Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोरोना तिसरी लाट: डॉक्टरांना बूस्टर डोस देण्यात उशीर झालाय का?

Webdunia
शुक्रवार, 7 जानेवारी 2022 (23:18 IST)
महाराष्ट्रातल्या सरकारी रुग्णालयातील 300 हून अधिक निवासी डॉक्टरांना कोरोनाची लागण झालीये. तर खासगी रुग्णालयांतही परिस्थिती फारशी वेगळी नाही.
रुग्णसंख्येत भरमसाठ वाढ झाल्यामुळे त्यांच्या संपर्कात येणारे डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी कोरोनाच्या विळख्यात सापडत आहेत.
मुंबई महापालिकेच्या सायन रुग्णालयातील निवासी डॉक्टर धनराज गित्ते सांगतात, "नवीन व्हेरियंटचा संसर्ग फक्त एका दिवसात होतोय." डॉ. गित्ते यांनाही तिसऱ्या लाटेत कोरोनाची लागण झाली होती.
कोरोनाची तिसरी लाट त्सुनामीच्या वेगाने पसरतेय. मोठ्या संख्येने डॉक्टर कोव्हिड पॅाझिटिव्ह होत असताना बूस्टर डोस देण्यात उशीर झाला का? डॉक्टर आजारी का पडत आहेत? हे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
 
300 पेक्षा जास्त निवासी डॉक्टर कोव्हिड पॅाझिटिव्ह
महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट डिसेंबरच्या अखेरीस पसरण्यास सुरुवात झाली. सरकारी असो किंवा खासगी, रुग्णालयात रुग्णांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली.
मुंबईत अत्यंत संसर्गजन्य अशा ओमिक्रॅानच्या लाटेचा थेट परिणाम आरोग्य कर्मचाऱ्यांवर झालेला पहायला मिळतोय.
पण फक्त मुंबईत नाही, तर राज्यातील इतर वैद्यकीय महाविद्यालयांमध्येही हा आकडा हळूहळू वाढू लागलाय.
डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनासंसर्ग होण्याची प्रमुख 4 कारणं तज्ज्ञ सांगतात.
रुग्णसंख्येत होणारी भरमसाठ वाढ, आरोग्य कर्मचाऱ्यांचा थेट संपर्क.
हॉस्टेलमध्ये एकाच रूममध्ये दोन-तीन निवासी डॉक्टर राहात असल्याने संपर्कातून पसरणारा संसर्ग.
लस घेतल्यानंतर नऊ ते दहा महिन्यांचा उलटून गेलेला कालावधी. त्यामुळे कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती.
पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या तुलनेत कमी घेतली जाणारी काळजी.
निवासी डॅाक्टरांची संघटना मार्डचे अध्यक्ष डॉ. अविनाश दहीफळे बीबीसीशी बोलताना म्हणाले, "कोरोना संसर्ग झपाट्याने पसरतोय. मुंबईत सामान्य रुग्णांची संख्या वाढतेय. त्याचसोबत डॉक्टरांचं पॅाझिटिव्ह येण्याचं प्रमाणही वाढलंय."
पॉझिटिव्ह आलेल्या निवासी डॉक्टरांना रुग्णालयात आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलंय.
 
'एकाच दिवसात संपर्कातील 5 डॉक्टरांना संसर्ग'
सेंट्रल मार्डचे माजी सचिव डॉ. धनराज गित्ते मुंबई महापालिकेच्या सायन रुग्णालयात कार्यरत आहेत. 31 डिसेंबरला त्यांना कोरोनाची लक्षणं आढळून आली.
अंगात थोडा ताप होता आणि घसा खवखवत होता, डॉ. धनराज सांगतात. त्यांनी तात्काळ कोरोना चाचणी केली आणि ते पॉझिटिव्ह असल्याचं स्पष्ट झालं.
ते पुढे सांगतात, "बरं नसताना माझ्या संपर्कात पाच डॉक्टर आले होते. दुसऱ्याच दिवशी सर्वांना कोरोनाची लक्षणं दिसून आली. एका दिवसातच सर्व पॉझिटिव्ह झाले होते."
"यापूर्वी कोरोना बाधितांच्या संपर्कात आल्यानंतर पाच, सहा दिवसांनी लक्षणं येत होती. पण या नवीन व्हायरसमुळे संसर्ग एकाच दिवसात पसरतोय," ते म्हणतात.
तज्ज्ञांच्या मते, ओमिक्रॅानची संसर्ग क्षमता पाच पटींनी जास्त आहे. त्यामुळे मुंबईत हा संसर्ग झपाट्याने पसरतोय.
डॉ. गित्ते यांच्यावर तात्काळ सायन रुग्णालयात उपचार झाले. ते आता कोरोनातून रिकव्हर झालेत. येत्या दोन दिवसात ते पुन्हा कामावर रूजू होणार आहेत.
ते पुढे म्हणाले, "25 डिसेंबरच्या आधी एकही रुग्ण नव्हता. पण मुंबईत संसर्ग वाढू लागल्यानंतर 27-28 डिसेंबरपासून सर्दी आणि तापामुळे येणारे रुग्ण खूप वाढले. आताही मोठ्या संख्येने रुग्ण येत आहेत."
त्यामुळे रुग्णांनी मास्क घालावा, हाच एक उपाय असल्याचं ते सांगतात.
 
डॉक्टरांना बूस्टर डोस देण्यास उशीर झाला?
देशभरातील डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आणि पहिल्या फळीतील कर्मचाऱ्यांना जानेवारी 2021 पासून कोरोनाविरोधी लस देणं सुरू झालं.
बहुतांश आरोग्य कर्मचाऱ्यांना लशीचे दोन डोस घेऊन आता नऊ-दहा महिने झालेत. तज्ज्ञ म्हणतात, लशीचा प्रभाव कमी झाल्याने रोगप्रतिकारशक्ती कमी झाली असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
इंडियन मेडिकल असोसिएशनचे सदस्य डॉ. शिवकुमार उत्तुरे सांगतात, "जगभरातील संशोधनात समोर आलंय की सहा-आठ महिन्यात शरीरातील अॅन्टीबॅाडीज कमी होऊ लागतात. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांना लस घेण्याची गरज आहे."
तिसऱ्या लाटेची शक्यता पाहता नोव्हेंबर महिन्यापासूनच देशभरातील डॉक्टरांनी केंद्राकडे बूस्टर डोस देण्याची मागणी लावून धरली होती. अखेर केंद्राने 10 जानेवारी 2022 पासून बूस्टर डोस देण्यास मंजूरी दिली आहे.
कोरोनाची तिसरी लाट भयंकर वेगाने पसरतेय. अशा परिस्थितीत डॉक्टरांना बूस्टर देण्यास उशीर झालाय? हा प्रश्न उपस्थित होतो.
याबाबत बोलताना लीलावती रुग्णालयाचे छातीविकारतज्ज्ञ डॉ. जलील पारकर म्हणाले, "आरोग्य कर्मचाऱ्यांना बूस्टर डोस आधीच देण्यात आला पाहिजे होता. पण अजूनही उशीर झालेला नाही.
"डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी व्हायरसला एक्स्पोज झाले आहेत. हा नवीन व्हेरियंट रोगप्रतिकारशक्तीला चकवणारा आहे. त्यामुळे लवकर बूस्टरची मागणी होऊ लागलीये."
तर डॉ. उत्तुरे म्हणाले, "शास्त्रीय कारणं लक्षात घेतली तर माझं मत आहे की, आपण बूस्टर डोस देण्यात थोडा उशीर केलाय."
फक्त मुंबईत किंवा महाराष्ट्रातच नाही तर देशभरातील खासगी रुग्णालयातील डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह येऊ लागले आहेत.
कोलकात्याच्या जी. डी. हॅास्पिटल आणि डायबेटीक इन्स्टिट्यूटचे इन्डोक्रोनोलॅाजिस्ट डॉ. ए. के. सिंह सांगतात, "हे बरोबर आहे की आरोग्य कर्मचारी, पहिल्या फळीतील कर्मचारी आणि सहव्याधी असलेल्यांना बूस्टर डोस देण्यात खूप उशीर झालाय. हेच गेल्या महिन्यात करण्यासारखं होतं. बहुतांश आरोग्य कर्मचारी कोव्हिडबाधित झालेत. काही दिवसांपूर्वी कोरोना झाला असेल तर आता बूस्टर घेऊन काय साध्य होणार?"
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या कॉलेज ऑफ जनरल प्रॅक्टिशनर्सचे राष्ट्रीय अधिष्ठाता डॉ. अविनाश भोंडवे सांगतात,"बूस्टर देण्यासाठी अक्ष्यम्य दिरंगाई झालीये."
भारत सरकारने लशीचा दुसरा डोस झाल्यानंतर नऊ महिने झाले असतील तरच बूस्टर मिळणार आहे, असं स्पष्ट केलंय. तर अमेरिकेत सहा महिन्यांनी बूस्टर डोस घ्यावा असं सांगण्यात आलंय.
डॉ. अविनाश भोंडवे पुढे म्हणाले, "नऊ महिन्यांनी शरीरातील अॅन्टीबॅाडीज संपल्यासारख्या असतात. आपल्याकडे 11 महिन्यांनी बूस्टर दिला जातोय."
आता जरी बूस्टर दिला तरी अॅन्टीबॅाडीज तयार होण्यासाठी काही दिवस लागतील. त्यामुळे आरोग्य कर्मचारी पॉझिटिव्ह येण्याचं प्रमाण वाढत जाईल, असं तज्ज्ञ सांगतात.
 
लसीकरणानंतर काळानुसार अॅन्टीबॅाडीज कमी झाल्या?
इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च भुवनेश्वरच्या संशोधकांनी लस घेतल्यानंतर शरीरात किती काळ अॅन्टीबॅाडीज राहतात यावर अभ्यास केला होता.
हा अभ्यास लस घेतलेल्या 614 आरोग्य कर्मचाऱ्यांवर करण्यात आला.
या अभ्यासाचे प्रमुख डॉक्टर भट्टाचार्य संशोधनात लिहितात, "कोव्हॅक्सिन घेतलेल्यांमध्ये दोन महिन्यांनी आणि कोव्हिशिल्ड घेतलेल्यांमध्ये लशीचे दोन डोस घेतल्यानंतर चार महिन्यांनी अॅन्टीबॅाडीज कमी झालेल्या आढळून आल्या."
यूके आणि अमेरिकेतही कालांतराने अॅन्टीबॅाडीज कमी झालेल्या आढळून आल्या होत्या.
डॉ. भोंडवे पुढे म्हणाले, "पुण्यातही काही महिन्यापूर्वी आम्ही IMA च्या डॉक्टरांमध्ये संशोधन केलं होतं. त्यात अनेकांच्या शरीरात अॅन्टीबॅाडीज कमी होत्या. यापैकी अनेकांना कोव्हिडही झाला होता. याचा अर्थ लशीचे पहिले दोन्ही डोस आता निष्प्रभ झाले आहेत."

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

LIVE: विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत मोठा घोटाळा, नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले

विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत मोठा घोटाळा, नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले

धरणात बुडून आई आणि मुलीचा वेदनादायक मृत्यू

सांगली जिल्ह्यात कार कृष्णा नदीत पडून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने पराभव टाळला,लक्ष्यही उपांत्यपूर्व फेरीत

पुढील लेख