Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दसऱ्याला 'सोनं' म्हणून आपट्याची पानं का लुटतात? या झाडाचं महत्त्व काय?

Webdunia
जान्हवी मुळे
भारतात अनेकदा एखाद्या सणाचं किंवा परंपरेचं त्या त्या प्रदेशातल्या निसर्गाशी, पशुपक्ष्यांशी किंवा झाडा-पाना-फुलांशी नातं असल्याचं दिसून येतं. कधी या निसर्गातल्या गोष्टींची, शक्तींची देव म्हणून पूजा केली जाते तर कधी एखाद्या देवतेच्या पुजेत त्यांचा वापर केला जातो.
 
दसऱ्याचाही त्याला अपवाद नाही. दसऱ्याच्या दिवशी सोनं म्हणून आपट्याची पानं लुटण्याची म्हणजे एकमेकांना देण्याची प्रथा अनेक हिंदू धर्मीय पाळताना दिसतात.
 
महाराष्ट्रात या दिवशी काही गावांमध्ये एखाद्या मंदिरात आपट्याच्या फांद्यांचा ढीग आणला जातो आणि मग सगळे त्यातून फांद्या काढून घेतात आणि एकमेकांना हे 'सोनं' वाटतात. तर काहीवेळा दसऱ्याला आपट्याच्या पानांच्या आकाराचं सोनं भेट म्हणून दिलं जातं.
 
पण या प्रथांमागचं कारण काय आहे? आपट्याच्या पानांना सोनं का म्हटलं जातं, या झाडाचं महत्त्व काय आहे? जाणून घेऊयात.
 
'सोनं' लुटण्याची प्रथा कुठून आली?
हिंदू धर्मात दसऱ्याला सोनं लुटण्याची प्रथा रघुराजाच्या कहाणीशी जोडलेली आहे.
 
पुराणकथांनुसार राम, लक्ष्मण, त्यांचे वडील दशरथ या सगळ्यांचा रघुराजा हा पूर्वज होता. त्याची महती एवढी होती, की ज्या इक्ष्वाकु कुळात त्याचा जन्म झाला, ते पुढे रघुकुल म्हणून ओळखलं जाऊ लागलं.
 
संस्कृतमधल्या महाकवी कालिदासाच्या 'रघुवंश' या काव्यात रघुराजाची आणि त्याच्या वंशातल्या राजांची कहाणी मांडली आहे. त्यात रघुराजाच्या दानशूरतेविषयीची एक कथा सांगितली आहे. तिचा सारांश साधारण असा आहे -
 
कौत्स हा पैठण शहरातल्या देवदत्त नावाच्या एका माणसाचा मुलगा, वरतंतु नावाच्या ऋषींकडे वेदाभ्यास करत होता. त्याला आपल्या गुरूंना गुरुदक्षिणा द्यायची होती. गुरूंनी म्हणजे वरतंतुंनी मला काही नको, असं म्हटल्यावरही कौत्सानं त्यांच्यामागे तुम्हाला मी काय देऊ म्हणून तगादा लावला.
 
त्याचा आग्रह पाहून, काहीशा वैतागलेल्या वरतंतुंनी कौत्साला म्हटलं, तू 14 विद्या शिकलास ना, मग मला चौदा कोटी सुवर्णमुद्रा आणून दे. कौत्साला हे जमणार नाही आणि तो आपला हट्ट सोडून देईल असं वरतंतुंना वाटलं. पण कौत्स तसा हुशार.
 
तो दानशूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रघुराजाकडे गेला. रघुराजानं त्याचं स्वागत आणि विचारपूस केली आणि तुम्हाला काय हवं म्हणून विचारणा केली. कौत्सानं काहीसा संकोच करत आपली कहाणी सांगितली आणि राजा पेचात पडला.
 
रघुराजानं नुकतंच सगळी पृथ्वी जिंकल्यावर विश्वजीत यज्ञ केला होता आणि आपली सगळी आधीच संपत्ती गरिबांत वाटून टाकली होती. तो स्वतः एका झोपडीत राहू लागला, मातीची भांडी वापरू लागला.
 
त्यानं कौत्साची मागणी पूर्ण करण्यासाठी तीन दिवसांची मुदत मागितली आणि कुबेरावर स्वारी करण्याचं ठरवलं. पण त्याची कुणकुण लागताच कुबेरानं युद्ध टाळण्यासाठी सुवर्णमुद्रांचा पाऊस पाडला.
 
रघुराजाचा खजिना पुन्हा सोन्यानं भरून गेला. त्यानं सगळं काही कौत्साला दान केलं, पण कौत्सानं केवळ चौदा कोटी सुवर्णमुद्राच घेतल्या आणि वरतंतुंना दिल्या. दोघांनीही त्यापेक्षा एकही मुद्रा जास्त घेण्यास नकार दिला.
 
कुबेरानंही एकदा दिलेल्या मुद्रा घरी नेण्यास नकार दिला. मग राहिलेलं सगळं सोनं गावाबाहेर आपट्याच्या आणि शमीच्या झाडाखाली ठेवण्यात आलं आणि कौत्सानं ते लोकांना लुटून घरी नेण्यास सांगितलं. तो दसऱ्याचा दिवस होता.
 
या कहाणीमधूनच सोनं म्हणून आपट्याची पानं लुटण्याची प्रथा सुरू झाली.
 
पण आपट्याच्या झाडाचा उल्लेख केवळ पुराणातच नाही. आयुर्वेदातही या झाडाला औषधी वनस्पती मानलं आहे.
 
आपट्याचं झाड महत्त्वाचं का आहे?
आपट्याच्या झाडाचं थेट लक्षात येणारं वैशिष्ट्य, म्हणजे त्याची दोन भागांत विभागलेली पानं. कुणाला ती हृदयाच्या आकाराची, बदामाच्या आकाराचीही वाटतात. आपट्याच्या फुलांचा रंग पांढरा आणि काहीसा पिवळसर असतो.
 
हे झाड मध्यम उंचीचं असून ते भारतीय उपखंडात आणि दक्षिणपूर्व आशियात निमसदाहरीत, पर्णझडी आणि शुष्क जंगलातही आढळतं.
 
आपट्याला संस्कृतमध्ये अश्मंतक म्हटलं जातं, श्वेत कांचन आणि युग्मपत्र अशा नावानंही हे झाड ओळखलं जातं. हिंदीमध्ये कठमूली, सोनपत्ती तर कोंकणीत आप्टो अशी या झाडाची वेगवेळी नावं आहेत.
 
या झाडावर अनेक कीटक, फुलपाखरं उपजीविका करतात त्यामुळं पर्यावरणीयदृष्ट्या हे झाड अतिशय महत्त्वाचं आहे.
 
त्याशिवाय मानवासाठीही ते उपयुक्त झाड आहे. या झाडापासून डिंग, धागे, टॅनिन मिळतं. आपट्याच्या लाकडाचाही पूर्वी वापर होत असे तसंच पानांचा बिडी बनवण्यासाठीही वापर केला जातो.
 
आयुर्वेदातही आपट्याचा उल्लेख आहे. आपट्याच्या सालीचा रस पचनसंस्थेच्या रोगांवर वापरला जायचा, मुतखडा विकारात औषधामध्ये आपट्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जायचा. तर याची पानं कफ आणि पित्त दोषांवर गुणकारी असल्याचं सांगितलं जातं.
 
धन्वंतरीनिघण्टु या ग्रंथात एक श्लोक आहे - "अश्मन्तक महावृक्ष महादोष निवारण| इष्टानां दर्शनं देही कुरु शत्रुविनाशनम्|| " ज्याचा अर्थ होतो की आपट्याचे झाड हे महावृक्ष असून ते महादोषांचं निवारण करते, इष्ट देवतेचं दर्शन घडवते आणि शत्रूंचा विनाश करते.
 
अर्थात, आपटा खरंच किती गुणकारी आहे याविषयी अधिक ठोस संशोधन गरजेचं आहे असं वनस्पतीशास्त्रज्ञ सांगतात.
 
कांचन आणि आपट्यामधला फरक
आपट्याच्या झाडाचं शास्त्रीय नाव आहे बौहिनिया रेसमोसा (Bauhinia racemosa).
 
बौहिनिया प्रजातीत आपट्याशिवाय आणखी 200 हून अधिक झाडांचा समावेश आहे. कांचन वृक्ष आणि कोरळ ही पावसाळी वनस्पतीही याच कुळात येते आणि त्यांची पानंही आकारानं साधारण आपट्यासारखी दिसतात.
 
पण कांचनाची पानं दोन खंडांत विभागलेली असतात, ती आपट्यापेक्षा आकारानं मोठी असतात. आपट्याचं झाड मध्यम उंचीचं असतं, तर कांचन हा त्यापेक्षा उंच वाढणारा वृक्ष आहे. त्याची फुलंही काहीशी जांभळट गुलाबी रंगाची असतात.
 
मात्र अनेकांना कांचन आणि आपट्याच्या पानांमधला फरक सहज लक्षात येत नाही, त्यामुळे दसऱ्याला आपट्यासोबत कांचनाचीही तोड होते.
 
आपट्याच्या झाडावर संकट कसं आलं?
बेसुमार आणि अशाश्वत पद्धतीनं तोड झाल्यानं आपट्याची प्रजाती संकटात असल्याचं प्राध्यापक डॉ. दिगंबर मोकाट सांगतात.
 
ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात वनस्पतीशास्त्र विभागाचे प्राध्यापक तंसच राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळाच्या पश्चिम विभागीय सुविधा केंद्राचे संचालक आणि प्रमुख संशोधक आहेत.
 
डॉ. मोकाट माहिती देतात, "आपट्या शेंगांमधून बी बाहेर पडायला पोषक वातावरण लागतं, ते आजकाल मिळत नाहीये. आधीच या शेंगांचं आवरण कठीण असतं, ते कुजून बी रुजण्यासाठी वेळ लागतो. त्यात फुलं, फळ येण्यापूर्वीच फांद्या काढून घेतल्या गेल्यानं जंगलात या झाडांचं नैसर्गिक पुनरुज्जीवन कमी झालं आहे."
 
ते पुढे सांगतात, "या झाडांच्या बिया शाश्वत पद्धतीनं गोळा करून त्यापासून रोपं तयार करण्याची गरज आहे. उपवन म्हणजे मानवनिर्मित जंगलांमध्ये या रोपांची लागवड करता येईल. त्यावर आमचं केंद्र, कृषी विद्यापीठं, सामाजिक वनीकरण विभाग काम करत आहेत. पण लोकांचा सहभाग हवा.
 
"पुढच्या दसऱ्याला आपट्याची पानं न वाटता, रोपं वाटायची आणि त्यांची लागवड करायची, असं केलं तर हे झाड टिकवू शकतो."
 
पण धार्मिकदृष्ट्या लोक ही गोष्ट मान्य करतील का? पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी त्याविषयी मांडलेली प्रतिक्रिया विचार करायला लावणारी आहे.
 
ते सांगतात, "आधी आपली लोकसंख्या कमी होती आणि त्यामुळं दसऱ्याला आपट्याच्या थोड्या फांद्या काढल्या तर मोठा फरक पडत नसे. पण आता तसं राहिलेलं नाही.
 
"दसऱ्याला शहरांत ट्रकमध्ये भरून आपट्याच्या फांद्या आणल्या जातात, एक दिवस सोनं म्हणून लुटलेली आपट्याची पानं दुसऱ्या दिवशी कचऱ्यात जातात."
 
सोमण पुन्हा पुन्हा कौत्स आणि रघुराजाच्या गोष्टीकडे वळतात.
 
"एक गोष्ट सर्वानी विचारात घ्यायला हवी. कौत्साने खऱ्या सुवर्णमुद्रा लोकांना लुटायला दिल्या होत्या, आपट्याची पाने दिली नव्हती. त्यामुळे पाने तोडणे सर्वस्वी चुकीचे आहे. आधुनिक काळात आपट्याची पानं तोडून लुटण्यापेक्षा द्यायचं असेल तर खरं सोनं द्यावं अथवा सोन्यासारखी असणारी आणि सोनं मिळवून देणारी विद्या म्हणजे पुस्तकं लुटावीत."

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

काल भैरव आरती Kaal Bhairav Aarti

कालभैरवाने काळ्या कुत्र्याला वाहन म्हणून का निवडले?

आरती शनिवारची

Kartik Amavasya 2024 कार्तिक अमावस्या कधी ? तारीख आणि पूजा विधी जाणून घ्या

कालभैरवाष्टकम् Kalabhairava Ashtakam

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

पुढील लेख
Show comments