rashifal-2026

संत निवृत्तीनाथांचे अभंग 11 ते 20

Webdunia
सोमवार, 13 जून 2022 (12:10 IST)
प्रारब्ध संचित विठ्ठलदैवत । कुळीं उगवत भाग्ययोगें ॥ १ ॥
तें रूप पंढरी उभें असे सानें । त्रिभुवनध्यान वेधियेले ॥ २ ॥
उगवली ज्योति प्रभा पैं फाकती । नाहीं दीनराती पंढरीये ॥ ३ ॥
प्रभात हरपे सायंकाळ लोपे । दिननिशी लोपे विठ्ठलप्रभा ॥ ४ ॥
पृथ्वी हे ढिसाळ वायु व्योमफळ । सेविती अढळ जोडती रया ॥ ५ ॥
निवृत्ति सप्रेम जोडती सर्व काळ । पंढरी ये राम विश्रामले ॥ ६ ॥
*****
सर्वकामधन सर्वसिद्धिपूर्ण । पतीतपावन हरि एक ॥ १ ॥
तें रूप पंढरी पुंडलिका वोळलें । आणूनि ठेविलें भीमातीरीं ॥ २ ॥
नलगती त्या सिद्धि करणें उपाधी । नित्य चित्तशुद्धि विठ्ठलनामें ॥ ३ ॥
कळिकालासि त्रास चित्तीं ह्रषिकेश । उगवला दिवस सोनियाचा ॥ ४ ॥
त्रिभुवनीं थोर क्षेत्र पैं सार । विठ्ठल उच्चार भीमातीरीं ॥ ५ ॥
निवृत्ति तत्पर निवाला सत्वर । नित्यता आचार विष्णुमय ॥ ६ ॥
*****
उघडें स्वरूप प्रत्येक्षाचें दीप । नाम घेतां पाप हरे जना ॥ १ ॥
तें रूप विनट विठ्ठल सकळ । सेवा दिनकाळ पंढरीयेसी ॥ २ ॥
रजतमें दूरी नामाची माधुरी । निशाणी एकसरी रामकृष्ण ॥ ३॥
भवाब्धितारक नावाडा विवेक । पुंडलिक देख सेवितसे ॥ ४ ॥
विश्व हें तारिलें नामचि पिकलें । केशवी रंगलें मन हेतु ॥ ५ ॥
निवृत्ति विठ्ठल सेवितु सकळ । दिनकाळफळ आत्माराम ॥ ६ ॥
*****
पंढरीये चोख रूपडें अशेख । भीमातीरीं देख पुण्यभूमी ॥ १ ॥
आदिपीठ देव ब्रह्म हें स्वयमेव । पुंडलिक भाव प्रगटला ॥ २ ॥
जन हें कोल्हाळ विठ्ठल तारक गोपाळ । कीर्तनीं कळीकाळ दूरी ठाये ॥ ३ ॥
नाम हें विठ्ठल नलगे पैं मोल । नित्यता सकळ पांडुरंग ॥ ४ ॥
त्रिविधताप पाप तें जिंतील अमूप । मुरतील संकल्प एक्या नामें ॥ ५ ॥
निवृत्ति म्हणे धन्य कीर्तन जो करी । सर्वत्र चराचरीं बोलियेलें ॥ ६ ॥
*****
जनासी तारक विठ्ठलचि एक । केलासे विवेक सनकादिकीं ॥ १ ॥
तें रूप वोळले पंढरीस देखा । द्वैताची पै शाखा तोडीयेली ॥ २ ॥
उगवलें बिंब अद्वैत स्वयंभ । नाम हें सुलभ विठ्ठलराज ॥ ३ ॥
निवृत्तीचें गूज विठ्ठल सहज । गयनीराजें मज सांगितलें ॥ ४ ॥
*****
पिंड हा न धरी ब्रह्मार्पण करी । विष्णु चराचरीं ग्रंथीं पाहे ॥ १ ॥
तें रूप विठ्ठ्ल ब्रह्माकार दिसे । पंढरी सौरस भींमातीरीं ॥ २ ॥
जगाचे तारक पूण्य पूज्य लोका । तृप्त सनकादिक नामें होती ॥ ३ ॥
पतीतपावन नाम हे जीवन । योगीयाचें ध्यान हरि आम्हां ॥ ४ ॥
वेणुनादीं काला पिंडावती जाला । भाग्य भोगियला दृष्टी पूढें ॥ ५ ॥
निवृत्ति म्हणे ते रूपडें अनंत । विठ्ठल संकेत तरुणोपेव ॥ ६ ॥
*****
हरिविण व्यर्थ आचार समर्थ । हरि हेंचि हेत अरे जना ॥ १ ॥
तें रूप पंढरी पुंडलिकसंगे । एका नामें पांग पाश तोडी ॥ २ ॥
सर्व ब्रह्मार्पण क्रिया करी जाण । वेदमत्तें खुण ऐसी असे ॥ ३ ॥
निवृत्तीचा देव सर्व हा गोविंद । नाहीं भिन्न भेद विश्वीं इये ॥ ४ ॥
*****
भाग्याचेनि भाग्य उदो पैं दैवयोगें । तें पुंडलिका संगें भीमातटीं ॥ १ ॥
ध्यान मनन एक करितां सम्यक । होय एकाएक एक तत्त्व ॥ २ ॥
उदोअस्तुमेळें ब्रह्म न मैळें । भोगिती सोहळे प्रेम भक्त ॥ ३ ॥
निवृत्ति निवांत विठ्ठल सतत । नघे दुजी मात हरिविण ॥ ४ ॥
*****
ध्येय ध्यान मनीं उन्मनीं साधनीं । लाविता निशाणी ध्यानमार्गे ॥ १ ॥
तें रूप सघन गुणागुणसंपन्न । ब्रह्म सनातन नांदे इटे ॥ २ ॥
विठ्ठलनामसार ऐसाचि निर्धार । मुक्ति पारावार तीं अक्षरीं ॥ ३ ॥
निवृत्ति निवांत राहिला निश्चित । केलेंसे मथीत पुंडलिकें ॥ ४ ॥
*****
काळवेष दुरी काळचक्र करीं । बाह्य अभ्यंअती हरि नांदे ॥ १ ॥
सर्वत्र श्रीकृष्ण नंदाघरीं जाला । कृष्णें काला केला गोपवेषें ॥ २ ॥
गोपाळ संवगडे खेळे लाडेकोडे । यशोदेमाये पुढें छंदलग ॥ ३ ॥
निवृत्तिम्हणे तो स्वामी सकळांचा । दिनकाळ वाचा कृष्ण जपों ॥ ४ ॥
*****

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Sankashti Chaturthi Mahatmya संकष्टी चतुर्थी महात्म्य

Maha Shivaratri 2026: महाशिवरात्रीला काय करावे आणि काय करू नये?

विनाशातून सृजनाकडे: महाशिवरात्रीचा खरा अर्थ काय?

Holi 2026 Essay in Marathi होळी निबंध मराठी

Shree Gajanan Maharaj Prakat Din 2026 श्री गजानन महाराजांचे आवडते नैवेद्य पाककृती

सर्व पहा

नक्की वाचा

Shree Mangeshi Rathyatra Goa 2026 श्री मंगेशी रथयात्रा गोवा बद्दल संपूर्ण माहिती

संत तुकाराम महाराजांचे ५ अभंग जे तुमचे जीवन बदलू शकतात

Essay on Corruption: भ्रष्टाचार: देशाच्या प्रगतीतील मोठा अडथळा

Weight Loss Recipe वजन कमी करायचे आहे? नाश्त्याला बनवा कमी तेलातले बाजरीचे अप्पे

नवर्‍याला 'अहो' म्हणण्यामागे दडलंय तरी काय? मराठी संस्कृतीतील त्यामागचे खास कारण माहित आहे का!

पुढील लेख
Show comments