Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दासबोध दशक आठवा - मायोद्भवाचा

Webdunia
समास पहिला : देवदर्शन
॥ श्रीराम ॥
श्रोतीं व्हावें सावध । विमळ ज्ञान बाळबोध ।
गुरुशिष्यांचा संवाद । अति सुगम परियेसा ॥ १ ॥
नाना शास्त्रें धांडोळितां । आयुष्य पुरेना सर्वथा ।
अंतरी संशयाची वेथा । वाढोंचि लागे ॥ २ ॥
नाना तिर्थें थोरथोरें । सृष्टिमध्यें अपारें ।
सुगमें दुर्गमें दुष्करें । पुण्यदायकें ॥ ३ ॥
ऐसीं तीर्थें सर्वहि करी । ऐसा कोण रे संसारी ।
फिरों जातां जन्मवरी । आयुष्य पुरेना ॥ ४ ॥
नाना तपें नाना दानें । नाना योग नाना साधनें ।
हें सर्वहि देवाकारणें । करिजेत आहे ॥ ५ ॥
पावावया देवाधिदेवा । बहुविध श्रम करावा ।
तेणें देव ठाईं पाडावा । हें सर्वमत ॥ ६ ॥
पावावया भगवंतातें । नाना पंथ नाना मतें ।
तया देवाचें स्वरूप तें । कैसे आहें ॥ ७ ॥
बहुत देव सृष्टीवरी । त्यांची गनना कोण करी ।
येक देव कोणेपरी । ठाईं पडेना ॥ ८ ॥
बहुविध उपासना । ज्याची जेथें पुरे कामना ।
तो तेथेंचि राहिला मना । सदृढ करूनि ॥ ९ ॥
बहु देव बहु भक्त । इच्ह्या जाले आसक्त ।
बहु ऋषी बहु मत । वेगळालें ॥ १० ॥
बहु निवडितां निवडेना । येक निश्चय घडेना ।
शास्त्रें भांडती पडेना । निश्चय ठाईं ॥ ११ ॥
बहुत शास्त्रीं बहुत भेद । मतांमतांस विरोध ।
ऐसा करितां वेवाद । बहुत गेले ॥ १२ ॥
सहस्त्रामधें कोणी येक । पाहे देवाचा विवेक ।
परी त्या देवाचें कौतुक । ठाईं न पडे ॥ १३ ॥
थाईं न पडे कैसें म्हणतां । तेथें लागली अहंता ।
देव राहिला परता । अहंतागुणें ॥ १४ ॥
आतां असो हें बोलणें । नाना योग ज्याकारणें ।
तो देव कोण्या गुणें । ठाईं पडे ॥ १५ ॥
देव कोणासी म्हणावें । कैसें तयासी जाणावें ।
तेंचि बोलणें स्वभावें । बोलिजेल ॥ १६ ॥
जेणें केले चराचर । केले सृष्ट्यादि व्यापार ।
सर्वकर्ता निरंतर । नाम ज्याचें ॥ १७ ॥
तेणें केल्या मेघमाळा । चंद्रबिंबीं अमृतकळा ।
तेज दिधलें रविमंडळा । जया देवें ॥ १८ ॥
ज्याची मर्यादा सागरा । जेणें स्थापिलें फणिवरा ।
जयाचेनि गुणें तारा । अंतरिक्ष ॥ १९ ॥
च्यारी खाणी च्यारी वाणी । चौर्यासि लक्ष जीवयोनी ।
जेणें निर्मिले लोक तिनी । तया नाव देव ॥ २० ॥
ब्रह्मा विष्णु आणी हर । हे जयाचे अवतार ।
तोचि देव हा निर्धार । निश्चयेंसीं ॥ २१ ॥
देव्हाराचा उठोनि देव । करूं नेणे सर्व जीव ।
तयाचेनि ब्रह्मकटाव । निर्मिला न वचे ॥ २२ ॥
ठाईं ठाईं देव असती । तेहिं केली नाहीं क्षिती ।
चंद्र सूर्य तारा जीमूती । तयांचेनि नव्हे ॥ २३ ॥
सर्वकर्ता तोचि देव । पाहों जातां निरावेव ।
ज्याची कळा लीळा लाघव । नेणती ब्रह्मादिक ॥ २४ ॥
येथें आशंका उठिली । ते पुढिलीये समासीं फीटली ।
आतां वृत्ती सावध केली । पाहिजे श्रोतीं ॥ २५ ॥
पैस अवकाश आकाश । कांहींच नाहीं जें भकास ।
तये निर्मळीं वायोस । जन्म जाला ॥ २६ ॥
वायोपासून जाला वन्ही । वन्हीपासुनी जालें पाणी ।
ऐसी जयाची करणी । अघटित घडली ॥ २७ ॥
उदकापासून सृष्टि जाली । स्तंभेविण उभारली ।
ऐसी विचित्र कळा केली । त्या नाव देव ॥ २८ ॥
देवें निर्मिली हे क्षिती । तीचे पोटीं पाषाण होती ।
तयासचि देव म्हणती । विवेकहीन ॥ २९ ॥
जो सृष्टिनिर्माणकर्ता । तो ये सृष्टीपुर्वीं होता ।
मग हे तयाची सत्ता । निर्माण जाली ॥ ३० ॥
कुल्लाळ पात्रापुर्वीं आहे । पात्रें कांहीं कुल्लाळ नव्हे ।
तैसा देव पूर्वींच आहे । पाषाण नव्हे सर्वथा ॥ ३१ ॥
मृत्तिकेचें शैन्य केलें । कर्ते वेगळे राहिले ।
कार्यकारण येक केलें । तरी होणार नाहीं ॥ ३२ ॥
तथापि होईल पंचभूतिक । निर्गुण नव्हे कांहीं येक ।
कार्याकारणाचा विवेक । भूतांपरता नाहीं ॥ ३३ ॥
अवघी सृष्टि जो कर्ता । तो ते सृष्टीहूनि पर्ता ।
तेथें संशयाची वार्ता । काढूंचि नये ॥ ३४ ॥
खांसूत्रींची बाहुली । जेणें पुरुषें नाचविली ।
तोचि बाहुली हे बोली । घडे केवी ॥ ३५ ॥
च्हयामंडपीची सेना । सृष्टिसारिखीच रचना ।
सूत्रें चाळी परी तो नाना । वेक्ति नव्हे ॥ ३६ ॥
तैसा सृष्टिकर्ता देव । परी तो नव्हे सृष्टिभाव ।
जेणें केले नाना जीव । तो जीव कैसेनी ॥ ३७ ॥
जें जें जया करणें पडे । तें तें तो हें कैसें घडे ।
म्हणोनि वायांचि बापुडे । संदेहीं पडती ॥ ३८ ॥
सृष्टि ऐसेंचि स्वभावें । गोपुर निर्मिलें बरवें ।
परी तो गोपुर कर्ता नव्हे । निश्चयेसीं ॥ ३९ ॥
तैसें जग निर्मिलें जेणें । तो वेगळा पूर्णपणें ।
येक म्हणती मूर्खपणें । जग तोचि जगदीश ॥ ४० ॥
एवं जगदीश तो वेगळा । जग निर्माण त्याची कळा ।
तो सर्वांमधें परी निराळा । असोन सर्वीं ॥ ४१ ॥
म्हणोनि भूतांचा कर्दमु । यासी अलिप्त आत्मारामु ।
अविद्यागुणें मायाभ्रमु । सत्यचि वाटे ॥४२ ॥
मायोपाधी जगडंबर । आहे सर्वहि साचार ।
ऐसा हा विपरीत विचार । कोठेंचि नाहीं ॥ ४३ ॥
म्हणोनि जग मिथ्या साच आत्मा । सर्वांपर जो परमात्मा ।
अंतर्बाह्य अंतरात्मा । व्यापूनि असे ॥ ४४ ॥
तयास म्हणावें देव । येर हें अवघेंचि वाव ।
ऐसा आहे अंतर्भाव । वेदांतीचा ॥ ४५ ॥
पदार्थवस्तु नासिवंत । हें तों अनुभवास येत ।
याकारणें भगवंत । पदार्थावेगळा ॥ ४६ ॥
देव विमळ आणी अचळ । शास्त्रें बोलती सकळ ।
तया निश्चळास चंचळ । म्हणों नये सर्वथा ॥ ४७ ॥
देव आला देव गेला । देव उपजला देव मेला ।
ऐसें बोलतां दुरिताला । काय उणें ॥ ४८ ॥
जन्म मरणाची वार्ता । देवास लागेना सर्वथा ।
देव अमर ज्याची सत्ता । त्यासी मृत्यु कैसेनी ॥ ४९ ॥
उपजणें आणी मरणें । येणें जाणें दुःख भोगणें ।
हें त्या देवाचें करणें । तो कारण वेगळा ॥ ५० ॥
अंतःकरण पंचप्राण । बहुतत्वीं पिंडज्ञान ।
यां सर्वांस आहे चळण । म्हणोनि देव नव्हेती ॥ ५१ ॥
येवं कल्पनेरहित । तया नाव भगवंत ।
देवपणाची मात । तेथें नाहीं ॥ ५२ ॥
तव शिष्यें आक्षेपिलें । तरी कैसें ब्रह्मांड केलें ।
कर्तेपण कारण पडिलें । कार्यामधें ॥ ५३ ॥
द्रष्टेपणें द्रष्टा दृश्यीं । जैसा पडे अनायांसीं ।
कर्तेपणे निर्गुणासी । गुण तैसे ॥ ५४ ॥
ब्रह्मांडकर्ता कवण । कैसी त्याची वोळखण ।
देव सगुण किं निर्गुण । मह निरोपावा ॥ ५५ ॥
येक म्हणती त्या ब्रह्मातें । इच्ह्यामात्रें सृष्टिकर्ते ।
सृष्टिकर्ते त्यापर्तें । कोण आहे ॥ ५६ ॥
आतां असो हे बहु बोली । सकळ माया कोठून जाली ।
ते हे आतां निरोपिली । पाहिजे स्वामी ॥ ५७ ॥
ऐसें ऐकोनि वचन । वक्ता म्हणे सावधान ।
पुढिले समासीं निरूपण । सांगिजेल ॥ ५८ ॥
ब्रह्मीं माया कैसी जाली । पुढें असे निरोपिली ।
श्रोतीं वृत्ति सावध केली । पाहिजे आतां ॥५९ ॥
पुढें हेंचि निरूपण । विशद केलें श्रवण ।
जेणें होय समाधान । साधकांचें ॥ ६० ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
देवदर्शननाम समास पहिला ॥ १ ॥
 
 
 
समास दुसरा : सूक्ष्मआशंकानिरूपण
॥ श्रीराम ॥
मागां श्रोतीं आक्षेपिलें । तें पाहिजे निरोपिलें ।
निरावेवीं कैसें जालें । चराचर ॥ १ ॥
याचें ऐसें प्रतिवचन । ब्रह्म जें कां सनातन ।
तेथें माया मिथ्याभान । विवर्तरूप भावे ॥ २ ॥
आदि येक परब्रह्म । नित्यमुक्त अक्रिय परम ।
तेथें अव्याकृत सूक्ष्म । जाली मूळमाया ॥ ३ ॥
॥ श्लोक ॥ आद्यमेकं परब्रह्म नित्यमुक्तमविक्रियम् ।
तस्य माया समावेशो जीवमव्याकृतात्मकम् ॥
आशंका ॥ येक ब्रह्मा निराकार । मुक्त अक्रिये निर्विकार ।
तेथें माया वोडंबर । कोठून आली ॥ ४ ॥
ब्रह्म अखंड निर्गुण । तेथें इच्हा धरी कोण ।
निर्गुणीं सगुणेंविण । इच्हा नाहीं ॥ ॥ ५ ॥
मुळीं असेचिना सगुण । म्हणौनि नामें निर्गुण ।
तेथें जालें सगुण । कोणेपरी ॥ ६ ॥
निर्गुणचि गुणा आलें । ऐसें जरी अनुवादलें ।
लागों पाहे येणें बोलें । मूर्खपण ॥ ७ ॥
येक म्हणती निरावेव । करून अकर्ता तो देव ।
त्याची लीळा बापुडे जीव । काये जाणती ॥ ८ ॥
येक म्हणती तो परमात्मा । कोण जाणे त्याचा महिमा ।
प्राणी बापुडा जीवात्मा । काये जाणे ॥ ९ ॥
उगाच महिमा सांगती । शास्त्रार्थ अवघा लोपिती ।
बळेंचि निर्गुणास म्हणती । करूनि अकर्ता ॥ १० ॥
मुळीं नाहीं कर्तव्यता । कोण करून अकर्ता ।
कर्ता अकर्ता हे वार्ता । समूळ मिथ्या ॥ ११ ॥
जें ठाईंचें निर्गुण । तेथें कैचें कर्तेपण ।
तरी हे इच्हा धरी कोण । सृष्टिरचाव्याची ॥ १२ ॥
इच्हा परमेश्वराची । ऐसी युक्ती बहुतेकांची ।
परी त्या निर्गुणास इच्हा कैंची । हें कळेना ॥ १३ ॥
तरी हे इतुकें कोणें केलें । किंवा आपणचि जालें ।
देवेंविण उभारलें । कोणेपरी ॥ १४ ॥
देवेंविण जालें सर्व । मग देवास कैंचा ठाव ।
येथें देवाचा अभाव । दिसोन आला ॥ १५ ॥
देव म्हणे सृष्टिकर्ता । तरी येवं पाहे सगुणता ।
निर्गुणपणाची वार्ता । देवाची बुडाली ॥ १६ ॥
देव ठाईंचा निर्गुण । तरी सृष्टिकर्ता कोण ।
कर्तेपणाचें सगुण । नासिवंत ॥ १७ ॥
येथें पडिले विचार । कैसें जालें सचराचर ।
माया म्हणों स्वतंतर तरी हेंहि विपरीत दिसे ॥ १८ ॥
माया कोणीं नाहीं केली । हे आपणचि विस्तारली ।
ऐसें बोलतां बुडाली । देवाची वार्ता ॥ १९ ॥
देव निर्गुण स्वतसिद्ध । त्यासी मायेसि काये समंध ।
ऐसें बोलतां विरुद्ध । दिसोन आलें ॥ २० ॥
सकळ कांहीं कर्तव्यता । आली मायेच्याचि माथां
तरी भक्तांस उद्धरिता । देव नाहीं कीं ॥ २१ ॥
देवेंविण नुस्ती माया । कोण नेईल विलया ।
आम्हां भक्तां सांभाळाया । कोणीच नाहीं ॥ २२ ॥
म्हणोनि माया स्वतंतर । ऐसा न घडे कीं विचार ।
मायेस निर्मिता सर्वेश्वर । तो येकचि आहे ॥ २३ ॥
तरी तो कैसा आहे ईश्वर । मायेचा कैसा विचार ।
तरी हें आतां सविस्तर । बोलिलें पाहिजे ॥ २४ ॥
श्रोतां व्हावें सावधान । येकाग्र करूनियां मन ।
आतां कथानुसंधान । सावध ऐका ॥ २५ ॥
येके आशंकेचा भाव । जनीं वेगळाले अनुभव ।
तेहि बोलिजेती सर्व । येथानुक्रमें ॥ २६ ॥
येक म्हणती देवें केली । म्हणोनि हे विस्तारली ।
देवास इच्ह्या नस्ती जाली । तरी हे माया कैंची ॥ २७ ॥
येक म्हणती देव निर्गुण । तेथें इच्हा करी कोण ।
माया मिथ्या हे आपण । जालीच नाही ॥ २८ ॥
येक म्हणती प्रत्यक्ष दिसे । तयेसी नाहीं म्हणतां कैसें ।
माया हे अनादि असे । शक्ती ईश्वराची ॥ २९ ॥
येक म्हणती साच असे । तरी हे ज्ञानें कैसी निरसे ।
साचासारिखीच दिसे । परी हे मिथ्या ॥ ३० ॥
येक म्हणती मिथ्या स्वभावें । तरी साधन कासया करावें ।
भक्तिसाधन बोलिलें देवें । मायात्यागाकारणें ॥ ३१ ॥
येक म्हणती मिथ्या दिसतें । भयें अज्ञानसन्येपातें ।
साधन औषधही घेईजेतें । परी तें दृश्य मिथ्या ॥ ३२ ॥
अनंत साधनें बोलिलीं । नाना मतें भांबावलीं ।
तरी माया न वचे त्यागिली । मिथ्या कैसी म्हणावी ॥ ३३ ॥
मिथ्या बोले योगवाणी । मिथ्या वेदशास्त्रीं पुराणीं ।
मिथ्या नाना निरूपणीं । बोलिली माया ॥ ३४ ॥
माया मिथ्या म्हणतां गेली । हे वार्ता नाहीं ऐकिली ।
मिथ्या म्हणतांच लागली । समागमें ॥ ३५ ॥
जयाचे अंतरीं ज्ञान । नाहीं वोळखिले सज्जन ।
तयास मिथ्याभिमान । सत्यचि वाटे ॥ ३६ ॥
जेणें जैसा निश्चये केला । तयासी तैसाचि फळला ।
पाहे तोचि दिसे बिंबला । तैसी माया ॥ ३७ ॥
येक म्हणती माया कैंची । आहे ते सर्व ब्रह्मचि ।
थिजल्या विघुरल्या घृताची । ऐक्यता न मोडे ॥ ३८ ॥
थिजलें आणी विघुरलें । हें स्वरूपीं नाहीं बोलिलें ।
साहित्य भंगलें येणें बोलें । म्हणती येक ॥ ३९ ॥
येक म्हणती सर्व ब्रह्म । हें न कळे जयास वर्म ।
तयाचें अंतरींचा भ्रम । गेलाच नाहीं ॥ ४० ॥
येक म्हणती येकचि देव । तेथें कैंचें आणिलें सर्व ।
सर्व ब्रह्म हें अपूर्व । आश्चिर्य वाटे ॥ ४१ ॥
येक म्हणती येकचि खरें । आनुहि नाहीं दुसरें ।
सर्व ब्रह्म येणें प्रकारें । सहजचि जालें ॥ ४२ ॥
सर्व मिथ्या येकसरें । उरलें तेंचि ब्रह्म खरें ।
ऐसीं वाक्यें शास्त्राधारें । बोलती येक ॥ ४३ ॥
आळंकार आणी सुवर्ण । तेथें नाहीं भिन्नपण ।
आटाआटी वेर्थ सीण । म्हणती येक ॥ ४४ ॥
हीन उपमा येकदेसी । कैसी साहेल वस्तूसी ।
वर्णवेक्ती अव्यक्तासी । साम्यता न घडे ॥ ४५ ॥
सुवर्णीं दृष्टी घालितां । मुळीच आहे वेक्तता ।
आळंकार सोनें पाहतां सोनेंचि असे ॥ ४६ ॥
मुळीं सोनेंचि हें वेक्त । जड येकदेसी पीत ।
पूर्णास अपूर्णाचा दृष्टांत । केवीं घडे ॥ ४७ ॥
दृष्टांत तितुका येकदेसी । देणें घडे कळायासी ।
सिंधु आणी लहरीसी । भिन्नत्व कैंचें ॥ ४८ ॥
उत्तम मधेम कनिष्ठ । येका दृष्टांतें कळे पष्ट ।
येका दृष्टांतें नष्ट । संदेह वाढे ॥ ४९ ॥
कैंचा सिंधु कैंची लहरी । अचळास चळाची सरी ।
साचा ऐसी वोडंबरी । मानूंच नये ॥ ५० ॥
वोडंबरी हे कल्पना । नाना भास दाखवी जना ।
येरवी हे जाणा । ब्रह्मचि असे ॥ ५१ ॥
ऐसा वाद येकमेकां । लागतां राहिली आशंका ।
तेचि आतां पुढें ऐका । सावध होऊनी ॥ ५२ ॥
माया मिथ्या कळों आली । परी ते ब्रह्मीं कैसी जाली ।
म्हणावी ते निर्गुणें केली । तरी ते मुळींच मिथ्या ॥ ५३ ॥
मिथ्या शब्दीं कांहींच नाहीं । तेथें केलें कोणें काई ।
करणें निर्गुणाचा ठाईं । हेंहि अघटित ॥ ५४ ॥
कर्ता ठांईचा अरूप । केलें तेंहि मिथ्यारूप ।
तथापी फेडूं आक्षेप । श्रोतयांचा ॥ ५५ ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
सूक्ष्मआशंकानिरूपण समास दुसरा ॥ २ ॥
 
 
 
समास तिसरा : सूक्ष्मआशंकानिरूपण
॥ श्रीराम ॥
अरे जे जालेंचि नाहीं । त्याची वार्ता पुससी काई ।
तथापि सांगों जेणें कांहीं । संशय नुरे ॥ १ ॥
दोरीकरितां भुजंग । जळाकरितां तरंग ।
मार्तंडाकरितां चांग । मृगजळ वाहे ॥ २ ॥
कल्पेनिकरितां स्वप्न दिसे । सिंपीकरितां रुपें भासे ।
जळाकरितां गार वसे । निमिष्य येक ॥ ३ ॥
मातीकरितां भिंती जाली । सिन्धुकरितां लहरी आली ।
तिळाकरितां पुतळी । दिसों लागे ॥ ४ ॥
सोन्याकरितां अळंकार । तंतुकरितां जालें चीर ।
कासवाकरितां विस्तार । हातापायांचा ॥ ५ ॥
तूप होतें तरी थिजलें । तरीकरितां मीठ जालें ।
बिंबाकरितां बिंबलें । प्रतिबिंब ॥ ६ ॥
पृथ्वीकरितां जालें झाड । झाडाकरितां च्ह्याया वाड ।
धातुकरितां पवाड । उंच नीच वर्णाचा ॥ ७ ॥
आतां असो हा दृष्टांत । अद्वैतास कैंचें द्वैत ।
द्वैतेंविण अद्वैत । बोलतांच न ये ॥ ८ ॥
भासाकरितां भास भासे । दृश्याकरितां अदृश्य दिसे ।
अदृश्यास उपमा नसे । म्हणोनि निरोपम ॥ ९ ॥
कल्पेनेविरहित हेत । दृश्यावेगळा दृष्टांत ।
द्वैतावेगळें द्वैत । कैसें जालें ॥ १० ॥
विचित्र भगवंताची करणी । वर्णवेना सहस्त्रफणी ।
तेणें केली उभवणी । अनंत ब्रह्मांडाची ॥ ११ ॥
परमात्मा परमेश्वरु । सर्वकर्ता जो ईश्वरू ।
तयापासूनि विस्तारु । सकळ जाला ॥ १२ ॥
ऐसीं अनंत नामें धरी । अनंत शक्ती निर्माण करी ।
तोचि जाणावा चतुरीं । मूळपुरुष ॥ १३ ॥
त्या मूळपुरुषाची वोळखण । ते मूळमायाचि आपण ।
सकळ कांहीं कर्तेपण । तेथेंचि आलें ॥ १४ ॥
॥ श्लोक ॥ कार्यकारण कर्तृत्वे हेतुः प्रकृतिरुच्यते ॥
हे उघड बोलतां न ये । मोडों पाहातो उपाये ।
येरवीं हें पाहतां काय । साच आहे ॥ १५ ॥
देवापासून सकळ जालें । हें सर्वांस मानलें ।
परी त्या देवास वोळखिलें । पाहिजे कीं ॥ १६ ॥
सिद्धांचे जें निरूपण । जें साधकांस न मने जाण ।
पक्व नाहीं अंतःकर्ण । म्हणोनियां ॥ १७ ॥
अविद्यागुणें बोलिजे जीव । मायागुणें बोलिजे शिव ।
मूळमाया गुणें देव । बोलिजेतो ॥ १८ ॥
म्हणौनि कारण मूळमाया । अनंत शक्ती धरावया ।
तेथीचा अर्थ जाणावया । अनुभवी पाहिजे ॥ १९ ॥
मूळमाया तोचि मूळपुरुष । तोचि सर्वांचा ईश ।
अनंतनामी जगदीश । तयासीचि बोलिजे ॥ २० ॥
अवघी माया विस्तारली । परी हे निशेष नाथिली ।
ऐसिया वचनाची खोली । विरुळा जाणे ॥ २१ ॥
ऐसें अनुर्वाच्य बोलिजे । परी हें स्वानुभवें जाणिजे ।
संतसंगेविण नुमजे । कांही केल्यां ॥ २२ ॥
माया तोचि मूळपुरुष । साधकां न मने हें निशेष ।
परी अनंतनामी जगदीश । कोणास म्हणावें ॥ २३ ॥
नामरूप माये लागलें । तरी हें बोलणें नीटचि जालें ।
येथें श्रोतीं अनुमानिलें । कासयासी ॥ २४ ॥
आतां असो हे सकळ बोली । मागील आशंका राहिली ।
निराकारीं कैसी जाली । मूळमाया ॥ २५ ॥
दृष्टीबंधन मिथ्या सकळ । परी तो कैसा जाला खेळ ।
हेंचि आतां अवघें निवळ । करून दाऊं ॥ २६ ॥
आकाश असतां निश्चळ । मधें वायो जाला चंचळ ।
तैसी जाणावी केवळ । मूळमाया ॥ २७ ॥
रूप वायोचें जालें । तेणें आकाश भंगलें ।
ऐसें हें सत्य मानलें । नवचे किं कदा ॥ २८ ॥
तैसी मूळमाया जाली । आणी निर्गुणता संचली ।
येणें दृष्टांतें तुटली । मागील आशंका ॥ २९ ॥
वायु नव्हता पुरातन । तैसी मूळमाया जाण ।
साच म्हणतां पुन्हा लीन । होतसे ॥ ३० ॥
वायो रूपें कैसा आहे । तैसी मूळमाया पाहें ।
भासे परी तें न लाहे । रूप तयेचें ॥ ३१ ॥
वायो सत्य म्हणो जातां । परी तो न ये दाखवितां ।
तयाकडे पाहों जातां । धुळीच दिसे ॥ ३२ ॥
तैसी मूळमाया भासे । भासी परी ते न दिसे ।
पुढें विस्तारली असे । माया अविद्या ॥ ३३ ॥
जैसें वायोचेनि योगें । दृश्य उडे गगनमार्गें ।
मूळमायेच्या संयोगें । तैसें जग ॥ ३४ ॥
गगनीं आभाळ नाथिलें । अकस्मात उद्भवलें ।
मायेचेनि गुणें जालें । तैसें जग ॥ ३५ ॥
नाथिलेंचि गगन नव्हतें । अकस्मात आलें तेथें ।
तैसें दृश्य जालें येथें । तैसियापरी ॥ ३६ ॥
परी त्या आभाळाकरितां । गगनाची गेली निश्चळता ।
वाटे परी ते तत्वता । तैसीच आहे ॥ ३७ ॥
तैसें मायेकरितां निर्गुण । वाटे जालें सगुण ।
परी तें पाहतां संपूर्ण । जैसें तैसें ॥ ३८ ॥
आभाळ आले आणि गेलें । तरी गगन तें संचलें ।
तैसें गुणा नाहीं आलें । निर्गुण ब्रह्म ॥ ३९ ॥
नभ माथा लागलें दिसे । परी तें जैसें तैसें असे ।
तैसें जाणावें विश्वासें । निर्गुण ब्रह्म ॥ ४० ॥
ऊर्ध पाहातां आकाश । निळिमा दिसे सावकास ।
परि तो जाणिजे मिथ्याभास । भासलासे ॥ ४१ ॥
आकाश पालथें घातलें । चहूंकडे आटोपलें ।
वाटे विश्वास कोंडिले । परी तें मोकळेचि असे ॥ ४२ ॥
पर्वतीं निळा रंग दिसे । परी तो तया लागला नसे ।
अलिप्त जाणावे तैसें । निर्गुण ब्रह्म ॥ ४३ ॥
रथ धावतां पृथ्वी चंचळ । वाटे परी ते असे निश्चळ ।
तैसें परब्रह्म केवळ । निर्गुण जाणावें ॥ ४४ ॥
आभाळाकरितां मयंक । वाटे धावतो निशंक ।
परी तें अवघें माईक । आभाळ चळे ॥ ४५ ॥
झळे अथवा अग्निज्वाळ । तेणें कंपित दिसे अंत्राळ ।
वाटे परी तें निश्चळ । जैसें तैसें ॥ ४६ ॥
तैसें स्वरूप हें संचलें । असतां वाटे गुणा आलें ।
ऐसें कल्पनेसि गमलें । परी ते मिथ्या ॥ ४७ ॥
दृष्टिबंधनाचा खेळ । तैसी माया हे चंचळ ।
वस्तु शाश्वत निश्चळ । जैसी तैसी ॥ ४८ ॥
ऐसी वस्तु निरावेव । माया दाखवी अवेव ।
ईचा ऐसा स्वभाव । नाथिलीच हे ॥ ४९ ॥
माया पाहातां मुळीं नसे । परी हे साचा ऐसी भासे ।
उद्भवे आणि निरसे । आभाळ जैसें ॥ ५० ॥
ऐसी माया उद्भवली । वस्तु निर्गुण संचली ।
अहं ऐसी स्फुर्ति जाली । तेचि माया ॥ ५१ ॥
गुणमायेचे पवाडे । निर्गुणीं हें कांहींच न घडे ।
परी हें घडे आणी मोडे । सस्वरूपीं ॥ ५२ ॥
जैसी दृष्टी तरळली । तेणें सेनाच भासली ।
पाहातां आकाशींच जाली । परी ते मिथ्या ॥ ५३ ॥
मिथ्या मायेचा खेळ । उद्भव बोलिला सकळ ।
नानातत्वांचा पाल्हाळ । सांडूनियां ॥ ५४ ॥
तत्वें मुळींच आहेती । वोंकार वायोची गती ।
तेथीचा अर्थ जाणती । दक्ष ज्ञानी ॥ ५५ ॥
मूळमायेचे चळण । तेंचि वायोचें लक्षण ।
सूक्ष्म तत्वें तेंचि जाण । जडत्वा पावलीं ॥ ५६ ॥
ऐसीं पंचमाहांभूतें । पूर्वीं होती अवेक्तें ।
पुढें जालीं वेक्तें । सृष्टिरचनेसी ॥ ५७ ॥
मूळमायेचें लक्षण । तेंचि पंचभूतिक जाण ।
त्याची पाहें वोळखण । सूक्ष्मदृष्टीं ॥ ५८ ॥
आकाश वायोविण । इच्ह्याशब्द करी कोण ।
इच्हाशक्ती तेचि जाण । तेजस्वरूप ॥ ५९ ॥
मृदपण तेचि जळ । जडत्व पृथ्वी केवळ ।
ऐसी मूळमाया सकळ । पंचभूतिक जाणावी ॥ ६० ॥
येक येक भूतांपोटीं । पंचभूतांची राहाटी ।
सर्व कळे सूक्ष्मदृष्टी । घालून पाहातां ॥ ६१ ॥
पुढें जडत्वास आलीं । तरी असतीं कालवलीं ।
ऐसी माया विस्तारली । पंचभूतिक ॥ ६२ ॥
मूळमाया पाहातां मुळीं । अथवा अविद्या भूमंडळीं ।
स्वर्ग्य मृत्य पाताळीं । पांचचि भूतें ॥ ६३ ॥
॥ श्लोक ॥ स्वर्गे मृत्यौ पाताले वा यत्किंचित्सचराचरं ।
सर्वपंचभूतकं राम षष्ठें किंचिन्न दृश्यते ॥
सत्य स्वरूप आदिअंतीं । मध्यें पंचभूतें वर्तती ।
पंचभूतिक जाणिजे श्रोतीं । मूळमाया ॥ ६४ ॥
येथें उठिली आशंका । सावध होऊन ऐका ।
पंचभूतें जालीं येका । तमोगुणापासुनी ॥ ६५ ॥
मूळमाया गुणापरती । तेथें भूतें कैंचि होतीं ।
ऐसी आशंका हे श्रोतीं । घेतली असे ॥ ६६ ॥
ऐसें श्रोतीं आक्षेपिलें । संशयास उभें केलें ।
याचें उत्तर दिधलें । पुढिले समासीं ॥ ६७ ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
सूक्ष्मआशंकानाम समास तिसरा ॥ ३ ॥
 
 
 
समास चवथा : सूक्ष्मपंचभूतेंनिरूपण
॥ श्रीराम ॥
मागील आशंकेचें मूळ । आतां होईल प्रांजळ ।
वृत्ति करावी निवळ । निमिष्य येक ॥ १ ॥
ब्रह्मीं मूळमाया जाली । तिच्या पोटा माया आली ।
मग ते गुणा प्रसवली । म्हणौनि गुणक्षोभिणी ॥ २ ॥
पुढें तिजपासाव कोण । सत्वरजतमोगुण ।
तमोगुणापासून निर्माण । जाली पंचभूतें ॥ ३ ॥
ऐसीं भूतें उद्भवलीं । पुढें तत्वें विस्तारलीं ।
एवं तमोगुणापासून जालीं । पंचमाहांभूतें ॥ ४ ॥
मूळमाया गुणापरती । तेथें भूतें कैंचीं होतीं ।
ऐसी आशंका हे श्रोतीं । घेतली मागां ॥ ५ ॥
आणिक येक येके भूतीं । पंचभूतें असती ।
ते हि आतां कैसी स्थिती । प्रांजळ करूं ॥ ६ ॥
सूक्ष्मदृष्टीचें कौतुक । मूळमाया पंचभूतिक ।
श्रोतीं विमळ विवेक । केला पाहिजे ॥ ७ ॥
आधीं भूतें तीं जाणावीं । रूपें कैसीं वोळखावी ।
मग तें शोधून पाहावीं । सूक्ष्मदृष्टीं ॥ ८ ॥
वोळखी नाही अंतरी । ते वोळखावी कोणेपरी ।
म्हणोनि भूतांची वोळखी चतुरीं । नावेक परिसावी ॥ ९ ॥
जें जें जड आणी कठिण । तें तें पृथ्वीचें लक्षण ।
मृद आणी वोलेपण । तितुकें आप ॥ १० ॥
जें जें उष्ण आणी सतेज । तें तें जाणावें पैं तेज ।
आतां वायोहि सहज । निरोपिजेल ॥ ११ ॥
चैतन्य आणी चंचळ । तो हा वायोचि केवळ ।
सून्य आकाश निश्चळ । आकाश जाणावें ॥ १२ ॥
ऐसीं पंचमाहांभूतें । वोळखी धरावी संकेतें ।
आतां येकीं पांच भूतें । सावध ऐका ॥ १३ ॥
जें त्रिगुणाहूनि पर । त्याचा सूक्ष्म विचार ।
यालागीं अति तत्पर । होऊन ऐका ॥ १४ ॥
सूक्ष्म आकाशीं कैसी पृथ्वी । तेचि आधीं निरोपावी ।
येथें धारणा धरावी । श्रोतेजनीं ॥ १५ ॥
आकाश म्हणजे अवकाश सून्य । सून्य म्हणिजे तें अज्ञान ।
अज्ञान म्हणिजे जडत्व जाण । तेचि पृथ्वी ॥ १६ ॥
आकाश स्वयें आहे मृद । तेंचि आप स्वतसिद्ध ।
आतां तेज तेंहि विशद । करून दाऊं ॥ १७ ॥
अज्ञानें भासला भास । तोचि तेजाचा प्रकाश ।
आतां वायो सावकाश । साकल्य सांगों ॥ १८ ॥
वायु आकाश नाहीं भेद । आकाशाइतुका असे स्तब्ध ।
तथापी आकाशीं जो निरोध । तोचि वायो ॥ १९ ॥
आकाशीं आकाश मिसळलें । हें तों नलगे किं बोलिलें ।
येणें प्रकारें निरोपिलें । आकाश् पंचभूत ॥ २० ॥
वायोमध्यें पंचभूतें । तेंहि ऐका येकचित्तें ।
बोलिजेती ते समस्तें । येथान्वयें ॥ २१ ॥
हळु फूल तरी जड । हळु वारा तरी निबिड ।
वायो लागतां कडाड । मोडती झाडें ॥ २२ ॥
तोलेंविण झाड मोडे । ऐसें हें कहिंच न घडे ।
तोल तोचि तये जडे । पृथ्वीचा अंश ॥ २३ ॥
येथें श्रोते आशंका घेती । तेथें कैचीं झाडें होतीं ।
झाडें नव्हतीं तरी शक्ती । कठिणरूप आहे ॥ २४ ॥
वन्हीस्फुलींग लाहान । कांहीं तऱ्ही असे उष्ण ।
तैसें सुक्ष्मीं जडपण । सूक्ष्मरूपें ॥ २५ ॥
मृदपण तेंचि आप । भास तेजाचें स्वरूप ।
वायो तेथें चंचळरूप । सहजचि आहे ॥ २६ ॥
सकळांस मिळोन आकाश । सहजचि आहे अवकाश ।
पंचभूतांचे अंश । वायोमधें निरोपिले ॥ २७ ॥
आतां तेजाचें लक्षण । भासलेंपण तें कठीण ।
तेजीं ऐसी वोळखण । पृथ्वीयेची ॥ २८ ॥
भासला भास वाटे मृद । तेजीं आप तेचि प्रसिद्ध ।
तेजीं तेज स्वतसिद्ध । सांगणेंचि नलगे ॥ २९ ॥
तेजीं वायो तो चंचळ । तेजीं आकाश निश्चळ ।
तेजीं पंचभूतें सकळ । निरोपिलीं ॥ ३० ॥
आतां आपाचें लक्षण । आप तेंचि जें मृदपण ।
मृदपण तें कठिण । तेचि पृथ्वी ॥ ३१ ॥
आपीं आप सहजचि असे । तेज मृदपणें भासे ।
वायो स्तब्धपणें दिसे । मृदत्वाआंगी ॥ ३२ ॥
आकाश न लगे सांगावें । तें व्यापकचि स्वभावें ।
आपीं पंचभूतांचीं नांवें । सूक्ष्म निरोपिलीं ॥ ३३ ॥
आतां पृथ्वीचें लक्षण । कठीण पृथ्वी आपण ।
कठिणत्वीं मृदपण । तेंचि आप ॥ ३४ ॥
कठिणत्वाचा जो भास । तोचि तेजाचा प्रकाश ।
कठिणत्वीं निरोधांश । तोचि वायो ॥ ३५ ॥
आकश सकळांस व्यापक । हा तों प्रगटचि विवेक ।
आकाशींच कांहीं येक । भास भासे ॥ ३६ ॥
आकाश तोडितां तुटेना । आकाश फोडितां फुटेना ।
आकाश परतें होयेना । तिळमात्र ॥ ३७ ॥
असो आतां पृथ्वीअंत । दाविला भूतांचा संकेत ।
येक भूतीं पंचभूत । तेंहि निरोपिलें ॥ ३८ ॥
परी हें आहाच पाहातां नातुडे । बळेंचि पोटीं संदेह पडे ।
भ्रांतिरूपें अहंता चढे । अकस्मात ॥ ३९ ॥
सूक्ष्मदृष्टीनें पाहातां । वायोचि वाटे तत्वता ।
सूक्ष्म वायो शोधूं जातां । पंचभूतें दिसती ॥ ४० ॥
एवं पंचभूतिक पवन । तेचि मूळमाया जाण ।
माया आणी सूक्ष्म त्रिगुण । तेहि पंचभूतिक ॥ ४१ ॥
भूतें गुण मेळविजे । त्यासी अष्टधा बोलिजे ।
पंचभूतिक जाणिजे । अष्टधा प्रकृति ॥ ४२ ॥
शोधून पाहिल्यावीण । संदेह धरणें मूर्खपण ।
याची पाहावी वोळखण । सूक्ष्मदृष्टीं ॥ ४३ ॥
गुणापासूनि भूतें । पावलीं पष्ट दशेतें ।
जडत्वा येऊन समस्तें । तत्वें जालीं ॥ ४४ ॥
पुढें तत्वविवंचना । पिंडब्रह्मांड तत्वरचना ।
बोलिली असे ते जना । प्रगटचि आहे ॥ ४५ ॥
हा भूतकर्दम बोलिला । सूक्ष्म संकेतें दाविला ।
ब्रह्मगोळ उभारला । तत्पूर्वीं ॥ ४६ ॥
या ब्रह्मांडापैलिकडिल गोष्टी । जैं जाली नव्हती सृष्टी ।
मूळमाया सूक्ष्मदृष्टीं । वोळखावी ॥ ४७ ॥
सप्तकंचुक प्रचंड । जालें नव्हतें ब्रह्मांड ।
मायेअविद्येचें बंड । ऐलिकडे ॥ ४८ ॥
ब्रह्मा विष्णु महेश्वर । हा ऐलिकडिल विचार ।
पृथ्वी मेरु सप्त सागर । ऐलिकडे ॥ ४९ ॥
नाना लोक नाना स्थानें । चन्द्र सूर्य तारांगणें ।
सप्त द्वीपें चौदा भुवनें । ऐलिकडे ॥ ५० ॥
शेष कूर्म सप्त पाताळ । येकविस स्वर्गें अष्ट दिग्पाळ ।
तेतिस कोटि देव सकळ । ऐलिकडे ॥ ५१ ॥
बारा आदित्य । अक्रा रुद्र । नव नाग सप्त ऋषेश्वर ।
नाना देवांचे अवतार । ऐलिकडे ॥ ५२ ॥
मेघ मनु चक्रवती । नाना जीवांची उत्पति ।
आतां असो सांगों किती । विस्तार हा ॥ ५३ ॥
सकळ विस्ताराचें मूळ । ते मूळ मायाच केवळ ।
मागां निरोपिली सकळ । पंचभूतिक ॥ ५४ ॥
सूक्ष्मभूतें जे बोलिलीं । तेचि पुढें जडत्वा आलीं ।
ते सकळहि बोलिलीं । पुढिले समासीं ॥ ५५ ॥
पंचभूतें पृथकाकारें । पुढें निरोपिलीं विस्तारें ।
वोळखीकारणें अत्यादरें । श्रोतीं श्रवण करावीं ॥ ५६ ॥
पंचभूतिक ब्रह्मगोळ । जेणें कळे हा प्रांजळ ।
दृश्य सांडून केवळ । वस्तुच पाविजे ॥ ५७ ॥
माहाद्वार वोलांडावें । मग देवदर्शन घ्यावें ।
तैसें दृश्य हे। सांडावें । जाणोनियां ॥ ५८ ॥
म्हणोनि दृश्याचा पोटीं । आहे पंचभूतांची दाटी ।
येकपणें पडिली मिठी । दृश्य पंचभूतां ॥ ५९ ॥
एवं पंचभूतांचेंचि दृश्य । सृष्टी रचली सावकास ।
श्रोतीं करून अवकाश । श्रवण करावें ॥ ६० ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
सूक्ष्मपंचभूतेंनिरूपणनाम समास चवथा ॥ ४ ॥
 
 
समास पांचवा : स्थूळपंचमहाभूतेंस्वरूपाकाशभेदोनाम
॥ श्रीराम ॥
केवळ मूर्ख तें नेणे । म्हणौन घडलें सांगणे ।
पंचभूतांचीं लक्षणें । विशद करूनि ॥ १ ॥
पंचभूतांचा कर्दम जाला । आतां न वचे वेगळा केला ।
परंतु कांहीं येक वेगळाला । करून दाऊं ॥ २ ॥
पर्वत पाषाण शिळा शिखरें । नाना वर्णें लहान थोरें ।
खडे गुंडे बहुत प्रकारें । जाणिजे पृथ्वी ॥ ३ ॥
नाना रंगांची मृत्तिका । नाना स्थळोस्थळीं जे कां ।
वाळुकें वाळु अनेका । मिळोन पृथ्व

समास सहावा : दुश्चीतनिरूपण
॥ श्रीराम ॥
श्रोता विनवी वक्तयासी । सत्संगाची महिमा कैसी ।
मोक्ष लाभे कितां दिवसीं । हें मज निरोपावें ॥ १ ॥
धरितां साधूची संगती । कितां दिवसां होते मुक्ती ।
हा निश्चय कृपामुर्ती । मज दिनास करावा ॥ २ ॥
मुक्ती लाभे तत्क्षणीं । विश्वासतां निरूपणीं ।
दुश्चितपणीं हानी । होतसे ॥ ३ ॥
सुचितपणें दुश्चीत । मन होतें अकस्मात ।
त्यास करावें निवांत । कोणे परीं ॥ ४ ॥
मनाच्या तोडून वोढी । श्रवणीं बैसावें आवडीं ।
सावधपणें घडीनें घडी । काळ सार्थक करावा ॥ ५ ॥
अर्थ प्रमेय ग्रंथांतरीं । शोधून घ्यावें अभ्यांतरीं ।
दुश्चीतपण आलें तरी । पुन्हां श्रवण करावें ॥ ६ ॥
अर्थांतर पाहिल्यावीण । उगेंचि करी जो श्रवण ।
तो श्रोता नव्हे पाषण । मनुष्यवेषें ॥ ७ ॥
येथें श्रोते मानितील सीण । आम्हांस केलें पाषाण ।
तरी पाषाणाचें लक्षण । सावध ऐका ॥ ८ ॥
वांकुडा तिकडा फोडिला । पाषाण घडून नीट केला ।
दुसरे वेळेसी पाहिला । तरी तो तैसाचि असे ॥ ९ ॥
टांकीनें खपली फोडिली । ते मागुती नाहीं जडली ।
मनुष्याची कुबुद्धि झाडिली । तरी ते पुन्हा लागे ॥ १० ॥
सांगतां अवगुण गेला । पुन्हा मागुतां जडला ।
याकरणें माहांभला । पाषाणगोटा ॥ ११ ॥
ज्याचा अवगुण झडेना । तो पाषाणाहून उणा ।
पाषाण आगळा जाणा । कोटिगुणें ॥ १२ ॥
कोटिगुणें कैसा पाषाण । त्याचेंहि ऐका लक्षण ।
श्रोतीं करावें श्रवण । सावध होऊनी ॥ १३ ॥
माणीक मोतीं प्रवाळ । पाचि वैडुर्य वज्रनीळ ।
गोमेदमणी परिस केवळ । पाषाण बोलिजे ॥ १४ ॥
याहि वेगळे बहुत । सूर्यकांत सोमकांत ।
नाना मोहरे सप्रचित । औषधाकारणें ॥ १५ ॥
याहि वेगळे पाषाण भले । नाना तिर्थीं जे लागले ।
वापी कूप सेखीं जाले । हरिहरमुर्ती ॥ १६ ॥
याचा पाहातं विचार । पाषाणा ऐसें नाहीं सार ।
मनुष्य तें काये पामर । पाषाणापुढें ॥ १७ ॥
तरी तो ऐसा नव्हे तो पाषाण। जो अपवित्र निःकारण ।
तयासातिखा देह जाण । दुश्चीत अभक्तांचा ॥ १८ ॥
आतां असो हें बोलणें । घात होतो दुश्चीतपणें ।
दुश्चीतपणाचेनि गुणें । प्रपंच ना परमार्थ ॥ १९ ॥
दुश्चीतपणें कार्य नासे । दुश्चीतपणें चिंता वसे ।
दुश्चीतपणें स्मरण नसे । क्षण येक पाहातां ॥ २० ॥
दुश्चीतपणें शत्रुजिणें । दुश्चीतपणें जन्ममरणें ।
दुश्चीतपणाचेनि गुणें । हानी होय ॥ २१ ॥
दुश्चीतपणें नव्हे साधन । दुश्चीतपणें न घडे भजन ।
दुश्चीतपणें नव्हे ज्ञान । साधकांसी ॥ २२ ॥
दुश्चीतपणें नये निश्चयो । दुश्चीतपणें न घडे जयो ।
दुश्चीतपणें होये क्षयो । आपुल्या स्वहिताचा ॥ २३ ॥
दुश्चीतपणें न घडे श्रवण । दुश्चीतपणें न घडे विवरण ।
दुश्चीतपणें निरूपण । हातींचे जाये ॥ २४ ॥
दुश्चीत बैसलाचि दिसे । परी तो असतचि नसे ।
चंचळ चक्रीं पडिलें असे । मानस तयाचें ॥ २५ ॥
वेडें पिशाच्य निरंतर । अंध मुके आणी बधिर ।
तैसा जाणावा संसार । दुश्चीत प्राणियांचा ॥ २६ ॥
सावध असोन उमजेना । श्रवण असोन ऐकेना ।
ज्ञान असोन कळेना । सारासारविचार ॥ २७ ॥
ऐसा जो दुश्चीत आळसी । परलोक कैंचा त्यासी ।
जयाचे जिवीं अहर्निशीं । आळस वसे ॥ २८ ॥
दुश्चीतपणापासुनि सुटला । तरी तो सवेंच आळस आला ।
आळसाहातीं प्राणीयांला । उसंतचि नाहीं ॥ २९ ॥
आळसें राहिला विचार । आळसें बुडाला आचार ।
आळसे नव्हे पाठांतर । कांहीं केल्यां ॥ ३० ॥
आळसें घडेना श्रवण । आळसें नव्हें निरूपण ।
आळसें परमार्थाची खूण । मळिण जाली ॥ ३१ ॥
आळसें नित्यनेम राहिला । आळसें अभ्यास बुडाला ।
आळसें आळस वाढला । असंभाव्य ॥ ३२ ॥
आळसें गेली धारणा धृती । आळसें मळिण जाली वृत्ती ।
आळसें विवेकाची गती । मंद जाली ॥ ३३ ॥
आळसें निद्रा वाढली । आळसें वासना विस्तारली ।
आळसें सुन्याकार जाली । सद्बुद्धि निश्चयाची ॥ ३४ ॥
दुश्चीतपणासवें आळस । आळसें निद्राविळास ।
निद्राविळासें केवळ नास । आयुष्याचा ॥ ३५ ॥
निद्रा आळस दुश्चीतपण । हेंचि मूर्खाचें लक्षण ।
येणेंकरिता निरूपण । उमजेचिना ॥ ३६ ॥
हें तिन्ही लक्षणें जेथें । विवेक कैंचा असेल तेथें ।
अज्ञानास यापरतें । सुखचि नाहीं ॥ ३७ ॥
क्षुधां लागतांच जेविला । जेऊन उठतां आळस आला ।
आळस येतां निजेला । सावकास ॥ ३८ ॥
निजोन उठतांच दुश्चीत । कदा नाहीं सावचित ।
तेथें कैचें आत्महित । निरूपणीं ॥ ३९ ॥
मर्कटापासीं दिल्हें रत्न । पिशाच्याहातीं निधान ।
दुश्चीतापुढें निरूपण । तयापरी होये ॥ ४० ॥
आतां असो हे उपपत्ती । आशंकेची कोण गती ।
कितां दिवसाइं होते मुक्ती । सज्जनाचेनि संगें ॥ ४१ ॥
ऐका याचें प्रत्योत्तर । कथेंसि व्हावें निरोत्तर ।
संतसंगाचा विचार । ऐसा असे ॥ ४२ ॥
लोहो परियेसी लागला । थेंबुटा सागरीं मिळाला ।
गंगे सरिते संगम जाला । तत्क्षणीं ॥ ४३ ॥
सावध साक्षपी आणी दक्ष । तयास तत्काळचि मोक्ष ।
इतरांस तें अलक्ष । लक्षिलें नवचे ॥ ४४ ॥
येथें शिष्यप्रज्ञाच केवळ । प्रज्ञावंतां नलगे वेळे ।
अनन्यास तत्काळ । मोक्ष लाभे ॥ ४५ ॥
प्रज्ञावंत आणी अनन्य । तयास नलगे येक क्षण ।
अनन्य भावार्थेंविण । प्रज्ञा खोटी ॥ ४६ ॥
प्रज्ञेविण अर्थ न कळे । विश्वासेंविण वस्तु ना कळे ।
प्रज्ञाविश्वासें गळे । देहाभिमान ॥ ४७ ॥
देहाभिमानाचे अंतीं । सहजचि वस्तुप्राप्ती ।
सत्संगें सद्गती । विलंबचि नाही ॥ ४८ ॥
सावध साक्षपी विशेष । प्रज्ञावंत आणी विश्वास ।
तयास साधनीं सायास । करणेंचि नलगे ॥ ४९ ॥
इतर भाविक साबडे । तयांसहि साधनें मोक्ष जोडे ।
साधुसंगें तत्काळ उडे । विवेकदृष्टी ॥ ५० ॥
परी तें साधन मोडुं नये । निरूपणाचा उपाये ।
निरूपणें लागे सोय । सर्वत्रांसी ॥ ५१ ॥
आतां मोक्ष आहे कैसा । कैसी स्वरूपाची दशा ।
त्याचे प्राप्तीचा भर्वसा । सत्संगें केवी ॥ ५२ ॥
ऐसें निरूपण प्रांजळ । पुढें बोलिलें असे सकळ ।
श्रोतीं होऊनियां निश्चळ । अवधान द्यावें ॥ ५३ ॥
अवगुण त्यागावयाकारणें । न्यायनिष्ठुर लागे बोलणें ।
श्रोतीं कोप न धरणें । ऐसिया वचनाचा ॥ ५४ ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे दुश्चीतनिरूपणनाम समास सहावा ॥
 
 
 
समास सातवा : मोक्षलक्षण
॥ श्रीराम ॥
मागां श्रोतयांचा पक्ष । कितां दिवसां होतो मोक्ष ।
तेचि कथा श्रोते दक्ष । होऊन ऐका ॥ १ ॥
मोक्षास कैसें जाणावें । मोक्ष कोणास म्हणावें ।
संतसंगें पावावें । मोक्षास कैसें ॥ २ ॥
तरी बद्ध म्हणिजे बांधला । आणि मोक्ष म्हणिजे मोकळा जाला ।
तो संतसंगें कैसा लाधला । तेंचि ऐका ॥ ३ ॥
प्राणी संकल्पें बांधला । जीवपणें बद्ध जाला ।
तो विवेकें मुक्त केला । साधुजनीं ॥ ४ ॥
मी जीव ऐसा संकल्प । दृढ धरितां गेले कल्प ।
तेणें प्राणी जाला अल्प । देहबुद्धीचा ॥ ५ ॥
मी जीव मज बंधन । मज आहे जन्ममरण ।
केल्या कर्माचें फळ आपण । भोगीन आतां ॥ ६ ॥
पापाचें फळ तें दुःख । आणी पुण्याचें फळ तें सुख ।
पापपुण्य अवश्यक । भोगणें लागे ॥ ७ ॥
पापपुण्य भोग सुटेना । आणी गर्भवासहि तुटेना ।
ऐसी जयाची कल्पना । दृढ जाली ॥ ८ ॥
तया नाव बांधला। जीवपणें बद्ध जाला ।
जैसा स्वयें बांधोन कोसला । मृत्यु पावे ॥ ९ ॥
तैसा प्राणी तो अज्ञान । नेणें भगवंताचें ज्ञान ।
म्हणे माझें जन्ममरण । सुटेचिना ॥ १० ॥
आतां कांहीं दान करूं । पुढिलया जन्मास आधारु ।
तेणें सुखरूप संसारु । होईल माझा ॥ ११ ॥
पूर्वीं दान नाहीं केलें । म्हणोन दरिद्र प्राप्त जालें ।
आतां तरी कांहीं केलें । पाहिजे कीं ॥ १२ ॥
म्हणौनी दिलें वस्त्र जुनें । आणी येक तांब्र नाणें ।
म्हणे आतां कोटिगुणें । पावेन पुढें ॥ १३ ॥
कुशावर्तीं कुरुक्षेत्रीं । महिमा ऐकोन दान करी ।
आशा धरिली अभ्यांतरीं । कोटिगुणांची ॥ १४ ॥
रुका आडका दान केला । अतितास टुक्डा घातला ।
म्हणे माझा ढीग जाला । कोटि टुकड्यांचा ॥ १५ ॥
तो मी खाईन पुढिलिये जन्मीं । ऐसें कल्पीं अंतर्यामीं ।
वासना गुंतली जन्मकर्मीं । प्राणीयांची ॥ १६ ॥
आतां मी जें देईन । तें पुढिले जन्मीं पावेन ।
ऐसें कल्पी तो अज्ञान । बद्ध जाणावा ॥ १७ ॥
बहुतां जन्माचे अंतीं । होये नरदेहाची प्राप्ती ।
येथें न होतां ज्ञानें सद्गती । गर्भवस चुकेना ॥ १८ ॥
गर्भवास नरदेहीं घडे । ऐसें हें सर्वथा न घडे ।
अकस्मात भोगणें पडे । पुन्हा नीच योनी ॥ १९ ॥
ऐसा निश्चयो शास्त्रांतरीं । बहुतीं केला बहुतांपरीं ।
नरदेह संसारीं । परम दुल्लभ असे ॥ २० ॥
पापपुण्य समता घडे । तरीच नरदेह जोडे ।
येरवीं हा जन्म न घडे । हें व्यासवचन भागवतीं ॥ २१ ॥
॥ श्लोक ॥ नरदेहमाद्यं सुलभं सुदुर्लभं । प्लवं सुकल्पं गुरुकर्णधारं ।
मायानुकुलेन नभस्वतेरितं । पुमान्भबाब्धिं न तरेत्स आत्महा ॥
नरदेह दुल्लभ । अल्प संकल्पाचा लाभ ।
गुरु कर्णधारी स्वयंभ । सुख पाववी ॥ २२ ॥
दैव अनुकुळ नव्हे जया । स्वयें पापी तो प्राणीया ।
भवब्धी न तरवे तया । आत्महत्यारा बोलिजे ॥ २३ ॥
ज्ञानेंविण प्राणीयांसी । जन्ममृत्य लक्ष चौर्यासी ।
तितुक्या आत्महत्या त्यासी । म्हणोन आत्महत्यारा ॥ २४ ॥
नरदेहीं ज्ञानेंविण । कदा न चुके जन्ममरण ।
भोगणें लागती दारुण । नाना नीच योनी ॥ २५ ॥
रीस मर्कट श्वान सूकर । अश्व वृषभ म्हैसा खर ।
काक कुर्कूट जंबुक मार्जर । सरड बेडुक मक्षिका ॥ २६ ॥
इत्यादिक नीच योनी । ज्ञान नस्तां भोगणें जनीं ।
आशा धरी मुर्ख प्राणी ॥ पुढिलिया जन्माची ॥ २७ ॥
हा नरदेह पडतां । तोंचि पाविजे मागुतां ।
ऐसा विश्वास धरिजां । लाज नाहीं ॥ २८ ॥
कोण पुण्याच संग्रहू । जे पुन्हा पाविजे नरदेहो ।
दुराशा धरिली पाहो । पुढिलिया जन्माची ॥ २९ ॥
ऐसा मुर्ख अज्ञान जन । केलें संकल्पें बंधन ।
शत्रु आपणासि आपण । होऊन ठेला ॥ ३० ॥
॥ श्लोक ॥ अत्मैव ह्यात्मनो बंधुरात्मैव रिपुरात्मनः ।
ऐसे संकल्पाचें बंधन । संतसंगे तुटे जाण ।
ऐक तयाचें लक्षण । सांगिजेल ॥ ३१ ॥
पांचा भूतांचें शरीर । निर्माण जालें सचराचर ।
प्रकृतिस्वभावें जगदाकार । वर्तों लागे ॥ ३२ ॥
देह अवस्ता अभिमान । स्थानें भोग मात्रा गुण ।
शक्ती आदिकरुन लक्षण । चौपुटी तत्वांचें ॥ ३३ ॥
ऐसी पिंडब्रह्मांड रचना । विस्तारें वाढली कल्पना ।
निर्धारितां तत्वज्ञाना । मतें भांबावलीं ॥ ३४ ॥
नाना मतीं नाना भेद । भेदें वाढती वेवाद ।
परी तो ऐक्यतेचा संवाद । साधु जाणती ॥ ३५ ॥
तया संवादाचे लक्षण । पंचभूतिक देह जाण ।
त्या देहामधें कारण । आत्मा वोळखावा ॥ ३६ ॥
देह अंती नासोन जाये । त्यास आत्मा म्हणों नये ।
नाना तत्वांचा समुदाय । देहामधें आला ॥ ३७ ॥
अंतःकर्ण प्राणादिक । विषये इंद्रियें दशक ।
हा सूक्ष्माच विवेक । बोलिला शास्त्रीं ॥ ३८ ॥
घेतां सूक्ष्माची शुद्धी । भिन्न अंतःकरण मन बुद्धी ।
नाना तत्वांचे उपाधी । वेगळा आत्मा ॥ ३९ ॥
स्थूळ सूक्ष्म कारण । माहाकारण विराट हिरण्य ।
अव्याकृत मूळप्रकृति जाण । ऐसे अष्टदेह ॥ ४० ॥
च्यारी पिंडी च्यारी ब्रह्मांडीं । ऐसी अष्टदेहाची प्रौढी ।
प्रकृती पुरुषांची वाढी । दशदेह बोलिजे ॥ ४१ ॥
ऐसें तत्वांचे लक्षण । आत्मा साक्षी विलक्षण ।
कार्य कर्ता कारण । दृश्या तयाचें ॥ ४२ ॥
जीवशिव पिंडब्रह्मांड । मायेअविद्येचें बंड ।
हें सांगता असे उदंड । परी आत्मा तो वेगळा ॥ ४३ ॥
पाहों जातां आत्मे च्यारी । त्यांचे लक्षण अवधारीं ।
हें जाणोनि अभ्यांतरीं । सदृढ धरावें ॥ ४४ ॥
एक जीवात्मा दुसरा शिवात्मा । तिसरा परमात्मा जो विश्वात्मा ।
चौथा जाणिजे निर्मळात्मा । ऐसे च्यारी आत्मे ॥ ४५ ॥
भेद उंच नीच भासती । परी च्यारी एकचि असती ।
येविषीं दृष्टांत संमती। सावध ऐका ॥ ४६ ॥
घटाकाश मठाकाश । महदाकाश चिदाकाश ।
अवघे मिळोन आकाश । येकचि असे ॥ ४७ ॥
तैसा जीवात्मा आणि शिवात्मा । परमात्मा आणी निर्मळाता ।
अवघा मिळोन आत्मा । येकचि असे ॥ ४८ ॥
घटीं व्यापक जें आकाश । तया नाव घटाकाश ।
पिंडी व्यापक ब्रह्मांश । त्यास जीवात्मा बोलिजे ॥ ४९ ॥
मठीं व्यापक जें आकाश । तया नाव मठाकाश ।
तैसा ब्रह्मांडीं जो ब्रह्मांश । त्यास शिवात्मा बोलिजे ॥ ५० ॥
मठाबाहेरील आकाश । तयाअ नांव महदाकाश ।
ब्रह्मांडाबाहेरील ब्रह्मांश । त्यास परमात्मा बोलिजे ॥ ५१ ॥
उपधीवेगळें आकाश । तया नाव चिदाकाश ।
तैसा निर्मळात्मा परेश । तो उपधिवेगळा ॥ ५२ ॥
उपाधियोगें वाटे भिन्न । परी तें आकाश अभिन्न ।
तैसा अत्मा स्वानंदघन । येकचि असे ॥ ५३ ॥
दृश्या सबाह्य अंतरीं । सूक्ष्मात्मा निरंतरीं ।
त्याचि वर्णावया थोरी । शेष समर्थ नव्हे ॥ ५४ ॥
ऐसे आत्म्याचें लक्षण । जाणतां नाहीं जीवपण ।
उपाधी शोधतां अभिन्न । मुळींच आहे ॥ ५५ ॥
जीवपणें येकदेसी । अहंकारें जन्म सोसी ।
विवेक पाहतां प्राणीयांसी । जन्म कैंचा ॥ ५६ ॥
जन्ममृत्यापासून सुटला । या नाव जाणिजे मोक्ष जाला ।
तत्वें शोधितां पावला । तत्वता वस्तु ॥ ५७ ॥
तेचि वस्तु ते आपण । हें माहावाक्याचें लक्षण ।
साधु करीती निरूपण । आपुलेन मुखें ॥ ५८ ॥
जेचि क्षणी अनुग्रह केला । तेचि क्षणीं मोक्ष जाला ।
बंधन कांहीं आत्मयाला । बोलोंचि नये ॥ ५९ ॥
आतां आशंका फिटली । संदेहवृत्ती मावळली ।
संतसंगें तत्काळ जाली । मोक्षपदवी ॥ ६० ॥
स्वप्नामधें जो बांधला । तो जागृतीनें मोकळा केला ।
ज्ञानविवेकें प्राणीयाला । मोक्षप्राप्ती ॥ ६१ ॥
अज्ञाननिसीचा अंतीं । संकल्पदुःखें नासती ।
तेणें गुणें होये प्राप्ती । तत्काळ मोक्षाची ॥ ६२ ॥
तोडावया स्वप्नबंधन । नलगे आणिक साधन ।
तयास प्रेत्न जागृतीवीण । बोलोंचि नये ॥ ६३ ॥
तैसा संकल्पें बांधला जीव । त्यास आणिक नाही उपाव ।
विवेक पाहतां वाव । बंधन होये ॥ ६४ ॥
विवेक पाहिल्याविण । जो जो उपाव तो तो सीण ।
विवेक पाहातां आपण । आत्माच असे ॥ ६५ ॥
आत्मयाचा ठांई कांहीं । बद्ध मोक्ष दोनी नाहीं ।
जन्ममृत्य हें सर्वहि । आत्मत्वीं न घडे ॥ ६६ ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे मोक्षलक्षणनाम समास सातवा ॥ ७ ॥
 
 
 
समास आठवा : आत्मदर्शन
॥ श्रीराम ॥
 
मागां जाले निरूपण । परमात्मा तो तूंचि जाण ।
तया परमात्मयाचें लक्षण । तें हें ऐसें असे ॥ १ ॥
जन्म नाही मृत्यु नाहीं । येणें नाहीं जाणें नाहीं ।
बद्ध मोक्ष दोनी नाहीं । परमात्मयासी ॥ २ ॥
परमात्मा निर्गुण निराकार । परमात्मा अनंत अपार ।
पर्मात्मा नित्य निरंतर । जैसा तैसा ॥ ३ ॥
पर्मात्मा सर्वांस व्यापक । परमात्मा अनेकीं येक ।
परमात्मयाचा विवेक । अतर्क्य आहे ॥ ४ ॥
ऐसी परमात्मयाची स्थिती । बोलताती वेद श्रुती ।
परमात्मा पाविजे भक्तीं । येथें संशय नाही ॥ ५ ॥
तये भक्तीचें लक्षण । भक्ती नवविधा भजन ।
नवविधा भजनें पावन । बहु भक्त जाले ॥ ६ ॥
तया नवविधामध्यें सार । आत्मनिवेदन थोर ।
तयेचा करावा विचार । स्वानुभवें स्वयें ॥ ७ ॥
आपुलिया स्वानुभवें । आपणास निवेदावें ।
आत्मनिवेदन जाणावें । ऐसें असे ॥ ८ ॥
महत्पूजेचा अंतीं । देवास मस्तक वाहाती ।
तैसी आहे निकट भक्ती । आत्मनिवेदनाची ॥ ९ ॥
आपणांस निवेदिती । ऐसे भक्त थोडे असती ।
तयांस परमात्मा मुक्ती । तत्काळ देतो ॥ १० ॥
आपणांस कैसें निवेदावें । कोठें जाऊन पडावें ।
किंवा मस्तक तोडावें । देवापुढें ॥ ११ ॥
ऐसें ऐकोन बोलणें । वक्ता वदे सर्वज्ञपणें ।
श्रोतां सावधान होणें । येकाग्र चित्तें ॥ १२ ॥
आत्मनिवेदनाचें लक्षण । आधीं पाहावें मी कोण ।
मग परमात्मा निर्गुण । तो वोळखावा ॥ १३ ॥
देवभक्ताचें शोधन । करितां होतें आत्मनिवेदन ।
देव आहे पुरातन । भक्त पाहे ॥ १४ ॥
देवास वोळखों जातां । तेथें जाली तद्रूपता ।
देवभक्तविभक्तता । मुळींच नाहीं ॥ १५ ॥
विभक्त नाहीं म्हणोन भक्त । बद्ध नाहीं म्हणोन मुक्त ।
अयुक्त नाहीं बोलणें युक्त । शास्त्राधारें ॥ १६ ॥
देवाभक्ताचें पाहातां मूळ । होये भेदाचें निर्मूळ ।
येक परमात्मा सकळ । दृश्यावेगळा ॥ १७ ॥
तयासि होतां मिळणी । उरी नाहीं दुजेपणीं ।
देवभक्त हे कडसणी । निरसोन गेली ॥ १८ ॥
आत्मनिवेदनाचे अंतीं । जे कां घडली अभेदभक्ती ।
तये नाव सायोज्यमुक्ती । सत्य जाणावी ॥ १९ ॥
जो संतांस शरण गेला । अद्वैतनिरूपणें बोधला ।
मग जरी वेगळा केला । तरी होणार नाहीं ॥ २० ॥
नदीं मिळाली सागरीं । ते निवडावी कोणेपरी ।
लोहो सोनें होतां माघारी । काळिमा न ये ॥ २१ ॥
तैसा भगवंतीं मिळाला । तो नवचे वेगळा केला ।
देव भक्त आपण जाला । विभक्त नव्हे ॥ २२ ॥
देव भक्त दोनी येक । ज्यासी कळला विवेक ।
साधुजनीं मोक्षदायेक । तोचि जाणावा ॥ २३ ॥
आतां असो हें बोलणें । देव पाहावा भक्तपणें ।
तेणें त्यांचें ऐश्वर्य बाणे । तत्काळ आंगीं ॥ २४ ॥
देहचि होऊन राहिजे । तेणें देहदुःख साहिजे ।
देहातीत होतां पाविजे । परब्रह्म तें ॥ २५ ॥
देहातीत कैसें होणें । कैसें परब्रह्म पावणें ।
ऐश्वर्याची लक्षणें । कवण सांगिजे ॥ २६ ॥
ऐसें श्रोतां आक्षेपिलें । याचे उत्तर काये बोलिलें ।
तेंचि आतां निरोपिलें । सावध ऐका ॥ २७ ॥
देहातीत वस्तु आहे । तें तूं परब्रह्म पाहें ।
देहसंग हा न साहे । तुज विदेहासी ॥ २८ ॥
ज्याची बुद्धी होये ऐसी । वेद वर्णिती तयासी ।
शोधितां नाना शास्त्रांसी । न पडे ठांई ॥ २९ ॥
ऐश्वर्य ऐसें तत्वता । बाणें देहबुद्धि सोडितां
देह मी ऐसें भावितां । अधोगती ॥ ३० ॥
याकारणें साधुवचन । मानूं नये अप्रमाण ।
मिथ्या मानितां दूषण । लागों पाहे ॥ ३१ ॥
साधुवचन तें कैसें । काये धरावें विश्वासें ।
येक वेळ स्वामी ऐसें । मज निरोपावें ॥ ३२ ॥
सोहं आत्मा स्वानंदघन । अजन्मा तो तूंचि जाण ।
हेंचि साधूचें वचन । सदृढ धरावें ॥ ३३ ॥
महावाक्याचें अंतर । तुंचि ब्रह्म निरंतर ।
ऐसिया वचनाचा विसर । पडोंचि नये ॥ ३४ ॥
देहासि होईल अंत । मग मी पावेन अनंत ।
ऐसें बोलणें निभ्रांत । मानूंचि नये ॥ ३५ ॥
येक मुर्ख ऐसें म्हणती । माया नासेल कल्पांतीं ।
मग आम्हांस ब्रह्मप्राप्ती । येरवीं नाहीं ॥ ३६ ॥
मायेसी होईल कल्पांत । अथवा देहासी येईल अंत ।
तेव्हां पावेन निवांत । परब्रह्म मी ॥ ३७ ॥
हें बोलणें अप्रमाण । ऐसें नव्हे समाधान ।
समाधानाचें लक्षण । वेगळेंचि असे ॥ ३८ ॥
शैन्य अवघेंचि मरावें । मग राज्यपद प्राप्त व्हावें ।
शैन्य अस्तांचि राज्य करावें । हें कळेना ॥ ३९ ॥
माया असोनिच नाहीं । देह असतांच विदेही ।
ऐसें समाधान कांहीं । वोळखावें ॥ ४० ॥
राज्यपद हातासी आलें । मग परिवारें काय केलें ।
परिवारा देखतां राज्य गेलें । हें तों घडेना ॥ ४१ ॥
प्राप्त जालियां आत्मज्ञान । तैसें दृश्य देहभान ।
दृष्टीं पडतां समाधान । जाणार नाही ॥ ४२ ॥
मार्गीं मूळी सर्पाकार । देखतां भये आलें थोर ।
कळतां तेथील विचार । मग मारणें काये ॥ ४३ ॥
तैसी माया भयानक । विचार पाहातां माईक ।
मग तयेचा धाक । कायसा धरावा ॥ ४४ ॥
देखतां मृगजळाचे पूर । म्हणे कैसा पावों पैलपार ।
कळतां तेथीचा विचार । सांकडें कैंचें ॥ ४५ ॥
देखतां स्वप्न भयानक । स्वप्नीं वाटे परम धाक ।
जागृती आलीयां साशंक । कासया व्हावें ॥ ४६ ॥
तथापी माया कल्पनेसी दिसे । आपण कल्पनेतीत असे ।
तेथें उद्वेग काईसे । निर्विकल्पासी ॥ ४७ ॥
अंतीं मतीं तेचि गती । ऐसें सर्वत्र बोलती ।
तुझा अंतीं तुझी प्राप्ती । सहजचि जाली ॥ ४८ ॥
चौंदेहाचा अंत । आणी जन्म मुळाचा प्रांत ।
अंतांप्रांतासी अलिप्त । तो तुं आत्मा ॥ ४९ ॥
जयासी ऐसी आहे मती । तयास ज्ञानें आत्मगती ।
गती आणी अवगती । वेगळाचि तो ॥ ५० ॥
मति खुंटली वेदांची । तेथें गती आणी अवगती कैंची ।
आत्मशास्त्रगुरुप्रचिती । ऐक्यता आली ॥ ५१ ॥
जीवपणाची फिटली भ्रांती । वस्तु आली आत्मप्रचिती ।
प्राणी पावला उत्तमगती । सद्गुरुबोधें ॥ ५२ ॥
सद्गुरुबोध जेव्हां जाला । चौंदेहांस अंत आला ।
तेणें निजध्यास लागला । सस्वरूपीं ॥ ५३ ॥
तेणें निजध्यासें प्राणी । धेयंचि जाला निर्वाणीं ।
सायोज्यमुक्तीचा धनी । होऊन बैसला ॥ ५४ ॥
दृश्य पदार्थ वोसरतां । आवघा आत्माचि तत्वता ।
नेहटून विचारें पहातां । दृश्य मुळींच नाहीं ॥ ५५ ॥
मिथ्या मिथ्यत्वें पाहिलें । मिथ्यापणें अनुभवा आलें ।
श्रोतीं पाहिजे ऐकिलें । या नाव मोक्ष ॥ ५६ ॥
सद्गुरुवचन हृदईं धरी । तोचि मोक्षाचा अधिकारी ।
श्रवण मनन केलेंचि करी । अत्यादरें ॥ ५७ ॥
जेथें आटती दोन्ही पक्ष । तेथें लक्ष ना अलक्ष ।
या नाव जाणिजे मोक्ष । नेमस्त आत्मा ॥ ५८ ॥
जेथें ध्यान धारणा सरे । कल्पना निर्विकल्पीं मुरे ।
केवळ ज्ञेप्तिमात्र उरे । सूक्ष्म ब्रह्म ॥ ५९ ॥
भवमृगजळ आटलें । लटिकें बंधन सुटलें ।
अजन्म्यास मुक्त केलें । जन्मदुःखापासुनी ॥ ६० ॥
निःसंगाची संगव्याधी । विदेहाची देहबुद्धी ।
विवेकें तोडिली उपाधी । निःप्रपंचाची ॥ ६१ ॥
अद्वैताचें तोडिलें द्वैत । येकांतास दिला एकांत ।
अनंतास दिला अंत । अनंताचा ॥ ६२ ॥
जागृतीस चेवविलें । चेईर्यास सावध केलें ।
निजबोधास प्रबोधिलें । आत्मज्ञान ॥ ६३ ॥
अमृतास केलें अमर । मोक्षास मुक्तीचें घर ।
संयोगास निरंतर । योग केला । ६४ ॥
निर्गुणास निर्गुण केलें । सार्थकाचें सार्थक जालें ।
बहुतां दिवसां भेटलें । आपणासि आपण ॥ ६५ ॥
तुटला द्वैताचा पडदा । अभेदें तोडिलें भेदा ।
भूतपंचकाची बाधा । निरसोन गेली ॥ ६६ ॥
जालें साधनाचें फळ । निश्चळास केलें निश्चळ ।
निर्मळाचा गेला मळ । विवेकबळें ॥ ६७ ॥
होतें सन्निध चुकलें । ज्याचें त्यास प्राप्त जालें ।
आपण देखतां फिटलें । जन्मदुःख ॥ ६८ ॥
दुष्टस्वप्नें जाजावला । ब्रह्मण नीच याती पावला ।
आपणांसी आपण सांपडला । जागेपणें ॥ ६९ ॥
ऐसें जयास जालें ज्ञान । तया पुरुषाचें लक्षण ।
पुढिले समासीं निरूपण । बोलिलें असे ॥ ७० ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे आत्मदर्शननाम समास आठवा ॥ ८ ॥
 
 
समास नववा : सिद्धलक्षण
॥ श्रीराम ॥
अंतरी गेलीयां अमृत । बाह्या काया लखलखित ।
अंतरस्थिति बाणतां संत । लक्षणें कैसीं ॥ १ ॥
जालें आत्मज्ञान बरवें । हे कैसेनि पां जाणावें ।
म्हणौनि बोलिलीं स्वभावें । साधुलक्षणें ॥ २ ॥
ऐक सिद्धांचे लक्षण । सिद्ध म्हणिजे स्वरूप जाण ।
तेथें पाहातां वेगळेपण । मुळीच नाहीं ॥ ३ ॥
स्वरूप होऊन राहिजे । तया नाव सिद्ध बोलिजे ।
सिद्धस्वरूपींच साजे । सिद्धपण ॥ ४ ॥
वेदशास्त्रीं जें प्रसिद्ध । सस्वरूप स्वतसिद्ध ।
तयासिच बोलिजे सिद्ध । अन्यथा न घडे ॥ ५ ॥
तथापी बोलों काहीं येक । साधकास कळाया विवेक ।
सिद्धलक्षणाचें कौतुक । तें हें ऐसें असे ॥ ६ ॥
अंतरस्थित स्वरूप जाली । पुढें काया कैसी वर्तली ।
जैसी स्वप्नीची नाथिली । स्वप्नरचना ॥ ७ ॥
तथापि सिद्धांचें लक्षण । कांहीं करूं निरूपण ।
जेणें बाणे अंतर्खूण । परमार्थाची ॥ ८ ॥
सदा स्वरूपानुसंधान। हें मुख्य साधूचें लक्षण ।
जनीं असोन आपण । जनावेगळा ॥ ९ ॥
स्वरूपीं दृष्टी पडतां । तुटोन गेली संसारचिंता ।
पुढें लागली ममता । निरूपणाची ॥ १० ॥
हें साधकाचें लक्षण । परी सिद्धाआंगीं असे जाण ।
सिद्धलक्षण साधकेंविण । बोलोंच नये ॥ ११ ॥
बाह्य साधकाचें परी । आणी स्वरूपाकार अंतरीं ।
सिद्धलक्षण चतुरीं । जाणिजे ऐसें ॥ १२ ॥
संदेहरहीत साधन । तेचि सिद्धांचे लक्षण ।
अंतर्बाह्य समाधान । चळेना ऐसें ॥ १३ ॥
अचळ जाली अंतरस्थिती । तेथें चळणास कैची गती ।
स्वरूपीं लागतां वृत्ती । स्वरूपचि जाली ॥ १४ ॥
मग तो चळतांच अचळ । चंचळपणें निश्चळ ।
निश्चळ असोन चंचळ । देह त्याचा ॥ १५ ॥
स्वरूपीं स्वरूपचि जाला । मग तो पडोनिच राहिला ।
अथवा उठोनि पळाला । तरी चळेना ॥ १६ ॥
येथें कारण अंतरस्थिती । अंतरींच पाहिजे निवृत्ती ।
अंतर लागलें भगवंतीं । तोचि साधु ॥ १७ ॥
बाह्य भलतैसें असावे । परी अंतर स्वरूपीं लागावें ।
लक्षणे दिसती स्वभावें । साधुआंगीं ॥ १८ ॥
राजीं बैसतां अवलिळा । आंगीं बाणे राजकळा ।
स्वरूपीं लागतां जिव्हाळा । लक्षणे बाणती ॥ १९ ॥
येरव्ही अभ्यास करितां । हाता न चढती सर्वथा ।
स्वरूपीं राहावें तत्त्वतां । स्वरूप हौनी ॥ २० ॥
अभ्यासाचा मुगुटमणी । वृत्ती राहावी निर्गुणीं ।
संतसंगें निरूपणीं । स्थिती बाणे ॥ २१ ॥
ऐसीं लक्षणें बरवीं । स्वरूपाकारें अभ्यासावीं ।
स्वरूप सोडितां गोसावी । भांबावती ॥ २२ ॥
आतां असो हें बोलणें । ऐका साधूची लक्षणें ।
जेणें समाधान बाणे । साधकाअंगीं ॥ २३ ॥
स्वरूपीं भरतां कल्पना । तेथें कैंची उरेल कामना ।
म्हणौनियां सधुजना । कामचि नाहीं ॥ २४ ॥
कल्पिला विषयो हातींचा जावा । तेणें गुणें क्रोध यावा ।
साधुजनाचा अक्षै ठेवा । जाणार नाहीं ॥ २५ ॥
म्हणोनि ते क्रोधरहित । जाणती स्वरूप संत ।
नासिवंत हे पदार्थ । सांडुनिया ॥ २६ ॥
जेथें नाहीं दुसरी परी । क्रोध यावा कोणावरी ।
क्रोधरहित चराचरीं । साधुजन वर्तती ॥ २७ ॥
आपुला आपण स्वानंद । कोणावरी करावा मद ।
याकारणें वादवेवाद । तुटोन गेला ॥ २८ ॥
साधु स्वरूप निर्विकार । तेथें कैंचा तिरस्कार ।
आपला आपण मत्सर । कोणावरी करावा ॥ २९ ॥
साधु वस्तु अनायासें । याकारणें मत्सर नसे ।
मदमत्सराचें पिसें । साधुसी नाहीं ॥ ३० ॥
साधु स्वरूप स्वयंभ । तेथें कैंचा असेल दंभ ।
जेथेन् द्वैताचा आरंभ जालाच नाही ॥ ३१ ॥
जेणें दृष्य केलें विसंच । तयास कैंचा हो प्रपंच ।
याकारणें निःप्रपंच । साधु जाणावा ॥ ३२ ॥
अवघें ब्रह्मांड त्याचे घर । पंचभूतिक हा जोजार ।
मिथ्या जाणोन सत्वर । त्याग केला ॥ ३३ ॥
याकारणें लोभ नसे । साधु सदा निर्लोभ असे ।
जयाची वासना समरसे । शुद्धस्वरूपीं ॥ ३४ ॥
आपुला आपण आघवा । स्वार्थ कोणाचा करावा ।
म्हणोनि साधु तो जाणावा । शोकरहित ॥ ३५ ॥
दृष्य सांडुन नासिवंत । स्वरूप सेविलें शाश्वत ।
याकारणें शोकरहित । साधु जाणावा ॥ ३६ ॥
शोकें दुखवावी वृत्ती । तरी ते जाहली निवृत्ती ।
म्हणोनि साधु आदिअंतीं । शोकरहीत ॥ ३७ ॥
मोहें झळंबावें मन । तरी तें जाहालें उन्मन ।
याकारणें साधुजन । मोहातीत ॥ ३८ ॥
सधु वस्तु अद्वये । तेथें वाटेल भये ।
परब्रह्म तें निर्भये । तोचि साधु ॥ ३९ ॥
याकारणें भयातीत । साधु निर्भय निवांत ।
सकळांस मांडेल अंत । साधु अनंतरूपी ॥ ४० ॥
सत्यस्वरूपें अमर जाला । भये कैंचें वाटेल त्याला ।
याकारणें साधुजनाला । भयेचि नाहीं ॥ ४१ ॥
जेथें नाहीं द्वंद्वभेद । आपला आपण अभेद ।
तेथें कैंचा उठेल खेद । देहबुद्धीचा ॥ ४२ ॥
बुद्धिनें नेमिलें निर्गुणा । त्यास कोणीच नेईना ।
याकारणें साधुजना । खेदचि नाहीं ॥ ४३ ॥
आपण एकला ठाईचा । स्वार्थ करावा कोणाचा ।
दृष्य नसतां स्वार्थाचा । ठावचि नाहीं ॥ ४४ ॥
साधु आपणचि येक । तेथें कैंचा दुःखशोक ।
दुजेविण अविवेक । येणार नाहीं ॥ ४५ ॥
आशा धरितां परमार्थाची । दुराशा तुटली स्वार्थाची ।
म्हणोनि नैराशता साधूची । वोळखण ॥ ४६ ॥
मृदपणें जैसे गगन । तैसें साधुचें लक्षण ।
याकरणें साधुवचन । कठीण नाहीं ॥ ४७ ॥
स्वरूपाचा संयोगीं । स्वरूपचि जाला योगी ।
याकरणें वीतरागी । निरंतर ॥ ४८ ॥
स्थिती बाणतां स्वरूपाची । चिंता सोडीली देहाची ।
याकरणें होणाराची । चिंता नसे ॥ ४९ ॥
स्वरूपीं लागतां बुद्धी । तुटे अवघी उपाधी ।
याकारणें निरोपाधी । साधुजन ॥ ५० ॥
साधु स्वरूपींच राहे । तेथें संगचि न साहे ।
म्हणोनि साधु तो न पाहे । मानापमान ॥ ५१ ॥
अलक्षास लावी लक्ष । म्हणोनि साधु परम दक्ष ।
वोढूं जाणती कैपक्ष । परमार्थाचा ॥ ५२ ॥
स्वरूपीं न साहे मळ । म्हणोनि साधु तो निर्मळ ।
साधु स्वरूपचि केवळ । म्हणोनियां ॥ ५३ ॥
सकळ धर्मामधें धर्म । स्वरूपीं राहाणें हा स्वधर्म ।
हेंचि जाणें मुख्य वर्म । साधुलक्षणाचें ॥ ५४ ॥
धरीतां साधूची संगती । आपषाच लागे स्वरूपस्थिती ।
स्वरूपस्थितीनें बाणती । लक्षणें आंगीं ॥ ५५ ॥
ऐसीं साधूचीं लक्षणें । आंगीं बाणती निरूपणें ।
परंतु स्वरूपीं राहाणें । निरंतर ॥ ५६ ॥
निरंतर स्वरूपीं साहातां । स्वरूपचि होईजे तत्त्वतां ।
मग लक्षणें आंगीं बाणतां । वेळ नाहीं ॥ ५७ ॥
स्वरूपीं राहिल्यां मती । अवगुण अवघेचि साडती ।
परंतु यासी सत्संगती । निरूपण पाहिजे ॥ ५८ ॥
सकळ सृष्टीचा ठाईं । अनुभव येकचि नाहीं ।
तो बोलिजेल सर्वहि । पुढि

संबंधित माहिती

।। श्री दत्तगुरूंची आरती ।।

श्रीदत्त क्षेत्र औदुंबर Shri Datta Kshetra Audumbar

दत्त जयंती विशेष रेसिपी : दत्तगुरूंना आवडणारी घेवड्याची भाजी

दत्तमाला कर्णांकित माघ माहात्म्य

श्रीदत्तात्रेयाष्टोत्तरशतनामावली श्री दत्तात्रेय 108 नाम

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

पुढील लेख