Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

श्री समर्थ सद्गुरूचा समर्थ महिमा

Webdunia
ND
श्री समर्थ रामदास स्वामी हे महाराष्ट्राला लाभलेले सद्गुरू होत. चारशे वर्षांनंतर आजही त्यांचा उपदेश महाराष्ट्राला जागृतीचे धडे देत आहे. गुरू पुष्कळ असतात, पण जो गुरू आत्मज्ञानाचे दर्शन घडवून देतो तोच खरा गुरू असे शास्त्र सांगते. सर्व काही नष्ट झाल्यावर जे उरते तोच आत्मा. त्या आत्म्यालाच ब्रह्म असे म्हणतात. त्याच परब्रह्माचे दर्शन श्री समर्थांनी महाराष्ट्राला करून दिले आहे. श्रीमंत दासबोधात त्याचा ठिकठिकाणी प्रत्यय येतो.

जे जे यातीचा जो व्यापरु। ते ते त्याचे तितिके गुरु।
याचा पाहता विचारु। उदंड आहे।
असो ऐसे उदंड गुरु। नाना मतांचा विचारु।
परी जो मोक्षाचा सदगुरु। तो वेगळाची असे ।

श्री समर्थांचा दासबोध हा गुरुशिष्याचा संवाद आहे. श्रीसदगुरुचरणी अनन्यभाव ठेवावा अशी समर्थांची शिकवण आहे. सद्गुरू म्हणजे माणसाला संसाररूप सागरातून तरून जाण्यास मदत करणारा संत होय. जन्म-मरणाची यातायात कायम तुटावी म्हणून सद्गुरूशी अअन्य होणे आवश्यक आहे. आत्मज्ञान किंवा ब्रह्मज्ञान प्राप्त झाले की सहजस्थिती प्राप्त होते. मग अलिप्तपणाने जगता येते. जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो आणि जीवनातील सुखदू:खाला सहजपणे जिंकता येते. मन शुद्ध होते. सद्गुरूच्या सहवासात राहून त्यांची सेवा केल्याने त्यांच्या निरनिराळ्या गुणांचे ज्ञान आकलन होते. श्री समर्थ राष्ट्रगुरू होते व आजही त्यांच्या दासबोधाच्या रूपाने ते जिवंत आहेत.

श्री समर्थांनी आपल्या स्वत:च्या आयुष्यात जे जे अनुभवले ते सर्व त्यांनी आपल्या वाङ्मयात लिहून ठेवले आहे. मानवी समाज अफाट आहे. आपल्याला मिळालेले अनुभव व ज्ञान भाषाबद्ध करून ठेवावे. ज्याला आपली उन्नती करून घ्यायची असेल तो त्या लिखाणातून करून घेऊ शकतो. श्री समर्थांनी स्वत: आपल्या जीवनावर निर्भयपणे प्रयोग केलेत व जगातील मानवी जीवनाचा अर्थ शोधून काढला. त्यांचे अनुभवविश्व मोठे होते. व्यापक होते, ते आजही ताजे, अति-जिवंत आणि रसरशीत आहे. त्यांची बुद्धी सूक्ष्म होती तशीच प्रतिभा जागृत होती. त्यांनी आपले जीवनदर्शन त्यांच्या दासबोधात भाषाबद्ध केले आहे. दासबोधाचा अभ्यास करून माणूस संसार सफल करून घेऊ शकतो. त्याकरिता त्याने ज्ञानदृष्टीचा लाभ करून घ्यावा. तो करण्याकरीता मनन हा विवेकाचा मार्ग आहे. सतत श्रवण मनन करून ज्ञान प्राप्त होते, अज्ञान नाश पावते. अखेर मनाचे उन्मन होऊन ज्ञानेचे विज्ञान होते अभंग समाधान प्राप्त होते. असा हा दासबोधाचा अभ्यास साधकाला ब्रह्मज्ञानी करू शकतो. त्याचा अनुभव साधकाने स्वत:चला स्वत:च घ्यायला हवा, असे श्री समर्थ सांगतात, 'जीवनाचे नैराश्य घालवून चैतन्य उत्पन्न करणारी' दासबोधाची शिकवण आहे.

कृपासिंधू उचंबळला। परमार्थ रूप ग्रंथ केला।
जो कल्प कोटी आला। उपेगासी।

असा हा दासबोध साधकांच्या उपयोगी पडतो. आजच्या काळात गुरू करताना साधकाला फार सावध राहावे लागते. कारण केवळ अंधश्रद्धा ठेवून गुरू करणे बरोबर नाही. गुरू करताना त्याची योग्य ती पारख करता आली पाहिजे. ज्याला भक्तिमार्गाची वाटचाल करायची आहे त्याने ईश्वराला किंवा श्री ज्ञानदेव-तुकारामासाख्या संतांना गुरू करावे, नेहमी संतवाङ्मय वाचावे आणि संतसहवास स्वत:चा स्वत:च निवडावा. श्री समर्थांनी स्वत: रामाला गुरू केले होते, 'गुरू साक्षात परब्रह्म' असे म्हटलेच आहे. ज्याप्रमाणे ब्रह्माचे वर्णन करता येत नाही त्याप्रमाणे सद्गुरूचे वर्णनही करता येत नाही. ते शब्दांच्या पलीकडेच आहे. एकदा का सद्गुरू सहवास लाभला की मग मोक्षलक्ष्मीचा लाभ झालाच म्हणून समजा. श्री समर्थांनी आपल्या गुरुवर म्हणजेच रामावर प्रेम केले. त्याची भक्ती केली, त्याचे नाम जपले आणि रामाशी अनुसंधान बांधले. स्वत: ते रामाचे दास झालेत. मग सर्व विश्वात 'समर्थ' म्हणून प्रसिद्ध झाले. त्यांनी योग्य तो गुरू केला व स्वत:ही परमगुरूपद प्राप्त करून घेतले. अशाप्रकारे 'ज्ञानमार्ग कळावया' त्यांनी सत्संग म्हणजेच रामाचा संग धरला आणि स्वत: ज्ञानी होऊन लोकांनाही ज्ञानी करण्याचा निर्धार केला. शास्त्र प्रचिती, गुरू प्रचिती व आत्म प्रचिती करून घेऊन समर्थ सद्गुरू झाले. गुरू करताना साधकाने सावध असावे. स्वत: गुरुची परीक्षा घ्यावा. उगाच 'शिष्यास न लाविती साधन। न करविती इंद्रिय दमन। ऐसे गुरू अडक्याचे तीन मिळाले। तरी त्यजावे। असे श्री समर्थांचे मत आहे. ज्या सद्गुरू वचनाने ज्ञानप्रकाश पसरतो त्याचा शोध घ्यावा.

जयसी वाटे मोक्ष व्हावा। तेणे सद्गुरू करावा।
सदगुरुवीण मोक्ष पावावा। हेकल्यांती न घडे ।

देवसुद्धा नाशिवंत असतात. देव मोक्ष देऊ शकत नाहीत. सद्गुरू अविनाशी आहे. तो शिष्याला मोक्ष देऊ शकतो. असा आहे सदगुरूमहिमा. श्रीसमर्थांनी आपल्या अमृतवाणीने श्री दासबोधात त्याचे वर्णन केले आहे. त्यांनी स्वत: सदगुरुची प्रचिती घेतली मग आपल्या दासबोध ग्रंथाची निर्मिती केली.

समर्थ ग्रंथ दासबोध। तेथूनी बोध प्रबोध।
विमळ ज्ञानबाळबोध । सतशिष्याशी वाढोत।।
एकदा सदगुरूची कृपा झाली की -

अहो सदगुरूकृपा जयासी। सामर्थ्य न चले तयापासी।
ज्ञानबळे वैभवासी। तुच्छ केले।।
असा हा सदगुरूचा महिमा अगाध आहे.

जयजय रघुवीर समर्थ।
सर्व पहा

नवीन

आरती शुक्रवारची

Coconut Remedies: व्यवसायात नुकसान झाले असेल तर नारळाच्या उपायाने पैसे परत मिळवा

श्रीमहालक्ष्मी-व्रताची कथा (गुरुवारची मार्गशीर्ष व्रत कथा)

सरयू नदी का शापित आहे ? शिव का क्रोधित झाले होते जाणून घ्या

आरती गुरुवारची

सर्व पहा

नक्की वाचा

New Year 2025 Gift नवीन वर्षात गर्लफ्रेंडला या वस्तू गिफ्ट द्या

व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे होऊ शकतात हे 6 गंभीर आजार! या गोष्टी खायला सुरुवात करा

NABARD Recruitment 2024 नाबार्डमध्ये विशेषज्ञ पदांसाठी रिक्त जागा, शेवटच्या तारखेपासून पात्रतेपर्यंत इतर तपशील जाणून घ्या

Year Ender 2024: भारतीय अर्थव्यवस्थेसाठी कसे होते 2024 हे वर्ष ?

Vrishchik Lal Kitab Rashifal 2025: लाल किताबनुसार वृश्चिक राशी भविष्य 2025 आणि उपाय