Dharma Sangrah

संत निवृत्तीनाथांचे अभंग 181 ते 190

Webdunia
बुधवार, 15 जून 2022 (16:19 IST)
माता पिता नाहीं बंधु बोध कांही । सर्वसम डोही वर्तताती ॥ १ ॥
सर्व आम्हा राम भजनीं निष्काम । दिन कळा नेम भजनशीळ ॥ २ ॥
दया वसे देहीं क्षमा ते माधवीं । कासवीं शोभवी जनीं इये ॥ ३ ॥
निवृत्ति म्हणे ऐसा गयनि सद्‌गुरु । उपदेश पूरु अमृताचा ॥ ४ ॥
 
पूर्णबोधें धाले आत्मराम धाले । निखळ वोतले पूर्णतत्त्वें ॥ १ ॥
पूर्वपूण्य चोख आम्हांसि सफळ । गयनि कल्लोळ तुषार आम्हां ॥ २ ॥
चंद्र सूर्य कीर्ण आकाश प्रावर्ण । पृथ्वी अंथुरण सर्वकाळ ॥ ३ ॥
निवृत्ति म्हणे गुरु धडफुडा । ब्रह्मांडा एवढा अनंत माझा ॥ ४ ॥
 
आम्हां जप नाम गुरुखूण सम । जन वन धाम गुरुचेचि ॥ १ ॥
नेघों कल्पना न चढों वासना । एका पूर्णघना शरण जाऊं ॥ २ ॥
तप हें अमूप नलगे संकल्प । साधितां संकल्प जवळी असे ॥ ३ ॥
निवृत्ति म्हणे मज निरोपिलें धन । हेचि ब्रह्मखुण जाणिजेसु ॥ ४ ॥
 
आम्हां हेंचि थोर सद्‌गुरुविचार । नलगें संप्रधार नानामतें ॥ १ ॥
नेघों ते काबाड न करूं विषम । ब्रह्मांड हें होम आम्हां राम ॥ २ ॥
नेदूं यासि दुःख उन्मनीचें सुख । न करूं हा शोक आला गेला ॥ ३ ॥
निवृत्ति म्हणे आम्हां सद्‍गुरु उपदेश । सर्व भूतीं वास हरि असे ॥ ४ ॥
 
चराचरीं हरि गुरुमुखें खरा । माजि ब्रह्म सैरा विचरों आम्हीं ॥ १ ॥
आम्हां ऐसें व्हावें तरीच हें भोगावें । निरंतर ध्यावें पोटाळूनि ॥ २ ॥
नाहीं येथें काळ अवघे शून्यमये । निर्गुणी सामाये तुन माझी ॥ ३ ॥
निवृत्ति म्हणें परत्रिंकूटगोल्हाट । त्यावरील नीट वाट माझी ॥ ४ ॥
 
नव्हें तें पोसणें नव्हे तें साधन । उपदेशखुण वेगळीं रया ॥ १ ॥
न भेदें पालथें वज्रें मढियेलें । जीवन घातलें न भरें घटीं ॥ २ ॥
नाइके उपदेश नव्हे खुण सिद्ध । योनिसी प्रसिद्ध मढियेले ॥ ३ ॥
निवृत्ति म्हणे जरीं कृपा करि श्रीगुरु । तरिच हा संप्रधारु घरीं आम्हां ॥ ४ ॥
 
साकार निराकार ब्रह्मीचे विकार । तेथील अंकुर गुरुराज ॥ १ ॥
रज तम नाहीं सात्विक तेही । परिपूर्ण देहीं आत्माराम ॥ २ ॥
सर्वघटवासि सर्वत्रनिवासी । आपण समरसीं बिंबलासें ॥ ३ ॥
निवृत्तिची खुण गुरूचा उद्गार । सर्व हा निर्धार आत्माराम ॥ ४ ॥
 
प्राकृत संस्कृत एकचि मथीत । गुरुगम्य हेत पुराणमहिमा ॥ १ ॥
वेदादिक मत शास्त्र हें बोलत । श्रुतीचा संपत वाद जेथें ॥ २ ॥
पृथ्वी हे ढिसाळ आकाश कव्हळ । जन्म मायाजाळ विरत जेथें ॥ ३ ॥
निवृत्ति म्हणे गुरु गयनि सौरसें । आपण जगदीश सर्वारूपीं ॥ ४ ॥
 
सार निःसार निवडूनि टाकीन । सर्व हा होईन आत्माराम ॥ १ ॥
राम सर्वा घटीं बिंबलासे आम्हां । पूर्ण ते पूर्णिमा सोळाकळी ॥ २ ॥
न देखों दूजें हरिविण आज । आणिकाचें काज नाहीं तेथें ॥ ३ ॥
निवृत्ति गौरव गुरुमुखें घेत । आपणचि होत समरसें ॥ ४ ॥
 
पृथ्वी श्रीराम आकाश हें धाम । आपण विश्राम स्थूलरूपें ॥ १ ॥
सूक्ष्मस्थूल राम साधक परम । नाम सर्वोत्तम सर्वारूपीं ॥ २ ॥
आकार विकार सम सारिखाचि हरि । बाह्यअभ्यंतरीं आपणचि ॥ ३ ॥
निवृत्ति निष्टंक ज्ञान तें सम्यक् । गयनि विवेक सिद्ध पंथ ॥ ४ ॥

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

गुरुवारी व्रत करण्यापूर्वी जाणून घ्या महत्त्वाचे नियम, पूर्ण होतील सर्व इच्छा

आर्थिक चणचण दूर होणार! गुरुवारी करा तुळशीचे ४ सोपे तोडगे

अपरा एकादशी व्रत कथा Apra Ekadashi 2026 Vrat katha

Apara Ekadashi Vrat 2026 अपरा एकादशी पूजा विधी तसेच महत्त्व जाणून घ्या

युगे अठ्ठावीस विठ्ठल आरती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

पुढील लेख
Show comments