Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

श्रीदत्त विजय अध्याय दहावा

Webdunia
शुक्रवार, 3 जून 2022 (17:57 IST)
श्रीगणेशाय नमः । ॐ गणेशदत्त गुरुभ्यो नमः । श्रीदत्त विजय सिद्ध ग्रंथ । ग्रंथ लेखन जव चालत । अनेक दिव्य अनुभव येत । ग्रंथ लेखन करताना ॥१॥
 
स्मिता असे ध्यान करीत । ध्यानात सरस्वती सांगत । दिव्य ग्रंथ निर्माण होत । आहे घरी ताईंच्या ॥२॥
 
स्मिता ताईंचे घरी येत । ग्रंथ लेखन चालले पाहात । नवदुर्गा देवी दिसत । ग्रंथ लेखन करताना ॥३॥
 
ग्रंथाच्या अक्षरा अक्षरात । दत्त दुर्गा भरोन राहात । अनेक देवता येथ । दत्त आज्ञे राहिल्या ॥४॥
 
पुरवावया भक्त मनोरथ । शिवशक्ती ग्रंथ सिद्ध करीत । प्रपंच आणि परमार्थ । साध्य होतील पठणाने ॥५॥
 
सर्व इच्छा होतील पूर्ण । भक्तकाम कल्पद्रुम । ऐसे ग्रंथ महिमान । स्वये शंकरे सांगितले ॥६॥
 
अक्षरे दिसती तेजोमय । ग्रंथ दिसे प्रकाशमय । ऐशी अनुभूती होय । स्मितासी ग्रंथ दर्शनाने ॥७॥
 
करिता ग्रंथ पठण । देवता देती दर्शन । घरी करिता ग्रंथ पठण । प्रार्थना पूर्ण होतसे ॥८॥
 
औदुंबर वृक्षातळी बैसोन । करिता ग्रंथ पारायण । तीन सहस्र करिता आवर्तन । दत्त प्रसन्न होतसे ॥९॥
 
नद्यांचे संगम स्थान । तेथे औदुंबर तीन । ऐसे असेल जर स्थान । सिद्धी तात्काळ मिळे तेथे ॥१०॥
 
औदुंबर नदी किनारी । बैसोनी जो पारायण करी । दिव्यदृष्टी त्यासी सत्वरी । प्राप्त जाणा होतसे ॥११॥
 
होता वाचन पूर्ण । करावे सोऽहम्‍ ध्यान । ऐसे करिता साधन । दत्त प्रसन्न होतसे ॥१२॥
 
ऐशा देव - देवता । स्मितासी सांगती देखा । ऐकोनी परमानंद चित्ता । तिच्या पाहा होतसे ॥१३॥
 
श्रीशैल पर्वतात । स्वामी होते तप करीत । ऋषी देवता तेथ । अनेक भेटती स्वामींना ॥१४॥
 
अगस्तीऋषी भेटत । भृशुँडऋषी भेटत । शांततपा महाख्यात । येवोनी भेटती तेथवरी ॥१५॥
 
कुमारस्वामी साधक । होता तेथे साधना करीत । शिवलिंगातूनी बाहेर येत । दत्तावधूत श्रीस्वामी ॥१६॥
 
शिवलिंगातून येवोन बाहेर । म्हणती मजजवळी ये सत्वर । येवोनी नागार्जुन सागर । सेवा करीत राहिला ॥१७॥
 
विरय्या नामे भक्त । गायी घेवोनी रानी जात । गायी चरती रानात । मागे फिरे विरय्या तो ॥१८॥
 
एके ठिकाणी बसत । पावा वाजवू लागत । एक भयंकर सर्प येत । द्वादश फडांचा तो असे ॥१९॥
 
पाहोनी सर्प भयंकर । विरय्या कापे थरथर । पावा वाजवी लावोनी जोर । सर्प मनाते रिझवाया ॥२०॥
 
थोडा वेळ पावा ऐकोन । सर्प जाई निघोन । विरय्या गाई वळवोन । घराकडे निघतसे ॥२१॥
 
जलप्रवाह वाटेत । तेथे तो स्नान करीत । विचार करी मनात । उद्या मारावे सर्पासी ॥२२॥
 
ऐसा जव विचार करीत । एक साधू तेथे येत । म्हणे चुकीचे विचार मनात । का ? करिसी विरय्या तू ॥२३॥
 
त्यासी सर्व हकिकत । विरय्या सांगोनी म्हणत । त्या सर्पासी जिवंत । उद्या ठेवणार नाही मी ॥२४॥
 
तव तो साधू म्हणत । श्रीस्वामी दत्तावधूत । राहाती तुझ्या गावात । त्यांचे दर्शन घेई तू ॥२५॥
 
ते सर्व खुलासा करतील । क्रोध तुझा जाईल । मीच तो सर्प म्हणोनी तात्काळ । साधू गुप्त होतसे ॥२६॥
 
विरय्या स्वामी पाशी येत । स्वामींसी सर्व निवेदित । स्वामी विरय्यासी सांगत । भाग्यवान तू खरा ॥२७॥
 
ते आश्वलायन ऋषी असत । दोन सहस्र वय असत । तुजला ते दर्शन देत । भाग्यवान अससी तू ॥२८॥
 
या श्रीगिरी पर्वतात । अनेक ऋषी असती राहात । भाग्यवंतासी भेटत । त्यातील एक तू असे ॥२९॥
 
ऐसे विरय्यासी सांगत । त्यासी बहु आनंद होत । तेव्हा पासोनी नेम करीत । नित्य स्वामी दर्शनाचा ॥३०॥
 
यती पोतलाच्या वाटेवर । मारुतिची मूर्ती सुंदर । उभी असे रस्त्यावर । कोणी तिसी पुसेना ॥३१॥
 
स्वामी पुसती लोकांसी । वाटेत टाकिले का ? मारुतिसी । तव सर्व लोक सांगती । वृत्तांत मारुतिमूर्तीचा ॥३२॥
 
हा मारुति गावात । पूर्वी होता देऊळात । परी भांडणे गावात । रोज होऊ लागली ॥३३॥
 
म्हणोनी त्यासी आणोन । दिले मार्गी ठेवोन । भांडणे तेव्हा पासोन । थांबली पाहा गावींची ॥३४॥
 
ऐसा ऐकोनी वृत्तांत । स्वामी हासती जोरात । म्हणती ग्रामस्थ भांडत । दोष देवासी देताती ॥३५॥
 
ऐसे म्हणोनी ध्यानस्थ । मूर्तीपासी बैसत । शक्ती स्वतःची ठेवीत । तया मूर्ती माझारी ॥३६॥
 
आज मारुति दर्शनासी । दूरदुरोनी लोक येती । प्रसाद खोबरे खावयासी । ग्रामस्थ राहती उभे तेथे ॥३७॥
 
ऐशा अनेक स्थानात । स्वामी स्वशक्ती ठेवीत । लोककल्याण कारणार्थ । ऐसे करिती श्रीस्वामी ॥३८॥
 
                            श्रीदत्त सूक्त
 
ॐ दत्तात्रेयो हरि कृष्णो । मुकुंदो आनंददायका । मुनी दिगंबरोबालो । सर्वज्ञो ज्ञानसागरः ॥३९॥
 
कार्तवीर्य सहस्रार्जुन । नारायण अच्युत माधवः । श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंहसरस्वती । स्वामी समर्थ केशवः ॥४०॥
 
गिरनार मातापूर निवासी । स्मरणगामी ईश्वरासी । मेरु शिखरी वास जयासी । दत्तात्रेया नमो तुज ॥४१॥
 
भक्तकाम कल्पद्रुम । ऐसे जयाचे महिमान । स्मरताची येई धावोन । दत्तात्रेया तुज नमो ॥४२॥
 
भक्तोद्धारा कारण । सदैव राही देह धरोन । अनंतरुपी नारायण । नमन दत्ता तुजलागी ॥४३॥
 
नृसिंहवाडी औदुंबर । अबु पर्वत गाणगापूर । वास जयाचा निरंतर । नमन दत्ता तुजलागी ॥४४॥
 
सर्व सदगुणांचे माहेर । दान नम्रता परोपकार । ऐसा दाता मनोहर । नमन दत्ता तुजलागी ॥४५॥
 
दाता म्हणोनी कीर्तिवंत । म्हणोनी तुज म्हणती दत्त । ब्रह्मा विष्णू महेश एक होत । नमन दत्ता तुजलागी ॥४६॥
 
सर्व येथे राहणार । काही न येई बरोबर । एक दत्त महेश्वर । नमन दत्ता तुजलागी ॥४७॥
 
सत्कर्म आणि सदाचार । करी जीवासी ईश्वर । उपदेश ज्याचा निरंतर । नमन दत्ता तुजलागी ॥४८॥
 
हे दत्तसूक्त नियमित । भक्तिभावे जो पठण करीत । दत्त तयाच्या ह्रदयात । येवोनिया राहतसे ॥४९॥
 
                            इति श्रीदत्तसूक्त
 
सर्व येथे राहणार । काही न येई बरोबर । सत्कर्म आणि सदाचार । हेचि जीवाचे सांगाती ॥५०॥
 
परोपकार ईश्वरभक्ती दान । याने भेटे नारायण । ईश्वराचे नामस्मरण । सदैव करावे भक्तांनी ॥५१॥
 
ऐसे स्वामी दत्त । सदैव भक्तांसी सांगत । दया क्षमा शांती जेथ । ईश्वर राहे तेथवरी ॥५२॥
 
अल्लमप्रबू स्थानात । एकदा जाती श्रीदत्त । त्याच वेळी स्मिता असत । ध्यानस्थ घरी बसलेली ॥५३॥
 
ती पाहे ध्यानात । अल्लमप्रभू ज्योती स्वरुपात । स्वामी समोर बैसत । संवाद करिती श्रीसवे ॥५४॥
 
ऐसे पाहे ध्यानात । ती ताईंसी सांगत । सर्वा आश्चर्य वाटत । दूरदर्शन सिद्धीचे ॥५५॥
 
दत्त जयंती निमित्त । असंख्य जमले भक्त । स्वामींसी सर्व विनवीत । भविष्य सांगा जगताचे ॥५६॥
 
भक्त विनंती ऐकोन । स्वामी सांगती कालज्ञान । म्हणती बहु संशोधन । होईल जाणा भूवरी ॥५७॥
 
दोन हजार तीस सालात । जग होईल सुखी बहुत । सात्त्विकता सर्वत्र । वाढेल जाणा निश्चये ॥५८॥
 
दोन हजार तीनशे श्याऐंशी सालात । दत्त पुन्हा अवतरत । योग विद्या अध्यात्मात । प्रगती होईल मानवाची ॥५९॥
 
एक धर्म होईल जगतात । मानवता हे सूत्र असत । ऐसा धर्म अस्तित्वात । भावी काळी येईल हो ॥६०॥
 
दोन हजार तीस पर्यंत । सर्वश्रेष्ठ होईल भारत । आणखी दोनशे वर्षांत । योगी असंख्य होतील हो ॥६१॥
 
भरो शांतीने विश्व । व्हावे आध्यात्मिक विश्व ! भक्ती ज्ञान प्रेमयुक्त । व्हावे अखिल विश्व हे ॥६२॥
 
सीमा व्हाव्या पुसट । कोणीही कोठेही राहोत । सर्वत्र प्रमे शांती असत । सर्वांसी सहकार सर्वांचा ॥६३॥
 
ऐसे व्हावे वातावरण । म्हणोनी करितसे तपाचरण । येत्या तीस वर्षांत पूर्ण । बदलेल सारे विश्व हे ॥६४॥
 
ऐसे सांगोनी श्रीदत्त । म्हणती जावे कर्दळीवनात । तेथोनी आलो पुन्हा परत । तेथेचि जावे वाटतसे ॥६५॥
 
ऐसे सांगोनी श्रीदत्त । कर्दळीवनी गमन करीत । परी सदभक्तांसी समवेत । आहेत ऐसे वाटतसे ॥६६॥
 
श्रीदत्त विजय ग्रंथाची ऐका । सांगतो आता अवतरणिका । प्रथम पासोनी सारांश निका । दशम अध्यायापर्यंत ॥६७॥
 
प्रथमाध्यायी मंगलाचरण । श्रीदत्ताचा झाला जन्म । योगी येती हिमालयातून । दर्शन देण्या बाळाला ॥६८॥
 
श्रीगुरुचरित्र पवित्र ग्रंथ । स्वये दत्त आणोन देत । दत्तमूर्ती मंत्र प्राप्त । होई त्याच अध्यायी ॥६९॥
 
कैसी करावी साधना । हे सांगितले साधू जनां । योगमार्गाचा महिमा । द्वितीयाध्यायी वर्णिला ॥७०॥
 
तैसेचि या अध्यायात । समर्थ चिदंबर दीक्षित । लीला करिती अदभुत । ऋषी दर्शन देताती ॥७१॥
 
अनेक क्षेत्रे पाहोन । येती रत्नागिरी लागोन । भक्त मनोकामना पूर्ण । करिती तिसरे अध्यायी ॥७२॥
 
महाशून्याचे साधन । प्रकटले औदुंबरातून । कॅनडामध्ये दर्शन । दिधले चौथ्या अध्यायी ॥७३॥
 
प्रकटोनी सुमतीच्या दारी । पुत्र पतीसी ठीक करी । व्याघ्र प्रदक्षिणा करी । पाचवे अध्यायी स्वामींसी ॥७४॥
 
कुंकुमाचा वर्षाव होत । होई ताईंसी देवत्त्व प्राप्त । कृष्ण पाणी पीत । सहावे अध्यायी हे कथा ॥७५॥
 
जप करी शेतात । पाखरे पीक न खात । सुरेखाचा पाय ठीक करत । सातवे अध्यायी श्रीस्वामी ॥७६॥
 
अन्नपूर्णाम्मासी कृष्ण दिसत । वृक्ष पाणी मागत । भक्त इच्छा पुरवीत । आठवे अध्यायी श्रीस्वामी ॥७७॥
 
नववे अध्यायी ऋषी दर्शन । गंडांतर गेले टळोन । ताई देवी असती म्हणोन । शांतादुर्गा  सांगतसे ॥७८॥
 
श्रीदत्त विजय ग्रंथ महिमान । दशमाध्यायी केले वर्णन । भक्ता सांगोनी कालज्ञान । कर्दळीबनांत गेले ते ॥७९॥
 
श्रीदत्त विजय दिव्य ग्रंथ । पठणे पुरती मनोरथ । येथे जागृत परमार्थ । अक्षरी असे भरलेला ॥८०॥
 
या अध्यायाचे करिता पठण । परमार्थी प्रगती होईल जाण । नित्य ग्रंथ करिता पठण । आत्मज्ञान होतसे ॥८१॥
 
॥ अध्याय दहावा ॥ ॥ ओवी संख्या ८१॥
 
॥ श्रीदत्त विजय ग्रंथ समाप्त ॥
 
॥ एकूण ओवी संख्या ९१९ ॥

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

Avoid on Wednesday बुधवारी ही कामे करु नये

आरती बुधवारची

Margashirsha 2024 मार्गशीर्ष महिन्यात काय करावे?

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

पुढील लेख
Show comments