Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

क्रिकेट वर्ल्ड कप Ind va Pak : ‘या’ कारणांमुळे भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय

Webdunia
रविवार, 15 ऑक्टोबर 2023 (12:06 IST)
ही क्रिकेट विश्वकप स्पर्धेतील सर्वात मोठी लढत समजली जात होती. विश्वचषकाचं वेळापत्रक जाहीर झाल्यापासून सर्वत्र याच लढतीची चर्चा होती.
 
जगातील सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम या सामन्यासाठी गच्च भरलं होतं. जगभरातील क्रिकेट फॅन्सनी सामन्याची तिकीटं मिळवण्यासाठी खटाटोप केला होता.
 
तिकीटं न मिळू शकलेल्या प्रत्येकाचं या लढतीमधील प्रत्येक अपडेटवर लक्ष होतं.
 
भारत विरुद्ध पाकिस्तान या दोन देशांमधील प्रत्येक क्रिकेट सामन्यापूर्वी हे असंच वातावरण असतं. हा विश्वचषकही त्याला अपवाद नव्हता.
 
दोन देशांमध्ये नियमित क्रिकेट मालिका होत नाही. फक्त आयसीसी स्पर्धेत हे संघ एकमेकांच्या समोर येतात. त्यामुळे हा स्वाभाविकच क्रिकेट विश्वातील सर्वात चर्चीत सामना असतो.
 
क्रिकेटवेड्या दोन शेजारी देशांमधील विश्वचषकाचा हा सामना अतिशय रंगतदार होईल, असं वातावरण होतं.
 
पण, प्रत्यक्षात हा अगदीच एकतर्फी सामना झाला. टीम इंडियानं सांघिक प्रयत्नाच्या जोरावर पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला.
 
वन-डे विश्वचषकातील टीम इंडियाचा पाकिस्तानवरील हा सलग आठवा विजय आहे. या विजयाची प्रमुख कारणं पाहूया
 
रोहित शर्माचं नेतृत्त्व
सामना सुरू होण्यापूर्वी झालेल्या टॉसपासून प्रत्येक बाबतीत रोहित शर्मानं प्रतिस्पर्धी टीमवर वर्चस्व गाजवलं. पाकिस्तानच्या सलामीवीरांनी सावध पण आश्वासक सुरूवात केली होती, पण त्यावेळी रोहित गडबडला नाही.
 
त्यानं माजी कर्णधार विराट कोहलीशी मैदानात चर्चा केली. मोहम्मद सिराज सुरूवातीला महाग ठरत असतानाही त्यानं सिराजवर विश्वास दाखवला. त्याच्याशी चर्चा केली.
 
सिराजने कॅप्टनचा विश्वास सार्थ ठरवत भारताला पहिलं यश मिळवून दिलं.
बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान जोडी मैदानात सेट झाली होती. त्यावेळी सिराजला पुन्हा बॉलिंग देण्याची त्याची चाल यशस्वी ठरली. सिराजनं बाबरला बाद केलं. त्यानंतर रोहितनं बुमराला गोलंदाजी देत पाकिस्तान टीमचे परतीचे दोर कापले.
 
रोहित शर्मानं यावेळी डीआरएसचा योग्य अचूक वापर केला. सौद शकील आणि हॅरीस रौफ या विकेट्स डीआरएसच्या आधारावरच मिळाल्या. रोहित शर्माची हुशार कॅप्टनसी हे विजयाचं मोठं कारण ठरलं.
 
बाबर-रिझवानचा संथ खेळ
रोहित शर्मानं आघाडीवर राहत टीम इंडियाचं नेतृत्त्व केलं. बाबर आझमनं या विश्वचषक स्पर्धेतील पहिलं अर्धशतक झळकावलं. पण, या अर्धशतकाचा त्याच्या टीमला फारसा फायदा झाला नाही.
 
बाबर आझमनं 58 बॉलमध्ये 86.20 च्या स्ट्राईक रेटनं 50 धावा केल्या. या 58 पैकी 30 बॉलवर बाबरला एकही धाव काढता आली नाही.
 
तसंच अर्धशतक होताच बाबर लगेच बाद झाला. त्यामुळे पाकिस्तानवर दडपण वाढलं.
या विश्वचषकात फॉर्मात असलेल्या मोहम्मद रिझवाननं बाबरपेक्षाही कमी म्हणजेच 71.01 च्या सरासरीनं 49 धावा केल्या.
 
पाकिस्तानची सर्वात अनुभवी जोडी मैदानात सेट झाली होती तेव्हाही आक्रमक फटकेबाजी करू शकली नाही. या दोघांनी 82 धावांची भागिदारी करण्यासाठी 103 बॉल घेतले.
 
5 ओव्हर्समध्ये फिरला सामना
पाकिस्ताननं 29 ओव्हर्समध्ये 150 धावा पूर्ण केल्या होत्या. बाबर-रिझवान ही अनुभवी जोडी मैदानात होती.
 
टीम इंडियाला 300 पेक्षा जास्त धावांचं आव्हान मिळेल असं ते चित्र होतं. त्यावेळी बाबर बाद झाला आणि संपूर्ण चित्रच बदललं.
 
बाबर बाद झाल्यानंतर पुढच्या पाच ओव्हर्समध्ये सौद शकील, इफ्तिखार अहमद, मोहम्मद रिझवान आणि शादाब खान बाद झाले. 2 बाद 155 वरुन 7 बाद 171 अशी पाकिस्तानची घसरण झाली. या सामन्याचा निकाल त्याचवेळी स्पष्ट झाला होता.
 
बुमरा -कुलदीपची भागिदारी
एखादा सामना जिंकण्यासाठी दोन फलंदाजांमधील भागिदारी इतकीच गोलंदाजीमधील भागीदारी देखील महत्त्वाची असते. भारताकडून जसप्रीत बुमरा आणि कुलदीप यादव यांनी पाकिस्तानविरुद्ध ती भागीदारी केली.
 
बुमरा आणि कुलदीप या दोघांनाही पहिल्या स्पेलमध्ये विकेट मिळाली नाही. त्यांनी फलंदाजांवर दबाव कायम ठेवला होता. दुसऱ्या स्पेलमध्ये परतल्यावर त्यांनी विकेट घेत पाकिस्तानचं कंबरडं मोडलं.
 
कुलदीपनं एकाच ओव्हरमध्ये सौद शकील आणि इफ्तिखार अहमद यांना बाद केलं. तर, जसप्रीत बुमरानं एका अप्रतिम बॉलवर रिझवानची दांडी उडवली. त्यानंतरच्या ओव्हरमध्ये शादाब खानला बाद केलं.
 
पाकिस्तानच्या डावातील मधल्या ओव्हर्समध्ये एका बाजूनं कुलदीप आणि दुसऱ्या बाजूनं बुमरानं दिलेले हे प्रत्येकी दोन धक्के टीम इंडियाच्या विजयाचं मोठं कारण आहे.
 
हिटमॅन रोहित
ऑस्ट्रेलियाविरुद्ध चेन्नईत भारताची सुरूवात 3 बाद 2 अशी धक्कादायक झाली होती.
 
पाकिस्तानविरुद्ध ती चूक होणार नाही, याची काळजी रोहितनं घेतली.
 
रोहितचा सलामीचा पार्टनर शुबमन गिल डेंग्यूमधून बरा होत पहिल्यांदाच मैदानात उतरला होता. त्यामुळे भारतीय कर्णधारावर मोठी जबाबदारी होती.
रोहितनं पहिल्याच बॉलवर चौकार लगावत खणखणीत सुरूवात केली. अफगाणिस्तान विरुद्धच्या शतकी खेळीचा फॉर्म त्यानं पाकिस्तानविरुद्धही कायम ठेवला.
 
पाकिस्तानला अकरा फलंदाजांना संपूर्ण डावात एकही षटकार मारता आला नाही. रोहितनं एकट्यानंच सहा षटकार लगावले.
 
रोहित शर्मानं 63 बॉलमध्ये 6 चौकार आणि 6 षटकारांसह 86 धावा केल्या. त्याचं शतक हुकलं, पण टीम इंडियाच्या मोठ्या विजयावर त्यानं आऊट होण्यापूर्वीच शिक्कामोर्तब केलं होतं.
 
विराट – श्रेयसची साथ
रोहित शर्माला विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी चांगली साथ दिली. रोहित आणि विराटनं दुसऱ्या विकेटसाठी 42 बॉलमध्ये 56 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली.
 
विराट 16 धावांवर बाद झाला असला तरी त्यानं ते रन सहजपणे करत त्याचा फॉर्म कायम ठेवला.
श्रेयस अय्यरनं नाबाद 53 धावा केल्या. क्रिकेट विश्वचषतकातील श्रेयसचं हे पहिलंच अर्धशतक आहे.
 
हे अर्धशतक झळकावत श्रेयसनं चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी आपण सर्वात योग्य फलंदाज असल्याचं दाखवून दिलं आहे.
 




















Published By- Priya Dixit
 
 
 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

ODI जर्सी: हरमनप्रीतने भारतीय महिला क्रिकेट संघाच्या ODI जर्सीचे अनावरण केले

5 चौकार-9 षटकार आणि स्ट्राईक रेट 300; इशान किशनची वानखेडेवर झंझावात

भारतीय क्रिकेटपटूचे पुण्यात आकस्मिक निधन, कारण ऐकून मित्रांना धक्का बसला

कर्करोग बरा करण्याचा उपाय सांगून सिद्धू अडकले , 850 कोटींचा केस दाखल

आयसीसी कसोटी क्रमवारीत बुमराह पहिल्या तर जैस्वाल दुसऱ्या क्रमांकावर, विराटनेही झेप घेतली

पुढील लेख
Show comments