नड तर हैद्राबादला तेलगू यांची चित्रपटसृष्टी फोफावली.
 
देशाच्या इतर भागातही चित्रपट निर्मिती होऊ लागली. बंगाली, हरियाणवी, राजस्थानी, भोजपुरी, गुजराती, कोंकणी, तुळू, पंजाबी वगैरे वगैरे मिळून एकूण बावीस तेवीस चोवीस लहान मोठ्या भाषेतील कमी अधिक प्रमाणात चित्रपट आपल्याकडे सातत्याने निर्माण होतात.
 
मुंबईजवळच्या पालघरपर्यंत भागात अनेक लहान मोठे स्टुडिओ कार्यरत झालेत. कुठे बंद पडलेल्या कंपनीच्या जागी तर कुठे दूरवर कुठे नव्यानेच दोन तीन शूटिंग स्पॉटचे स्टुडिओ कार्यरत आहेत. मग ते काशीमीरात असो वा वसईत चिंचोटी फाट्याजवळ.
 
अर्थात या स्टुडिओंची निर्मिती ही मालिका अथवा एकाद्या रिॲलिटी शोसाठी झाली आहे. ओशिवरातील यशराज फिल्मचा अतिशय अद्ययावत यशराज स्टुडिओ आणि एकता कपूरचा बालाजी स्टुडिओ हे कायमच कार्यरत असतात. हे नवीन पिढीतील मनोरंजन क्षेत्राचे प्रतिनिधित्व करताहेत.
आता यात मराठी माणसाचं महत्त्वाचे स्टुडिओ सांगायचे तर, राजकमल कलामंदिर स्टुडिओचं सगळं व्यवस्थापन आज व्ही. शांताराम फाउंडेशनचे अध्यक्ष किरण शांताराम हे यशस्वीपणे सांभाळत आहेत.
 
प्रभात फिल्म कंपनीमधून बाहेर पडल्यावर 1943 साली राजकमलची स्थापना केली. आपल्या वडिलांचे नाव राजाराम यातील राज आणि आपल्या आईचे नाव कमल. यातून त्यांनी राजकमल असे नाव ठेवले.
 
राजकमलचा पहिला चित्रपट 'शकुंतला' ( हिंदी) होता. त्यानंतर राजकमलने परबत पे अपना डेरा, डॉ. कोटणीस की अमर कहानी, झनक झनक पायल बाजे, नवरंग, सेहरा, गीत गाया पत्थरोने, जल बिन मछली नृत्य बिन बिजली, चानी, झुंज, अशी सातत्याने चित्रपट निर्मिती केली.
 
राजकमल कलामंदिर स्टुडिओत मनोजकुमारपासून रमेश सिप्पीपर्यंत अनेकांनी आपल्या चित्रपटांचे शूटिंग व तांत्रिक काम केलं. विशेष उल्लेखनीय ठरले ते यश चोप्रा. त्यांनी राजेश खन्ना आणि नंदा यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'इत्तेफाक'चं सगळंच शूटिंग एकाच घराच्या सेटवर केलं.
 
यश चोप्रा यांनी आपले बंधु बी. आर. चोप्रा यांच्या बी. आर. फिल्म या बॅनरमधून बाहेर पडून यशराज फिल्म या आपल्या बॅनरची स्थापना केली तेव्हा व्ही. शांताराम यांनी त्यांना आपल्या राजकमल स्टुडिओत कार्यालयासाठी जागा दिली.
 
यशजींनी 'दाग' (1973) पासून आपल्या प्रत्येक चित्रपटाचा मुहूर्त येथेच केला तसंच अनेक दृश्यांचं शूटिंग केलं. आदित्य चोप्रा दिग्दर्शित 'दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगे ' ( 1995) पर्यंत यशराज फिल्मचं कार्यालय राजकमलमध्ये होतं.
 
मराठी आणि हिंदी चित्रपटाच्या वाटचालीत राजकमल कलामंदिर स्टुडिओचं खूपच मोठे स्थान आहे.
 
असाच आणखीन एक मराठी माणसाचा शूटिंग मुंबईत आहे.
 
'अशी ही बनवाबनवी 'मधील ह्रदयी वसंत फुलताना... हे चार जोड्यांवर एकेका कडव्यातून चित्रीत झालेलं गाणे नक्कीच आठवत असेल. त्यातील सचिन आणि सुप्रिया पिळगावकर यांच्यावरचं कडवं चांदिवली स्टुडिओत चित्रीत झालं आहे....
 
धर्मेंद्रने पाहुणा कलाकार म्हणून भूमिका साकारलेल्या 'हीचं काय चुकलं' या चित्रपटातील विक्रम गोखले यांच्यासोबतचे घेऊन टांगा सरजा निघाला... हेही गाणे माहिती आहे...
 
यश चोप्रा दिग्दर्शित 'दीवार' मधील क्लायमॅक्सला विजय (अमिताभ बच्चन) देवाच्या मूर्तीशी बोलतो हे दृश्य नक्कीच आठवत असेल....
 
राज खोसला दिग्दर्शित 'दो रास्ते 'मधील राजेश खन्ना मुमताजची तारीफ करीत गातो, ये रेशमी जुल्फे... हेही गाणे तुम्हाला माहितीय...
 
या सगळ्याचे शूटिंग चांदिवली स्टुडिओत झाले आहे. आज या चांदिवली स्टुडिओचं वय आहे, फक्त 83 वर्षं!
 
1940 साली चंद्रकांत कदम या महाराष्ट्रीय माणसाने पाचशे एकर जमीनवर हा स्टुडिओ उभारला. पण या स्टुडिओची संस्कृती काही वेगळीच आहे. म्हणजे चित्रपट स्टुडिओ म्हटल्यावर जे मोठे मोठे फ्लोअर दिसतात (म्हणजे भव्य सेट उभे करण्याची बंदिस्त जागा) असे सर्वसामान्यांच्या डोळ्यासमोर जे चित्र येते, त्या पठडीतील हा स्टुडिओ नाही असे या स्टुडिओला अनेकदा तरी भेट देताना अनुभवावयास आले.
 
चित्रपटासाठी आवश्यक असलेल्या अनेक जागा येथे कायमस्वरुपी आहेत. फक्त त्यात गरजेनुसार काही बदल अथवा रंगरंगोटी करायची इतकेच. येथे मोठे देऊळ आहे, त्यातील देवाची मूर्ती बदलायची आणि एखादं गाणं अथवा नाट्यमय प्रसंग चित्रीत करायचा.
 
त्याचप्रमाणे हॉस्पिटल, पोलीस स्टेशन, कोर्ट वगैरे वगैरे बरेच काही आलेच. जणू एखादं गावच येथे वसलयं असा येथे गेल्यावर फिल येतो.
 
इन्सानियतपासून राम लखनपर्यंत आणि थानेदारपासून खलनायकपर्यंत अनेक चित्रपटातील अनेक तरी दृश्यं इथंच चित्रीत झाली आहेत. या स्टुडिओत आणखीन आत गेल्यावर फार मोठी हिरवळ असलेलं गार्डन आहे. तेथे अनेक तरी गाणी अथवा काही गाण्यातील एखादा भाग चित्रीत झाला आहे.
 
साकी नाका परिसरातच अनेक कंपन्या बंद पडून त्या जागी एस. जे. स्टुडिओ ,निप्पॉन इत्यादी लहान मोठे बरेच स्टुडिओ कार्यरत झाले आहेत.
 
चंद्रकांत कदम हे मुळचे गुजरातच्या कच्छचे. मुंबईत आल्यावर ते उत्तम मल्लखांबपटू बनले. त्यांनी मूकपटाच्या काळात ज्युनिअर आर्टिस्ट अथवा 'एक्स्ट्रा' म्हणून काम करण्यास सुरुवात केली. तेथून ते निर्माता आणि दिग्दर्शक तर झालेच पण अगदी हीरोदेखिल झाले आणि त्यांनी फौलादी जिगर, दैवी खजाना, जंगल ए आझादी इत्यादी चित्रपटात भूमिका साकारल्या.
 
'हिम्मत ए मर्दा 'मध्ये त्यांनी टारझन साकारला. या चित्रपटाने त्यांना 'स्टंट किंग' अशी ओळख दिली. याच वाटचालीत त्यांनी चांदिवली स्टुडिओची स्थापना केली तेव्हा मुंबईची सीमा वांद्रे सायन इतकीच होती. चांदिवली परिसर खूपच दूरचा होता आणि रस्त्याची सुविधाही चांगली नव्हती. 1948 साली चंद्रकांत कदम यांनी त्यासाठी पुढाकार घेतला.
 
डकैत, खून पसिना, क्रांतीवर अशा असंख्य हिंदी चित्रपटांचं काही शूटिंग येथेच झालं. मधुचंद्राची रात्र, भुताचा भाऊ, थरथराट, गुपचूप गुपचूप, माझा पती करोडपती, गडबड घोटाळा, खिचडी, राणीनं डाव जिंकला, शापित, चटक चांदणी, मोसंबी नारंगी अशा अनेक मराठी चित्रपटांच्या काही प्रसंग अथवा गाण्यांचं शूटिंग येथे झालं.
 
चंद्रकांत कदम यांची मुले आणि नातू आता या स्टुडिओचे कामकाज पाहतात.
 
पण एक अगदी वेगळी आठवण सांगायला हवी. मनमोहन देसाई निर्मित आणि दिग्दर्शित 'कुली' ( 1983) च्या बंगलोर येथील सेटवर एका मारधाड दृश्यात पुनीत इस्सारचा एक ठोसा चुकवायच्या प्रयत्नात अमिताभ बच्चनच्या पोटाला एका टेबलाचा कोपरा लागला आणि तो विव्हळला.
 
तेथून त्याला उपचारासाठी मुंबईत आणलं, बीच कॅन्डी इस्पितळात त्याच्यावर उपचार केले गेले, त्यातून तो बरा झाला, त्याने काही महिने विश्रांती घेतली आणि मग पुन्हा त्याने कामाला सुरुवात केली तेव्हा मनमोहन देसाईंनी ज्या दृश्याच्या अभिनयात अमिताभ जखमी झाला होता अगदी त्याच दृश्याने पुन्हा 'कुली'चं शूटिंग सुरु करायचा निर्णय घेतला.
 
चांदिवली स्टुडिओच्या वॉचमनपासून ते मेकअपरुमपर्यंत असंख्य गोष्टींचा प्रवास सुरू आहे.
याच वाटचालीत नितीन चंद्रकांत देसाई यांनी जुन्या मुंबई-पुणे मार्गावरील खालापूर तालुक्यातील चौक गावात भव्य असा एन.डी. स्टुडिओ उभारला आणि 2005 साली अतिशय थाटात उदघाटन केलं. एक मेहनती आणि व्हीजन असलेला कला दिग्दर्शक अशा पodOlrvs स्वतःचा आऊटडोअर्स स्टुडिओ उभारतो ही अतिशय कौतुकास्पद गोष्ट होती.
 
विशेष म्हणजे स्टुडिओची रचना करताना भव्य ऐतिहासिक चित्रपट आणि दुसरं म्हणजे फॅण्टसी चित्रपट यांना आवश्यक ठरतील अशा अनेक देखाव्यांची तेथे रचना होती.
 
देसाईंची एकूणच घौडदौड पाहता हा स्टुडिओ सतत कार्यरत राहिल अथवा राहणार याची जणू खात्री वाटावी. एन. डी. स्टुडिओत चित्रपट, मालिका, वेबसिरिज यांचे शूटिंग होऊ लागलं. नीतिन चंद्रकांत देसाईनी स्टुडिओचा विस्तारही केला. नितीन चंद्रकांत देसाई यांनी चित्रपटात नायक (हॅलो जय हिंद), चित्रपटाची निर्मिती (बालगंधर्व), चित्रपटाचे दिग्दर्शन (अजिंठा), प्रॉडक्सन्स डिझायनर असा आपला कार्यविस्तार केला.
 
राजकीय नेत्यांशी त्यांची जवळीक वाढली. राजकीय सभेचे भव्य व्यासपीठ ते उभारु लागले. त्यांच्या एकूणच वाटचालीचं प्रगती पुस्तक भरपूर गुणांचं आहे.
 
एक मोठीच यशस्वी वाटचाल आहे. पण कोरोनाच्या काळात अनेकांप्रमाणेच एन. डी. स्टुडिओचंही आर्थिक गणित गडबडलं. नितीन देसाईनी एन.डी. स्टुडिओ हॉलीवूडच्या दर्जाचा करायचं स्वप्न पाहिलं होतं. त्यासाठी कर्ज आलंच. मग कर्जाचा डोंगर उभा राहिला. आणि त्याच दबावातून दुर्दैवी शेवट झाला.
 
व्हीएफएक्स तंत्रामुळे स्टुडिओतील सेट उभारण्याची गरज कमी झालीय आणि जगभरातील अनेक ठिकाणी शूटिंग होत असल्याचाही स्टुडिओना मोठाच सेटबॅक बसल्याचा एक निष्कर्ष काढण्यात येतोय. आणि त्यातूनच अनेक जुने स्टुडिओ इतिहासजमा होत गेलेत. आणि तांत्रिक करामती करणारे स्टुडिओ कार्यरत झालेत.
 
'कोल्हापूर'मधील चित्रपट निर्मितीचा प्रवास खूपच मोठा आहे. काही महत्त्वाचे संदर्भ सांगायलाच हवेत.
 
1 जून 1929ला मंगळवार पेठेतील म्हदू गवंडी तालीमजवळील मोकळ्या जागेत नवीन चित्रसंस्था ‘प्रभात फिल्म’ कंपनीची स्थापना झाली.
 
बाबुराव पेंटरांच्या तालमीत व्ही. शांताराम, फत्तेलाल, केशवराव धायाबर, दामले मामा हे तयार झालेले तंत्रनिष्णात होते. सीतारामपंत कुलकर्णी हे पाचवे त्यात मिळाले आणि सर्वांनी मिळून प्रभात फिल्म कंपनी काढली.
 
"सैरंध्री"पाठोपाठ पहिला बोलपट बनविण्याचं श्रेय प्रभातचं. "गोपालकृष्ण" हा प्रभातचा पहिला चित्रपट. कालांतराने व्यवसायाच्या बदलत्या प्रवाहात प्रभात फिल्म कंपनी पुण्यात गेली.
 
ऐतिहासिक चित्रपट म्हणजे भालजी पेंढारकर हे समीकरणच झाले. छ. राजाराम महाराजांनी 1932 साली कोल्हापूर सिनेटोनची स्थापना केली.
 
1948 ला महात्मा गांधीची हत्या झाली आणि जयप्रभा स्टुडिओ संपूर्ण जाळला गेला. त्या राखेतून भालजींनी पुन: स्टुडिओ उभा केला. नुकतीच सेन्सॉर झालेली ‘मीठभाकर' या चित्रपटाची प्रिंट जळाली. प्रयत्नपूर्वक पुन: मीठभाकर तयार केला. भालजींनी 1942 पासून स्टुडिओ घेतला आणि जयप्रभा हे नाव देऊन प्रभाकर पिक्चर्सद्वारा निर्मिती सुरू केली.
 
श्रीमंत छ. आक्कासाहेब महाराजांनी बाबुराव पेंटरांना घेवून शालिनी सिनेटोनची 1934-35 च्या सुमारास स्थापना केली. 1940 मध्ये नवयुग चित्रपट लिमिटेड अशी कंपनी प्रथमच इथे निर्माण झाली. पुढे ती पुण्यास गेली.
 
कंपनी पद्धतीने सर्व तंत्रज्ञ आणि स्टुडिओचे पगारी नोकर असत. जोपर्यंत ही स्टुडिओप्रणीत व्यवस्था होती, तोपर्यंत निर्मितीत कौटुबिक जिव्हाळा होता. अगदी ऐंशी नव्वदच्या दशकात मुंबईतील आम्ही सिनेपत्रकार कोल्हापूरला शूटिंग रिपोर्टींगसाठी जात असू तेव्हा आम्हाला तसा अनुभव येई.
 
कोल्हापूर सिनेटोन, छत्रपती सिनेटोन, शालिनी सिनेटोन, हंस, सुरेल चित्र, जयप्रभा, प्रफुल्ल चित्र, प्रभाकर पिक्चर्स, गायत्री अशा अनेक संस्थांनी इथे कार्यरत होत्या.
 
चित्रपट स्टुडिओचा प्रवास खुपच मोठा आणि काळासोबत रंग बदलणारा. यावरचा फोकस कधीच न संपणारा...
 
हा तर एक ट्रेलरच म्हणायला हवा.
 
 





Published By- Priya Dixit 
 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

आयुष्मान खुरानाने त्याच्या पहिल्या लाईव्ह सिंगिंग परफॉर्मन्सचे श्रेय अरिजीत सिंगला दिले

भूल भुलैया 3 ने सिंघम अगेनला टाकले मागे, चार आठवड्यात 247 कोटींची कमाई

एआर रेहमानसोबतच्या नात्याच्या अफवांवर मोहिनी डे यांनी मौन सोडले

फोर्स ऑफ नेचर: द ड्राय 2 आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झाला

अनुपमा'च्या सेटवर विजेचा धक्का लागल्याने कॅमेरा असिस्टंटचा मृत्यू, निर्माता म्हणाले-

सर्व पहा

नवीन

नागराज मंजुळे यांना महात्मा फुले समता’ पुरस्कार मिळणार

बिग बॉस फेम हिमांशी खुरानाच्या वडिलांना पाच वर्षे जुन्या प्रकरणात अटक

वायलेंट हिरो' चा काळ: ताहिर राज भसीन

जमिनीवर बसून चहा प्यायले, हातात झेंडा घेऊन चालले, Bageshwar Baba यांच्या यात्रेत Sanjay Dutt यांचा नवीन अवतार

चंदिगडमध्ये गायक आणि रॅपर बादशाहच्या नाईट क्लबवर बॉम्ब हल्ला

पुढील लेख
Show comments