Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

प्राण : पार्टीला जाताना घरूनच दोन पेग पिऊन जाणारा 'ग्लॅमरस खलनायक’

Webdunia
मंगळवार, 12 जुलै 2022 (17:44 IST)
'इशारों को अगर समझों, राज को राज रहने दो…'1973 साली रिलिज झालेल्या 'धर्म' या पिक्चरमधली ही कव्वाली. थिएटरमध्ये हे गाणं आलं की प्रेक्षक बेभान व्हायचे, थिएटरमध्ये नाचायला लागायचे, अख्खं थिएटर हे गाणं म्हणायला लागायचं.
 
ज्या पात्राच्या तोंडी हे गाणं होतं त्याला पब्लिकने डोक्यावर घेतलं होतं हे सांगायला नकोच. कोण होता हा हिरो? हीच तर खरी गंमत आहे. ज्याच्या कव्वालीवर लोक थिएटरमध्ये दौलतजादा करायला मागेपुढे पाहायचे नाहीत, तो हिरो नव्हताच. व्हिलन होता. असा व्हिलन ज्याला ग्लॅमरचं वरदान लाभलं होतं.पत्रकार बनी रूबेन यांच्या पुस्तकात याचा उल्लेख आहे.
 
जवळपास साठ वर्षं हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप सोडणाऱ्या प्राण (पूर्ण नाव प्राण किशन सिकंद) यांचा आज स्मृतीदिन. 12 जुलै 2013 साली त्यांनी या जगाचा निरोप घेतला. पण त्यानिमित्ताने त्यांच्या आठवणींना दिलेला हा उजाळा.
 
प्राण यांची सिनेमातली कारकिर्द काहीशी अपघातानेच सुरू झाली पण त्यांनी अखेरपर्यंत आपली निष्ठा सिनेमाच्या पायी वाहिली. मोठ्या मोठ्या कलाकारांच्या मांदियाळीत त्यांचं नाव घेतलं जातं. 1950, 60 आणि 70 च्या दशकातले गाजलेले पिक्चर्स '... आणि प्राण' या नामावलीशिवाय पूर्णच होत नाहीत.
 
वडिलांनी सांगितलेले 3 नियम
बनी रूबेन यांनी लिहिलेल्या प्राण यांच्या चरित्राचा मराठी अनुवाद अशोक जैनानी केला आहे. या पुस्तकाच्या सुरुवातीलाच प्राण यांनी स्वतः एक आठवण सांगितलेली आहे. आपल्या यशाचं श्रेय ते त्यांच्या वडिलांनी सांगितलेल्या तीन नियमांना द्यायचे. काय होते हे नियम?
 
1) जेव्हा तुम्ही यशाच्या पायऱ्या चढत असाल तेव्हा ज्यांचा पडता काळ आहे त्यांना नेहमी चांगलं वागवावं. कारण उद्या जेव्हा तुमचा पडता काळ येईल आणि ते लोक यशाच्या पायऱ्या चढतील तेव्हा ते तुमच्या वागण्याची आठवण ठेवतील.
 
2) कोणाहीकडे मद्य पार्टीला जाताना घरून दोन पेग पिऊन जावं. म्हणजे पार्टीला आपण हावरटासारखी पिणार नाही आणि ज्यांनी पार्टी दिली आहे त्यांना आपण फालतू वाटणार नाही. तात्पर्य आपला आब आपण स्वतः राखावा.
 
3) तिसरं म्हणजे वागताना असं वागावं की आपल्याला माघार घ्यावी लागणार नाही, आपल्या तत्वांशी तडजोड करावी लागणार नाही, आणि म्हणूनच कदाचित आपली 'सज्जन खलनायक' अशी प्रतिमा तयार झाली असं प्राण मानायचे.
 
हिरामंडी या तवायफींच्या भागात फिरताना मिळाला पहिला रोल
प्राण यांना पहिला रोल कसा मिळाला हा किस्सा फारच रंजक आहे. त्यांचा जन्म झाला 1920 साली एका धनिक कुटुंबात झाला. त्यांचे वडीलही सरकारी कंत्राटदार होते. साहजिकच प्राणचं बालपण सुखात गेलं.
 
प्राण यांना कॉलेजमध्ये जाऊन डिग्री वगैरे घेण्यात अजिबात रस नव्हता, त्यामुळे त्यांनी वडिलांना सांगून टाकलं की मला फोटोग्राफी करायची. (शिक्षण सोडून फोटोग्राफी करायची पद्धत तेव्हापासून आहे तर..!) वडिलांच्याच एका मित्राच्या कंपनीत काम करायचा पर्यायही त्यांनी समोर ठेवला. वडिलांनी हो म्हटलं.
 
या कंपनीसाठी त्यांनी आधी दिल्लीत आणि नंतर लाहोरमध्ये काम केलं. याच लाहोरमध्ये त्यांचं नशीब फळफळणार होतं.
 
फाळणीपूर्व भारतात लाहोर हे खूप पुढारलेलं, ब्रिटीश वळणाचं, मॉडर्न शहर होतं. मुंबई अजून भारतीय हिंदी सिनेमाचं केंद्र बनायचं होतं.
 
याच लाहोरमधला एक प्रसिद्ध भाग म्हणजे हिरामंडी. आज तो रेडलाईट भाग म्हणून ओळखला जात असला तरी त्या काळात तिथल्या तवायफींचे कोठे, नाच-गाणं, उत्तमउत्तम खाद्यपदार्थ आणि तोंडात ठेवताच विरघळेल असं पान प्रसिद्ध होते. साहजिक तिथे गर्दी असायची.
 
अशाच एक रात्री मित्रांबरोबर जेवण झाल्यानंतर हिरामंडीत पान खात होते. समोरून एक माणूस झोकांड्या देत आला. तो नशेत होता हे स्पष्टच दिसत होतं. त्यांनी प्राणला नाव विचारलं आणि सांगितलं की पंजाबीत एक नवा चित्रपट तयार होतोय त्याचा नायक तू असशील. मी तुला निवडतो.
 
अर्थातच या बेवड्या माणसाकडे लक्ष देण्याची प्राणला गरज वाटली नाही. तरी त्या माणसाने विनंती केली की एकदा स्टुडिओत येऊन जा. प्राणने त्यांना काहीतरी बोलून कटवलं आणि झाला प्रकार विसरून गेले.
 
त्या नशेत असलेल्या माणसाचं नाव होतं वली मोहम्मद वली आणि ते प्रख्यात पटकथा लेखक होते. पण हे तेव्हा प्राण यांना माहिती नव्हतं.
 
काही दिवसांनी पुन्हा प्राणची गाठ वलींशी पडली, तेव्हा ते शुद्धीत होते आणि त्यांनी प्राणवर बरीच आरडाओरड केली की मी सांगूनही तू आला नाहीस, माझं नाव खराब केलंस. आता प्राणला पटलं की वली खरंच जेन्युईन माणूस आहे.
 
वलींनी लिहिलेला 'यमला जाट' हा प्राणचा पहिला पिक्चर ठरला. त्यावेळी प्राणचं वय होतं 20 वर्षं.
 
प्राणकडे देखणं रूप होतंच, जोडीला मस्त स्टाईल होती, ग्लॅमर होतं. लाहोरच्या पंजाबी इंडस्ट्रीत प्राण स्टार झाला होता.
 
न्यायधीशांनी डोळे बघून सोडून दिलं
प्राणचे सुरुवातीचे काही पंजाबी चित्रपट जोरदार हिट झाले. हातात पैसा आला, उंची सूट, सिल्कचा टाय, सिल्कचा रूमाल, तोंडात सिगरेट ठेवण्याची विशिष्ट स्टाईल असा ग्लॅमरस अवतार तर त्यांचा होताच. लोक त्यांच्या गाडीलाही रस्त्यावर ओळखायला लागले.
अशात प्राण यांच्या गाडीचा अपघात झाला आणि त्यांच्यावर खटला भरला गेला. खटला मागे घ्यावा म्हणून खूप प्रयत्न केले गेले. त्यांच्या चित्रपट निर्मात्या-दिग्दर्शकांनीही प्रयत्न केले, पण काही उपयोग झाला नाही.
 
प्राण यांना समन्स बजावण्यात आलं. त्यांनी कोर्टात हजर राहाणं बंधनकारक होतं. कोर्टातही त्यांना दोषी करार दिला गेला. चार गुन्हे सिद्ध झाले, त्यामुळे प्रत्येक गुन्ह्यासाठी पंचवीस रूपये दंड नियमाप्रमाणे कोर्टाने ठोठवायला हवा होता.
 
पण झालं वेगळंच.
 
न्यायाधीशांचं सगळं लक्ष प्राणच्या दिसण्याकडे होते. प्राण दिसायला फारच हँडसम होते. त्यांचे डोळेही बोलके होते. न्यायधीशांनी प्राणच्या दिसण्याचं, विशेषतः डोळ्यांचं कौतुक केलं आणि चक्क पंचवीस रुपयांचा दंड पाच रूपयांवर आणला.
 
त्याकाळी लाहोरमध्ये हा किस्सा खूप गाजला.
 
फाळणी आणि मुंबईतली धडपडती सुरुवात
प्राण यांचं चांगलं बस्तान बसलं होतं लाहोरला. 1945 साली त्यांचा शुक्ला या तरूणीशी लग्नही झालं. तेव्हाच भारतात स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले होते. लग्नानंतर त्यांना एकाच वर्षात पहिला मुलगा झाला.
 
पण 1946 सालापर्यंत वातावरण बिघडलं होतं, छोटमोठ्या दंगलींच्या बातम्या येत होत्या. हिंसाचाराच्या घटना घडत होत्या, त्यामुळे काळजीपोटी प्राण यांनी आपली पत्नी आणि मुलाला इंदोरला पाठवून दिलं. प्राण स्वतःजवळ शस्त्र बाळगायला लागले.
 
पुढचं वर्ष ते एकटेच लाहोरला काम करत होते. ऑगस्ट 1947 मध्ये त्यांच्या मुलाचा पहिला वाढदिवस होता. बायकोने त्यांना इंदोरला येण्याचा आग्रह केला. प्राण आधी नाही म्हणाले पण बायकोच्या हट्टामुळे शेवटी इंदोरला निघाले. या एका कृतीने माझा जीव वाचला असं त्यांनी नंतर मुलाखतीत म्हटलं.
 
10 ऑगस्टला लाहोरमध्ये प्रचंड दंगली झाल्या. हजारो लोकांचे जीव गेले, कत्तली झाल्या, घरं पेटवून देण्यात आली. एका रात्रीतून लाहोरमधलं प्राणचं राहतं घर, तिथली संपत्ती होत्याची नव्हती झाली. पण तेवढ्यावरच ते थांबलं. बाकी त्यांच्या कुटुंबातलं कोणी पाकिस्तानात नव्हतं आणि त्याचं पिढीजात घरदारही तिथलं नव्हतं.
 
पण आता काम कुठे मिळणार हा प्रश्न उभा राहिला आणि नशीब आजमवण्यासाठी प्राण बायको मुलाला घेऊन मुंबईत आले.
 
मुंबईत सिनेमे बनत होते, एव्हाना मुंबई सिनेमाचं केंद्र बनली होती आणि लाहोर पाकिस्तानात गेल्यावर तर मुंबईला अजूनच महत्त्व येणार होतं.
 
पण प्राण यांच्या ओळखीचं तिथे कोणी नव्हतं. अनेक महिने काम शोधूनही त्यांना तिथे काम मिळालं नाही, अखेरीस बायकोच्या बांगड्या गहाण टाकून खर्च चालवावा लागला.
 
तब्बल एका वर्षानंतर त्यांना 'जिद्दी' या चित्रपटात पाचशे रूपयांच्या मोबदल्यावर काम मिळालं. पण तेव्हापासून प्राण यांनी कधी मागे वळून पाहिलं नाही.
 
जिद्दीनंतर त्यांना दुसरा चित्रपट मिळाला त्यासाठी त्यांनी चक्क हिरोपेक्षा जास्त मानधन घेतलं होतं. नंतरही प्राण यांच्या नावाचा करिष्माच असा होता की त्यांच्या नावावर, एका व्हिलनच्या नावावर पिक्चर चालायचे.
 
प्राण चित्रपटात असला की वितरक खूश व्हायचे, निर्माते चित्रपटाची किंमत वाढवायचे असा महिमा होता या सुपर व्हिलनचा.
 
मराठी बाजाची भूमिका
प्राणने कधी मराठी चित्रपटात काम केलं नसलं तर त्यांनी एक मराठी बाजाची भूमिका केली होती. वसंत कानिटकरांच्या 'अश्रुंची झाली फुले' या मराठी नाटकावर अशोक कुमार यांचे बंधू अनुपकुमार यांनी 'आसू बन गये फूल' हा चित्रपट काढला.
 
यातली शंभूची भूमिका प्राण यांनी केली होती. हे पात्र मराठी होतं. सगळ्या कलाकारांनी नाटक आधी पहावं असं ठरलं पण प्राणचा याला विरोध होता कारण त्यामुळे आपल्या अभिनयावर नाटकातल्या पात्राचा प्रभाव पडेल असं त्यांना वाटलं.
 
पण शंभूच्या पात्रासाठी त्यांना मराठी माणूस कशा धाटणीचं हिंदी बोलेल, त्यात बोलण्यात कसे मधून मधून मराठी शब्द येतील हे शिकायचं होतं. हे सगळं त्यांनी आपल्या मराठी इलेक्ट्रिशियनकडून शिकून घेतलं.
 
त्यांनी आपल्या कारकिर्दीत खलनायक तर रंगवलाच, पण नंतर नंतर चरित्र आणि विनोदी भूमिकांमध्येही छाप सोडली.
 
फिल्मफेअर नाकारला होता तेव्हा
प्राण यांच्या आयुष्यात जे काही वादाचे प्रसंग आले त्यातला हा सगळ्यांत मोठा असावा कदाचित. आपल्या तत्वांना कधीही मुरड घालायची नाही ही वडिलांची शिकवण त्यांनी पुरेपूर आचरणात आणली होती.
 
त्यांना 1973 साली 'बेईमान' चित्रपटासाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला पण त्यांनी तो नाकारला. तो नाकारण्याचं कारण कोणताही वैयक्तिक मुद्दा नव्हता तर त्यावर्षी सर्वोकृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार 'पाकीजा' साठी मीनाकुमारीला न देणं आणि सर्वोकृष्ट संगीत दिग्दर्शनाचा पुरस्कार 'पाकीजा' साठीच गुलाम महमंद यांना न देणं हे होतं.
 
यानंतर या गोष्टीविषयी मुलाखत देताना प्राण यांनी म्हटलं होतं की ते दोघंही या पुरस्काराच्या वेळी हयात नसले तरी तरी फिल्मफेअरचा असा कोणताही नियम नव्हता की फक्त हयात व्यक्तींना पुरस्कार द्यायचे. त्यांनी हयात नसलेल्या व्यक्तींना अनेकदा आधी पुरस्कार दिले होते.
 
माझ्या दृष्टीने या दोन्ही कलाकारांची अदाकारी सर्वोकृष्ट होती आणि त्यांचा सन्मान व्हायला हवा, मी नम्रतेने पुरस्कार नाकारतो.
 
फिल्मफेअर समिती विरुद्ध प्राण हे नाट्य ही काही काळ रंगलं पण त्यांनी अखेरपर्यंत फिल्मफेअर स्वीकारला नाही. त्यानंतर पुढची 25 वर्षं त्यांना हा पुरस्कार मिळाला नाही, मिळाला तो डायरेक्ट 1999 साली जीवनगौरव.
 
तत्वांना मुरड न घालण्याचा त्यांचा स्वभाव आणिबाणीच्या काळातही दिसला. त्यांनी आणिबाणीला जोरदार विरोध केला होता. त्यांचं कौतुक करायला जॉर्ज फर्नांडिस यांनी तुरुंगातून त्यांना लपूनछपून पत्र लिहून कौतुक केलं होतं.
 
भावना दुखावल्या म्हणून खटला
'बेईमान' या चित्रपटाचाच हा किस्सा आहे. या पिक्चरमध्ये एक सीन आहे. हिरोचा बाप पोलीस काँस्टेबल असतो. ही भूमिका प्राण यांनी केली आहे. एका सीनमध्ये प्राण आपल्या हातातल्या काठीने एका देवाच्या मुर्तीवर वार करतो आणि देवाच्या मुर्तीचं मुंडकं तुटून खाली पडतं.
 
या सीनला आक्षेप घेत गुजरातमधल्या राजकोटमधल्या एका पानवाल्याने पिक्चरचे दिग्दर्शक सोहनलाल कंवर आणि प्राण यांच्यावर खटला भरला होता. त्या पानवाल्याचं म्हणणं होतं की या सीनमुळे त्याच्या 'धार्मिक भावना दुखावल्या.'
 
यावर कोर्टात प्राण यांनी मजेशीर उत्तर दिलं होतं. ते म्हणाले होते, "आजवर मी पडद्यावर दोनशे खून आणि चाळीसहून जास्त बलात्कार केले आहेत पण माझ्यावर कोणी खटला भरला नाही. पण एका प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मुर्तीचा भंग झाला म्हणून मी कोर्टात उभा आहे. किती गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे हा."
 
कपिल देवला मदत
सिनेमा वगळता प्राण यांना उर्दू शायरी, उत्तम खाणं-पिणं, मद्य, आणि खेळांची आवड होती. त्यांनी कपिल देव यांना मदत केली हा किस्साही फार कमी जणांना माहिती असेल.
 
एकदा त्यांना कळलं की कपिल देव यांना दुखापत झालीये आणि त्यांना उपचारासाठी देशाबाहेर जावं लागेल. कपिल देव त्यावेळी नवे होते, त्यांचं नाव झालं नव्हतं, पाठीशी पुण्याई नव्हती. क्रिकेट बोर्डही इतकं मोठं झालं नव्हतं. बोर्डाने त्यांचा खर्च करायला नकार दिला.
 
तेव्हा प्राण पुढे आले आणि म्हणाले की जर बोर्डाला कपिल देव यांच्या इलाजाचा खर्च परवडत नसेल तर मी करेन. नंतर बोर्डाने कपिल यांचा खर्च करायला होकार दिला.
 
प्राण यांनी आपल्या आयुष्यात अनेक ज्युनियर आर्टिस्टांनाही मदत केली.
 
आपल्या 93 वर्षाच्या प्रदीर्घ आयुष्यातली जवळपास 60 वर्षं प्राण यांनी सिनेमाला समर्पित केली होती. पण त्या पलिकडे जाऊनही प्राण खूप काही होते.
 
तत्वांना मुरड न घालणारा प्रामाणिक माणूस, बहिण गेली त्या दिवशी निर्मात्याचं नुकसान होऊ नये म्हणून आऊटडोर शूट पूर्ण करणारा करारी माणूस, दिलेली भूमिका अक्षरशः जगणारा हरहुन्नरी कलाकार, मुलानातवंडांमध्ये रमणारा संसारी गृहस्थ, अडल्यानडलेल्या मदत करणारा परोपकारी माणूस.
 
प्राण यांच्याच कवितेच्या ओळीत सांगायचं झालं तर...
 
गुजरे हुए जमाने का अब तजकाराही क्या,
 
अच्छा गुजर गया, बहुत अच्छा गुजर गया.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दिग्दर्शक आणि आर्ट डिझायनर सुमित मिश्रा यांचे निधन

अक्षय कुमार स्टारर वेलकमला17 वर्षे पूर्ण झाली, अनिल कपूरने जुने दिवस आठवत पोस्ट केली

पुष्पा 3 बाबत अल्लू अर्जुनने घेतला मोठा निर्णय

एका मुलाच्या प्रेमात करीना कपूरने तोडले घराचे कुलूप, नंतर तिच्या आईने तिला बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवले

Year Ender 2024 कमी बजेटमध्ये बनवलेले 5 चित्रपट, ज्यांनी यावर्षी चांगलीच धमाल केली

सर्व पहा

नवीन

नवरा पेशंट फरार आहे…

Shyam benegal Passes Away: प्रसिद्ध दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचे निधन

Pushpa 2 : पुष्पा 2' ने इतिहास रचला आणि 110 वर्षांचा विक्रम मोडला

तुम्ही वर पिता का ?

Pushpa 2 OTT Release: पुष्पा 2'चित्रपट OTT वर प्रदर्शित होणार नाही

पुढील लेख
Show comments