Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तेथ शब्दब्रह्म कवळलें

Webdunia
बुधवार, 27 ऑगस्ट 2014 (12:23 IST)

नमस्तस्मै गणेशाय ब्रह्मविद्याप्रदायिने।

यस्यागस्त्यायते नाम विघ्नसागरशोषणे।

ज्याच्या नामामध्ये विघ्नसमुद्राचे अगस्तीप्रमाणे शोषण करण्याचे सामर्थ्य आहे आणि वेदांताचे ज्ञानही जो करून देतो असे मानले जाते, त्या गणपतीचा वार्षिक महोत्सव प्रत्येक भाद्रपद शु. चतुर्थीस साजरा केला जातो. प्रत्येक हिंदू महिन्याची शुक्ल पक्षांतील चौथी तिथी सिद्धिविनायकी या नावाने प्रसिद्ध असून भाद्रपद शुक्ल चतुर्थी ही महासिद्धिविनायकी होय. कृष्णपक्षातील चतुर्थीस संकष्टचतुर्थी हे नाव आहे. ही तिथी मंगळवारी आल्यास अंगारकी संकष्ट चतुर्थी असे मानून त्या दिवशी चंद्रोदयी गणपतीची पूजा केल्याच्या योगाने सर्व प्रकारच्या संकटांचा परिहार होतो असे लोक समजतात. श्रावण व माघातील अंगारकी विशेष श्रेष्ठ समजतात.

गणपतीच्या उपपत्तीसंबंधाने अनेक कथा पुराणात सांपडतात. मुद्‍गलपुराण, गणेशपुराण व गणेशभागवत हे तीन संस्कृत ग्रंथ उपपुराणात्मक असून त्याच्यात आलेल्या कथाभागात एकवाक्यता नाही. तरी सामान्यत: पुढील कथा गणेशाच्या उत्पत्तीसंबंधाने विशेषत: सांगण्यात येतात:- मत्स्यपुराणात असे लिहिले आहे की एकदा पार्वतीने आपल्या अंगाची मळी काढून तिचा एक पुतळा तयार केला. त्यास हत्तीचे मुख असून खालची आकृती पुरुषाप्रमाणे होती. पुढे तिने तो पुतळा जळात टाकला. तेव्हा त्याने विशाल देह धारण केला व देवांनी हा गंगापुत्र मानून त्याची पूजा केली. विनायकनामक रुद्रगणाचे त्यास आधिपत्य दिले. पार्वतीच्या अंगाच्या मळापासून याची उत्पत्ती असल्यामुळे यास शिवपुत्र असे म्हणतात. दुसरी एक कथा अशी आहे की, तारकासुराच्या सैन्यांतील गजासुर नावाच्या असुराने शंकराचा कमंडलू लाथाडून त्याचा अपमान केला. हे कृत्य आपला द्वारपाल जो गणपति त्याचेच असावे या समजुतीने शंकराने त्याचा शिरच्छेद केला. परंतु पत्नीकडून खरा प्रकार समजतांच त्याने गजासुराचे शुंडयुक्त शीर त्याच्या धडापासून वेगळे केले व गणपतीच्या धडावर गजतुंड बसविले. हा गजासुर तारकामय संग्रामात कपाली रुद्राच्या हातून मरण पावल्याचे मत्स्यपुराणात सांगितले आहे.

उत्पत्तीचे तात्विक विवेचन
अशी ही एक कथा आहे की गजासुराचा वध करण्यासाठी विष्णूने पार्वतीच्या उदरी जन्म घेतला. त्याचे योग्य काली अष्टसिद्धींबरोबर लग्न झाले व सिद्धींनी त्याला अनेक कार्यात मदत केली. प्राचीन काळी त्रिविष्टप किंवा तिबेटदेश देवभूमी होता व तेथे प्राचीन आर्यांच्या देवदेवता मूलत: वास करीत अशी समजूत आहे. या देवांत लेखा: नांवाचे देवगण होते. हे देवगण लेखकाचे काम करीत. गणपतीस अत्यंत श्रेष्ठ लेखक मानले आहे. तेव्हा अशा गणांतील एक देवता गणपतीच्या नावाने हिंदूंच्या देवगणांत दाखल करण्यात आली असल्यास नकळे.

प्रणवस्वरूप गणपती
गणपतीच्या उत्पत्तीचा तात्त्विकदृष्ट्या विचार करून गणपति हा प्रणवस्वरूप असल्याचे गणेशपुराणाच्या 12 व्या अध्यायात विस्ताराने सांगितले आहे. गणपती हा मूळचा गणेश नसून गुणेश आहे. अर्थांत् सत्व, रज, तम या त्रिगुणांचा तो अधिपति होय. सृष्टीला व्यापून असणारा परमेश्वर ॐ प्रणवाच्या रूपात असल्याचे सांगून गणपती हा त्याचेच रूपांतर होय असे दर्शविले आहे. एकदंत, वक्रदंत, हा प्रणवाच्या वरचा भाग आहे. यासाठी ही नावे गणपतीस देण्यात आली आहेत. ज्ञानेश्वरीच्या आरंभी श्रीगणेशस्तवन करतेवेळी ज्ञानदेवाने म्हटले आहे की-

 

उपरी दशोपनिषदें। जियें उदार ज्ञानमकरंदें।

तियें कुसुमें मुक्तिसुगंधें। शोभती भाळीं।।

अकार चरण युगुल। उकार उदर विशाल।

मकार महामंडल।मस्तकाकार।।

हे तिन्ही एकवटले। तेथ शब्दब्रह्म कवळलें।

तें मियां गुरुकृपें नामिलें। आदिबीज।।


चतुर्थीला गणपतीपूजनाची चाल आहे तिचा अर्थं असा की, चतुर्थ तुर्यांवस्थेत परमात्म्याचा साक्षात्कार होतो. या दिवशी चंद्रदर्शनाचा निषेध आहे. कारण चंद्र ही मनाची देवता असून मन चंचल आहे. चंद्रदर्शन न घेणे म्हणजे मनोलय करणे होय. गणपतीचे वाहन जो उंदीर तो कालरूप जाणावा. उंदीर ज्याप्रमाणे अहर्निश पदार्थमात्र कुरतडीत असतो, तद्वत् कालही सृष्ट पदार्थांचा सारखा नाश करीत आहे. या कालालाच ज्याने जिंकून आपले वाहन बनविले तो भूतमात्रांचा गणराज श्रेष्ठ होय. असे या देवतेचे तात्विक वर्णन आहे.

( आर्यांच्या सणांचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास पुस्तकातून साभार) 
सर्व पहा

नवीन

Surya Arghya on Makar Sankranti 2025: मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याला अर्घ्य कसे द्यावे, योग्य पद्धत आणि नियम जाणून घ्या

मुंज मंगलाष्टके

Maha Kumbh 2025: महाकुंभ मेळ्यात जाणे शक्य नसेल तर घरी शाही स्नान कसे करायचे जाणून घ्या

जिवंत मुलीसाठी करणार पिंडदान; दाम्पत्याने महाकुंभात कन्येचे दान केले, साध्वी होणार

ऋण मुक्तीसाठी ऋणमोचन अङ्गारकस्तोत्रम्

सर्व पहा

नक्की वाचा

Birthday Wishes For Mother In Law In Marathi सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

HMPV Virus: तो कसा पसरतो, लक्षणे आणि खबरदारी, ह्यूमन मेटापन्यूमोव्हायरस बद्दल तपशीलवार माहिती वाचा

HMPV व्हायरस काय आहे? ज्यामुळे लोक त्याला बळी पडत आहेत, जाणून घ्या

Makar Sankranti 2025: मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही या वस्तूंचे दान करू नये?

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतचे मराठी सणवार

Show comments