प्राचीन व अर्वाचीन इतिहा स
गणपतीचा गजानन केव्हा व कसा झाला याचा उलगडा होत नाही. पुराणांत त्याबद्दल कारण दिले आहे, त्यावरून त्याच्या धडावर गजतुंड बसविले असावे हे संयुक्तिक दिसत नाही. रुद्र व त्याची पत्नी ही गजचर्म पांघरीत असत. ज्या अरण्यात रुद्राचा व त्याच्या विनायक वगैरे गणांचा वास असे ते स्थान हत्तीसाठी प्रसिद्ध मानून वन्यपशूंत विशेष बुद्धिमान् जो हत्ती त्याचे शिर विनायकास जोडण्याची क्लृप्ति पुराणकाली निघाली असावी. शिवाच्या अन्य गणांस देखील इतर प्राण्यांची (माकड, मांजर, सिंह) शिरे असल्याचे पुराणांवरून दिसून येते. या सर्व गणांत गणपतीला अत्यंत बुद्धिमान् व विद्वान असे मानतात. वेदात बृहस्पतीस अत्यंत ज्ञाता व बुद्धिशाली गणले असून त्यास गणपति असे संबोधिले आहे.