Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मनात दरवळणारा अंगणातला पारिजात

marathi book review
Webdunia
अंगणातला पारिजात... पारिजातकाच्या फुलांचा सुगंध कसा मनात दरवळत राहतो तसेच लेखकाचे शब्द, त्याच्या भावना व त्यांचे अनुभव मनात दरवळत राहतात..
विंग कमांडर प्रविणकुमार पाडळकर यांचे पुस्तक 'अंगणातला पारिजात' हातात घेतले आणि एक वेगळीच अनुभूती आली.
 
पुस्तकाविषयी सांगायचे झाले तर आकाशात चमकणारा सूर्य अचानक ढगाआड जातो आणि पुन्हा ढगांमधून बाहेर निघतो... ऊन सावलीचा हा खेळ सुरूच असतो कायम, असे हे पुस्तक! क्षणातच चेहऱ्यावर निरागस हास्य आणणारे, तर लगेच डोळ्यांच्या कडा पाणावणारे...!
कधी हसायला तर कधी रडायला लावणारे अन् कधी अंतर्मुख करणारे!
 
पुस्तकात लेखकाने आपले वैयक्तिक अनुभव मांडले आहेत तरी ते मांडण्याची पद्धत एवढी प्रभावी आहे की आपण कुठेतरी लेखकासोबत जोडले जातो..!
सुरुवातीलाच लेखक म्हणतो, "विविध रंगांचे अनुभवमणी एकत्र गुंफून, त्यांच्या रंगात रंगून जाऊन, कधी त्यांच्या मधून आरपार दूर बघत, कधी एखाद्या मण्यात गुरफटून, कधी त्यांच्या प्रकाशानं दाखवलेल्या रस्त्यानं धावत, तर कधी काळवंडून काळोखात अडकून पडत, हे पुस्तक मी लिहिलं आहे." आणि प्रस्तावनेतील या ओळीच संपूर्ण पुस्तक वाचायला भाग पाडतात.
 
बाहेरुन अतिशय कठोर आवरण घेतलेल्या या विंग कमांडरच्या मनात भाव भावनांचा एक विशाल समुद्र आहे! त्या समुद्रात आईची माया, बहिणीचे प्रेम, वडिलांचा दरारा, त्यांच्यासाठी आदर, निसर्गाची ओढ आणि देशप्रेमाच्या लाटा उसळतात! 
 
लेखक नांदेडला गोदातीरी राहणारा. लहानपणीचे वर्णन लेखकाने अतिशय सरस भाषेत केले आहे. असे की आपणच त्याचा हात धरून नांदेडचा एक फेरफटका मारून येतो. गावाचे रेल्वेस्थानक, हनुमानाचे मंदिर, गाव बासर, शाळा यांचे सुंदर वर्णन केले आहे.
आठवणींबद्दल लिहिताना लेखक म्हणतो, "आठवणी आपोआप वर येतात. मुंग्यांच्या वारुळातून एक मुंगी बाहेर आली की तिच्यामागं शंभर मुंग्या बाहेर येतात. अगदी तसंच. एक आठवण निघाली की तिच्यामागे शंभरतरी येतात आणि मग आठवणींची एक मालिकाच तयार होते. एकात एक गुंफून जाते. मनाला गुंतून टाकते."
 
अवेळी आईचे सोडून जाणे आणि त्यामुळे वडिलांचे कोसळणे हे वर्णन मनाला चटका लावून जातं. लेखकाचे हे शब्द काळजाला स्पर्श करतात..
"माझ्या घरातील अंगणात आईने तिचा आवडता पारिजात लावला होता. तो फुलांनी सदैव बहरलेला असे. ती पारिजातकाची फुले एकदम प्रकाशमान अन् टवटवीत दिसायची. माझ्या आईसारखी. जणू तिचाच प्रकाश या फुलांवर पडून परावर्तित होत असावा. सकाळी सकाळी अंगणात काढलेल्या रांगोळीच्या आसपास ही फुले विखुरलेली असायची. त्यांचा मंद सुगंध घरभर दरवळत राहायचा. शाळेत जातांना या विखुरलेल्या फुलांवर पाय पडू नये म्हणून मी उड्या मारत मारत अंगण पार करायचो. आई असेपर्यंत हे माझं घर, आईच्या आणि या फुलांच्या प्रकाशानं अन उत्साहानं ओसंडून वाहायचं. पण एके दिवशी आई अचानक गेली अन तिच्यासोबत तो पारिजातही कोमेजला. अंगणातली रांगोळी कायमचीच विस्कटून गेली.
पारिजाताला "ट्री ऑफ सॉरो" असं म्हणतात हे उमगायला खूप पावसाळे जावे लागले."
 
त्या कठिण काळी मिळालेली मित्रांची अमूल्य साथ, त्यांच्या सोबत घालवलेले क्षण, अभ्यास, मग सैन्यात भरती, कठोर ट्रेनिंग, वाळवंटात पोस्टिंग, वाळवंटाचे त्या भागात राहणाऱ्या लोकांचे वर्णन सारे सारे अद्भुत आहे! अगदी लहान-लहान वाक्यात भावना मांडल्या आहेत. आणि छोट्या छोट्या गोष्टीत जीवनाचे सत्य उलगडले आहे. एकेका गोष्टीचे एवढे सजीव वर्णन केले आहे की ते दृष्य डोळ्यासमोर येतात. भाषा साधी सोपी ओघवती आहे. 
 
लेखकाने मनापासून अगदी प्रामाणिकपणे आपले विचार मांडले आहेत म्हणून तो आपलासा वाटू लागतो‌.
 
या पुस्तकाचे मुखपृष्ठ पण सारंग क्षीरसागर यांनी फार सुरेख केले आहे, लेखकाच्या भावनांना साजेसे..
 
एकंदरीत पुस्तक संग्रही ठेवण्यासारखे आहे. हे पुस्तक शॉपिजन, एमेझॉन व‌ फ्लिपकार्ट वर उपलब्ध आहे.
अवश्य वाचा.
 
पुस्तकाचे नाव: अंगणातला पारिजात
प्रकाशक: शॉपिज़न प्रकाशन
किंमत: १८४/- 
पृष्ठ संख्या: ११७
 
ऋचा दीपक कर्पे

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chaitra Navratri 2025 भारतातील दहा प्रमुख श्रीराम मंदिर

Gudi Padwa 2025 Rangoli Designs गुढीपुढे काढण्यासाठी रांगोळी डिझाईन

हिंदू नववर्षापूर्वी घरातून बाहेर काढून टाका या ७ वस्तू, जीवनात सुख-समृद्धी येईल

फाटलेले ओठ गुलाबी करण्यासाठी नारळाच्या तेलात हे मिसळून लावा

नारळ पाणी कोणी पिऊ नये पिण्यापूर्वी त्याचे तोटे जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

Festival Special केशर पिस्ता खीर रेसिपी

सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला खूप भूक लागते का? त्याची 5 धक्कादायक कारणे जाणून घ्या

बॅचलर ऑफ युनानी मेडिसिन अँड सर्जरी मध्ये करिअर करा

मुलांच्या डोक्यात उवा असतील तर हे घरगुती उपाय अवलंबवा

बसताना किंवा उभे राहताना तुमच्या पायांच्या हांड्यातून कट-कट आवाज येतो का , कारणे जाणून घ्या

पुढील लेख
Show comments