Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रुक्मिणी स्वयंवर प्रसंग सोळावा

Webdunia
श्रीगणेशाय नम: । अंत्रपाट आहे ज्यासी । वेगें सावध करा त्यासी । पळ अक्षर निमिषोन्मिषीं । हरिचरणासी चिंतावें॥ १ ॥
सद्‌गुरु म्हणती सावधान । घटिका हो आली पुर्ण । वचनीं नेदावें प्रतिवचन । सावधान परिसावें ॥ २ ॥
सांडा चौघींची कळकळ । महामौन्येंसी रहा निश्चळ । लग्नघटिका भरे चपळ । अतिसबळ वेगेसीं ॥ ३ ॥
अंगीं धरुनि जाणपण । वचना देती प्रतिवचन । तेणेंचि वचनें त्यांसी दूषण । सावधानपण त्यां नाहीं ॥ ४ ॥
अतिसमयो वर्ते लग्न । दोन्हीं पक्षीं सावधान । अच्युतचिंतनीं राखा मन । सावधान निजबोधें ॥ ५ ॥
ओंपुण्या पडली मिठी । द्वैतभावना सुटली गांठी । सुटला अंत्रपाट दृष्टी । उठाउठी हरीवरी ॥ ६ ॥
भीमकीमाथा एकाएक । कृष्ण अक्षता घाली देख । तोचि मस्तकीं हस्तक । परम सुख पावली ॥ ७ ॥
भीमकी कृष्णाचिया माथां । घालूं जाय जंव अक्षता । कृष्णचि देखे सभोवता । सबाह्यता हरि देखे ॥ ८ ॥
कृष्ण देखे जिकडे तिकडे । अक्षता घाली चहूंकडे । पुरोहित म्हणती लागलें वेडें । कृष्ण निवाडे नोळखसी ॥ ९ ॥
कृष्णालागीं परम पिसी । माळ घालूनि रथीं होतीसी । शेखीं कृष्णासी नोळखसी । केवीं नांदसी संसारीं ॥ १० ॥
ऎसें हें झालें पाणिग्रहण । कृष्णे प्रकृति पाहिली जाण । मग बांधावया कंकण । शुद्ध सुतें सुतविती ॥ ११ ॥
पहिलें सूक्ष्म अति अत्यंत । तेंचि अष्टधा वाढत । स्थूलमानें दृश्य होत । भग तोडित तडातडां ॥ १२ ॥
पहिलें दुखंड केलें जाण । त्रिगुणगुणें घाली वळण । अर्ध स्त्रीनाम कंकण । अर्ध जाण कृष्णपुरुषा ॥ १३ ॥
एकचि तंतू द्वैत झाला । स्त्री अंगीं बाणला । अर्ध पुरुषत्व पावला । करीं बांधला कृष्णाचे ॥ १४ ॥
फेडिलें मायेचें वधूवस्त्र । अष्टपुत्र्या पीतांबर । नेसली कृष्णमय स्वतंत्र । तेणें सुंदर शोभली ॥ १५ ॥
मलिन वाम सांडी प्रकृती । सांडिलें दोहीं पक्ष न घेती । सलोभ उपाध्यें तें नेती । मग भांडती परस्परें ॥ १६ ॥
भीमकिया वरिला नारायण । झळकत दृश्याचें करीं कंकण । सौभाग्यद्रव्यें देतसे वाण । आहेवपणा श्रीकृष्णें ॥ १७ ॥
दिव्य शोभा शोभे कृष्ण । तेथीची शोभा वर्णी कोण । जाणती अनुभवीं सुजाण । सुख संपूर्ण तेथीचे ॥ १८ ॥
जीवी जीवां पडली मिठी । बाह्य पालवां दिधल्या गांठी । भीमकी कृष्ण पाहें दृष्टीं । हरिख पोटीं न समाये ॥ १९ ॥
विवाह होमलागी श्रीहरी । वेगें चला बोहल्यावरीं । कडे घ्यावी जी नोवरी । लहानथोरी वेढिला ॥ २० ॥
नोवरी धरितांचि हाती । नारी मिनल्या नेण किती । प्रकृती वेढिली श्रीपती । अडकले गोविंदा ॥ २१ ॥
बाइल हाती धरिल्यासाठीं । कृष्ण गोविला जगजेठी । येरां जीवांची कायसी गोष्टी । बैसता पाठीं गोड लागे ॥ २२ ॥
कृष्ण विचारी निजव्रती । मजचि वरी माजी प्रकृती । माझेनि गमन इसी निश्चितीं । लाजों किती लटिकाचीं ॥ २३ ॥
हे बैसली माझिये कडिये । जीवेंभावें मज हे पढिये । प्रपंचाचे आंतुलेकडिये । नामरूप इचेनी ॥ २४ ॥
मजवीण हे नोवरी । पुढें न चलें पाऊलभरी । लटकी लाज सांडुनि दूरी । वचन करी वडिलांचे ॥ २५ ॥
आंगां नातळत श्रीहरी । हात न लाविता नोवरी । उचलोनी आणली बोहल्यावरी । नरनारी हांसती ॥ २६ ॥
विवाहहोम झाला संपूर्ण । सप्तपदी पाणिग्रहण । भीमकें दिधली वरदक्षिणा जाण । भूरिदान वांटिलें ॥ २७ ॥
कान पिळू मेहुणे भिती । होईल रुक्मियाची गती । परु विटंबील श्रीपती । याची ख्याती तिहीं लोकीं ॥ २८ ॥
त्यांचा जाणोनियां भावो । कृष्णें फेडिला संदेहो । मेहुणे गौरविले पहा हो । दिव्यांबरी भूषणीं ॥ २९ ॥
भीमक कृष्णासी विनंती करी । चतुर्थहोम आमुचे घरीं । करावा जी कृपेंकरीं । सहपरिवारीं सुदृदेशीं ॥ ३० ॥
पाहावया सुनमुखासी । मूळ पाठवा वरमायेसी । भंवरिया कळस आहे तिजपाशीं । निघें वेगेंसी शुद्धमती ॥ ३१ ॥
कृष्ण वदे ह्रदयासी । धन्य धन्य तिची कुशी । शुद्धमति लागे पायांसी । देवकीसी प्रार्थिलें॥ ३२ ॥
देवकी बैसविली सुखासनीं । लागल्या वाजंत्र्याच्या ध्वनी । विंजणें वारिती दोघीजणी । पायरावणी पदोपदी ॥ ३३ ॥
शुद्धमती देतसे विडिया । पीक धरावया सुवर्णघडिया । श्रीगिरीवरी बोलती गुडिया । पायघडिया पदोपदीं ॥ ३४ ॥
चांदवें मोतिलग विस्तारें । दोहीं बाहीं ढळतीं चवरे । देवकी समारंभें थोरें । आणिली गजरें मांडवा ॥ ३५ ॥
कृष्णरुक्मिणी अतिगोमेटीं । साजिरीं वोहरें देखिलीं दृष्टीं । ऎसा जोडा नाहीं सृष्टीं । माझी दृष्टीं झणी लागे ॥ ३६ ॥
देवकी घेऊनि अपण । दोघां उतरी निंबलोण । कृष्णनिंबलोणा हुताशन । मुख पसरोन धांविन्नला ॥ ३७ ॥
कृष्णनिंबलोण पडतां मुखीं । तेणें मुख सरतें तिहीं लोकीं । हे जाणोनियां याज्ञिकीं । अतिसाक्षेपीं सादर ॥ ३८ ॥
कृष्णनिंबलोण अतिसाक्षेप । करितां हरलें त्रिविधताप । जाऊनि देहसंताप । सुखरूप तो जाला ॥ ३९ ॥
सून बैसवूनि मांडिवरी । कृष्णश्रवण जडित भोवरीं । कानीं घातली निर्धारी । कळस त्यावरी धैर्याचा ॥ ४० ॥
मुक्तमोतिलग गंभीर । श्रवणी बाणल्या साचार । तेणें शोभलीं सुंदर । मनोहर सकळिंकां ॥ ४१ ॥
लग्न लागलिया येरे दिवशी । सोहळा मांडिला वोहरांसी । मूळ पाठविले हळदीसी । यादवांसी भीमकें ॥ ४२ ॥
मूळ पाठविलें सकळां । दोहीं बाहीं बारा सोंळा । करवली सुभद्रा वेल्हाळा । चाले सुढाळा उन्मनी ॥ ४३ ॥
अत्यंत शाहाण्या सुवासिनी । आणीक आल्या नवजणी । कृष्णाची खुतखावणी । त्या जाणोनी वर्तती ॥ ४४ ॥
वडिलपणें अतिश्रेष्ठ । सकळांमाजी वरिष्ठ । शांति चालिली चोखट । अतिलोभिष्ट श्रीकृष्णा ॥ ४५ ॥
सभा बैसली निजबोधें । ढवलळे गाती स्वानंदें । हळदी आरंभिली विनोदे । झालीं सावधे अधिकारें ॥ ४६ ॥
पाहों जाणती कृष्णकौतुक । तेही सावध झाले लोक । अनाधिकारिया लगबग देख । पाहाती मुख वनितांचें ॥ ४७ ॥
वोहरें पाहातां निवे मन । दोन्हीं पक्षी सावधान । कोणा न बोलवे वचन । पडिलें मौन सकळिकां ॥ ४८ ॥
चौघीजणी अतिचपळा । कुजबुजती वेळोवेळां । कैशा झाल्याती तोंडाळा । शब्द्चाळा न सोडा ॥ ४९ ॥
शांति म्हणे परत्या सरा । सांगेन तें तुम्ही करा । कुरवंडी श्रीकृष्णवरा। लोण उतरा सर्वस्वें ॥ ५० ॥
स्नेहें उजळूनियां वाती । भीमकी सन्मुख दाविती । येरी नातळे जी हातीं । स्नेहवृत्ती नावडे ॥ ५१ ॥
कुरवंडी न धरितां हातीं । माय धाय शंकल्या चित्तीं । मग बोलली निजशांती । नव्हे श्रीपती हें योग्य ॥ ५२ ॥
जया दीपाचिये मेळीं । न निघे स्नेहधूम काजळी । तैसा दीप उजळी । मग वोवाळी श्रीकृष्णा ॥ ५३ ॥
ऎकोनि भीमकी झाली सुखी । खूण बाणली नेटकी । जीवीं जीवाची वोळखी । परम पारखी तो जाणे ॥ ५४ ॥
निर्धूम अग्नीच्या निजमेळीं । कृष्णदीपें दीप उजळी । आकाश लोपलें प्रभेतळीं । भावें वोवाळी श्रीकृष्ण ॥ ५५ ॥
न कळे भीमकीचें लाघव । सकळही म्हणती धन्य भाव । आतां घेऊनिया नांव । पाय मागें कृष्णाचे ॥ ५६ ॥
ऎकोनि जनांचियां गोष्टी । भीमकी दचकली पोटीं । काय आतां बोलों वोठीं । न दिसे दृष्टि नामरूप ॥ ५७ ॥
याच्या नामरूपभेदा । व्यक्ति नाणवेचि वेदा । पुढारी वाटले नच शब्दा । नेति अनुवादा परतल्या ॥ ५८ ॥
पाहातां रूपाचा दुकाळ । घालितां साकारतेचा आळ । लाविती नामाचा विटाळ । तेणें गोपाळ शोभेल ॥ ५९ ॥
सवेचि म्हणे कळें चित्ता । गोइंद्रियांचा हा नियंता । यासी गोपाळा म्हणतां । दोष सर्वथा मज नाहीं ॥ ६० ॥
ऎसें विचारूनि वेल्हाळा । लक्ष लाविजे चरणकमळा । वेगीं पाय द्या गोपाळा । भीमकबाळा बोलिली ॥ ६१ ॥
तंव पिटिली टाळिया टाळी । ऎकोनि हांसिजे सकळीं । भीमकीये भली केली रांगोळी । खुण वनमाळी जाणत ॥ ६२ ॥
ऎकोनि भीमकीच्या बोला । कृष्णदेवो मानवला । वर्तत खुणा आपुल्या । देत पाउला स्वानंदें ॥ ६३ ॥
अबला सांगती वडिलां । येणें अभिमान सांडिला । कृष्ण बाइलेआधीन झाला । तिच्या बोलामाजी वर्ते ॥ ६४ ॥
कृष्ण देखोनि बहु काळा । हळदी लाव वेळोवेळां । उठूनिया घनसांवळा । अति सोज्वळा करूं पाहे ॥ ६५ ॥
जें जें कृष्णाअंगीं लावे । तें तें कांहीं केलिया न निघे । भीमकी उटी लागवेगें । मळी न निघे सर्वथा ॥ ६६ ॥
अत्यंत निर्मळ वनमाळी । निज निर्मळ न निघे मळी । चाकाटली भीमकबाळी । न देखे तळीं मळवटू ॥ ६७ ॥
पाहातां कृष्णचरणरेखा । चरणीं देखे तिहीं लोकां । भीमकी कृष्णमय देखा । उटणें हरिखा होतसे ॥ ६८ ॥
कृष्णचरणीं निजस्वरूप । देखतां आला स्वेदकंप । कंठीं दाटला जी बाष्प । विकळरूप मूर्च्छित ॥ ६९ ॥
सद्‌गुरु म्हणती सावधान । कृष्णचरणीं दृढ मन । धैर्य बळें राखोनि जाण । विकळपण येवों नेदीं ॥ ७० ॥
मोहें धांविन्नलो धाये । म्हणे तुज झालें काये । झणीं दिठी लागेल माये । उचलोनि कडिये घेतली ॥ ७१ ॥
कृष्णचरणीं जें अनुभविलें । तें तंव न बोलवे बोलें । भीमकीया शहाणपण केलें । खुणें वारिलें धायेतें ॥ ७२ ॥
पाळी आली कृष्णाकडे । एकेचिं हातें फेडा बिरडें । न फिटे तरी रोकडें । दंडवत घडे भीमकीसी ॥ ७३ ॥
महुणेपणाचे परिपाटीं । विषयतृष्णेचिये दृष्टीं । बिरडा पडिल्या सुबद्ध गांठी । केवीं जगजेठी सोडील ॥ ७४ ॥
मेहुणे म्हणती हा जगजेठी । जाणे बिरडियाची हातवटी । अभ्यास केला यमुनेतटीं । दाटोदाटी गौळणीसीं ॥ ७५ ॥
वर्मेंकर्में बोलती खुणा । यादव म्हणती श्रीकृष्णा । बिरडिया पाडु तो केसणा । तूं देखणा निजदृष्टीं ॥ ७६ ॥
महावीरांचें बिरडें पडलें । तें तुवां एकलेनि फेडिलें । मेहुणे न लाजती बोलतां बोलें । रुक्मिया दिधलें तें यासी दीजे ॥ ७७ ॥
सासुसासरियांची आवडी । देवकीवसुदेवांचिये गोडी । म्हणती कृष्ण बिरडें फेडीं । वचन न मोडीं वडिलांचें ॥ ७८ ॥
कृष्ण अवलोकी कृपादृष्टीं । बिरड्या सुटल्या जी गांठी । द्वैतकांचोळी समदृष्टी । फेडी जगजेठी तत्काळ ॥ ७९ ॥
पहा गे येणें नवल केलें । कृष्णदृष्टीच उगवले । न सोडितां पैं फेडिलें । बिरडें काढिलें निजदृष्टीं ॥ ८० ॥
पाहतां कृष्णदृष्टीकडे । फिटे संसारबिरडें । त्यासी हें दुर्घट केवढें । फेडितां बिरडें नोवरीचें ॥ ८१ ॥
नाना व्रतें तपें दानें । योगयागादि सधनें । करितां शिनले होगिजन । तरी कृष्णचरण न ठाकती ॥ ८२ ॥
भीमकी दैवाची पैं चांग । परम भाग्यें अतिसभाग्य । पावली कृष्णाचें अर्धांग । भावें श्रीरंग भोगित ॥ ८३ ॥
श्रीकृष्णासन्मुख भीमकी । बैसविली जी कौतुकीं । लाज जाली अधोमुखी । कृष्णाकडे पाहे ॥ ८४ ॥
तंव तळवटीं एकाएक । देखती जाली कृष्णमुख । पाठमोरी पाहता देख । देखे सन्मुख श्रीकृष्ण ॥ ८५ ॥
वाम सव्य दोहींकडे । देखे कृष्णाचें रूपडें । आतां मी रिघों कोणीकडे । चहूंकडे हरि दिसे ॥ ८६ ॥
ऎशापरी अतिसंकटीं । लाजतां कृष्ण देखे दृष्टीं । लाज सांडूनि गोरटी । उघटी दृष्टीं हरिरूपीं ॥ ८७ ॥
भीमकी सुकुमार गोमटी । कृष्णा इसीं हळूचि उटीं । कठिणहस्त तूं जगजेठी । मल्ल मुष्टीं मर्दिले ॥ ८८ ॥
तुझा लागतांचि हात । देह बुद्धीचा करिती घात । याचलागीं जीव भीत । तुझी मात न करवे ॥ ८९ ॥
रेवती म्हणे जी यादवा । आधीं घ्यावें इच्या नांवा । मग इसी हळदी लावा । देवाधिदेवा श्रीकृष्ण ॥ ९० ॥
कृष्ण म्हणे हळदीमिसे । मजसी लावूं आल्या पिसें । नांवरूप मज न दिसे । काय म्यां कैसें म्हणावें ॥ ९१ ॥
नामरूपाची व्यवस्था । रुक्मिणीच जाणे तत्त्वतां । माझ्या आंगीं नाहीं सर्वथा । नाम घेता मी नव्हें ॥ ९२ ॥
आग्रह न करावा गोपाळा । नामरूपा तूंचि जिव्हाळा । व्यर्थ चाळविशी अबळा । सुखसोहळा तुझेनी ॥ ९३ ॥
कृष्ण खूण सांगें जीवींची । नामरूपें अतिरूपाची । सगुणगुणें हे गुणाची । प्रिया आमुची निजदृष्टीं ॥ ९४ ॥
कृष्ण म्हणे रुक्मिणी देवी । नामरूप तूंचि अवघी । मजपरीस तूंचि बरवी । हांसिजे सर्वी ऎकोनी ॥ ९५ ॥
हळदी घेऊनि श्रीरंगें । उतित भिमकीची अष्टांगें । येरी निवतसे सर्वांगें । जाणती आगें अनुभवी ॥ ९६ ॥
चरणीं उद्धरली शिळा । ते कर भोगी भीमकबाळा । मृदुपणाचा जिव्हाळा । जाणती कळा निजभक्त ॥ ९७ ॥
हा तंव ब्रह्मादिकांचा ईश । हळदीमिसें ह्रषीकेश । झाला भीमकीचा दास । जगन्निवास जगाचा ॥ ९८ ॥
दासांचेंही दास्य करणें । हें तव श्रीकृष्णचि जाणे । उच्छिष्ट भक्तांचें काढणें । स्वामिपणें फुगों नेणे ॥ ९९ ॥
कृष्ण साचार देवाधिदेवो । फेडी भक्तांचा संदेहो । जैसा जयाचा भक्तिभावो । तैसा देवो तयासी ॥ १०० ॥
भक्तभावाच्या आवडी । धूत रणांगणीं घोडीं । भक्तभावाची निजगोडी । जाणे धडफुडी श्रीकृष्ण ॥ १ ॥
कृष्णचरणीं सत्य समता । सुरंग भावार्थ अक्षता । भीमकीये ठेवीं माथा । लाज सर्वथा न धरावी ॥ २ ॥
ऎकोनि हरिखेली वेल्हाळा । धन्य दशा झाली कपाळा । चरण वंदीन गोपाळा । भीमकबाळा उल्हासली ॥ ३ ॥
हरिखें नमूं पाहे गोरटी । तव पूर्वील सख्या वक्रदृष्टी । देखतां लाज आली पोटीं । भेद उठी शंकेचा ॥ ४ ॥
तेणें चुकविले समचरण । वृथा गेलें जी नमन । मायेसकट हांसती जन । येरी अभिमान धरियेला ॥ ५ ॥
थोर अभिमानली बाळी । धरी अंगुष्ठ करतळीं । नमन चुकों नेदी ये वेळीं । देखोनि वनमाळी हांसत ॥ ६ ॥
येरी मस्तक जंव लोटी । तंव समचर्णा पडली तुटी । अभिमानें केली फुटी । पाय ललाटीं न लागती ॥ ७ ॥
नमस्कारालागीं भलें । येरी मागुती अंगविलें । तंव समसाम्य पाउलें । कांहीं केल्या नातुडती ॥ ८ ॥
जितुकें अभिमानाचें बळ । तितुकें निजदृष्टिपडळ । तेणें चुकविलें चरणकमळ । वेगें वेल्हाळ गजबजली ॥ ९ ॥
वियोग न साहवे पोटीं । ऊर्ध्वश्वासें स्फुंदे गोरटी । चरण न लागती लल्लाटीं । कपाळ पिटीं निजकरीं ॥ ११० ॥
दु:खे म्हणतसे कटकटा । मर मर दुष्टा अदृष्टा । कृष्ण पावलिया गोष्टी फुकटा । चरण लल्लाटा न लागती ॥ ११ ॥
लोक म्हणती सकळ । धन्य भीमकीचें कपाळ । तें हें आजि झालें निर्फळ । श्रीकृष्णचरण नातळती ॥ १२ ॥
मनीं होती ऎसी आस । करूनि उटणियांचे मिस । कृष्ण नमीन सावकाश । तेंही उदास भाग्य जालें ॥ १३ ॥
चरण न पावेचि कपाळ । जीवीं लागली तळमळ । गात्रें जाताती विकळ । परम विव्हळ होतसे ॥ १४ ॥
चंडवाते जैसी कर्दळी । उलथों पाहे जी समूळीं । त्याहून अधिक भीमकबाळीं । गात्रें सकळीं कांपती ॥ १५ ॥
नेत्रीं अश्रूचिया धारा । अंग कांपतसे थरथरा । चरणवियोगें सुंदरा । शरीरभारा उबगला ॥ १६ ॥
गळती अलंकार भूषणें । करमुद्रिका आणि कंकणें । पडली अवशेषित प्राणें । सत्त्वगुणें मूर्च्छित ॥ १७ ॥
जीवनावेगळी मासोळी । तेवी तळमळी भीमकबाळी । उद्धव कळवळिला तये वेळीं । आनंदजळीं वर्षत ॥ १८ ॥
उद्धव म्हणे कृष्णनाथा । तुझी अवस्था शोधित चित्ता । विनोद करिसी भक्तहिता । चरणीं माथा ठेवूं दे ॥ १९ ॥
मग धांवोनियां लवलाहें । धरूनि भीमकीची बाहे । म्हणे उठीं उठीं वो माये । वंदीं पाय कृष्णाचे ॥ १२०॥
सांडीं सांडीं लज्जाभिमान । निर्विकल्प राखीं मन । वृत्ति करूनि सावधान । हरिचरण वंदावें ॥ २१ ॥
मग उद्धवाचे वचनीं । देत विश्वास रुक्मिणी । लाज सांडिली उपडोनी । हरिचरणीं निर्लज्ज ॥ २२ ॥
समचरणाचिये भेटी । सुटल्या अहंसोहं गांठी । उटूं विसरली गोरटी । घातली मिठी हरिचरणीं ॥ २३ ॥
वृत्तीसी जालें समाधान । खुंटला शब्द तुटलें मौन । भोगिताहे चैतन्यघन । समचरण वंदितां ॥ २४ ॥
उपरमली विषयदृष्टी । निजानंदें कोंदली सृष्टी । तेथें हरपली त्रिपुटी । उठाउठी निजलाभ ॥ २५ ॥
कृष्णचरणीं जडली कैसी । देह विदेह नाथवे तिसी । विसरली विवाहसोहळ्यासी । कृष्णसाम्येंसी समरस ॥ २६ ॥
नोवरा नोवरी नाठवे हेतू । आणवाहूनि गेला दृष्टांतू । अर्थ स्वार्थ आणि परमार्थू । झाला अनंतू अनंतीं ॥ २७ ॥
हरि म्हणे वेल्हाळ । दिसे देहभावीं विकळ । माय धाय करिती कोल्हाळ । सोयरे सकळ मिळोनी ॥ २८ ॥
ऎशा करतील पां गोष्टी । पायां लागलियासाठीं । जीवभावा पडली तुटी । वर जगजेठी वरूं नये ॥ २९ ॥
लौकिक परमार्थासी सळ । दोहीं पक्षीं पडेल विकळ । मजवरी रचिती किडाळ । नानाशब्द जाळ तर्काचे ॥ १३० ॥
ऎसी उफराटी विकडी । पडली देवांसी सांकडी । सावधान हे धडफुडी । केवीं तांतडी होईल ॥ ३१ ॥
भीमकी निजसुखा अंतरीं । वेगें प्रवेशला श्रीहरी । तोही विसरला सुंदरी । सावधान करावया ॥ ३२ ॥
देवो देवी झालीं एक । भेद फिटला नि:शंक लागली निजसुखटकमक । चेतवि देख कोण कोणा ॥ ३३ ॥
सहजीं सहजमेळीं । निजबोधें वनमाळी । स्वभावें भीमकबाळी । सावध करी सवेगें ॥ ३४ ॥
निजीं निजसुखावेगीं । न निवडे कवणें काळीं । करूनि अहंकाराची होळी । होय वेल्हाळी सावध ॥ ३५ ॥
तिसी देहावर जरी येणें । तरी मी देह ऎसें न म्हणे । अवघें आंगेंचि आंगवणें । पूर्णपणें रचिलीसे ॥ ३६ ॥
चराचर जें जें दिसे । तें तें अवघें मीच असें । जीव शिव झाले मदंशें । रितें न दिसे मजविण ॥ ३७ ॥
यापरी कृष्णरुक्मिणी । सावध झालीं ऎक्यपणीं । माया गेली निंबलोण करूनी । वोंवाळूनि सर्वस्वें ॥ ३८ ॥
ऎक्याचिया बहुल्यावरी । दोघें वोहरे साजिरीं । बैसलीं अभिनव प्रीतिकरीं । निजनिर्धारीं स्वलीला ॥ ३९ ॥
सरली नमस्काराची वारी । तंव श्रीकृष्णें केली चोरी । लिंगदेहाचे गांठीभीतरीं । डाव श्रीहरीं चोरिला ॥ १४० ॥
पालवा पालव बांधल्या साठी । चहूं देहांच्या सोडिल्या गांठी । पायां लागतां गोरटी । नेदी महाहटी हटवादी ॥ ४१ ॥
चैतन्य चोर हा निजदृष्टीं । सोडीत अभ्यंतरींच्या गांठीं । घेतले देऊं नेणे जगजेठी । व्यर्थ चावटी कां करावी ॥ ४२ ॥
आंबा शिंपावया गोरटी । कडे घेऊनि कृष्ण उठी । आइती केलीसे गोमटी । कुंकुमें वाटी परिपूर्ण ॥ ४३ ॥
ओंकार आळां दृढमूळ । सहज वृक्ष तो सुनीळ । वाढिन्नला सकोमळ । अर्धमात्रापरियंत ॥ ४४ ॥
आगमनिगम तेचि पानें । वैराग्यमोहराचीं सुमनें । मोहरला कवणें मानें । श्रद्धाजीवें सपोष ॥ ४५ ॥
परिमळा लोधले साचार । रुंजी करिती मुमुक्षुभ्रमर । आमोदरस भाव सादर । झणत्कार सांडूनी ॥ ४६ ॥
स्वानंदवसंताचें रिघवणें । वृक्ष नित्य नवा तेणें गुणें । संतकोकिळचीं सुटलीं मौनें । टाहो करिती निजबोधे ॥ ४७ ॥
सकळ फळें फळल्यापाठी । आम्रवृक्ष फळे शेवटीं । रसास्वादाचिय खोटी । पोटींची आंठी सांडिलिया ॥ ४८ ॥
निजसेजे जो मुराला । तोचि सज्जनीं सेविला । बहु काय बोलों बोला । आंबा शिंपों आला श्रीकृष्ण ॥ ४९ ॥
तेथें केली नवलकुसरी । सन्मुख पाहतां नोवरा श्रीहरी । विन्मुख पाहतांचि नोवरी । मांडियेवरी बैसविली ॥ १५० ॥
शेंड्याहूनि समूळीं । अखंड एक धार लागली । आंबा शिंपी भीमकबाळी । चौघी वेल्हाळ तेथें गाती ॥ ५१ ॥
प्रकृती पुरुष दोघेंजणें । आंबा शिंपिती एकपणें । चूत विस्तारला अच्युतपणे । आंबा म्हणवणें जगाचा ॥ ५२ ॥
आंबा शिंपोनी गोरटी । कृष्णसहित वेगें उठी । हातींची रिती नव्हे वाटी । कृष्ण पूर्णदृष्टीं पाहातसे ॥ ५३ ॥
त्रिगुण गुणातीत जाण । तिसरे दिवशीं तेलवण । करूनि नोवरीसी अर्पण । वाणपालटण चतुर्थी ॥ ५४ ॥
श्रीकृष्णासी वाणपालटण । नामरूपाचें वास संपूर्ण । स्थितिकाळासी देऊनि मान । लीला श्रीकृष्ण नेसला ॥ ५५ ॥
वाणपालटण नोवरीस । अक्षयाचे सपूर वास । नेसोनियां सावकाश । निजसुखेसी वर्तती ॥ ५६ ॥
वोहरें बैसवोनि वाडेंकोडें । समसाम्य वाहूनि साडे । ऎरणी विस्तारावया पुढें । शुद्धमती सावध ॥ ५७ ॥
व्याही गौरवितां कौतुक । कृष्णासमान मानी भीमक । सकळिकां देऊनि सुख । एकेंएक गौरविलें ॥ ५८ ॥
भीमकें मांडिलें विंदान । भवऎरणी संपादून । कृष्णासी वंशपात्रदान । विधीविधान वेदोक्त ॥ ५९ ॥
वंश विस्तारितां सुख । सोळा कळांचे सोळा कर्क । प्रकृतिस्वभाव सुपल्या देख । ज्ञानदीपें सोज्वळ ॥ १६० ॥
शुद्धमतीनें तत्त्वता । एका जनार्दन पाहतां । वंश ठेविला कृष्णसमर्था । जुनाट कथा परिसिजे ॥ ६१ ॥
पूर्वी पितामहाचा पिता । तयासी प्रसन्न सुभानु होता । तेणें भानुदासें वंश सरतां । केला तत्त्वता हरिचरणीं ॥ ६२ ॥
प्रल्हादाचे कृपेसाठीं । बळींचें द्वार राखी जगजेठी । तैसीच हेही आहे गोष्टी । कृपादृष्टी कृष्णाची ॥ ६३ ॥
सांगतां वंशपात्रदान । लागलें निजयशाचें अनुसंधान । आमुचे वंशी वरदान । परम भक्त कृष्णाचे ॥ ६४ ॥
मी जन्मलों धन्य वंशीं । म्हणोनि हरिभक्ति आम्हांसी । संत सोयरे निजमुखासी । वश कृष्णासी निरविला ॥ ६५ ॥
जें जें जयासी निरविलें । तेणें तें पाहिजे सांभाळिलें । आमुचें चाळकपण कृष्णासी आलें । कांसे लाविलें जनार्दन ॥ ६६ ॥
कथेसी झाली आडकथा । म्हणोनि न कोपावें श्रोतां । धेंडा नाचवील कृष्णनाथा । रसाळ कथा पुढें आहे ॥ ६७ ॥
 
इति श्रीमद्भागवते महापुराणे दशमस्कंधे हरिवंशसंहितासंमते रुक्मिणीस्वयंवरे विवाहसंभ्रमो नाम षोडश: प्रसंग ॥ १६८ ॥
 
॥ श्रीगोपालकृष्णार्पणमस्तु ॥

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

Avoid on Wednesday बुधवारी ही कामे करु नये

आरती बुधवारची

Margashirsha 2024 मार्गशीर्ष महिन्यात काय करावे?

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

पुढील लेख
Show comments