Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जड झाले ओझे!

नंदिनी आत्मसिध्द

Webdunia
MHNEWS
महानगरी मुंबईत अनेक लहान लहान मुलं आणि मुली रेल्वे गाड्यांमधून, गल्लीबोळांमधून, निरनिराळ्या बकाल वस्त्यांमधून बघायला मिळतात. घर असूनही नसल्यासारखी अवस्था असणारी मुलंही त्यात खूपदा असतात. आपल्या कुवतीनुसार लहानसहान कामं करत जगणारी, भावंडांना जगवणारी ही मुलं इतक्या कमी वयातच जगाचा अनुभव घेत, थपडा खात शहाणी होत वाढत असतात. लाखो लोक येताजाता त्यांना पाहतात. कधी त्यांचा तिरस्कार करतात, तर कधी कीव करतात. काहीतरी खटकतं त्यांच्या मनाला, पण आपण काय करणार असा विचार करून लगेच ही माणसं आपापल्या कामालाही लागतात. काय भवितव्य असेल या मुलांचं, कशी राहत असतील ती, घरच हरवलेली ही मुलं उद्या आयुष्याच्या कोणत्या वळणावर जाऊन पोचणार...असे असंख्य प्रश्न अनुत्तरितच राहतात. जीवनातलं एक विदारक वास्तव आहे हे, असंच चालायचं असं म्हणून आपली नजर त्यावरून हटवून पुढे जाण्याचा रस्ता पकडून माणसं चालू लागतात..

अशाच तऱ्हेचं आयुष्य कधीकाळी जगलेल्या रवीन्द्र बागडे या लेखकाचं ‘गटुळं’ हे भरकटलेल्या जीवनाची कहाणी सांगणारं मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रसिद्ध केलेलं पुस्तक अशा मुलांचं जगणं किती क्लेशकारक असू शकतं याची कल्पना देऊन जातं. चर्मकार समाजात जन्मलेला हा लेखक इथल्या गल्लीबोळांमधल्या आपल्या जगण्यातून जे अनुभव गाठीला बांधत गेला त्यांचं हे गटुळं आहे. हे पुस्तक बागडे यांनी कादंबरीच्या स्वरूपात लिहिलं आहे. कादंबरीचा नायक नाऱ्या-नारायण हा स्वतः लेखकच तर आहे. बालपणातलं भणंग जगणं आणि तसं जगताना बघितलेली दुनिया लेखकाने यात चितारली आहे.

दारूच्या व्यसनाच्या पुरपूर आहारी गेलेला बाप, त्याची मारहाण नेहमीच सहन करत आलेली आई, तिने मुलांना वाढवण्यासाठी उपसलेले कष्ट आणि रस्त्यावर मांडलेला सारा संसार....हे वातावरण आहे ‘गटुळं’ मधल्या नायकाच्या जीवनातलं. गरिबी, भूक, चणचण हा त्याच्या घराचा स्थायिभावच जणू. आपला पारंपरिक धंदा न करता नाऱ्याचा बाप भाजी विकण्याचं काम करतो. पण दारूने त्याला पुरतं नाडलं आहे. अशा स्थितीत पाच पोरांना पोसणं किती कठीण, पण ते काम नाऱ्याच्या आईचंच. तिला जबाबदारी टाळून चालत नाही. अशाही वातावरणात नाऱ्या शाळेत जायचा. पण पुस्तकं नाहीत म्हणून त्याला तिथून काढलं जातं. मग कसंबसं करत तरीही शिकून तो मॅट्रिक होतो. या रस्त्यावरच्या जगण्यातली कुचंबणा, तिथला गलिच्छपणा हे सारं त्याला आवडत नाही आणि यातून आपल्याला बाहेर पडायचं आहे, वर यायचं आहे ही भावना सतत त्याच्या मनात आहे. तरीही नाऱ्या या धडपडीत ज्या तऱ्हेचं आयुष्य जगला ते मध्यमवर्गीय माणसाला धक्कादायक वाटावं असं आहे. कोवळ्या वयातल्या नाऱ्याचं भावविश्व आणि त्याच्या अवतीभवतीचं भयावह वास्तव यांचं कादंबरीतलं चित्रण जगण्याचा कुरूप चेहरा मांडतं.

नाऱ्याच्या डोक्यावर परिस्थतीने विदारक अनुभवांचं गटुळं ठेवलं आहे. समाजातलं विषम वास्तव, गरीब माणसाची होणारी परवड, चुकीच्या मार्गाला लागलेली लहान मुलं, व्यसनापायी उद्‍ध्वस्त होणारे संसार, जनावराच्या पातळीवरचं जीवन आणि भविष्याबाबतची अनिश्चितता अशा गोष्टींनी व्यापलेलं नाऱ्याचं जगणं त्याच्या मानसिकतेचं दर्शन घडवतं. तो आईला मदत व्हावी म्हणून धडपडतो. भाजी विकायला बसतो. पण शाळेतली मुलगी भाजी घ्यायला आली की त्याला शरम वाटते. कारण त्याची शाळेत टिंगल होणार असते. नाऱ्याचं संवेदनशील मन अशा वेळी खंतावतं, आक्रसतं. नाऱ्याचं जगणं, शिकणं, भरकटणं त्याला बरंच काही शिकवून जातं. त्याच्या या अनुभवांमध्ये मुंबईतल्या वेश्यावस्तीतल्या कुणा एकीत गुंतणं आहे.

अंगावर काटा आणणारे बाललैंगिक शोषणाचे अनुभव आहेत. कॉलेजातलं अर्धवट शिक्षण, त्यानंतरच्या सरकारी नोकऱ्यांमध्ये मदत करणारे, वाट दाखवणारेही त्याला भेटतात. नाऱ्याच्या लग्नापर्यंतची ही कहाणी आहे. आपल्या आयुष्यात नाऱ्याला प्रेरणा हे ती आईची. आईच्या कष्टांचा आणि तिच्या डोळ्यांमधल्या पाण्याचा तो साक्षीदार आहे. बापाबद्दल त्याच्या मनात एक चीड आहे. पण माझ्यासारखं वागू नकोस असं बापानेच आपल्याला सांगितलं होतं हेही नोंदवायला तो विसरत नाही. अर्थात इतरही अनेक अनुभव यात येतात. डोक्यावर पाटी घेऊन वणवण भटकणं, दारुड्या बापाशी भांडणं, त्याला मारहाण करणं अशा अनेक घटना लेखकाने सांगितल्या आहेत. १९५५ ते १९६८ या काळातल्या मुंबई शहराचं एक निराळंच चित्रण या पुस्तकात बघायला मिळतं. वैशिष्ट्यपूर्ण अशी मुंबई यात आहे.

एका घर असून वणवण करावी लागलेल्या मुलाची ही कहाणी समाजापुढे काही प्रश्न ठेवते. समाजाला जाबही विचारते. बोली भाषेचा यातला वापर कथनाला एक वेगळी शैली बहाल करून जाणारा आहे. विस्कळित जगणं मांडताना तसाच विस्कळीतपणा लेखनात उतरवला आहे, तो पुस्तकातील अनुभवांना अधिक ठळक करणारा आहे. नाऱ्याचं मीपण उलगडताना प्रांजळ निवेदनाचा वापर केल्याने ते मनाला भिडतं. लेखनाचा सूर नुसताच तक्रारीचा नाही. वास्तव नेमक्या शब्दांमध्ये मांडण्याचा आग्रह त्यात आहे. स्वतःबद्दल लिहिताना इतरांच्या दुःखांनाही त्याने स्पर्श करत लिहिलं आहे. लेखकाची ही सहवेदना खूप महत्त्वाची आहे. ती या लेखनाला एक उंची प्राप्त करून देते.
सर्व पहा

नक्की वाचा

Kalratri Katha शारदीय नवरात्रीच्या सातव्या दिवशी कालरात्री देवीची व्रत कथा नक्क‍ी वाचा

प्रत्येक समस्यांचे निराकरण : नवरात्रीत विड्याच्या पानांनी करा हे 5 चमत्कारी उपाय

Kojagari Purnima 2024 कोजागरी पौर्णिमा 16 की 17 ऑक्टोबर केव्हा? जाणून घ्या लक्ष्मी पूजेची तिथी आणि शुभ मुहूर्त

विजयादशमीच्या दिवशी आपट्याची पाने का वाटतात?

लहान मुलीसाठी दुर्गा देवीची नावे अर्थांसह

सर्व पहा

नवीन

Stretch Marks Remedies: प्रसूतीनंतर तुम्हाला स्ट्रेच मार्क्स नको असतील तर हे करा

लव्ह मॅरेज की अरेंज्ड मॅरेज काय योग्य आहे? जाणून घ्या

नीलकेतू आणि तेनालीरामची गोष्ट

नवरात्री स्पेशल: कांदा-लसूणशिवाय बनवा स्वादिष्ट ग्रेव्ही

Navratri Special Recipe: वरईचे ढोकळे

Show comments