Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पॅपराझी : सेलिब्रेटींची एक छबी टिपण्यासाठी या लोकांना काय काय करावं लागतं?

Webdunia
शनिवार, 29 एप्रिल 2023 (22:01 IST)
विकास त्रिवेदी
आपण आपल्या आवडत्या ॲक्टर्सचे रील्स, फोटो, व्हिडिओ बघतो. या व्हिडिओमध्ये आपल्या मागून आवाज येत असतात, ''मलाइका, मलाइका मॅम, करीना, दीपिका, सलमान भाई."
 
हे आवाज नेमके असतात कोणाचे? ॲक्टर्सचे फोटो, व्हिडिओ घेणारे नेमके असतात तरी कोण? कधी विचार केलाय?
 
या लोकांकडून फोटो काढून घ्यायला स्टार्स असतात राजी. पण कधीकधी व्यक्ती करतात आपली नाराजी. या लोकांना म्हटलं जातं पॅपराझी.
 
स्थळ : मुंबईचं एक थिएटर. दुपारचे 12 वाजून गेलेत, सगळीकडे चाहत्यांची तुफान गर्दी लोटलीय.
 
काही तरुण मुलं आपल्या हातात फोन आणि कॅमेरे घेऊन सज्ज आहेत. तिथंच बाजूला सलमान खानच्या 'किसी का भाई, किसी की जान' चित्रपटाचं पोस्टर लागलंय.
 
कॅमेरा हातात धरून उभा असलेल्या एका मुलाला विचारलं की, कार्यक्रम नेमका किती वाजता सुरू होणार आहे? आणि सलमान किती वाजता येणार आहे?
 
तेव्हा तो मुलगा उत्तरला, "कार्यक्रम तर अडीच वाजता सुरू होणार आहे. पण सलमान सहा-सात वाजेपर्यंत येईल. त्याच्या सिक्योरिटीचा काहीतरी लोचा सुरू आहे, त्यामुळे येईल की नाही याची शंकाच आहे."
 
ही मंडळी कॅमेरा सेटअप लावलाय सुरुवात करतात. पाच वाजल्यापासून काही ॲक्टर्स यायला सुरुवात झाली. त्यानंतर त्यांचं नाव घेऊन, त्यांना बोलवून त्यांचे फोटो काढले जातात. पण हे लोक कोणा दुसऱ्याचीच वाट बघत आहेत.
 
साधारण सहा वाजता मोठमोठ्याने म्युझिक लावलं जातं आणि इतक्यात समोरून सलमानची एंट्री होते. आता आपले फोटो काढून घेणारे दूसरे ॲक्टर्स थोडे मागे सरतात आणि भाईजानला वाट मोकळी करून देतात.
 
हातात मोबाईल, कॅमेरा पकडलेले हे लोक मोठमोठ्याने सलमानला हाका मारू लागतात. "भाई आ गए, भाई आ गए. भाईजान, आपके राइट साइड. भाई आपके लेफ्ट.'' दरम्यान धक्काबुक्की सुरूच असते. जसा सलमान तिथून निघतो, तसं कॅमेऱ्याचे फ्लॅश आणि लोकांचे आवाज शांत होतात.
 
तुमच्या आवडत्या ॲक्टर्सचे पर्सनल ते पब्लिक लाईफमधले फोटो कॅमेऱ्यात कैद करून तुमच्या समोर आणण्याचं काम करणाऱ्यांना म्हणतात पॅपराझी. कधी सिनेस्टार्सचा पाठलाग करून तर कधी त्याच्या मर्जी विरूद्ध तर कधी त्यांच्या मर्जीने फोटो काढणारे हे पॅपराझी चाहते आणि सिनेस्टार्सच्या दरम्यान दुव्याचं काम करतात.
 
त्यामुळेच सोशल मीडियावर दिसणारे रील्स, व्हिडिओ, फोटो तुमच्या समोर येतात.
 
मग अभिषेक बच्चनच्या लग्नाचे फोटो असो वा आलिया भटच्या लिव्हिंग रूमचे, तर कधी सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी गेलेल्या कॅटरीना कैफचे फोटो असो. पॅपराझी फार पूर्वीपासूनच ॲक्टीव्ह आहेत. म्हणजेच दिलीप कुमार यांच्या काळात देखील पॅपराझी होते आणि आज तैमूर शाळेत जाताना त्याचे फोटो टिपणारे देखील पॅपराझी आहेत.
 
मलायका अरोरा जिमला जाते तेव्हा सावलीसारखे तिच्या मागे मागे करणारे देखील हे पॅपराझीच आहेत.
 
पण हा पॅपराझी शब्द नेमका आला कुठून? त्यांना हे नाव मिळालं कसं? पॅपराझी जगातात काम करणाऱ्या लोकांचं आयुष्य कसं असतं? कोणत्या आव्हानांनी भरलेलं असतं? त्यांना पैसे कसे आणि किती मिळतात? कायदा काय सांगतो? हा ॲक्टर इथे इथे दिसणार याची नेमकी माहिती त्यांना मिळते कशी? जाणून घेऊया.
 
या पॅपराझींच्या जगात स्नेह जाला, बिहारमधील कैमूर येथून पॅपराझी बनण्यासाठी आलेला चुलबुल पांडे आहे.
 
पॅपराझी
पॅपराझी म्हणजे कधी सेलिब्रिटींच्या मर्जीने तर कधी मर्जीविना फोटो काढणारे लोक. हे लोक सेलिब्रिटींचे क्लिक केलेले फोटो कोणत्याही वर्तमानपत्राला, मॅगझिनला, चॅनेलला विकतात. किंवा अशा कोणत्याही पॅपराझी चॅनेलला विकतात, त्यांच्यासाठी काम करतात.
 
मुंबईत यांना दर महिना 10,000 ते 25,000 रुपयांपर्यंत पगार मिळतो. अनेक वेळा या पॅपराझींनी काढलेले खास किंवा खाजगी फोटो 10 हजार ते 1 लाख रुपयांच्या दरम्यान विकले जाते. कायद्याचे जाणकार सांगतात, कोणाच्याही संमतीशिवाय गुपचूप फोटो काढण्याला स्टॉकिंग मानलं जातं.
 
पॅपराझी हा इटालियन शब्द आहे.
 
1960 मध्ये इटालियन फिल्ममेकर फ्रेडेरिको फेलिनी यांचा 'ला डॉयचे वीटा' नामक चित्रपट प्रदर्शित झाला होता. 'ला डॉयचे वीटा' म्हणजेच स्वीट लाईफ.
 
या चित्रपटातील एका पात्राचं नाव होतं पापाराझो. हे पात्र बेधडक होतं जे सेलिब्रिटींचे फोटो काढण्यासाठी कुठेही जायचं. असं म्हटलं जातं की, लेखक जॉर्ज गिसिंग यांच्या 1901 साली आलेल्या एका पुस्तकातून हे नाव घेतलं होतं.
 
हे नाव येण्यापूर्वी प्रसिद्ध व्यक्तींचे फोटो घेतले जायचे नाहीत असं काही नव्हतं. पण फेलिनीच्या चित्रपटातून या लोकांना एक नवीन नाव मिळालं, पॅपराझी.
 
पाश्चात्य देशांमध्ये पॅपराझींविषयी बऱ्याच चर्चा झडल्यात. प्रिन्सेस डायनाच्या कारचा अपघात झाला तेव्हा पॅपराझी त्यांच्या कारचा पाठलाग करत होते. या अपघातात डायनाला आपला जीव गमवावा लागला. काही देशांमध्ये तर पॅपराझींच्या मर्यादा ठरविण्यासाठी कायदेही करण्यात आलेत.
 
हिंदी सिनेसृष्टीचं म्हणाल तर पॅपराझी पूर्वीही होते आणि आजही आहेत. बदल इतकाच आहे की, काळानुसार पॅपराझींच्या कामाच्या पद्धतीही बदलल्या.
 
पूर्वी मायापुरी, स्टारडस्ट सारखे मॅगझिन असायचे, तर आता विरल भयानी, मानव मंगलानी, वरिंद्र चावला, योगेन शाह अशी बडी बडी नावं पॅपराझींच्या कंपन्यांप्रमाणे काम करतात. जशी मोबाईल फोनची एंट्री झाली, तसं पॅपराझींचं मार्केट देखील वाढलं. चांगल्या मोबाईल फोनमधून फोटो काढताही येतात आणि याच मोबाईलमधील सोशल मीडियावरून फोटो बघताही येतात. यातलं सर्वात लोकप्रिय ॲप म्हणजे इंस्टाग्राम.
 
पॅपराझींच्या जगातील एक जाणकार सांगतात, "इथे प्रत्येकाला प्रत्येकाची गरज आहे. सेलिब्रेटी बनण्यासाठी आणि त्यांचं आकर्षण टिकवून ठेवण्यासाठी पॅपराझींची गरज असते."
 
 
हे मार्केट इतकं मोठं आहे की, इथे आधीच खूप सारे पॅपराझी आहेत आणि आता नवे लोक आपलं अस्तित्व निर्माण करण्यासाठी इथे येत आहेत. जसं की चुलबुल पांडे उर्फ ​​विनय.
 
आकर्षण
सलमान खानने त्याच्या 'दबंग' चित्रपटात चुलबुल पांडे नामक पोलिसाची भूमिका साकारली होती. आणि याच सलमानच्या एका इव्हेंटमध्ये चुलबुल पांडे नावाचा पॅपराझी हातात कॅमेरा धरून, खांद्यावर बॅग लटकवून सलमानचे फोटो टिपताना आम्हाला दिसला.
 
चुलबुल पांडे हे तुझं खरं नाव आहे का?
 
असं विचारल्यावर चुलबुल पांडे सांगतो, "2017 पूर्वी माझं नाव विनय होतं. पण जेव्हापासून मी पॅपराझीच्या प्रोफेशनमध्ये आलो तेव्हापासून मला सगळे प्रेमाने चुलबुल पांडे म्हणू लागले. मग मी देखील हेच नाव वापरू लागलो. मी थोडा मस्तीखोर असल्याने सगळे मला चुलबुल-चुलबुल म्हणू लागले.
 
चुलबुल पांडे
आपल्या गावा-शहरांमधून बाहेर पडून मुंबईत स्थायिक होण्याचा आणि इथं आपलं कनेक्शन दाखवण्याचा सर्वांत सोपा मार्ग म्हणजे 'अपुन' शब्द वापरणं.
 
चुलबुलचे मामा मुंबईत राहतात. त्याचे मामा सांगतात, "आम्ही चुलबुलला ट्रॅव्हलच्या बिजनेसमध्ये ये असं सांगितलं होतं, पण त्याला हेच सगळं आवडतं."
 
यावर चुलबुल हसत हसत सांगतो,
 
"हिरो-हिरोईनला भेटावं, त्यांना बघावं असं मला लहानपणापासूनच वाटायचं. मला कुठंतरी नोकरीला चिटकव म्हणून मी महादेवाला नवसं केली. पण दहावीत नापास झालो आणि पळून मुंबईला आलो. पॅपराझी काम करायला मला मनापासून आवडतं. रोज नवीन लोकांना भेटावं लागतं. नवीन गोष्टी शिकायला मिळतात. आता तर इथे काम करतोय, बघू आणखीन नवं काय करता येतं."
 
सेलिब्रेटींचा पाठलाग करणं पॅपराझीच्या कामाचा एक महत्त्वाचा भाग आहे. संजय दत्त कोर्टात गेल्यावर त्याचा झालेला पाठलाग आठवला की आजही अनेकांच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव असतात.
 
सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर रिया चक्रवर्ती असो की आर्यन खान प्रकरण. मीडिया चॅनेल्सच्या गर्दीत केवळ आणि केवळ पॅपराझींची स्पर्धा सुरू होती.
 
पॅपराझींकडे बाईक नाहीतर कार असणं गरजेचं असतं. पण अवघ्या 10-12 हजारांची नोकरी करणारा चुलबुल पांडे बाईकशिवायही काम करतो. ते कसं?
 
पॅपराझी दुनियेतील स्ट्रगलर असलेला चुलबुल सांगतो, "मी बस, ऑटो आणि लोकलने प्रवास करतो. रात्री दोन वाजता घरी पोहोचतो. सकाळी फोनवर मेसेज पडला की मला इव्हेंटला जावं लागतं. मी कुठेही असलो तरी मला पळावंच लागतं. हातात पुरेसे पैसे आले की मी ही एखादी बाईक घेईन. स्वतःचा कॅमेरा घेईन."
 
चुलबुलच्या डोळ्यात जे स्वप्न दिसतं ते वास्तव स्नेह जालाच्या आयुष्यात दिसतं. स्नेहचे इंस्टाग्रामवर दोन लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. स्नेह दुसऱ्या पॅपराझींप्रमाणे इतरही प्लॅटफॉर्मसाठी फोटो देतो.
 
बरेच ॲक्टर्स स्नेहला नावानिशी ओळखतात.
 
तो सांगतो, "सुरुवातीला मी दीपिका-रणवीरचं फॅनपेज बघायचो. त्यानंतर मला समजलं की, हा सगळा प्रकार वांद्रा इथं चालतो. मग नंतर मी स्वतः फिरू लागलो. सेलिब्रिटींच्या भेटीगाठी घेऊ लागलो.
 
"मग मी मानव मंगलानी सरांना भेटलो. त्यावेळी रील्स नसायचे, आम्ही छोटे-छोटे व्हिडिओ बनवायचो. आता सगळेच रील करतात."
 
स्नेह सांगतो, "मी नोकरी करायला चाललोय असं मला कधीच वाटत नाही. मला हे काम आवडतं. मी बी.कॉम केलंय. त्यानंतर तीनवेळा सीएची एंट्रांस एक्झाम दिली, पण यात एकदाही क्लिअर झालो नाही. पण आता मी जे करतोय ते सीए पेक्षा चांगलं आहे."
 
'मानव मंगलानी' पॅपराझी प्लॅटफॉर्मचे प्रमुख असलेले मानव म्हणतात, "लोक या प्रोफेशनमध्ये येत आहेत कारण त्यांना सेलिब्रिटींचे फोटो क्लिक करायला, त्यांच्या आसपास राहायला आवडतं."
 
संघर्ष
दुपारच्या एक वाजता स्नेहला फोन आला. "अदिती राव हैदरी वांद्र्याच्या जवळपास एका ठिकाणी येणार आहे अशी टिप मिळालीय. तू लवकर पोहोच."
 
आम्ही स्नेहच्या आधी पोहोचलो. आदित राव हैदरीची निळी कार आली आणि ती एका बिल्डिंगमध्ये शिरली. थोड्या वेळातच स्नेह तिथे आला. अदिती आल्याचं जेव्हा आम्ही त्याला सांगितलं तेव्हा तो म्हणाला की, तुम्ही व्हिडिओ बनवला का? निळ्या रंगाची गाडी होती का?
 
कोणत्या अभिनेत्याकडे कोणत्या रंगाची कार आहे आणि तिचा नंबर काय आहे? याची सगळी माहिती मुंबईतील पॅपराझींकडे असते.
 
आता स्नेह अदिती कधी बाहेर येईल याची वाट पाहतोय. दोन तास उलटल्यावर स्नेह म्हणाला की, मी अदितीला खाली आणण्याचा प्रयत्न करतो, कारण हा कार्यक्रम 7 वाजेपर्यंत चालणार आहे.
 
खूप वेळ वाट बघितल्यावर संध्याकाळी पाच वाजता अदिती राव हैदरी 'ज्युबिली' सिरिजच्या स्टारकास्टसह बाहेर येते आणि फोटो काढून घेते.
 
अदिती म्हणते, "मुंबईतील आपले फोटोग्राफर खरंच खूप भारी आहेत. ते आमचा खूप विचार करतात, प्रेमाने आमचे व्हिडिओ बनवतात. आमचे सुंदर क्षण टिपतात आणि असे क्षण टिपणं सोपं नाही."
 
चुलबुलसारख्या नव्या पॅपराझींसमोरची आव्हानं आणखीच खडतर असतात. बाईक न मिळाल्याने कधी ट्रेन, तर कधी ऑटो तर कधी पायी चालत जावं लागतं.
 
चुलबुल सांगतो, "बऱ्याचदा शूट करता करता मी खाली पडलोय. आता मागचं कसं दिसेल? पडलो तरी पुन्हा उठून शूट सुरू करतो. सेलिब्रेटीही सांभाळून कर असं म्हणतात. फक्त 10 मिनिटांच्या व्हिज्युअलसाठी तासनतास बसावं लागतं."
 
स्नेह सांगतो, "एकदा दीपिका आणि रणवीर सुट्टीवरून परत येत होते. फोटो काढताना मी उलटा चालत होतो आणि अचानक खाली पडलो. मग पुढच्या वेळी दीपिका मला भेटली तेव्हा बरा आहेस का? असं तिने विचारलं."
 
आम्ही मुंबईतील एका रेड कार्पेट इव्हेंटमध्ये गेलो होतो. भारतीय चित्रपटसृष्टीतील जवळपास सर्वच लोक इथे आले होते. आमिर, रहमान, हृतिक, शाहिद कपूर, अभिषेक, लारा दत्ता, राजू हिरानी इ.
 
सेलिब्रिटींची फोटो काढून अपलोड करणं सुरू होतं.
 
स्नेह सांगतो, "तुम्ही जे काही शूट करता ते एक मिनिटाच्या आत अपलोड व्हायला हवं. आणि तुम्ही किती वेगाने काम करताय यावर सगळ्या गोष्टी डिपेंड असतात. जर कोणी 10 मिनिटांआधीच व्हिडिओ अपलोड करत असेल तर पोस्टला इंगेजमेंट मिळणार नाही."
 
एकेकाळी पॅपराझी म्हणून काम केलेले निक्के राणा म्हणतात, "आमच्या लोकांचे काम असं आहे की, कधी ताजमध्‍ये जावं लागतं तर कधी स्मशानभूमीत."
 
कधीकाळी चपला शिवायचं काम करणारा एक व्यक्ती आज मुंबईत पॅपराझी म्हणून काम करतो. तो सांगतो, "किती लोकांना आयुष्यात त्यांचा आवडता स्टार पाहायला मिळतो. पण पॅपराझी मात्र सतत त्यांच्या अवतीभोवती असतात."
 
पॅपराझी आणि त्यांची कुटुंबं
चुलबुलचं लग्न झालंय. त्याची बायको बिहारमध्ये असते. आर्थिक परिस्थिती सुधारल्यावर तिला मुंबईत आणण्याची चुलबुलची इच्छा आहे.
 
सध्या चुलबुल सांताक्रूझच्या अरुंद गल्ल्यांमध्ये असलेल्या एका चाळीत राहतो. तिथून थोड्याच अंतरावर समुद्र आहे. मात्र चुलबुल राहत असलेल्या छोट्या खोलीत पाण्याचा पत्ताच नाही.
 
चुलबुल सांगतो, "मी बॉलिवूडमध्ये काम करतोय असंच माझ्या बायकोला सांगितलंय. एखाद्या हिरोईनसोबत फोटो काढून पाठवल्यावर बायकोला राग येतो आणि ती म्हणते, तू इतक्या जवळून का फोटो काढतोस. यावर असं काही नसून तो नुसता फोटो असल्याचं मला तिला सांगावं लागतं. माझी बायको भोजपुरी ॲक्टर आम्रपाली दुबेची फॅन आहे."
 
स्नेह सांगतो की, "मी मीडियामध्ये काम करतोय हे माझ्या घरच्यांना माहीत आहे. त्यामुळे सतत एअरपोर्टवर जावं लागतं, तर कधीकधी जेवण मध्येच सोडून पळावं लागतं. इथे एकाएका मिनिटाची किंमत आहे. जर एक मिनिट उशिर झाला आणि सेलिब्रिटी निघून गेले तर माझा दिवस खराब जातो."
 
पॅपराझी प्रोफेशनमध्ये कुटुंब खूप महत्वाची असतात. या फिल्डमध्ये मुलामुलींची संख्या बघून आपल्याला याची कल्पना येऊ शकते.
 
चुलबुल सांगतो, "पूर्वी या प्रोफेशनमध्ये मुली होत्या. पण लॉकडाऊन लागलं, त्यामुळे घरी जावं लागलं. येऊन बघतो तर अर्ध्याधिक मुलींची लग्न होऊन गेली होती. सासरचे लोक काम करू देतीलच असंही नाही. आम्ही मुलं आहोत, आमचं चालून जातं. आणि मुलींनी देखील या प्रोफेशनमध्ये आलं पाहिजे. हे काही वाईट काम नाहीये."
 
पॅपराझी स्टार्सच्या मागे मागे धावतात. पण बऱ्याचदा या पॅपराझींची देखील चलती असते.
 
मुंबईतील एका मोठ्या रेड कार्पेट इव्हेंटमध्ये अनेक पॅपराझी पोहोचले होते. त्यांच्या सोबत बऱ्याच मीडिया हाऊसमधील व्हिज्युअल जर्नालिस्टही आले होते.
 
ठरलेल्या ठिकाणाहून पॅपराझी थोडे पुढे आले, त्यावर बॉडीगार्डने येऊन त्यांना मागे व्हायला सांगितलं. पण काही पॅपराझी जागचे हलले नाहीत आणि इथे थोडा वाद झाला.
 
इतक्यात काही पॅपराझींनी पीआरला हाक मारली आणि म्हटले, "ऐ समझाव न इसको, कौन लोग हैं हम. ज्यासती बोल रेला है ये."
 
पीआर आल्यावर बॉडीगार्ड थोडं नरमाईने वागू लागतात. यावर पॅपराझी म्हणतात, "अब क्या तमीज से बात कर रहा है, वैसे कर न जैसे पहले बोल रहा था."
 
पॅपराझी एखाद्या इव्हेंटमध्ये असतील आणि त्यांच्याकडे वेळ असेल तेव्हा ते एकमेकांची चेष्टा मस्करी करत असतात. बऱ्याचशा इव्हेंट्समध्ये स्नेह जाला सारख्या पॅपराझीला बोलवलं जातं. मात्र तेच दुसऱ्या बाजूला नवख्या असलेल्या चुलबुल पांडेला एंट्रीसाठी संघर्ष करावा लागतो.
 
एखादा ॲक्टर कॅमेऱ्याच्या रेंजमध्ये अलयावर पॅपराझी ओरडू लागतात.
 
जसं की, लव्ह यू शाहिद भाई, योर राइट, फ्रंट टू बॅक. फर्स्ट प्वॉइंट टू सेकेंड प्वॉइंट. हे सर्व शब्द ऐकल्यानंतर ॲक्टर्स काय करायचं ते समजतं.
 
बऱ्याचदा पॅपराझी कलाकारांशी बोलण्याचाही प्रयत्न करतात. तर कधी कधी आम्ही तुम्हाला ओळखतो असं म्हणत नवख्या स्टार्सना कॉन्फिडन्सही देतात.
 
काही इव्हेंटसमध्ये पॅपराझींसाठी एंट्रीपासून एक्झिटपर्यंत रस्ते तयार केले जातात. पॅपराझीचं काम करणारे बरेचसे लोक यूपी आणि बिहारमधील आहेत. अशातच त्यांना जर मनोज तिवारी, रवी किशन, खेसारी लालसारखे दिग्गज दिसले की त्यांच्या आनंदाला भरतं येतं.
 
बऱ्याचदा रेड कार्पेट इव्हेंटमध्ये जुने स्टार्स येत असतात. अशा स्टार्सची चेष्टा मस्करी करण्यात देखील हे पॅपराझी मागे पुढे पाहत नाहीत. अशाच एका इव्हेंटमध्ये हरमन बावेजा वेगवेगळ्या कलाकारांसोबत फोटो काढण्यासाठी थांबला तेव्हा काही पॅपराझी त्याला म्हणाले, हरमन सर, आज कितनी बोगी में चढ लिए हो आप? यावर हरमन हसून म्हणतो, "अब तक चार, अब नहीं दिखूँगा."
 
पॅपराझींच्या या कमेंट्स बऱ्याचदा चर्चेत असतात. मुंबईत एका कार्यक्रमात सुनील ग्रोवर आला होता, त्यावेळी तो म्हणाला होता की, आजकाल तुमच्या कमेंट्स बऱ्याच पॉप्युलर होत आहेत.
 
पॅपराझींकडे जेव्हा काही काम नसतं तेव्हा ते स्टार्सच्या कपड्यांबद्दल, शूजबद्दल बोलत असतात. बऱ्याचदा त्याची स्तुती करतात तर कधी 'लो बजेट' असं म्हणून सोडूनही देतात.
 
पॅपराझी बहुतेकवेळा अशा काही गोष्टी बोलतात, ज्यामुळे ॲक्टर कंफर्टेबल होतील आणि मोकळेपणाने फोटो काढू देतील. आणि साहजिकच या गोष्टी म्हणजे त्यांच्यावर उधळलेली स्तुतीसुमनं असतात.
 
बिझनेस
पॅपराझींचा बिझनेस खरं तर तीन टप्प्यांमध्ये विभागला गेलाय.
 
पॅपराझींना अमिताभ, शाहरुख, सलमान, दीपिका, आलिया यांसारख्या टॉप ग्रेड स्टार्सची गरज आहे. या स्टार्सबद्दल लोकांमध्ये खूप उत्सुकता असते आणि भरपूर लाईक्स, कमेंट्स आणि शेअर्स मिळतात.
पॅपराझींना रेड कार्पेट इव्हेंट किंवा जिम, रेस्टॉरंटच्या बाहेर इनवाईट किंवा टिपऑफद्वारे बोलावलं जातं आणि स्टार्सचे फोटो काढले जातात. वरवर पाहता हे सगळं अचानक घडल्याचं दाखवलं जातं.
लोकप्रियतेची इच्छा असणारे स्टार्स बऱ्याचदा फोटो काढून घेण्यासाठी पॅपराझींना पैसे देतात. जेणेकरून पॅपराझी प्लॅटफॉर्म वापरून तुमच्या सोशल मीडिया फीड्स आणि बातम्यांमध्ये चर्चेत राहता येईल.
आम्ही मुंबईतल्या बऱ्याच पॅपराझी ग्रुप्सची भेट घेतली. यातल्या लाखो फॉलोअर्स असणाऱ्या पॅपराझी प्लॅटफॉर्मने फोटो अपलोड करण्यासाठी पैसे घेतल्याचं सांगितलं.
 
एका पोस्टची किंमत 4000 ते 25 हजार रुपयांपर्यंत असते.
 
बऱ्याचदा स्टार्स एखाद्या प्रॉडक्टच्या इव्हेंटसाठी आलेले असतात. पण ज्या प्रॉडक्टचा इव्हेंट असतो त्यांनी जर पॅपराझींना पैसे दिलेले नसतील, तर पॅपराझी त्यांच्या प्लॅटफॉर्मवर प्रॉडक्ट ब्लर करून फक्त ॲक्टरचे फोटो टाकतात.
 
मुंबईत अशाच एका इव्हेंटमध्ये शाहरुख खानची मुलगी सुहाना दिसली होती. पण जेव्हा तिचे फोटो पॅपराझींच्या प्लॅटफॉर्मवर दिसले तेव्हा प्रोडक्ट ब्लर केलेलं होतं.
 
चुलबुल सांगतो, "काही ठिकाणी पीआर पैसे देतात. काही ठिकाणी पैसे मिळत नाहीत. पैसे देऊन फोटो काढले जात नाहीत. आम्ही इतक्या दूरवरून तिथे जातो म्हणून पैसे मिळतात. बॉस 10 हजार रुपये देतो. यातले सहा ते सात हजार रुपये मी घरी पाठवतो."
 
स्नेह सांगतो, "कमाई होते. यूट्यूबवरून पैसा येतो. इन्स्टाग्राममुळे शूट्स मिळतात. डिजिटली आणखीन मजबूत होण्याचं माझं स्वप्न आहे."
 
मानव मंगलानी सांगतात, "मॅगझिन, पेपर्स, मीडिया चॅनेल, हे लोक आमच्याकडून कंटेंट घेतात आणि आम्हाला पैसे देतात. सध्या बहुतेक अॅप्सना कंटेंट टाकण्यासाठी पैसे दिले जातात. तुम्ही जितका जास्त कंटेंट टाकाल तितके जास्त पैसे तुम्हाला मिळतील."
 
ते पुढे सांगतात, "अनेक प्रोडक्शन हाऊस आम्हाला त्यांच्या प्रमोशनसाठी कंटेंट आणि पैसे देतात. एखाद्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी वेगळे आणि सेलिब्रिटीला प्रमोट करण्यासाठी वेगळे असे पॅकेजेस असतात. काही स्टार्स जिममधून जाता-येताना फोटो काढण्यासाठी पैसे देतात. पण यात टॉपचे स्टार्स नसतात.
 
"ज्यांना सोशल मीडियावर दिसायचं असतं ते पैसे देतात जेणेकरून दिग्दर्शक, कास्टिंग डायरेक्टर देखील या स्टार्सना बघतील आणि त्यांना कामं मिळतील. पण यात पोस्टला किती इंगेजमेंट मिळते हे देखील पाहिलं जातं."
 
पीआरचा रोल
पॅपराझींना बोलावण्यात पीआरची भूमिका महत्त्वाची असते. हे असे पीआर असतात जे एखाद्या कार्यक्रमात किंवा एखाद्या ठिकाणी कलाकार 'अचानक' दिसण्यापूर्वीच पॅपराझींना बोलवून घेतात.
 
आम्ही पॅपराझींचे असे अनेक ग्रुप्स पाहिलेत, ज्यात त्यांना फ्लाइट नंबर, गुगल लोकेशन पाठवल्याचे मेसेज असतात.
 
एक पॅपराझी सांगतो, "काही पीआर कुठे यायचं ते सांगतात. मेसेजमध्ये सर्व काही लिहिलेलं असतं."
 
स्नेह सांगतो, "माझ्यासोबत इतरही अनेक लोक आहेत. आम्ही पेट्रोलिंग करतो, फेऱ्या मारत राहतो. आता इतके वर्ष काम केलंय म्हटल्यावर आमचे पण सोर्स तयार झालेत. पण 80% गोष्टी शोधल्यावरच सापडतात. बहुतेक वेळा आम्ही शोधच घेतो. कधीकधी पीआरला विचारून ॲक्टरचा शोध घेतो. ते मूडमध्ये असतील तर चांगले फोटोही मिळतात."
 
फिल्म क्रिटिक आणि जर्नलिस्ट अनुपमा चोप्रा सांगतात, "सगळेच पीआर पॅपराझींना बोलावतात असं नाही. हा एक बिझनेस आहे. इथे आपण किती दिसतो, यासाठी पैसे मोजले जातात."
 
त्या पुढे सांगतात, "आता तर एअरपोर्ट लूक एक नवी गोष्ट बनलीय. एकदा तर करण जोहर चेष्टेने म्हणाला होता की, मी खूप आवरून तयार होऊन एअरपोर्टवर गेलो होतो, पण तिथे कोणीच आलं नव्हतं. माझा आउटफिट वाया गेला."
 
यावर अदिती राव हैदरी म्हणते, "मी कुठे चालले आहे हे मी कधीच सांगत नाही. मी नकार दिला तरी ते माझं ऐकतात."
 
एवढे सगळे स्टार्स आणि त्यांच्या तुलनेत मूठभर पॅपराझी. मग वेगवेगळ्या ठिकाणी जाणाऱ्या स्टार्सना हे पॅपराझी कसे गाठतात?
 
पॅपराझी प्लॅटफॉर्मसाठी कंटेंट पुरवणारे नसीम अनेक वर्षांपासून मुंबईत राहतायत, ते मुंबईत पॅपराझी कंटेंट एजन्सी चालवतात.
 
नसीम सांगतात, "आर्टिस्ट हा आर्टिस्टच असतो, मग तो कोणत्याही लेव्हलचा का असेना. प्रत्येकाकडे पीआर मशिनरी, मॅनेजर, सोशल मीडिया टीम असते. कलाकार नेमका कुठे दिसणार आहे हे सांगायचं काम त्यांच्या टीमचं काम असतं. आणि ते स्वतः सांगतात.
 
"एखादा म्हणेल की पॅपराझींना स्वतःहून समजेल तर? तसं नसतं बॉस. एखाद्याला त्याचा फोटो टाकायचा असेल तर तो मानव मंगलानी, विरल भयानी यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करण्यासाठी सांगेल. ते माझ्याबद्दल बोलणार नाहीत कारण मी फ्रेममध्ये कुठेच नाहीये."
 
एखादा ॲक्टर त्याचे फोटो अशा प्लॅटफॉर्मवर टाकण्यासाठी पैसे देतो का?
 
यावर नसीम स्पष्ट करतात, "हो, ते पैसे देतात. आणि असं नेहमीच घडतं. प्रत्येक ॲक्टरला हे करायचं असतं. पण या बिझनेसमध्ये एक लाईन आहे जी क्रॉस करायची नसते."
 
प्रायव्हसी
आलिया भट्टने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये एक फोटो शेअर करून तिचा आक्षेप नोंदवला होता.
 
फिल्मी दुनियेच्या बुडाखाली उजेड आहे असं म्हणता येणार नाही. काही ठिकाणी अंधार देखील आहे.जसं की प्रायव्हसी.
 
अलीकडेच आलिया भट्टचा लिव्हिंग रूममध्ये बसलेला एक फोटो काही पॅपराझींनी क्लिक केला होता. आलियाने हा फोटो शेअर करताना मुंबई पोलिसांना टॅग केला आणि पॅपराझींच्या या कृतीवर तीव्र आक्षेप घेतला होता.
 
जेव्हा अनुष्का आणि विराट कोहलीची मुलगी वामिकाचा फोटो लाइव्ह झाला होता तेव्हा या दोन्ही सेलिब्रिटींनी हा फोटो पुढे शेअर न करण्याचं आवाहन केलं होतं. पण करीना-सैफचा मुलगा तैमूर मात्र पॅपराझींच्या कॅमेऱ्यांच्या फोकसमध्ये कायमच राहिलाय.
 
मुंबई उच्च न्यायालयातील वकील रिजवान सिद्दीकी म्हणतात, "असे अनेक पालक आहेत ज्यांना आपल्या मुलांना एक्सपोज करायचं नसतं. पण काही पालकांना मुलांचे फोटो काढले तरी हरकत नसते. पण जर एखादं मूल ओवर-एक्सपोज झालं आणि याची तक्रार झाली तर पालकांनाही अडचणी येऊ शकतात."
 
जर पॅपराझींनी एखाद्या चित्रपटाचा लूक फोटोत कॅप्चर केला तर कलाकारांकडून आणि चित्रपट निर्मात्यांकडूनही आक्षेप घेतले जातात. काही प्रसंगी जया बच्चन, तापसी पन्नू यांच्यासह अनेक कलाकार पॅपराझींवर चिडल्याचं दिसलंय.
 
अनुपमा चोप्रा म्हणतात, "जेव्हा ॲक्टर रेड कार्पेटवर येतात तेव्हा तुम्ही फोटो काढण्यासाठी तयार असता. पण जर तुम्ही कोणाच्या लिव्हिंग रूममध्ये डोकावत असाल तर तुम्ही परवानगीशिवाय हे करताय आणि हे चुकीचं आहे."
 
मलायका अरोरा पॅपराझींमध्ये खूप लोकप्रिय आहे. पॅपराझींच्या कॅमेऱ्यांसमोर मलायकाच्या चालण्याची खिल्ली उडवणारे अनेक मीम्स, रील सोशल मीडियावरही पाहायला मिळाले आहेत.
 
अनुपमा चोप्रा म्हणतात, "हे चुकीचं आहे. तुम्ही तुमचा कॅमेरा झूम करून एखाद्याच्या शरीराचा भाग दाखवत आहात आणि ते ज्या पद्धतीने समोर आणलं जातंय ते अतिशय चुकीचं आहे. एखाद्यासोबतचे चांगले संबंध का बिघडवायचे?"
 
पाश्चात्य देशांतही पॅपराझींनी मर्यादा ओलांडण्याचे प्रकार घडलेत. पण भारतात हे दिसत नाही. यामागची कारणं काय असू शकतात?
 
अनुपमा चोप्रा म्हणतात, "इथे कायदेशीर कारवाई करणं म्हणजे डोंगर चढण्यासारखं आहे. त्यामुळे ॲक्टर्स असं करणं टाळतात."
 
यावर वकील रिजवान सिद्दीकी म्हणतात, "जर एखाद्या व्यक्तीने एखाद्या सेलिब्रेटीचा प्रायव्हेट मुमेंटचा फोटो काढला तर यातून स्टॉकिंगची केस उभी राहते आणि हा कायद्याने गुन्हा आहे. जर असं करताना कोणी सापडलं तर त्यांना शिक्षाही होऊ शकते. पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत आपली यंत्रणा थोडी धीमी आहे. निकाल लागेपर्यंत बराच वेळ निघून जातो."
 
सिद्दीकी म्हणतात, "भारतातील सुपरस्टार अनेकदा यांच्यासमोर सरेंडर होतात. कारण त्यांना या लोकांच्या नजरेत वाईट बनायचं नसतं. कारण त्याचा परिणाम त्यांच्या चित्रपटांवर होतो. सेलिब्रिटी असणं ही अशी गोष्ट आहे की तुम्हाला दिसलं ही पाहिजे आणि तुमचं प्रोडक्ट विकलं गेलं ही पाहिजे."
 
पॅपराझींच्या मनात कायद्याविषयी भीती असते का?
मानव मंगलानी म्हणतात, "केस होणं ही नामुष्कीच आहे. जर अतिरेक झाला तर मग ती वेगळी बाब आहे. आलिया भट्टची मुमेंट कॅच झाली ती अचानक क्लिक झाली. त्यात कोणता प्लॅन नव्हता. बऱ्याचदा लोकांनी प्रायव्हसी तोडली आहे. खरं तर हे घडायला नको."
 
स्नेह जाला म्हणतो, "मी तर या बिजनेसमध्ये एकच शिकलोय, काही पण करा पण प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये घुसून मस्ती करू नका. जर एखाद्याला फोटो द्यायचे असतील तर तो देईल, त्याला देऊ वाटलं नाही तर नाही देणार."
 
जया बच्चन बऱ्याचदा पॅपराझींवर रागवताना दिसल्या आहेत. पॅपराझी प्लॅटफॉर्मचं नाव ऐकल्यावर तर त्यांनी आश्चर्य व्यक्त केलंय.
 
अदिती राव हैदरी म्हणते की, "मला आशा आहे की या बाउंड्रीज कायम राहतील. कारण जेव्हा ही मर्यादा ओलांडली जाते तेव्हा ते योग्य नसतं. पॅपराझींसाठी चुकीच्या मार्गाने जाणं खूप सोपं आहे. आमच्या बाबतीत असं घडू नये अशी आशा आहे. कारण जगात हे घडताना आपण सगळ्यांनी पाहिलंय.
 
भूतकाळ आणि भविष्यकाळ
पॅपराझींनी केलेल्या कामाचं आयुष्य कमी असतं. पण जी नाती तयार होतात ती कधी कधी इतकी घट्ट असतात की कित्येक दशके ती नाती टिकतात.
 
प्रदीप बांदेकर फिल्मी दुनियेत फोटोग्राफीचं काम 1977 पासून करतायत. वाढत्या वयामुळे त्यांचं हे काम आता कमी झालंय. पण त्यांच्याकडे आठवणीच इतक्या आहेत की ते बोलू लागले की डोळ्यासमोर फोटो तरळू लागतात.
 
तुम्ही प्रदीपला विचारलं की तुम्ही कोणत्या कोणत्या स्टार्सचे फोटो काढलेत, तर ते सांगतात, "मी कोणाचे फोटो काढले नाहीत असं विचारा. मला नायिकांचं वेड होतं. मी अनेक हिरोईनचे फोटो काढलेत."
 
पूर्वीचे पॅपराझी आणि आजचे पॅपराझी यांच्यात जमीन आस्मानचा फरक असल्याचं प्रदीप सांगतात.
 
प्रदीप सांगतात, "पूर्वी कलाकार अजिबात नजरेस पडत नव्हते. दिलीप साब, राजकुमार, राजेंद्र कुमार यांचे फोटो कोणत्याही कार्यक्रमात बघायला मिळणार नाहीत. आजचे कलाकार सहज सापडतात, तेव्हा तसं नव्हतं. पूर्वी कलाकारांचा आब इतका होता की समोर बोलायची हिंमत होत नव्हती. तुम्ही कोणत्याही कलाकाराचा फोटो थेट घेऊ शकत नव्हता. सेटवर येण्याची परवानगी नव्हती."
 
प्रदीप म्हणतात, "पूर्वी लोक कोर्स करून फोटोग्राफी करायचे. आता ज्याच्या खिशात फोन आहे तो फोटोग्राफर. कोणत्याही अँगलमध्ये ड्रॅग करून घाणेरडे फोटो काढले जातात. तुम्ही त्यांच्याकडून मोबाईल काढून घ्या, त्यांना अजिबात फोटोग्राफी करता येणार नाही."
 
प्रदीप म्हणतात, "त्या काळात एका हिरो-हिरोईनच्या अफेअरच्या चर्चा जोरदार होत्या. तेव्हा मायापुरी मॅगझिनच्या लोकांनी मला सांगितलं की तू कसला फोटोग्राफर आहेस. या कपलचे फोटो आणून दे, मग तुला मानलं. पण ज्या हिरोचा फोटो काढायचा होता तो मारण्यात तरबेज होता. शेवटी एक दिवस मी लपून बसलो आणि ते दोघे दिसल्यावर दोन फ्लॅश मारल्या आणि तिथून पळून आलो."
 
बी. के. तांबे हे देखील तेव्हाचं एक नाव. अलीकडच्या काळापर्यंत तांबे यांचा थेट संबंध बच्चन कुटुंबाशी होता. बऱ्याच ॲक्टर्सन

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अजय देवगण आणि काजोलच्या 'इश्क' चित्रपटाला 27 वर्षे झाली पूर्ण

सन ऑफ सरदारच्या प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या मुलाचे वयाच्या 18व्या वर्षी निधन

नागराज मंजुळे यांना महात्मा फुले समता’ पुरस्कार मिळणार

Rakhi Sawant: गरिबीत गेले बालपण,त्यानंतर राखी बनली बॉलिवूडची ड्रामा क्वीन

अटक टाळण्यासाठी राम गोपाल वर्मा घरातून गायब,व्हिडिओ जारी केला

सर्व पहा

नवीन

वीरमाता जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालय मुंबई

Saif Ali Khan: साऊथच्या हिट चित्रपटाच्या रिमेकमध्ये सैफ अली खान दिसणार

अभिनेत्री सामंथा रुथ प्रभूचे वडील जोसेफ प्रभू यांचे निधन

अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राच्या घरावर ईडीचा छापा, पोर्नोग्राफी प्रकरणाशी संबंधित प्रकरण

महाराष्ट्रातील हे सुंदर स्थळे सूर्योदय आणि सूर्यास्तासाठी आहे खास

पुढील लेख
Show comments