Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ, काय आहेत कारणं?

Webdunia
मंगळवार, 21 मार्च 2023 (12:14 IST)
राज्यभरात H3N2 या नवीन व्हायरसचे रुग्ण वाढत असतानाच आता कोव्हिड रुग्णसंख्याही गेल्या आठवड्याच्या तुलनेत अचानक 50 टक्क्यांनी वाढल्याचं दिसतं.तर मुंबईतही गेल्या दोन दिवसात कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट झाली असून अ‍ॅक्टिव्ह रुग्णही वेगाने वाढत आहेत.
भारतातही दररोज नोंदवल्या जाणाऱ्या कोरोना रुग्णसंख्येत सहा पटींनी वाढ झाली आहे. यात महाराष्ट्र, केरळ, गुजरात, तामिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक या राज्यांत रुग्ण वाढल्याचं केंद्र सरकारने सांगितलं असून या राज्यांना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने विशेष काळजी घेण्याची सूचना केली आहे.
 
मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डाॅ. मंगला गोमरे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं,
 
"कोरोना केसेस वाढतायत हे बरोबर आहे. पण आता पुन्हा कमी होतील. अचानक केसेस वाढतात मग कमी होतात असं का होत आहे याचं कारण आता लगेच तरी सांगता येणार नाही. पण हवामान बदल झाल्यावर आणि तापमान वाढत असताना व्हायरल केसेसमध्ये वाढ होतेच. आता कोव्हिडच्या रुग्णसंख्येतही यामुळे वाढ होत आहे का, असं स्पष्ट सांगता येणार नाही."
 
तर कोव्हिड विषाणूचा कोणतीही नवा व्हेरिएंट आढळला नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
 
19 मार्च 2023 रोजी राज्यत 236 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली तर सध्या राज्यात कोव्हिडचे 1309 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
 
कोव्हिडचा प्रसार कसा होतोय?
राज्यात आठ दिवसांपूर्वी म्हणजेच अगदी 13 मार्च 2023 रोजी पर्यंत दैनंदिन साधारण 50 ते 100 कोरोनाच्या नवीन रुग्णांचं निदान होत होतं. परंतु गेल्या काही दिवसांत राज्यात कोव्हिडचा प्रसार वेगाने झाल्याचं दिसतं.
 
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 13 मार्च 2023 पर्यंत राज्यात 577 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण होते. आता हीच रुग्णसंख्या 1309 वर पोहोचली आहे.
 
तर 12 मार्च रोजी राज्यात 101 नवीन रुग्णांची नोंद झाली होती तर 13 मार्च रोजी 61 नवीन रुग्णांची नोंद झाली होती. परंतु आठवड्याभरात ही रुग्णसंख्या वाढली आणि 19 मार्च रोजी 24 तासात 236 नवीन रुग्ण आढळले.
 
दरम्यान, यात रुग्णालयात दाखल व्हावं राहणाऱ्याा रुग्णांची संख्या कमी असून मृत्यूदर 1.82% एवढा आहे.
 
खरंतर नोव्हेंबर 2022 नंतर 13 मार्चला पहिल्यांदाच 24 तासांत 100 नवीन रुग्णांची नोंद झाली होती. यानंतर रुग्णसंख्या वाढत गेल्याचं दिसतं.
 
कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण?
आरोग्य विभागाच्या सर्वेक्षण अहवालानुसार, सद्यपरिस्थितीत पुणे, मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात कोव्हिडचे सर्वाधिक रुग्ण आहेत.
 
राज्यातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांच्या आकडेवारीनुसार, 19 मार्च 2023 रोजी पुण्यात 381, मुंबईत 279 तर ठाणे जिल्ह्यात 228 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
 
यानंतर नाशिक, अहमदनगर, सोलापूर या जिल्ह्यांमध्येही 40 हून अधिक रुग्ण आहेत.
 
अगदी गेल्या आठवड्यापर्यंत राज्यात अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या यापेक्षा 50 टक्के कमी होती. म्हणजेच सात दिवसात राज्यातील अ‍ॅक्टिव्ह रुग्ण दुपटीने वाढले आहेत.
 
13 मार्च 2023 रोजी पुण्यात 179, मुंबईत 122 तर ठाण्यात 93 रुग्ण होते.
 
मुंबईत रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे का?
इतर जिल्ह्यांच्या तुलनेत मुंबई आणि ठाण्यात गेल्या काही दिवसात कोव्हिडचे रुग्ण वेगाने वाढत आहेत.
 
मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन दिवसांत मुंबईत कोव्हिडची लागण झालेले रुग्ण वाढले आहेत.
 
शुक्रवारी (17 मार्च) कोव्हिड बाधित नवीन रुग्णांची संख्या 36 होती. तर शनिवारी (18 मार्च) मुंबईत 71 नवीन कोव्हिड रुग्ण आढळले. यानंतर रविवारीही 51 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे मुंबईत अचानक कोव्हिड विषाणूचा प्रसार वेगाने होतोय.
 
यापैकी 50% रुग्णांना कोव्हिडची लक्षणं नाहीत, असंही आरोग्य अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे.
 
महाराष्ट्रात अचानक कोव्हिड पुन्हा का पसरतोय हे सुद्धा जाणून घेऊया.
 
रुग्णसंख्या वाढीचं कारण काय?
केंद्राने राज्यांना स्थानिक पातळीवर रुग्ण वाढत असून ते आटोक्यात आणण्यासाठी ताबडतोब प्रयत्न करावेत असे निर्देश दिले आहेत.
 
आरोग्य विभागातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, "तापमान वाढलं की व्हायरस पसरण्यास हवामान अनुकूल असतं. त्यामुळे फेब्रुवारी, मार्च, एप्रिल या काळात व्हायरसचे रुग्ण अधिक असतात. म्हणूनच ताप, सर्दी, खोकल्याच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ आहे. कोव्हिडचा प्रसार थोडा वाढल्याचंही हेच कारण असू शकतं."
 
कोव्हिड रुग्णांमध्ये वाढ झाल्याने कोव्हिडच्या नवीन व्हेरिएंटचे रुग्ण आढळत आहेत का याचीही पडताळणी आरोग्य विभागाकडून केली जात आहे.
 
"कोव्हिड विषाणूमध्ये नवीन व्हेरिएंट आहे का याची माहिती आम्ही घेत आहोत. अद्याप त्याचे रिपोर्ट्स आलेले नाहीत. तसंच आम्ही राज्यात टेस्टिंग वाढवत आहोत. काॅन्टॅक ट्रेसिंग शक्य तितक्या वेगाने करत आहोत," असंही आरोग्य विभागाने सांगितलं.
 
मुंबई, पुणे, नागपूर या आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांचं सर्वेक्षण केलं जात आहे. तसंच प्रवाशांचं थर्मल स्क्रीनिंग केलं जात असून 2 टक्के प्रवाशांचे नमुने कोव्हिड चाचणीसाठी घेतले जात आहेत.
 
19 मार्च रोजीच्या आरोग्य विभागाच्या सर्वेक्षणानुसार, विमानतळावरील 32 हजार 205 प्रवाशांची आरटी पीसीआर चाचणी करण्यात आली. यापैकी 41 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं.
काय काळजी घ्याल?
ताप, खोकला, घशात खवखवणे, तोंडाची चव जाणे, वास न येणे ही कोव्हिडची लक्षणं आतापर्यंत आपल्या सर्वांना माहिती आहेत. त्यामुळे यापैकी कोणतेही लक्षण दिसल्यास किंवा थकवा जाणवत असल्यास डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधं घ्या, असं आरोग्य विभागाने स्पष्ट केलं आहे.
 
राज्यात हवामान बदलामुळे आणि व्हायरसचा प्रसार होत असल्याने ताप, सर्दी, खोकला ही लक्षणं मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहेत, असंही तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
 
राज्यात इन्फ्लूएन्झाचे रुग्णही वाढत आहेत. कोव्हिड आणि इन्फ्लूएन्झा दोन्ही आजारांच्यादृष्टीने नागरिकांनी काळजी घ्यावी, असंही आवाहन करण्यात आलं आहे.
 
घरच्या घरी उपचार न करता अगदी सामान्य खोकला, सर्दी आहे असं वाटलं तरी डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घ्यावेत.
 
तसंच लसीकरणावरही भर दिला जाणार आहे. कोव्हिड प्रतिबंधात्मक दोन लशी घेतल्यानंतर बुस्टर डोस ज्यांनी घेतला नाही त्यांनी आता हा प्रीकाॅशनरी डोस म्हणजेच बुस्टर डोस घ्यावा, असंही आवाहन आरोग्य विभागाने केलं आहे.
 
इंडियन मेडिकल असोसिएशनचे उपाध्यक्ष डाॅ. शिवकुमार उत्तुरे सांगतात, "पूर्वी आपण म्हणत होतो की कोव्हिड हा थंडीत वेगाने पसरतो पण आता तर तापमान वाढलं आहे. उन्हाळा सुरू झालाय. तरीही कोव्हिडच्या केसेस वाढत आहेत. दुसरीकडे H3N2 हा सुद्धा व्हायरल आजार आहे. दोन्ही आजार हे ड्राॅपलेटमुळे पसरतात, त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यायला हवी. केसेस वाढल्यावर सरकार मार्गदर्शन सूचना जारी करेल. परंतु यासाठी वाट न पाहता लोकांनीच खबरदारी घ्यायला सुरुवात करावी."
 
ते पुढे सांगतात, आपल्याला आतापर्यंत माहिती आहे की कोव्हिड कसा पसरतो आणि किती वेगाने संसर्ग होऊ शकतो. यामुळे गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरायला हरकत नाही. विशेषतः वृद्ध नागरिकांनी मास्क वापरावा. तसंच ज्यांना डायबेटिस आणि हार्ट प्राॅब्लेम आहेत त्यांनी अधिक सावध रहायला हवं.
 
"पूर्वीप्रमाणे आता काॅन्टॅक्ट ट्रेसिंग तेवढ्या प्रमाणात होत नाही. ताप, खोकला असल्यास लगेच कोणी घरी थांबत नाही किंवा विलगीकरणातही राहत नाही यामुळेही केसेस वाढत आहेत. गरजेचं नसल्यास गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळलं तर H3N2 आणि कोव्हिड दोन्हीपासून संरक्षण होईल. तसंच मास्क पुन्हा वापरण्यास सुरुवात करायला हवी," असंही ते सांगतात.
 
Published By- Priya Dixit 
 

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

पुढील लेख