Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

माझे काव्य काळ्या मातीशी निगडीत- महानोर

संदीप पारोळेकर
कविवर्य ना. धों. महानोर यांना यंदाचा प्रतिष्ठेचा 'जनस्थान पुरस्कार' जाहीर झाला आहे. कुसुमाग्रजांच्या जयंतीदिनी नाशिकला हा पुरस्कार दिला जाणार आहे. मराठी साहित्य क्षेत्रात विशेष कामगिरी करणार्‍या आणि आपल्या साहित्यातून संपूर्ण महाराष्ट्रातील सांस्कृतिक, सामाजिक जीवनावर ठसा उमटवणार्‍या साहित्यिकाला नाशिक येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानाच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो. यानिमित्ताने महानोर यांच्याशी साधलेला संवाद...

प्रश्न- एका कवीपलीकडचे महानोर कसे आहेत?
प्रत्येकाच्या बालपणीचे दिवस मंतरलेले असतात आणि त्याला मी कसा अपवाद ठरणार! माझे बालपण जामनेर तालुक्यातील पळासखेड या छोट्याशा गावी गेले. आता ही मला तेथेच रहायला आवडते. 'जनस्थान पुरस्कार' जाहीर झाला तेव्हा मी व माझा मोठा मुलगा डॉ. बाळासाहेब आम्ही आमच्या शेतात होतो.

शाळेत असताना अभ्यासासोबत मला निसर्गात फिरायला, खेळायला आवडायचे. नाटक, तमाशा आमच्या गावात आला म्हणजे घरच्यांच्या अपरोक्ष सवंगड्यांसह मी ते बघायला जायचो. क्रिकेट हा खेळ जसा प्रसिध्द झाला आहे तसा त्या काळी विटी दांडूला महत्त्व होते. कदाचित क्रिकेटचे ते पहिले रूप असावेसे वाटते. कुस्तीचे फडही रंगायचे. चित्रपटही बघायचो. माझे आवडते कलाकार म्हणजे भगवानदा. त्यांचा चित्रपट लागला म्हणजे तो मी पाहिला पाहिजेच, हे जणू सुत्रच होऊन बसले होते. महाविद्यालयात असताना मी हॉलीबॉल संघाचा कर्णधारपदही भूषवले आहे.

प्रश्न- कवितेशी नाते कधी आणि कसे जडले?
मला फिरायला आवडते आणि तेही निसर्गाच्या सानिध्यात. कविता त्यातूनच स्फुरत गेली. वयाच्या 15 वर्षी काव्य प्रवासाला प्रारंभ केला. साडेचार दशकात कुठेही न थांबता हा प्रवास आजही सुरूच आहे. खेड्याशी, तिथल्या काळ्या मातीशी, लोककलेशी, संस्कृतीशी माझे नाते जुळले आहे. त्यामुळे तिथल्या नागरिकांचे सुख-दु:ख मी जवळून पाहिले. माझ्या लिखाणातूनही हे जीवन अभिव्यक्त झाले आहे. माझ्यासारख्या खेड्यातील कवीच्या लेखनाची नोंद घेण्यात आली, हा माझ्यासह माझ्या खेड्यातील, माझ्या खान्देशातील नागरिकांचा सन्मान आहे. वाचकांनी माझ्या साहित्याला स्वीकार केला, प्रेम दिले हीच माझ्या साहित्य सेवेची पावती आहे, असे मला वाटते.

प्रश्न- तुमच्या कवितेचे पहिले कौतुक कुणी केले?
इचलकरंजी येथे डिसेंबर 19974 ला साहित्य संमेलन भरले होते. तेथे मी काव्यसंमेलनात भाग घेतला होता. तेच संमेलन माझ्या कारकिर्दीत मैलाचा दगड ठरले. संमेलनाचे अध्यक्ष पु.ल. देशपांडे होते. त्यांनी मला ऐकले. दुसर्‍या सत्रातही त्यांनी माझ्या कविता पुन्हा एकदा ऐकल्या. वाचल्या. त्यांनी मला सांगितले- 'तुझी कविता दोनशे ते तीनशे वर्ष रसिकांमध्ये जगणारी आहे', या त्यांच्या वाक्याने मी प्रभावीत झालो. त्यानंतर 'गणगवळण', 'भुपाळी' यांच्या माध्यमातून माझ्याकडून त्यांनी साहित्याची आणखी सेवा करून घेतली.

प्रश्न- जनस्थान पुरस्काराविषयी काही सांगाल?
' जनस्थान पुरस्कार' जाहीर होणे ही नूतन वर्षाच्या सुरवातीलाच माझ्या आयुष्यात घडलेली आनंददायी घटना आहे. याआधी माडगूळकर, श्री. ना. पेंडसे, विजय तेंडूलकर, विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर, इंदिरा संत या साहित्य पंडितांना सन्मान मिळालेला आहे. यांच्या पंक्तीत बसवून 45 वर्षे साहित्याची केलेल्या साधनेची 'जनस्थान' पुरस्काराच्या रूपात तात्यांकडून (कुसुमाग्रज) मिळालेली शाबासकी आहे. समाजातील शेवटच्या घटकाची जाणीव ठेऊन लेखन करणार्‍या साहित्यिकाला हा पुरस्कार दिला जातो, असे मला निवडकर्त्यांकडून कळाले. माझ्या काव्यातील अनुभव, प्रतिभाशक्ती, शब्द, लय, ताल हे महाराष्ट्रातील काळ्या मातीशी निगडीत आहे. निसर्ग, शेती, माणसाच्या जीवनातील सुख-दु:खे, शेतकरी जीवन काव्य रसिकाला आनंद देणारी आहेत एवढेच नव्हे तर ग्रामीण महाराष्ट्राची स्पंदने माझ्या कवितेतून अभिव्यक्त झाली असल्याने माझी निवड झाली, असे मला वाटते.

प्रश्न- कवितेसोबत मराठी चित्रपटांची गाणीही लिहिलीत त्याविषयी काही सांगा?
' रानातल्या कविता' हा माझा पहिला कवितासंग्रह 1967 साली रसिकांसमोर आला. कवितेला चाल कशी देता येईल, असा प्रयोग मी करत असतो. 1970 मध्ये 'वही' या संग्रहात आलेल्या लावण्या रसिकाना मंत्रमुग्ध करणार्‍या ठरल्या. मग पुढे मला गीतलेखनासाठीही बोलावले गेले. 'जैत रे जैत' व 'विदुषक' या मराठी चित्रपटातील गीते मी लिहिली. या काळात कविता लेखनही सुरूच होते. 'पावसाळी कविता', 'प्रार्थना', 'दयाघना', 'पक्षांचे लक्ष थवे', 'अजिंठा', 'पानझड', 'तिची कहाणी', 'पळासखेडची गाणी', 'पुन्हा कविता', 'पुन्हा एकदा कविता', असे माझे काव्यसंग्रह 1945 ते 80 च्या दरम्यान रसिकांसमोर आले. 'गांधारी' ही कादंबरी 'गपसप' व 'गावाकडल्या गोष्टी' हे लोककथा संग्रह प्रकाशित झाले. 'ऐसी कळवळ्याचिया जाती' या व्यक्ती चित्रात्मक ललितलेख संग्रहात यशवंतराव चव्हाण यांचे मौलिक विचार आले आहेत.

प्रश्न- नवोदित कवींना कोणता संदेश द्याल?
नवोदितांनी त्यांच्या लेखणात सातत्य ठेवले पाहिजे. आपले साहित्य आपणच स्वत: एकदा नाही, दोनदा नाही तर शंभर वेळा पडताळून पाहिले पाहिजे. त्यात वेगळे प्रयोग केले पाहिजे. काही कविता लिहून झाल्या म्हणजे प्रकाशित करण्याच्या नादात पडू नये.

चंद्रपुरात 1500 रुपये चोरी करण्याचा आरोपावरून एका व्यक्तीची हत्या, आरोपीला अटक

बारामतीत EVM स्ट्राँग रुमचा सीसीटीव्ही कॅमेरा 45 मिनिटे बंद असल्याचा शरद पवार गटाचा आरोप

मतदाराला आमदाराने कानशिलात लगावली, व्हिडीओ व्हायरल!

GT vs KKR Playing 11: गुजरातला प्लेऑफ मध्ये जाण्यासाठी केकेआरला पराभूत करण्याचे प्रयत्न, प्लेइंग 11 जाणून घ्या

गडचिरोलीत नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक, तीन नक्षलवादी ठार, दोन महिलांचाही समावेश

या 5 खोट्यांमुळे नाती मजबूत होतील

Cucumber Mint Detox Drink काकडी-पुदीना ड्रिंक, विषाक्त पदार्थ शरीराच्या बाहेर काढण्यास मदत होईल

Instant Noodles Side Effects इंस्टंट नूडल्स खाल्ल्याने 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, संपूर्ण कुटुंब आजारी

दहा नियमांचे पालन केल्यास होत नाही गंभीर आजार

Perfect Eyeliner या टिप्स आणि ट्रिक्सच्या मदतीने परफेक्ट आयलायनर लावा

Show comments