Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोरोनातून बरं झालेल्या महिलांना मासिक पाळीचा जास्त त्रास का होतोय?

Webdunia
शुक्रवार, 5 मार्च 2021 (16:43 IST)
मयांक भागवत

"कोरोनामुक्त झाल्यानंतर मासिक पाळी खूप आधी आली. पाळीचा पॅटर्न पूर्णत: बदलला. खूप त्रास झाला त्या दिवसात. कोरोनावर मात केल्यानंतर पाळीचे ते काही महिने ओटी-पोट कवटाळून रहावं लागत होतं."
 
मुंबईकर रश्मी पुराणिक यांचे शब्द ऐकून कोणत्याही महिलेच्या अंगावर काटा येईल. रश्मी, यांनी कोरोनाविरोधात यशस्वी लढा दिलाय. कोरोनाला हरवून पुन्हा नव्या जोमाने कामाला सुरूवात केली.
 
पण, कोरोनानंतरची पहिली पाळी त्या अजूनही विसरलेल्या नाहीत. कोरोनामुक्त झाल्यांनंतर आलेल्या पहिल्या पाळीचा प्रत्येक दिवस त्यांना आठवतोय.
 
"ओटीपोट कवटाळून राहावं लागत होतं"
राजकीय पत्रकार रश्मी पुराणिक यांना गेल्यावर्षी (2020) जून महिन्यात कोव्हिड-19 चा संसर्ग झाला होता.
 
संसर्गावर मात केल्यानंतर त्यांची पहिली पाळी आली. पण, ते दिवस सामान्य दिवसांपेक्षा वेगळे होते, असं त्या सांगतात.
 
रश्मी पुढे म्हणतात, "प्रत्येक महिलेच्या पाळीचा एक पॅटर्न असतो. पण, कोव्हिडनंतर डेट खूप आधी आली. कोव्हिडआधी पाळीच्या दिवसात 1 दिवस जास्त रक्तस्राव व्हायचा. आता रक्तस्राव दोन ते अडीच दिवस होतोय."
 
रश्मी यांना पाळीत बदल होण्याचा त्रास डिसेंबर महिन्यापर्यंत जाणवत होता.
"कोव्हिडमुक्त झाल्यानंतर पाळीत होणारा त्रास खूप वाढलाय. 2-3 महिने असे आठवतात जेव्हा, खूप रक्त गेल्याने उभं रहाणं सोडाच, धड बसताही येत नव्हतं, ओटीपोट कवटाळून रहावं लागत होतं." असं त्या पुढे सांगतात.
 
मासिक पाळीत झालेला बदल हा कोव्हिड-19 चा पोस्ट इम्पॅक्ट असल्याचं त्यांना जाणवत आहे. "कोरोना नाहीये, पण त्याचे साइडइफेक्ट जाणवत आहेत. शारीरीक आणि मानसिकदृष्ट्या हे त्रासदायक आहे," असं रश्मी पुढे म्हणतात.
 
"माझी पाळी भयानक होती"
कोव्हिड-19 संसर्ग बरा झाल्यानंतर मासिक पाळीत बदल जाणवलेल्या रश्मी एकट्या नाहीत.
 
नाव न घेण्याच्या अटीवर एक महिला सरकारी अधिकारी सांगतात, "कोरोनामुक्त झाल्यानंतर पहिली पाळी भयानक होती. अंगात अजिबात त्राण नव्हतं. चक्कर येत होती. रक्तस्राव खूप जास्त झाला होता. कारण, काही कळत नव्हतं."
 
"पण, पाळीच्या सामान्य दिवसांपेक्षा यावेळी, शरीरात काहीतरी बदल झाल्याचं जाणवत होतं," असं त्या पुढे बोलताना सांगतात.
सुनो इंडिया वेबसाईटच्या संपादक पद्म प्रिया डी यांनी ट्विटरवर कोव्हिड-19 नंतर मासिक पाळीत त्यांना आलेले अनुभव शेअर केले आहेत.
 
कोव्हिडमुळे बदलू शकतं मासिक पाळीचं चक्र?
महाराष्ट्रात कोरोनारुग्णांच्या एकूण संख्येपैकी जवळपास 40 टक्के महिला आहेत. त्यामुळे स्त्रीरोगतज्ज्ञांकडून आम्ही हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला की, कोव्हिडमुळे महिलांच मासिक पाळीचं चक्र बदलतं का?
 
याबाबत बीबीसीशी बोलताना फोर्टिस हॉस्पिटलच्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सोनल कुमटा सांगतात, "कोरोनामुक्त झालेल्या महिलांमध्ये पाळी अनियमित येणं, पाळी येण्यास उशिरा होणं, रक्तस्राव होण्याचा पॅटर्न बदलणं, खूप जास्त रक्तस्राव होणं अशा तक्रारी आढळून आल्या आहेत."
 
तज्ज्ञांच्या मते, कोरोनासंसर्गातून मुक्त झालेल्या रुग्णांमध्ये इतर वैद्यकीय समस्या दिसून येतात. त्यामुळे पाळीत बदल कोव्हिडमुळे झाला का? याबाबत ठोस सांगता येणार नाही.
याबाबत बीबीसीशी बोलताना सर जे.जे रुग्णालयाच्या स्त्रीरोग विभागाचे माजी प्रमुख डॉ. अशोक आनंद सांगतात, "कोव्हिडनंतर महिलांच्या अंडाशयाला सूज येण्याच्या माहितीची कागदोपत्री नोंद आहे. या केसेस नोंदवण्यात आल्या आहेत."
 
"कोरोना संसर्गानंतर अंडाशयाला सूज असेल तर, मासिक पाळी दरम्यान त्रास किंवा बदल होण्याची शक्यता असते" असं डॉ. आनंद पुढे सांगतात.
 
"महिलेला पाळी आलीच नाही"
फोर्टिस रुग्णालयाच्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सोनल कुमटा कोरोना संसर्गातून मुक्त झालेल्या एका महिला रुग्णाची माहिती देताना सांगतात.
 
"माझ्याकडे 41 वर्षीय महिला आली. तिला कोरोनाचा संसर्ग झाला होता. कोव्हिडमुळे झालेल्या फुफ्फुसांच्या समस्येतून ती बरी होत असतानाच, तिला 'अॅमेनोरिहा' (Amenorrhea) म्हणजेच, पाळी येत नसल्याचं निदान झालं. पूर्णत: कोरोनामुक्त झाल्यानंतर तिला पुन्हा पाळी येऊ लागली."
 
'अॅमेनोरिहा' (Amenorrhea) म्हणजे काय?
वेब-एमडीच्या माहितीनुसार, 'अॅमेनोरिहा' म्हणजे पाळी न येणं.
एखाद्या महिलेला हा त्रास असेल तर तिला पाळी येणार नाही. हा आजार नाही. पण, डॉक्टरांना याबद्दल माहिती दिली पाहिजे.
 
कोरोना आणि मासिक पाळीचा संबंध आहे?
तज्ज्ञ सांगतात, कोरोनाचा मासिक पाळीवर थेट परिणाम झाल्याचा ठोस पुरावा नाही.
 
हिरानंदानी रुग्णालयाच्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. मंजिरी मेहता म्हणतात, "मासिक पाळीत झालेल्या बदलाचा थेट कोव्हिड-19 शी संबंध लावता येणार नाही. कोरोना संसर्गाचा मासिक पाळीवर परिणाम होतो हे दाखवणारा पुरावा अजूनही उपलब्ध नाही."
 
मुंबईतील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. कोमल चव्हाण यांच्याकडे कोरोनामुक्त झाल्यानंतर मासिक पाळीचा त्रास असल्याची तक्रार घेऊन एकही महिला आलेली नाही.
 
बीबीसीशी बोलताना त्या सांगतात, "लॉंगटर्म आजारानंतर महिलांच्या मासिक पाळीत बदल होतात. काहीमध्ये जास्त किंवा कमी रक्तस्राव होतो. पण, कोव्हिडमुक्त झाल्यानंतर मासिक पाळीत बदल किंवा त्रास झाल्याची तक्रार माझ्याकडे कोणीही केली नाहीये."
"पण, यावर अभ्यास होणं गरजेचं आहे," असं डॉ. कोमल यांचं मत आहे.
 
कोव्हिडनंतर महिलांच्या प्रजनन प्रणालीत बदल होतात?
कोरोना संसर्गात शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी होते. काहींना फुफ्फुसाचा त्रास होतो. तर, काहींमध्ये इतर वैद्यकीय समस्या निर्माण होतात.
 
"कोव्हिडनंतर रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्याने प्रजनन प्रणाली कमकुवत होण्याची शक्यता असते." असं फोर्टिस रुग्णालयाच्या डॉ. सोनल कुमटा सांगतात.
 
महिलांनी काय करावं?
स्त्रीरोगतज्ज्ञांच्या मते, महिलांनी स्वतःची काळजी घ्यायला हवी
 
योग्य आहार, व्यायाम गरजेचा आहे
शरीराला योग्यवेळी रिलॅक्स केलं पाहिजे
झोप वेळेवर हवी
जास्तवेळ बसून काम करू नये. कामातून मध्येच थोडा ब्रेक घ्यावा.
कोव्हिड-19 संसर्गानंतर शरीराची झालेली झीज हळूहळू भरून येत असते. "त्यामुळे मासिक पाळीचं चक्र हळूहळू पूर्वपदावर येईल," असं डॉ. कुमटा सांगतात.
 
लॉकडाऊनमध्ये महिलांना पाळीचा त्रास झाला का?
डॉ. मंजिरी पुढे सांगतात, "लॉकडाऊनच्या काळात पीसीओडी (पॉलिसिस्टिक ओव्हेरिअन डिसीज) असलेल्या महिलांनी व्यायाम केला नाही. वर्क फ्रॉम होम असल्याने खाण्या-पिण्याच्या वेळा बदलल्या. जंकफूड खाणं जास्त झालं. त्यामुळे वजन वाढल्याचा त्रास झाला. यामुळे महिलांना मासिक पाळीचे त्रास सुरू झाले होते."

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

सूर्यनमस्काराने शरीर मजबूत होते, जाणून घ्या योग्य पद्धत

वर्षानुवर्षे आतड्यांमध्ये साचलेली घाण साफ होईल, सकाळी उठल्याबरोबर हे पाणी प्या

28 डिसेंबर रोजी कुंभ राशीत शुक्र आणि शनीचा संयोग 2025 मध्ये चमत्कार घडवेल, 5 राशी धनवान होतील

साप्ताहिक राशीफल 23 डिसेंबर ते 29 डिसेंबर 2024

Kanya Lal Kitab Rashifal 2025: लाल किताबनुसार कन्या राशी भविष्य 2025 आणि उपाय

सर्व पहा

नवीन

राहुल गांधी यांच्या परभणी दौऱ्यावर भाजप नेते प्रवीण दरेकर यांचा काँग्रेसवर हल्लाबोल

महाराष्ट्रातील मतदार यादीतील अनियमिततेच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने दिले उत्तर

LIVE: पालघरमध्ये वनविभागाच्या अधिकाऱ्यावर लाच मागितल्याचा आरोप,गुन्हा दाखल

पालघरमध्ये वनविभागाच्या अधिकाऱ्यावर लाच मागितल्याचा आरोप,गुन्हा दाखल

मेंढरमध्ये लष्कराचे वाहन कोसळले पाच जवानांचा मृत्यू,अनेक जवान जखमी

पुढील लेख