Webdunia - Bharat's app for daily news and videos
Install App
✕
महाराष्ट्र माझा
धर्म संग्रह
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
स्कोअरकार्ड
वेळापत्रक
आयसीसी रँकिंग
क्रीडा जग
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
धर्म संग्रह
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक
ज्योतिष
लाईफस्टाईल
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
दत्तमाला कर्णांकित माघ माहात्म्य
Webdunia
शनिवार, 14 डिसेंबर 2024 (06:12 IST)
माला १ ते ५०
श्री गणेशाय नम: । श्रीसरस्वत्यै नम: ।
श्रीकुलदेवतायै नम: । श्रीगुरुभ्यो नम: ।
ॐ कारसद्रस पाजुनी । आवृत्तिरोग निरसुनी
टाकिला ज्या गुरुवैद्यानीं । त्यांला ध्यानीं आणूं नित्य ॥१॥
न चले कोणाचें औषध । व्यर्थ झाले यत्न विविध ।
असाध्य तो रोगबाध । प्रणवबोधरसे केला ॥२॥
मोघ होता अन्योपाय । भावें धरिले म्यां पाय ।
प्रीत होवुनि गुरुमाय । सर्वापाय दूर करी ॥३॥
भक्तिरसाच्या अनुपानें । ज्याणें अर्धमात्रानें ।
ध्यानपथ्य योजुनी क्षणें । रोगभेणें दवडिलें ॥४॥
गती अतर्क्य औषधाची । एकाक्षरें या जीवाची ।
एकाक्षरता झाली साची । नवल हेंची न वर्णवे ॥५॥
वर्णवेना द्वैतपणा । तथापि वाराया कृतघ्नपणा ।
गुरुशिष्यत्व लक्षणा । योजूं बाणा प्रगटाया ॥६॥
तेजस्वी यदुपदेश । अविद्यांधतमसनाश ।
कराया जो सामग्रीस । इच्छी खास न कदापी ॥७॥
दत्ताभय दत्तात्रेय । तोचि माझा गुरुराय ।
त्याचे नित्य चिंतूं पाय । जे अपाय निवारिति ॥८॥
तारक जो ह्या कलियुगीं स्मृतिगामी पावे वेगीं ।
यत्कृपेनें धन्य जगीं । होती रागी विरागी ॥९॥
त्रेधा पापतापहर । त्याणें केला जो सादर ।
कार्तवीर्या बोध रुचिर । भाषांतर करूं त्याचें ॥१०॥
या भाषेची प्रौढी आज । लोकां असे प्राय: मज ।
धीप्रेरकें दिधला उमज । निजगुज समजवाया ॥११॥
यमादियोगसंपन्न । कार्तवीर्य तो अर्जुन ।
सह्यतटीं माघीं येवुन । श्रीदत्तचरण वंदितसे ॥१२॥
स्मरणभक्ति ज्याची पूर्ण । ज्याला मानितो सिद्धगण ।
माघस्नातां तो देखोन । प्रार्थी अर्जुन श्रीदत्ता ॥१३॥
र क्षावा हा यत्नें देह । ह्याच्यायोगें स्वसंदेह ।
फिते त्याला जनसमूह । पीडितो मोहग्रस्त हा ॥१४॥
ण कारांत रायमघ्य । ज्याला नाकार हो आद्य ।
तो तूं ह्या नरांला साध्य । होसी दुराराध्य इतरांला ॥१५॥
मानुषदेह दुर्लभ । त्याचा झाला ज्यांला लाभ ।
ते त्या देती जरी क्षोभ । ईशक्षोम तयां हो कीं ॥१६॥
त्रस्त पूर्वीं जो शीतानें । पुन: त्याला माघस्नानें ।
अत्यंत शीतजलानें । नित्य यत्नें कष्टविती ॥१७॥
संकल्प तरी त्या स्वर्गाचा । काय उपयोग नश्वराचा ।
संदेह हा मच्चित्ताचा । वारा साचा शिष्य मी ॥१८॥
तुष्ट होवुनी दत्त वदे । उपाय हा योजिला वेदें ।
लोकां वळवाया फलवादें । अधिकारभेदें योजिला ॥१९॥
टा ळावया विषयाशा । वेद योजी युक्ती अशा ।
सद्धर्में क्षाळुनी दुराशा । क्रमें पाशा तोडवितो ॥२०॥
यज्ञादिक धीशुध्यर्थ । योजिले ते यथार्थ ।
न घडती त्याला हा स्वार्थ । दावी समर्थ वेदराज ॥२१॥
महाकष्ट स्वार्थामुळें । न पाहती हे जन भोळे ।
देहा धन्यत्व सोहाळे । धर्मबळें त्यां लाधती ॥२२॥
हारक्तमांसास्थिमय देह । पंचभूतांचा समूह ।
नाना दोषांचें हें गेह । काममोहस्थान हेंची ॥२३॥
भय ज्याच्यायोगें नित्य । यदर्थची घडे अकृत्य ।
तथापि हा अशुची अनित्य । त्याचें अगत्य किती पहा ॥२४॥
यज्जन्म स्त्रीविटाळांत । विष्ठामूर्तीं झाला मूर्त ।
विष्ठा मूत्र ज्याचे आंत । वाहतसे नवद्वारें ॥२५॥
नित्य क्षाळितांही ये वीट । कृमिविट्भस्म शेवट ।
ज्याचें तो हा देह स्पष्ट । दोषदुष्ट काळभक्ष्य ॥२६॥
वासनेचें हें माहेर । ममताहंतेचें हें घर ।
मोक्षस्वर्गनरकद्वार । दुर्धर दुष्पूर वंचक ॥२७॥
रक्षणार्थ यत्न करितां । काळ पळवी न कळतां ।
जीववियोगें अस्पृश्यता । मग कां अहंता तशाची ॥२८॥
णाणें पारखी परीक्षक । तैसा आत्मानात्मविवेक ।
सत्तास्फूर्तीनें हा येक । करी चोख न इतर ॥२९॥
यत्प्राप्ति अति दुर्लभ । ह्याणेंच घडे मुक्तिलाभ ।
व्यर्थ याचा न कीजे लोभ । देवक्षोभ अन्यथा ॥३०॥
मनुष्यें स्वदेहपीडन । व्यर्थ न कीजे साच जाण ।
शास्त्राधारें करितां कोण । अकारण वदेल तें ॥३१॥
हा माघ अघनाशन । सूर्योदयीं करितां स्नान ।
सर्व पातक परिहारून । अढळ स्थान देतसे ॥३२॥
ज्ञानेंच मोक्ष होतो खास । परंतू तें न पापियास ।
लाभे म्हणोनि पापर्हास । शास्त्र खास करवी असें ॥३३॥
नहोतां पापक्षालन । न लाभे ज्ञानसाधन ।
साधनाविना न ठसे ज्ञान । म्हणोन योजी शास्त्र हें ॥३४॥
प्रकृती प्राक्तन चेष्टा करवी । ह्या सद्धर्में तीला बरवी ।
वळवितां मोक्षपदवी । अचूक पाविजे न कष्टें ॥३५॥
दारपुत्रादिकां करितां । देहा कष्टविती त्या परता ।
शास्त्राधारें पुण्य करितां । ईशक्षोभता न घडे ॥३६॥
यज्ञादिक परतंत्र । देह साध्य हें स्वतंत्र ।
ऐकें एक द्विजकलत्र । गेलें परत्र ह्या योगें ॥३७॥
चिमणी एक ब्राह्मणीं । बालवैधव्यें पीडूनी ।
कपिलारेवासंगमीं जावुनी । माघस्नानें साठ केलीं ॥३८॥
दानधर्म करी नित्य । वदे वाक्य मिताल्पसत्य ।
दुष्टसंग सोडुनी स्वकृत्य । करी अकृत्य निवारी ॥३९॥
नं दन भ्रात्रादि स्वजन । धर्म एक सनातन ।
ऐसें मानी अनुदिन । न करी पीन स्वदेहासी ॥४०॥
दात् त्री साध्वी उंछवृत्ती । नित्य करी शिणे न चित्तीं ।
स्वधर्मीं ठेवी जागृती । राखी सन्मती निरंतर ॥४१॥
मन विषयीं न घाली । कृछ्र चांद्रायणें करी भलीं ।
अशा आचारें वृद्ध झाली । ब्राह्मणी भली ऋचीका ॥४२॥
नेमें करितां माघस्नान । तिची बुद्धी पालटोन ।
सहज लागलें विष्णुध्यान । देहावसान । समयासी ॥४३॥
बाल्यापासून केले कष्ट । त्याचें घे ती फल उत्कृष्ट ।
विष्णुलोकीं अप्सरा वरिष्ट । ब्रह्मनिष्ठ तीसी ॥४४॥
लोकींन्से जीला उपमा । नाम जीचें तिलोत्तमा ।
यत्सौंदर्या नसे सीमा । तिला ब्रह्मा प्रार्थितसे ॥४५॥
न्ऋत्यगीतादि कौशल । तिलोत्तमे वाक्पेशल ।
असे तुला निश्चल । ह्मणोनी चाल भूलोकीं ॥४६॥
मत्त दैत्य सुंदोपसुंद । तन्मतीचा करीं भेद ।
तेणें त्रैलोक्याचा खेद । निर्विवाद दूर होयिल ॥४७॥
तथास्तु ह्मणोनी ये ती । सुंदोपसुंद तिला पाहती ।
भुलोनी ऐक्य सोडिती । भोगू इच्छिती दोघेही ॥४८॥
पिटोनि बाहू गदा घेती । परस्परें गजसे भिडती ।
मीच भोगीन हे युवती । ह्मणोनी ताडिती परस्पर ॥४९॥
शातकुंभ आणि युवती । मती कोणाची न भेदिती ।
त्यांत ही लावण्य संपत्ती । तन्मती भेदी बळें ॥५०॥
माला ५१ ते १००
चतुर दोघे देह भिन्न । नित्य ज्यांचें एक मन ।
व्यवहार अन्नपान । एक वर्तन दोघांचें ॥५१॥
वेधा वर दे जेव्हां त्यांला । हाचि वर त्यांणीं वरिला ।
इतरांपासूनी आम्हाला । मृत्यू न घडला पाहिजे ॥५२॥
षाड्गुण्ययुत जरी होते । मोहें परस्पर गदाघातें ।
मेले तेव्हां ब्रह्मा तीतें । सूर्यलोकातें नेतसे ॥५३॥
यमादिकें न साधे । ती पदवी तिलां लाधे ।
जीवनमुक्ता तेथें नांदे । ब्रह्मानंदें अद्यापि ॥५४॥
मग औदार्य सोडुनी । काय कार्पण्य जोडुनी ।
लाभे ऐक पुरातनी । कथा पावनी अर्जुना ॥५५॥
हाटकाष्टकोटिनायक । हेमकुंडलाख्य धनिक ।
न्यायें धनसंपादक । वैश्य एक नैषधीं ॥५६॥
योग्य भार्या असे त्याला । दोन पुत्र झाले तीला ।
श्रीकुंडल विकुंडला नाम त्यांला । ठेविता झाला तो वाणी ॥५७॥
गिळे काळ कधीं न कळे । दुर्दशा येतां बुद्धी चळे ।
म्हणोनी तो उपरमी वळे । धर्मबळें तराया ॥५८॥
नेणुनी अथवा जाणुनी । घडल्या पापाची करी धुणी ।
षष्ठांश द्रव्य वेंचुनी । करी धनी दानादिक ॥५९॥
वनीं वैश्य स्वयें चाले । पुत्रां सर्वस्व ओपिलें ।
ईश्वरघ्यानें वपू त्यजिलें । त्याणें जोडिलें स्वर्गपद ॥६०॥
धू र्तसंगतीनें तत्पुत्र । व्यसनीं झाले परतंत्र ।
अपकीर्ति गाजविती सर्वत्र । कुमित्रसंगें बुडाले ॥६१॥
तातें कष्टें मेळविलें धन । वेश्या नट वीत भाट दुर्जन ।
त्यांचे ठायीं व्यर्थ खर्चून । झाले निर्धन निराश्रय ॥६२॥
यान छत्र नानावेष नित्य पालटोनि विशेष ।
विषय भोगितां नि:शेष । द्रव्यकोष संपले ॥६३॥
नपरिसतां वृद्धवचना । गती आली अशी त्यांना ।
क्षुधातुर धरिती राना । स्वजनांनीं त्यागितां ॥६४॥
सूर्यास्त होतां ग्रामी लुटती । पांथांची चोरी करिती ।
किंवा जीवहिंसा करिती । भिल्लसंगती धरूनी ॥६५॥
यापरी काळ कंठिता । व्याघ्रें मारिला ज्येष्ठ भ्राता ।
सर्पदष्ट दुजा भ्राता । पंचता पावला एके वेळीं ॥६६॥
नंदन वैश्याचे दोन । त्यांचें करोनी बंधन ।
दूत नेती ताडून । तया ओढून यमापुढें ॥६७॥
दण्डधर वदे दूतां । विकुंडला न्या वैकुंठा ।
श्रीकुंडला नरकीं लोटा । पापी मोठा हा असे ॥६८॥
चर्तन याचें कुत्सित । कनिष्ठाचें असे सुकृत ।
त्याला वैकुंठीं नेवोत । विष्णुदूत सन्मानें ॥६९॥
धर्मरायें असें बोलतां । विष्णुदूतें कनिष्ठ भ्राता ।
विमनीं बैसविला तो दूतां । प्रार्थिता झाला नम्रत्वें ॥७०॥
नानापापें आम्हीं केली । पुण्यवार्ता न ऐकिली ।
तुल्यमृत्यु एककालीं । केंवी झाली भिन्नगती ॥७१॥
यागादिक म्यां न केलें । प्राग्जन्मींचीं कीं ही फलें ।
धर्मतत्त्व न ऐकिलें । सांगा पहिलें तें मज ॥७२॥
त्रिकालज्ञ विष्णुदूत । म्हणती त्वां होतां दुर्गत ।
दोन माघस्नानें यमुनेंत । हरिमित्रसुतसंगें केलीं ॥७३॥
पुण्य तेंची अगणित । पाप जावूनी वैकुंठ ।
तुला लाधला अश्रांत । तो अप्राप्त श्रीकुंडला ॥७४॥
त्राता आपणा आपण । भोगिजे आपुलें आपण ।
पाप पुण्य तें केवी कोण । भोगीजे जाण इतरांचें ॥७५॥
यत्न न होतां पुण्य । घडलें तत्फल अगण्य ।
दयाळू हरि शरण्य । तारी वरेण्य यापरी ॥७६॥
ॐ कारादि नमोंत । नारायण चतुर्थ्यंत ।
उच्चारितां पातकांत । मन शांत होतसे ॥७७॥
भगवन्मूर्ति विश्व असा । निर्धार ठेवुनी न कीजे हिंसा ।
उवा लिखा किडे माशा । आत्मवत् रक्षाव्या ॥७८॥
वदे शास्त्र ती अहिंसा । तीणें नये गळां फांसा ।
चुकवुनी नरकवासा । स्वर्गवासा जाती नर ॥७९॥
बंध तोडी अभयदान । तैसेंची स्वधर्माचरण ।
परद्रोहादि सोडुन । देतां स्थान अचळ मिळे ॥८०॥
धर्म इष्टापूर्त दत्त । जे आचरती दयायुक्त ।
अग्निहोत्री वेदरत । त्याला शाश्वत स्वर्लोक ॥८१॥
विवेकी गोद्विजसेवक । वापीकूपप्रपास्थापक ।
पंगुदीनांधतारक । उत्तम लोक तया होय ॥८२॥
मोचन करी शरणागता । धर्मयुद्धीं घे पंचता ।
दाता नृप तो नरकवार्ता । यमकथाही नायके ॥८३॥
चतुर नर मार्गी द्रुम । लावी त्याला लाभे शर्म ।
पुत्राहुनि ही परम । तारी द्रुम मानवां ॥८४॥
नाहीं तुलसी ज्याचे द्वारीं । यम त्याला दंड करी ।
वाहे विष्णूला जो मंजरी । तो तारी निजकुला ॥८५॥
यज्ञ तीर्थ पितर देव । तुलसीपाशी घेती ठाव ।
तिला सेवी जो मानव । शुद्ध भाव होय त्याचा ॥८६॥
आंतरशुद्धीं तुलसी जळ । करीं धरितां तुलसीमाळ ।
झडे वाङ्मन:काय मळ । अमंगळ मंगळ होय ॥८७॥
अगत्यें करी शिवार्चन । त्रिपुंड् रुद्राक्ष लेउन ।
बिल्वपत्रें लिंगार्चन । करी तो जन कैलासभागी ॥८८॥
सावधानें रुद्र पढें । त्यांचें पाप सर्व झडे ।
अरिष्ट टळे आयुष्य वाढे । जायी पुढे कैलासा ॥८९॥
ध्यक्ष लावुनी षडक्षर । जपे तो होय अक्षर ।
शिवस्व भोगी पामर । नरक दुर्धर होय तया ॥९०॥
साधन जोडाया मोक्षाचें । रूप पंचक ईश्वराचें ।
भजावें जें ज्याला रुचे । तेची त्याचें तारक ॥९१॥
धर्म हाची द्रोह नसणें । मताग्रह न करणें ।
देवभक्त एकपणें । हेंचि देखणें डोळसां ॥९२॥
नानायत्नें देवालय । संरक्षितां लाभे श्रेय ।
गोशाला विश्रमालय । करितां होय स्वर्गवास ॥९३॥
यतिमठ देवमंदिर । जीर्ण होतां करी उद्धार ।
तो तरे जो त्यावर । लोभ करी नर नरक तया ॥९४॥
र्हींकारांकित शक्तियंत्र । पूजितां होयी स्वतंत्र ।
शक्ति सूर्य गजवक्त्र । हरि त्रिनेत्र तारक ॥९५॥
सर्वपाप्याहुनी अधिक । देवद्रव्योपजीवक ।
निर्लोभ जो देवार्चक । तोचि एक धन्य होय ॥९६॥
वसे प्रीती जसी विषयीं । लागे तैसी देवाविषयीं ।
भला हो कां तो विषयीं । मुक्तिविषयीं न शंका ॥९७॥
विधाता जो जीवांचा । वेद ही त्याची वाचा ।
ती उल्लंघी तयाचा । किण कैंचा कैवारी ॥९८॥
भूतदया ही त्याची पूजा । येथें न हो भाव दुजा ।
निजधर्में तया भजा । त्राता न दुजा त्याहुनी ॥९९॥
तितिक्षापथ्य सेविती । धर्म औषध जे घेती ।
त्यांचे क्लेश रोग हरती । सुखस्थिति तयां होय ॥१००॥
माला १०१ ते १५०
दानें देती यथाशक्ती । ग्रीष्मी प्रपा स्थापिती ।
हेमंती काष्ठ कंबळें देती । विश्रांति करविती वर्षाकाळीं ॥१॥
यज्ञदानादिक धर्म । किंवा करणें सत्कर्म ।
याच द्विपीं घडे उत्तम । अन्यत्र शर्म भोगणें ॥२॥
क्रोंचादि द्वीपें असती । तेथें कर्मे न घडती ।
जंबुद्बिपीं पुण्यें होती । आर्यावर्ती विशेष ॥३॥
असें जाणुनी सादर । नित्यकर्म करी नर ।
पापें वारूनी सत्वर । जायी पार भवाब्धीच्या ॥४॥
सादरें करी प्रात:स्नान । यथाकाळीं संध्यावंदन ।
पंचयज्ञ आचरोन । राहे तो न बद्ध होय ॥५॥
ध्यानीं धरी विष्णूसी । कर्में करी निराशी ।
मुक्ती त्याचि होयि दासी । सिद्धी त्यापासी रांगती ॥६॥
कर् माकर्म विकर्म । जाणावें ह्याचें वर्म ।
तोचि सनातन धर्म । शर्म घडे त्यायोगें ॥७॥
षट्शास्त्रेंही जाणिली । परि कर्माची हे किल्ली ।
जंववरी हातीं न आली । तंव शिणविलीं त्रिकरणें ॥८॥
णाडिती पक्ष करूनी । अन्या ठेविती अडवुनी ।
ते जातील निर्वाणीं । हे कहाणीं नायकावी ॥९॥
यथोक्त कर्मे करून । जे करिती ईश्वरार्पण ।
दंभासूयादि सोडून । तेची जाण मोक्षभागी ॥११०॥
ऐंद्रीपासूनी अष्ट दिशा । तीर्थें हिंडतां न दुर्दशा ।
दुरावे धरितां फलाशा । ईशानुग्रहावांचुनी ॥११॥
चाक्पटुत्व बुद्धिकौशल । असे जरी विद्याबल ।
तरीं अज्ञानाचें मूल । नरा निर्मूल न करवे ॥१२॥
प्रत्यक्षादि प्रमाणानें । न मिळे तें स्वधर्मानें ।
लाभे बुद्धिशुद्धीनें । वेदवचनें विश्वासितां ॥१३॥
दावी गुरु शास्त्राधारें । तें श्रद्धेनें जो आचरे ।
तो नर भवाब्धी तरे । हेंची खरें मुख्य वर्म ॥१४॥
यज्ञ पूर्तष्टदान । जपतपानुष्ठान ।
सफळ होय भाविकां जाण । गुरुवचन पाळितां ॥१५॥
क्लींकारादि बीजें योजून । मोहनादिप्रयोगाचरण ।
करविती कर्म दारुण । गुरु कोण म्हणेल ते ॥१६॥
ज नदु:खें कळवळे । ज्याचें चित्त स्वयें वळे ।
दीना तारी निजबळें । उपदेश फळे तयाचा ॥१७॥
गरज नाहीं स्वार्थीं ज्याला । सांगेना कां सकामाला ।
त्याचा उपदेश भला । तो लोकांला तारील ॥१८॥
त्रयिमूर्ति तो मानुन । पाळितां त्याचें वचन ।
उद्धरती हीन दीन । सत्य जाण त्रिवाचा ॥१९॥
यत्नें पाप वर्जावें । घडतां प्रायश्चित्त करावें ।
नित्य हरीतें स्मरावें । पाप दुरावे तयाचें ॥१२०॥
वश्य करी इंद्रियांसी । सोडुनी दे परान्नासी ।
माता मानी परस्त्रीसी । खास त्यासी श्रेय ये॥२१॥
शीतोष्णादि साहुनीं । भावें वागे सदाचरणीं ।
परनिंदा न घे कानीं । तो तरोनी तारी परा ॥२२॥
कर्म न फळे स्नानाविणें । अस्नाताच्या वीक्षणें ।
देव फिरती मागें क्षणें । त्याचें जिणें शववत् ॥२३॥
रजस्वल स्नानाविणें । म्हणोनी तें नित्य करणें ।
मात्र मानसस्नानें । रोग्याकारणें योजिलीं ॥२४॥
णाडी लोकां पाखंडपणें । खायी पियी स्नानाविणें ।
तो नर नरकीं शिणें । यमभेणें ये तया ॥२५॥
यम न करी पाप्याची दया । अपराध क्षमा नसे जया ।
नृदेहीं धरितां हरिच्या पायां । यम तया काय करी ॥२६॥
सौष्टवें हरिचें नाम । वेदसेवा तीर्थधाम ।
धर्म करी निष्काम । परंधाम त्या लाभे ॥२७॥
सर्वांहुनी अन्नदान । श्रेष्ठ न ज्या काळ मान ।
बुभुक्षित पात्र जाण । हें तारण उभयत्र ॥२८॥
वसे गृहस्थ होवुन । त्याणें द्यावें शक्त्या अन्न ।
यती वर्णी ब्राह्मण । विमुख होतां जाण दुर्गती ॥२९॥
मध्यान्ही ये भुकेला । न देतां दवडी त्याला ।
त्याचे गेहीं अवदशेला । थारा झाला शाश्वत ॥१३०॥
न:ष्ट दुष्ट न म्हणावा । यथाशक्ती तोषवावा ।
अतिथीप्रसादें ये देवा । दया भावार्थि याची ॥३१॥
क्षोभवितां अतिथीसी । देव पितर तयासी ।
शापिती तो कष्टेंसी । नरकवासी होतसे ॥३२॥
भवभय टाळावया । गंगातीर सेवी तया ।
गती ये हें न घडे जया । नामही तया तारीतसे ॥३३॥
णाठवी जो चित्तीं पाप । लोकां न दे शाप ताप ।
त्याच्या पुण्या नाहीं माप । त्याचा कोप उपशमे ॥३४॥
यत्नें तीर्थवास कीजे । प्रतिग्रह न धेइजे ।
अन्यपाप क्षेत्रीं बारिजे । वज्रलेप जें क्षेत्रपाप ॥३५॥
श्रींगितज्ञाची भक्ती थोर । सौख्य दे जी इहपर ।
साधू होती दुष्ट क्रूर । ईणें पामर तरले ॥३६॥
महामृत्यू अजामिळा । आला फांस घाली गळां ।
नारायणा निजबाळा । बाहे त्या वेळां हरी ये ॥३७॥
हाक दिल्ही नारायणा । त्या अंतरीं पुत्रपणा ।
ब्रीद राखाया नारायणा । दया ये शरणागताची ॥३८॥
संज्ञा पुत्रासी योजिली । तीच दैवें अंतकालीं ।
वैखरीनें उच्चारिली । ती झाली तारक ॥३९॥
पत्ता ज्याचा योग्या नसे । स्वनामें तो भेटतसे ।
विवक्षा न पाहतसे । औदार्य असें जयाचें ॥१४०॥
प्रयत्नें न घेतां नामा । पापी गेला परंधामा ।
घेती ठेवूनी जे प्रेमा । हरि नामातें बुडती कीं ॥४१॥
दास होवूनी विष्णूचे । नाम घेती फुका वाचे ।
अर्चन करिती शालग्रामाचें । स्थान त्याचें वैकुंठीं ॥४२॥
यज्ञादिकें पुनरावृत्ती । जन्मक्लेश न चुकती ।
शालग्रामर्चनें मुक्ती । वैकुंठासी निश्चल ॥४३॥
ग्लौंबीजयुक्तोपासना । करितां कष्टें मिळे त्यांना ।
भूमिलाभ नश्वर जाणा । अन्य कामना न पुरती ॥४४॥
भूति निधी संतती । एकैक मंत्रें मिळती ।
त्यांची नसे शाश्वती । दैवगती अतर्क्य ॥४५॥
मंत्र तंत्रादि फळती । तीं फळें नश्वर होती ।
शालग्राम इष्ट प्राप्ती । दे सन्मती ठेवितां ॥४६॥
डसूं येतां महाकाळ । त्याचें हरावया बळ ।
शालग्रामार्चन सबळ । चित्ता निश्चळ करी जें ॥४७॥
लाभे गुरुप्रसादें जी । विष्णुभावें तिला पूजी ।
त्याला गती न ये दुजी । वैष्णवांमाजीं श्रेष्ठ तो ॥४८॥
धिक्कार असो तयाला । विके जो शालग्रामाला ।
दान देतां भूदानफलाला । दे जी तिला कोण दवडी ॥४९॥
पय आदिकीं अभिषेक । करोनी पीतां तीर्थोदक ।
त्याचें जाय सर्व पातक । चक्रांकयोगें विशेष ॥१५०॥
माला १५१ ते २००
त्यजा विषमचक्रां । शालग्राम सम सुमुख ।
अथवा पूजावा एक । दोन ऐक न पूजावे ॥५१॥
प्रसन्न होय श्रीहरी । शालग्रामर्चनें तारी ।
एकादशी व्रत करी । तोही हरिवल्लभ ॥५२॥
दान यज्ञ तपाहुन । एकादशी व्रत जाण ।
उपवासें करी पावन । पाप जाळून मानवां ॥५३॥
यत्नें कीजे निराहार । किंवा करूनी फलाहार ।
रात्रौ भजनें जागर । करितां नर पावन ॥५४॥
द्रांबीजयुक्तोपासनें । चिरंजीवित्व मात्र होणें ।
तेही देवूनी भवभेणें । हरी उपोषणें एकादशी ॥५५॥
चित्तीं ठेवूनी हरीस । एकाहार एकादशीस ।
एकादशीचा उपवास । द्वादशीस पारणा ॥५६॥
रंगी हरिभजनीं नर । दोन्ही एकादशी सादर ।
करी त्याचे वैकुंठपूर । दामोदरप्रसादें ॥५७॥
जीवां विषय सर्वंत्र । अन्यत्र मिळे भोगमात्र ।
येथेंची नर ज्ञानपात्र । होतां पवित्र मोक्ष घे ॥५८॥
विवश न कीजे इंद्रियगण । द्यावें सर्वां अभयदान ।
आपुलें चित्त शोधुनद्रोहवर्जन करावें ॥५९॥
नेमें पाप वारुन । वदावें सत्य वचन ।
परस्व न घ्यावें चोरून । विषय सेवन सोडावें ॥१६०॥
वसती कीजे सज्जनीं । पीडितांही दुर्जनीं ।
विवेक शांति घ्यावी मनीं । संतोषोनी दैवलाभें ॥६१॥
षट्शत्रू जरीं उठती । त्यांची कीजे उलट गती ।
चित्तीं चिंतावा श्रीपति । सन्मती राखावी ॥६२॥
वदोनी वाचे तन्नाम । करी ऐसा स्वधर्म ।
त्याचें कर्म होय अकर्म । जें दे शर्म इहपर ॥६३॥
शी ण मनी न आणितां । असा धर्म आचरतां ।
केवीं न ये मुक्तता । धरितां सत्यता शास्त्रार्थीं ॥६४॥
कुशल कर्मीं हर्षति । अकुशला द्वेषिती ।
त्यांला कैंची ऊर्ध्वगती । ते दुर्मती जाणावे ॥६५॥
रुद्रोपेंद्रादि देवता । ऐसा धर्म आचरतां ।
तुष्ट होती हें तूं आतां । अनुभविलें ताता विकुंडला ॥६६॥
वचन दूतांचें हें ऐकुन । विकुंडल धरी चरण ।
केलें धर्म निरूपण । धालें मन परिसतां ॥६७॥
शीत होयी अग्नी सूर्य । ऐसें संतां अंगीं वीर्य ।
तुम्हीं चतुर आर्य । एक कार्य करावें ॥६८॥
कुत्सित हा माझा भ्राता । नरकांतूनी ये वरता ।
ऐसा उपाय करा आतां । असाध्य संता नसेची ॥६९॥
रुदित जो माझ्याविरहें । यमयातना न साहे ।
त्या वांचुनी सुख मी हें। न पाहें सर्वथा ॥१७०॥
वौढाळ जरी आपुला । न सोडवे तयाला ।
हें कठिण तुम्हाला । नसे मला वाटतें ॥७१॥
षट्शास्त्री जें नेणती । संत तेंची जाणती ।
म्हणोनी करितों प्रणती । द्यावी गति बंधूला ॥७२॥
डाकू चाड लबाड । लांडी करी जरी द्वाड ।
तरीं तो उद्धरा म्हणोनि आड । पडला भीड घालुनी ॥७३॥
कर्म खोटें श्रीकुंडलाचें । तरीं मन वळे दूतांचें ।
म्हणती आठव्या जन्माचें । पुण्य साचें तुझें असे ॥७४॥
षडंग वेद निपुण । तूं होतास ब्राह्मण ।
मत्स्यदेशीं तुझें स्थान । तेथें ब्राह्मण चार आले ॥७५॥
याशीक शाकल मुनी । त्याचे पुत्र ब्रह्मज्ञानी ।
विधिनिषेधा उलंडुनी । फिरती सोडुनी देहभान ॥७६॥
कर्नृत्वादि नसे ज्यांला । तूं त्या दिगंबरांला ।
गेहीं आणूनी भला । सन्मान केला भावार्थें ॥७७॥
षड्रिपू ज्यां न शिवती । चिदन्वयें विश्व पाहती ।
तत्सेवापुण्यमिती । करूं न सकती कोणीही ॥७८॥
यत्न न होतां सत्संगति । एक दिन घडली होती ।
त्या पुण्याची नसे मिती । अगम्य गती ये ज्या योगें ॥७९॥
हुंतुंकारें गुरूला । अवमानितां ये तुला ।
सहा जन्म भोग सरला । हा लाधला देह मग ॥१८०॥
विषयकर्दमीं येथें ही । रुततां वर येसी तेंही ।
ज्ञानिसेवा फल पाहीं । संदेह नाहीं यामध्यें ॥८१॥
द्वेषरागादि जावून । माघस्नानें तूं पावन ।
होवुन घेतलें साधून । उत्तम स्थान धन्यारे ॥८२॥
षड्रिपुग्रस्त बंधु तुजा । नेणें शुभाशुभ काजा ।
त्याची नसे पुण्यपुंजा । त्या दे तुझ्या पुण्यातें ॥८३॥
यमापाशीं त्वां जावें । तेंची पुण्य वोपावें ।
त्याणें तुझा बंधू पावे । वैकुंठी जवें करी हें ॥८४॥
विकुंडल हें ऐकून । तसें करे पुण्यदान ।
तेणें बंधूला सोडवून । विमानासन्न आणिला ॥८५॥
द्वेष मत्सरादि जावून । त्या पुण्यें शुद्ध होवुन ।
भ्रात्यासह यानीं बैसोन । विष्णुभवना पातला ॥८६॥
षडिंद्रियें जिंकिती । त्यांला दुर्लभ जी गती ।
दूतसंगे वैश्या ये ती । सत्संगती तारी असी ॥८७॥
यत्न न होतां केवळ । तारी ऐसें धर्मबळ ।
देहलोभें काय फळ । खायी काळ अंतीं ज्याला ॥८८॥
फट्कारूनी लोभातें । आचरितां धर्मातें ।
नर पावे मुक्तितें । अर्जुनातें म्हणे दत्त ॥८९॥
उच्च नीच नसे देवा । तो पाहुनी भक्तिभावा ।
देतो आनंदाचा ठेवा । करी भवाब्धीपार ॥१९०॥
चातुर्य जेथें न चले । जेथें तार्किक भागले ।
योगीश्वरही ठकले । तें पद लाधलें भाविका ॥९१॥
टपती अर्थी स्वार्थाला । तसे सिद्ध टपती ज्यालां ।
कष्ठ होती तयांला । भाविकांला तें सहज हो ॥९२॥
योद्धा लक्ष्या लक्षी जेवीं । योगी चित्त ठेवी तेवी ।
त्याल जी पदवी । दवीयसी होतसे ॥९३॥
चाड त्याची न धरितां । सदाचारें येती हाता ।
तेव्हां ऐसें आचरतां । मुक्तता ये जनासी ॥९४॥
टळू न देतां काळ । माघस्नान करिती ते सकळ ।
पूजा होम श्रवणीं वेळ । नेती मळ गळे त्यांचा ॥९५॥
यत्नें व्रतस्य राहती । जरीं ते कामना धरिती ।
नित्य महात्म्यें ऐकिती । पालटे मती आपोआप ॥९६॥
ठ: स्का लागतांही विवश । नाम घेतांही तुटे पाश ।
मग स्वस्थ घेती निराश । त्यांचा नाश होय कीं ॥९७॥
ठ: स्का लागतां बडबडे । नामोच्चार दैवें घडे ।
तो पडे भवाचे कडे । तेथें नडे कीं सावधान ॥९८॥
स्तंभित होती जेथें श्रुति । म्हणोनियां नेति नेति ।
त्या पदाची प्राप्ति । या रीती होतसे ॥९९॥
भक्ति श्रद्धा ध्यान । याहें घडे आत्मज्ञान ।
त्यांत भक्ती ये घडोन । धर्माचरण करितां ॥२००॥
माला २०१ ते २५०
यथार्थ होतां आचरण । शुद्ध होय अंत:करण ।
मग सहजची ध्यान । लागे जाण अर्जुना ॥१॥
स्तंभाधार जेवीं घर । तेवीं ज्ञान भक्त्याधार ।
परभक्ती ज्ञानोत्तर । जे ईश्वरानुरक्ति ॥२॥
भक्ती ज्ञानाची जननी । ती मिळे सदाचरणीं ।
तेव्हां ही लोकां करणी । होय तारिणी जाणावी ॥३॥
यमादि योग सत्कार । कारण असे साचार ।
तप श्रद्धा त्यांत थोर । योगिवर मानिती ॥४॥
खेंचावया इंद्रियां । मन हेतू होय तया ।
बुद्धी खेंचे तिला राया । सत्वशुद्धी पाहिजे ॥५॥
खें म देतां सत्वें धीला । आत्मा स्वयें दिसे भला ।
आचार हा सत्वाला । शोधक योजिला श्रुतीनें ॥६॥
माघस्नान तुच्छ साधन । असें न मानो तुझें मन ।
हें ध्यानीं आणोन । पाहें भ्रमण न ये रे ॥७॥
रचना वेदाची अचाट । अधिकारें दावी वाट ।
भाविक तेणें जाती नीट । जे धीट ते तरती ॥८॥
यत्नें आणि मार्गावर । वेद हा दयापर ।
दोषारोप त्यावर । करतां नर न तरती ॥९॥
माघस्नानपुण्यें एक । ब्रह्मराक्षस तरला ऐक ।
माघस्नान अपसरा सुरेख । करी एकभक्तीनें ॥२१०॥
रमणी सर्वकलापूर्ण । कैलासी जीचें स्नान ।
उमेची सखी होवून । शिवार्जन नित्य करी ॥११॥
यत्नें प्रतिवर्षें ती । माघस्नानीं धरी प्रीती ।
अर्धोदयीं आप्लुती । प्रयागीं ती करितसे ॥१२॥
नटळे तीचा कधीं काळ । होतां नित्य उष:काळ ।
प्रयागीं ये चपळ । योगबळ असे जीला ॥१३॥
म:स्तकीं अंजुली बांधून । करी शंकरा नमन ।
यथाविधी माघस्नान । करी मन लावुनी ॥१४॥
संकल्प ईशप्रीत्यर्थ । याहुनी नसे अन्यार्थ ।
मग ती देहाचा स्वार्थ । प्राज्ञी किमर्थ राखील ॥१५॥
पंनग भूषणें न्हाणाया । जल घेवुन चाले तया ।
गायी चित्त लावुनियां । भवभया वारी जो ॥१६॥
नपाहे ती इतस्तत: । ऐसें नित्य आचरत ।
एके दिनीं मार्गांत । देखे अकस्मात राक्षसा ॥१७॥
यक्षादिक ज्याला भीती । हिमाचलीं करी वस्ती ।
त्याची पाहतां आकृती । प्राण होती कंठगत ॥१८॥
संनिध येतां तीचा । तुषार पडला आर्द्रवस्त्राचा ।
क्रूरभाव राक्षसाचा । गेला पुण्याचा प्रभावें ॥१९॥
पंन जलकणयोगें । पूर्वस्मृती झाली वेगें ।
नमूनी म्हणे कोणगे । आकाशमार्गें जासी तूं ॥२२०॥
नमितों तुझे चरण । जासी कोठें तूं कोण ।
कोठून तुझें आगमन । निवेदन करीं हें ॥२१॥
यक्षिणी किंवा योगिनी । किंवा क्षिराब्धिनंदिनी ।
वाटे तूं होसी भवानी । माझ्या कानीं दे वार्ता ॥२२॥
स्वागम तुझें रूप । लावण्यतेजें त्वद्रूप ।
स्फुरे तेणें माझें दूर । होईजे अज्ञानांध ॥२३॥
हामी ब्रह्मराक्षस । नित्य करीं येथें वास ।
कोणी न येती आसपास । करी ग्रास म्हणोनी ॥२४॥
पोट माझें सदां रितें । खातां गजादि जीवातें ।
कधीं न जाणें तृप्तीतें । आज मातें शांत केलें ॥२५॥
षडरी नित्य खवळती । कधीं न ये स्वस्थ स्थिती ।
ऐसी माझी दुर्गती । आज ती पालटली ॥२६॥
यत्न न होतां दर्शन । झालें मला दैवें जाण ।
करीं माझें उद्धरण । बहु शीण पावलों ॥२७॥
पोर जेवीं मातेपुढें । आळ घेवोनी आड पडे ।
तैसा मी हा तुझ्यापुढें । आड पडे मातोश्री ॥२८॥
षडिंद्रियें मी पाहिलीं । क्षणमात्रही नावरलीं ।
पापकर्में म्यां केली । गती आली हे त्याची ॥२९॥
यज्ञादिक नाहीं केलें । परी क्षेत्रवासपुण्य भलें ।
सहजची होतें घडलें । फल आलें तें आजी ॥२३०॥
परिसोनी त्याचें वचन । म्हणे अप्सरा करीं श्रवण ।
तूं म्हणसी मी कोण । अप्सरा जाण निश्चयें ॥३१॥
रहाणें माझें कैलासीं । मी असें उमेची दासी ।
पूजीं नित्य शिवासी । मकरार्क माघमासीं विशेष ॥३२॥
मंन्नाम कांचनमालिनी । प्रयागीं स्नान करूनी ।
आल्यें जात्यें शिवभवनीं । अर्चीं भवानीपतीला ॥३३॥
त्रयिमूर्तिच्या प्रसादें । सर्वत्र फिरें स्वच्छंदें ।
राहें नित्य परानंदें । नसे संदेह मच्चितीं ॥३४॥
परम हा माघमास । सांप्रत चाले जो जनास ।
स्नानें तारी आणिकास । नसे खास हे शक्ती ॥३५॥
रविमंडलार्धोदयीं । स्नानाकरितां शीघ्र जायीं ।
त्रिवेणी जल न्हेयीं । शिवपायीं अभिषेकीं ॥३६॥
यंनामें पापी तरती । त्याची जडली मला भक्ती ।
तेणें सर्वही मानिती । पूर्वस्थिती ऐक माझी ॥३७॥
त्रपाहीन वेश्याजाती । तेथें माझी उत्पत्ती ।
रूप लावण्य संपत्ती । मीच होती कलिंगीं ॥३८॥
पराक्रमी कलिंगेश । तो भुलोनी झाला वश ।
त्याचे लुटिले सर्व कोश । केला दास त्याला मी ॥३९॥
रडती त्याच्या अंगना । त्यांला न घडवी राजदर्शना ।
इतरांही धनिकजना । ठकवीं नाना प्रयत्नें ॥२४०॥
तंटा लावीं परस्परां । कपटें विश्वास दावीं जारां ।
असे सेवीं अनंत नरां । दुराचारा करूनी ॥४१॥
त्रास न ये पापाचा । परिणाम हा अविचाराचा ।
मातेरा नरदेहाचा । केला भोगाचा ल्हावानें ॥४२॥
णिक्कींहिं जे समजती । परी तेही न उमजती ।
कामाची न करवे शांती । भोगासक्ती करूनी ॥४३॥
छिंन भिन्न करी यम । हें जाणें बुद्धस्तोम ।
त्यालाही नावरे काम । तेथें नाम काय माझें ॥४४॥
धिकारीं संतां महंतां । दुराचार नाणी चित्ता ।
मांस मद्य खातां पितां । तारुण्यसरिता आटली ॥४५॥
छिंन करी यम पाप्यांसी । हें दैवे पाघमासीं ।
माहात्म्य ऐकतां कर्णासी । झोंबले मानसीं विरत्की ये ॥४६॥
धिक्कारीं हीन कुलासी । तेवीच जार भोगांसी ।
पुढें माझी गती कैसी । होईल ऐसी अनुतापें ॥४७॥
ग्रस्त होवूनी मोहग्रहें । केलें जें जें पाप हें ।
सांचविलें द्रव्य व्यर्थ हें । बरवा नोहे परिणाम ॥४८॥
हान्याय कीं अन्याय । न विचारीं अपाय उपाय ।
न धरिली बरवी सोय । आतां हृदय संतापे ॥४९॥
नित्य मानीं भोग गोड । अविवेकीं हें चर्मकुंड ।
विकूनी पाप उदंड । केलें यमदंड भोगाया ॥२५०॥
माला २५१ ते ३००
वासना दुष्ट धरूनी । दुष्टसंगती करूनी ।
पाप केलें हर्षूनी । भागी कोणी नसे त्याचा ॥५१॥
रडोनी ऐसी स्वकर्मासी । संतापूनी मानसी ।
शरण जावूनी द्विजासी । निवेदी त्यासी सर्वही ॥५२॥
यमयातना टाळाया । जन्मारभ्य पाप तया ।
निवेदितां माझी दया । आली तया विप्रासी ॥५३॥
निर्मळ होसी म्हणे द्विज । सर्व सोडुनी दे आज ।
थोर तीर्थ प्रयागराज । तारील तूज निर्धारें ॥५४॥
वारावया पापासी । शीघ्र जायीं प्रयागासी ।
क्षाळिसी सर्व पापासी । अनुतापासी पावतां ॥५५॥
रमणीय त्याचें वचन । निश्चयें अंगीकारून ।
गृह भूषा धन स्वजन । सर्व सोडून दिधलें ॥५६॥
यमयातना पुढें जाणूनी । पाप मनीं आणूनी ।
चित्तीं अनुतापूनी । विप्रा वंदुनी विनविलें ॥५७॥
व्याकूळ झालें माझें मन । करा त्याचें समाधान ।
प्रयागीं करितां माघस्नान । मत्समान तरे कीं ॥५८॥
धीन्धीन् थै थै करोनी । सर्व जन लुटोनी ।
पाप केलें त्याची धुणी । कराया मनीं स्थिरावें ॥५९॥
विश्वास व्हावया चित्ता । सांग एक प्राचीन कथा ।
कोण पापी प्रयागीं न्हातां । तरला दुरितापासुनी ॥२६०॥
नानापरी विनवितां । विप्र वदे ऐक आतां ।
गती लाधली पुरुहूता । सर्व दुरिता वारुनी ॥६१॥
शची ज्याची असे प्रिया । उर्वश्यादि वश्य जया ।
दुर्बुद्धी त्या देवराया । बरी न या दवडूनी ॥६२॥
यमादि योगसंपन्न । गौतमर्षीं तपोधन ।
तत्पत्नी अहल्या जाण । तीवरी मन इंद्र करी ॥६३॥
विवेक सोडुन स्वर्गाहुन । इंद्र आला भुलोन ।
गौतमस्वरूप धरून । कामुक होवुन पातला ॥६४॥
नाहीं गौतम जाणून । स्वयें गौतम बनून ।
अहल्येपासीं येवून । तीला फसवून उपभोगी ॥६५॥
शतक्रतू करोनी । देवाधिपत्य पावुनी ।
स्वर्गी राहे तोची मनीं । हें घेवोनी बुडाला ॥६६॥
यज्ञीं ज्याचा पूर्वभाग । तो करी ऐसें आग ।
तत्क्षणीं ये ऋषी सवेग । जाणोनी मग इंद्र भ्याला ॥६७॥
दु:खी होवूनी ये बाहेर । गौतमें जाणोनी सत्वर ।
शापिला कीं अंगावर । भगें सहत्र पडतील ॥६८॥
खंती करी अहल्या ती । अज्ञानें हो दुर्मती ।
मुनी शापूनि शिला करिती । पुढें रामें ती उद्धरिली ॥६९॥
हतदैव देवेश । भगें पडतां शरीरास ।
मेरुपर्वती गुहावास । करी त्रास पासून ॥२७०॥
रडे केल्या कर्मासी । धिक्कारी आपणासी ।
विरह झाला शचीसी । बृहस्पतीसी ती पुसतसे ॥७१॥
हसोनी म्हणे बृहस्पती । चला दावूं देवपती ।
शची देवांसह येती । मेरुपर्वतीं तेधवां ॥७२॥
रडत बैसला देवेश । बृहस्पती दावी तयांस ।
लाजोनी इंद्र देहास । झांकोनी ठेवी ते क्षणीं ॥७३॥
दाटोनी शोकें गुरूला । इंद्र म्हणे तारा मला ।
पुन: न करीं ह्या कर्माला । अनुग्रह केला पाहिजे ॥७४॥
रिघतां शरण गुरूतें । दयेनें तो वदे त्यातें ।
जावूनी ब्रह्मक्षेत्रातें । तीर्थराजातें सेवीं तूं ॥७५॥
द्रंममित धन दान । देतां होय मेरुसमान ।
खास ज्याला उपमान । न ये त्रिभुवनतीर्थाची ॥७६॥
विविध पापें जो हरी । तेथें तूं स्नान करीं ।
हें ऐकूनी वृत्रारी । जावूंनी करी मकराकीं स्नान ॥७७॥
द्राक्पाप जावून । इंद्र झाला सहस्रनयन ।
तूं करीं त्रिवेणीस्नान । चित्तीं चिंतून शंकरा ॥७८॥
वचन ऐसें विप्राचें । परिसोनी मनाचें ।
स्थैर्य करोनी प्रयागाचें । केलें त्याचें दर्शन ॥७९॥
यत्स्नान तीन दिन । करितां पाप जावून ।
शेष मासस्नानें जाण । अप्सरापण मज आल्यें ॥२८०॥
विदुषी होवुनी कैलासीं । राहें गौरीहरापासीं ।
अद्यापी माघमासीं । प्रतिवर्षीं स्नान करीं ॥८१॥
द्राक्तारिलें हा उपकार । स्मरोनी कराया दूर ।
कृतघ्नत्वा सादर । ऐसा निर्धार केला म्यां ॥८२॥
वचन तीचें परिसूनी । राक्षस वदे नमूनी ।
पूर्वजन्म आठवूनी । खिन्न होवुनी निवेदीं मी ॥८३॥
यन्नामाचें स्मरण । करी पाप निवारण ।
त्या काशींत जन्मून । श्रेष्ठ ब्राह्मण मी होतों ॥८४॥
देवर्षिपित्रर्चन । न घडलें विप्रतर्पण ।
न केलें इष्टापूर्तदान । न केलें स्नान गंगेचें ॥८५॥
हंसजप किंवा ध्यान । न केलें घेतलें दान ।
दुष्टापासून अनुदिन । ब्रह्मस्व हिरोन घेतलें ॥८६॥
पोट भरीं अभक्ष्यभक्षणें । सत्यवार्ता कधीं नेणें ।
सर्व पापें पूर्णपणें । देती ठाणें माज्याठायीं ॥८७॥
षडिंद्रियें नावरलीं । थोरांची बोली नायकिली ।
काशीक्षेत्रीं मृती आली । दैवें झाली दुर्दशा ॥८८॥
यन्नाम अविमुक्त । जेथें सर्व होती मुक्त ।
तेथें होतां पापसक्त । भैरव युक्त दंडी त्याला ॥८९॥
पोञ्चतां अन्यत्र मरण । त्याला यमयातना दारुण ।
काशींत मरतां जाण । भैरवशासन क्षेत्रपाप्या ॥२९०॥
षट्शास्त्रीं असोनि निपुण । क्षेत्रीं केलें पापाचरणं ।
म्हणोनीं विश्वेश्वरें जाण । भैरवशासन योजिलें ॥९१॥
यच्छासनें नवू योनी । प्रेतभूतादि भोगूनी ।
दाहावें जन्म ये स्थानीं । राक्षसयोनी मिळाली ॥९२॥
चित्तीं नसे सुखलेश । भोगीतसें दारुन क्लेश ।
माझे दृढकर्मपाश । मोक्षीं निराश होतों मी ॥९३॥
तं टा करोनी ब्राह्मण । जिंकीं विद्यामदें जाण ।
त्याचें फळ हें दारुण । राक्षसपण शेवटीं ॥९४॥
तोक्षेत्रवास केवळ । झाला आतांची सफळ ।
पदरीं तेंची पुण्यबळ । दर्शनें कळतसे तुझ्या ॥९५॥
षष्ठीसहस्र संवत्सर । या जन्मास झाले फार ।
कष्ट भोगिले आतां तार । मातें सत्वर दयेनें ॥९६॥
यथार्थ सर्व सांगून । ब्रह्मराक्षस नमून ।
आड पडला तें पाहुन । वळली कांचनमालिनी ॥९७॥
तोजरीं महापाप । त्याला कराया विपाप ।
ती दयेनें आपोआप । त्याचे ताप निवारी ॥९८॥
षष्ठीसहस्र वर्षें तूं रे । पाप भोगिलें येथें रे ।
नवू जन्मीं तसें सारें । कर्म बरें क्षाळिलें ॥९९॥
यमयातना जरीं होत्या । चौर्याऐशीं लक्ष धिरट्या ।
कदापीही न चुकत्या । क्षेत्रवासें त्या वारिल्या ॥३००॥
माला ३०१ ते ३४३
सर्वतीर्थामध्यें थोर । गंगा तीहुनी काशीनगर ।
जेथें तारी विश्वेश्वर । हा निर्धार सत्यची ॥१॥
वसे ताराया ह्या लोकांला । संगें अन्नपूर्णेला ।
घेवोनी परिवाराला । म्हणती ज्याला विश्वेश ॥२॥
मंत्र तारक कानीं । सांगे मरतांची प्राणी ।
नेयी त्याला उद्धरोनी । तो भवानीनायक ॥३॥
त्रयमूर्ति पाप्यास । उपदेशें तारी खास ।
करोनी जे क्षेत्रवास । करिती खास पातकें ॥४॥
स्वयें भैरवाकरवीं । त्यांला यातना भोगवी ।
भोगें पातक संपवी । मग दे पदवी तयाला ॥५॥
रूढयोगा दे सायुज्य । अन्य धन्या करी पूज्य ।
कैलासी ने तेथें प्राज्य । सौख्य होय निश्चित ॥६॥
पाप काशीमध्यें ज्याणें । केलें त्याला हें भोगणें ।
कल्पित योनी भोगूनी त्याणें । मोक्ष घेणें निश्चित ॥७॥
यमदूत जेथ न येती । भैरव यातना देती ।
परी अंतीं गती ये ती । क्षेत्रमृती असी असे ॥८॥
सर्व पाप जातां तूझें । दर्शन हें झालें माझें ।
आतां कष्ट तुझे विझे । देतें माझें थोडें पुण्य ॥९॥
वसोनी मी कैलासीं । प्रतिवर्षीं माघमासीं ।
करीं स्नान प्रयागासी । पुण्यराशी जोडिले असे ॥३१०॥
यंनाम तीर्थराज । स्नानें क्षाळी पापपुंज ।
जेणें तारिलें मज । करविलें अजदर्शन ॥११॥
त्रयमूर्ती तो माझा देव । पुरवी भक्तांचा भाव ।
निजपदीं देयी ठाव । तो हा तव तारक ॥१२॥
स्वरूप चिंतुनी त्याचें । एक माघस्नानाचें ।
फळ देयीं तुला साचें । सद्गतीचें दायक जें ॥१३॥
रूप शिवाचें चिंतून । अप्सरा ती हर्षून ।
पिळूनी आर्द्रवसन । करीं जीवन घेतसे ॥१४॥
पाणी हातीं घेवून । म्हणे एक माघपुण्य ।
तुला म्यां दिल्हें दान । म्हणोनी जीवन सोडिलें ॥१५॥
यद्रूप अति कराल । होतें परंतू तीणें जल ।
सोडितां तो तत्काळ । शोभे विमल राक्षस ॥१६॥
सर्व क्रूरभाव त्याचे । पालटोनी शांततेचें ।
पात्र झाला तो हें पुण्याचें । फळ वाचे न वर्णवे ॥१७॥
वदे वंदूनी अप्सरेला । माये उद्धरिलें मला ।
न विसरें उपकाराला । प्रत्युपकाराला काय देवूं ॥१८॥
तंत्र मंत्रादि साधन । संतांपुढें जाती लपोन ।
ज्यावरी करिती नयन । तो पावन होतसे ॥१९॥
त्र्ययी धर्मादि साधनें । फलद होती कालानें ।
तत्काल संतदर्शनें । फल दानें देतात ॥३२०॥
स्वयें तरोनी तारिती । संतांच्या ह्या विभूती ।
लोककल्याणार्थ वांचिती । ज्या फळती नमस्कारें ॥२१॥
रूप संतांचें अलौकिक । वसे जेथें नित्य विवेक ।
त्यांपुढें बापुडें पातक । शोक धाक कायसे ॥२२॥
पापी मी हो महाक्रूर । माझा केला त्वां उद्धार ।
तुला प्रसन्न शंकर । असो धरसुताही ॥२३॥
यत्प्रसादें तूं धन्य । अससी लोकमान्या ।
तो ताराया अन्या । करो वदान्या नित्य तुला ॥२४॥
सर्वत्र जें दिसे मज । अनित्य वाटे तें आज ।
आतां मातें ज्ञान पाज । अन्य काज न उरलें ॥२५॥
वदें निश्चय करून । इहपर भोग साधन ।
तें मानी श्ववमन । विटे मन तेथें आतां ॥२६॥
पल्लवूनी वदूं किती । त्वद्दर्शनें शांति दांती ।
समाधान उपरती । लाधली क्षांती पूर्णत्वें ॥२७॥
लक्ष्य लावूनी श्रद्दायुक्त । उपदेश श्रवणीं सक्त ।
झालों आतां करीं व्यक्त । प्रबोध मुक्त करी जो ॥२८॥
वसें दैवे कोठेंतरीं । पुन: ऐसें न करीं ।
ऐसा धर्म सुंदरी । सांगें वारी जो आवृत्ती ॥२९॥
स्वभाव जाणूनी त्याचा । मग अप्सरा बोले वाचा ।
हा देह देवयोनीचा । झाला साचा तुझारे ॥३३०॥
रूपें देव तूं खास । नरधर्मीं नहो वास ।
नर जे दैवी संपत्तीस । धरिती त्यांस मोक्ष ये ॥३१॥
पावले देव जयासी । स्वसंपत्तीनें दैत्यांसी ।
आसुरी संपत्ती ग्रासी । मोक्ष त्यांसी दुर्लभ ॥३२॥
यमेंद्राश्विवरुणादि । पद पावले अनादि ।
तूंही जावया त्या पदीं । वागीं मदीयोक्तधर्में ॥३३॥
ॐकारवाच्य जो देव । त्याच्या पदीं ठेवीं भाव ।
त्याला समर्पूनी सर्व । वायां गर्व न करीं ॥३४॥
नम्र होई सर्व भूतां । दैवी संपत्ती तत्वता ।
राखें शोधीं निजचित्ता । ब्रह्मसत्ता लक्ष्यीं धरीं ॥३५॥
मोचन करीं हिंसेला । न वदें परदोषाला ।
सद्धृतीमतीनें मनाला । आवरी कामाला वारूनी ॥३६॥
म हादेवा भजें नित्य । दृश्य हें पाहें असत्य ।
प्रवाहपतितकृत्य । करीं अहंता सोडुनी ॥३७॥
हाची तुला उपदेश । चिदन्वयें देखें विश्वास ।
जीवन्मुक्ति दशेस । जासी खास समत्वें ॥३८॥
सि द्धीलागीं न भुलतां । असा नित्य वागतां ।
जीवन्मुक्ती तत्वतां । मिळोनी विदेहता मिळेल ॥३९॥
घाम लाधलें त्याला खास । विमान आलें सूर्यसंकाश ।
राक्षस वंदूनी तीस । गेला स्वर्गास पुण्य भूं ॥३४०॥
यत्नाविना मुक्ति देवुनी । अप्सरा गेली शिवभुवनीं ।
अर्जुना म्हणे श्रीदत्तमुनी । माघस्नानी फळ हें ॥४१॥
स्वा शय हा ठेवुनी । जनांला फल दावुनी ।
वेद तारी असें ऐकुनी । अर्जुन मनीं आनंदला ॥४२॥
हाश्रीदत्तार्जुन संवाद । माघमाहात्म्यमिषें विषद ।
हो हा हरी जीवात्म भेद । अखेर पद दे ध्रु ॥४३॥
श्रीगोविंदकृपापूर्णा वासुदेवसरस्वती । मृगार्के नर्मदातीरे तीर्थराज इवोद्गता ॥१॥
इति श्रीदत्तात्रेयाsर्जुनसंवादे मकरार्कमाघमाहात्म्यं संपूर्णं ॥ श्रीदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
संबंधित माहिती
श्रीदत्तात्रेयाष्टोत्तरशतनामावली श्री दत्तात्रेय 108 नाम
Dhanu Sankranti 2024: धनु संक्रांतीला या चुका टाळा, नाहीतर प्रगती थांबेल !
श्री दत्तात्रेयाचीं पदे
श्री दत्ताचे अभंग
हिवाळ्यात तुमच्या नखांना स्टायलिश लुक द्या, या उपयुक्त नेल आर्ट टिप्स फॉलो करा
सर्व पहा
नवीन
दत्तमाला कर्णांकित माघ माहात्म्य
श्रीदत्तात्रेयाष्टोत्तरशतनामावली श्री दत्तात्रेय 108 नाम
Dattatreya Jayanti 2024 दत्त जयंती कधी आहे? दत्ताचा जन्म कुठे झाला?
Dhanu Sankranti 2024: धनु संक्रांतीला या चुका टाळा, नाहीतर प्रगती थांबेल !
श्री दत्तात्रेयाचीं पदे
सर्व पहा
नक्की वाचा
Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?
Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?
वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील
बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे
दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा
पुढील लेख
श्रीदत्तात्रेयाष्टोत्तरशतनामावली श्री दत्तात्रेय 108 नाम