Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

श्री भक्तविजय अध्याय ३०

Webdunia
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीपूतनाप्राणहरणाय नमः ॥    
ऐका श्रोते सादरचित ॥ नरसी मेहेता वैष्णव भक्त ॥ जुन्यागडीं प्रेमयुक्त ॥ श्रीहरिभजन करीतसे ॥१॥
क्षमा शांति मूर्तिमंत ॥ जयापासीं ॥ अखंड वसत ॥ वृत्ति तयाची अयाचित ॥ अल्पसंतुष्ट सर्वदा ॥२॥
भक्ति ज्ञान वैराग्य पूर्ण ॥ प्रेमें करीत हरिभजन ॥ कुटुंब कलत्र असोन ॥ अलिप्त असे सर्वांसीं ॥३॥
जेवीं सरोवरीं असोनि कमळिणी ॥ जीवन नातळे तिजलागूनी ॥ कीं घटीं बिंबतां वासरमणी ॥ न भिजतां दिसोनि येतसे ॥४॥
कीं सर्वां ठायीं असोनि जाण ॥ न कोंडे जैसा प्रभंजन ॥ तेवीं प्रपंचीं असोनि सज्जन ॥ न लागती अवगुण तयांसी ॥५॥
हरिभक्तांसी संसार ॥ आहे म्हणती अज्ञान नर ॥ त्यांचा होतसे भूमीसी भार ॥ निंदक थोर म्हणूनि ॥६॥
आकाशासी काळिमा लावितां ॥ परी लावी तयाचे लागे हातां ॥ तेवीं निंदील जो वैष्णव भक्तां ॥ दोष तयासी लागती ॥७॥
नरसी मेहेता उदास जाण ॥ त्याचे कन्येसी जाहलें ऋतुदर्शन ॥ फ्हळशोभनाकारण ॥ तयासी आमंत्रण पाठविलें ॥८॥
घरीं नसें वस्त्र अन्न ॥ कांता तयासी बोले वचन ॥ अहेर न्यावयाकारण ॥ काय आपण योजिले ॥९॥
मग तो म्हणे अहेरासी ॥ हरीचें नाम असे आम्हांपासीं ॥ ऐसें बोलोनि स्त्रियेसी ॥ गेला तेथें सत्वर ॥१०॥
नरसी मेहेत्यासी देखोन ॥ हांसों लागले अवघे जन ॥ म्हणती काय कारण ॥ याचें येथें यावया ॥११॥
लौकिकार्थ पाठविलें मूळ ॥ हा तंव आला तत्काळ ॥ गळा घालोनि तुळसींची माळ ॥ करीं टाळ घेऊनि ॥१२॥
वाद्यें वाजती अति गजर ॥ सोयरे मिळाले थोरथोर ॥ जवळी नसतां अहेर ॥ येथें कासया हा आला ॥१३॥
कन्या साशंकित होऊन चित्तीं ॥ नरसी मेहेत्यासी सांगे एकांतीं ॥ नष्ट तुम्हांस हिणाविती ॥ लज्जा मजप्रति वाटतसे ॥१४॥
अकोनि सकळांचें वचन ॥ नरसी मेहेता त्यासी म्हणे ॥ काय काय तुम्हांकारण ॥ अहेर लागतो मज सांगा ॥१५॥
जें जें पाहिजे जयासी ॥ तें तें लिहून द्यावें मजपासीं ॥ गोष्टी ऐकूनियां ऐसी ॥ लोक हांसती गदगदां ॥१६॥
तंव एक आला कुटिळ ॥ कागद घेऊनियां तत्काळ ॥ म्हणे लिहून देऊं जी सकळ ॥ ऐसा तो खळ बोलिला ॥१७॥
मग व्याही जांवई सोयरे खळ ॥ अहेर सांगती सकळ ॥ कन्या म्हणे अलंकार ॥ पाहिजेत मजलागीं ॥१८॥
जें जें जयासी अपेक्षित ॥ तें तें हून दिधलें समस्त ॥ मग नरसी मेहेता पुसत ॥ लिहिणारासी तेधवां ॥१९॥
तुजही अपेक्षित असेल कांहीं ॥ तेंही तत्काळ पत्रीं लिहीं ॥ मग अविश्वासी बोलिला कांहीं ॥ विश्वास नाहीं म्हणोनियां ॥२०॥
तो म्हणे एक पाषाण ॥ पाहिजे कीं मजकारण ॥ तत्काळ ठेविला लिहून ॥ लोक हांसती तयांसी ॥२१॥
मग तो म्हणे सकळ जनां ॥ अहेर लिहूनि दिधले जाणा ॥ येतील ऐसा माझिया मना ॥ विश्वास न वाटे सर्वथा ॥२२॥
संतवचनीं विश्वास नाहीं ॥ महाखळ तो पितृद्रोही ॥ भवचक्रांत पडिला पाहीं ॥ कल्पांतींही सुटेना ॥२३॥
पढतमूर्ख जो ब्रह्मद्रोही ॥ तीर्थक्षेत्रें निंदी पाहीं ॥ त्यासी हरीची प्राप्ति नाहीं ॥ कदाकाळीं जाणिजे ॥२४॥
स्त्रीलंपट मातृद्रोही ॥ कालचक्रांत पडिला पाहीं ॥ त्यासी हरीची प्राप्ति नाहीं ॥ कदाकाळीं जाणिजे ॥२५॥
विधिनिषेध नेणे कांहीं ॥ परदारालुब्धक पाहीं ॥ त्यासी हरीची प्राप्ति नाहीं ॥ कदाकाळीं जाणिजे ॥२६॥
असो ऐसा तो खळ जाण ॥ म्हणे मज पाहिजे पाषाण ॥ नरसी मेहेता तें ऐकून ॥ स्तवन करी हरीचें ॥२७॥
म्हणे दीनदयाळा भक्तवत्सला ॥ कमलनेत्रा वैकुंठविहारा ॥ रुक्मिणीमानसचकोरचंद्रा ॥ पाव सत्वरा ये वेळे ॥२८॥
अनाथनाथ म्हणविसी ॥ लळे भक्तांचे पुरविसी ॥ आतां नरसी मेहेत्यासी ॥ टाकूं नको दयाळा ॥२९॥
ऐसी करुणा ऐकोनि कानीं ॥ संतुष्ट जाहले चक्रपाणी ॥ अहेरांचें दिंड भरूनी ॥ आले घेऊनि तेधवां ॥३०॥
ब्राह्मणवेष धरूनि हरी ॥ उभे ठाकले त्याचें द्वारीं ॥ कापड आणिलें दिंडभरी ॥ नरसी मेहेत्यासी सांगत ॥३१॥
सोयरे पुसती तयालागून ॥ तुम्ही कोठील असा कवण ॥ वचन ऐकोनि जगज्जीवन ॥ काय बोलती तें ऐका ॥३२॥
नरसी मेहेत्याच्या दुकानावरी ॥ गुमास्ता असतों द्वारकापुरीं ॥ आजि अहेर घेऊनि सत्वरी ॥ आलों लवकरी या ठाया ॥३३॥
ऐसें बोले भक्तभूषण ॥ परे कोणासी न कळे निजखूण ॥ मोहममतेनें भुलले जन ॥ झांकिले भ्रांतीनें ज्ञानचक्षु ॥३४॥
अलंकारांची पेटारी ॥ घेऊनि उभा ठाकला हरी ॥ मग सोयर्‍यांसी ते अवसरीं ॥ नरसी मेहेता बोलत ॥३५॥
जें जें जयासी अपेक्षित ॥ तें तें मागा रे समस्त ॥ मानसीं न व्हावें संकोचित ॥ कल्पनाद्वैत टाकूनियां ॥३६॥
यादीचा कागद रुक्मिणीपती ॥ मागोनि घेत आपुले हातीं ॥ दिंड सोडोनि सत्वरगती ॥ वस्त्रें वांटीत निजहस्तें ॥३७॥
चिराशेला जामातासी ॥ काढूनि देतसे हृषीकेशी ॥ चोळी पाटाव वरमायेसी ॥ काढूनियां दीधलें ॥३८॥
कोणा साडी कोणा लुगडीं ॥ कोणा चोळी कोणा दुल्लडी ॥ कोणासी नेसवी चुनडी ॥ मुंगी पैठणी रुमाल ॥३९॥
कोणासी कुसुंबी पातळ जाण ॥ कोणा केशरी पीतवर्ण ॥ कोणा देतसे जगज्जीवन ॥ हिरवीं पातळें जरतारी ॥४०॥
कोणासी पागोटें परकाळा ॥ कोणी मागती अष्टगोली शेला ॥ कोणासी हरीनें दिधला ॥ धोतरजोडा रेशमी ॥४१॥
कोणा काळी चौकडीकांठी कटार ॥ कोणी मागें पीतांबर ॥ लवलाहें शारंगधर ॥ काढोनि देत तयांसी ॥४२॥
मदनगलोलाधटी जाण ॥ एकासी देत नारायण ॥ दिंड आणिलें मधुसूदन ॥ परी भरलें असे तैसेंचि ॥४३॥
कौतुक पहावया आले नर ॥ तयांसी देतां दिव्यांबर ॥ शेले परकाळे आपार ॥ शारंगधर वांटीतसे ॥४४॥
हळदीकुंकुम घ्यावयासी ॥ गांवच्या स्त्रिया आल्या तयांसी ॥ वस्त्रें निजांगें हृषीकेशी ॥ अतिवेगेंसीं देतसे ॥४५॥
मुगवीं तपसिलीं चिटबंदरी ॥ हिरवी साडी धटी पोफळी ॥ राजमहाल पातळें ढवळीं ॥ अंगें वनमाळी वांटीतसे ॥४६॥
धन्य धन्य तेचि जन ॥ जयांसी वस्त्रें देत नारायण ॥ येथें दृष्टांत द्यावयाकारण ॥ काय आतां योजावा ॥४७॥
द्रौपदी सतीस हस्तनापुरी ॥ नग्न करितां दुराचारी ॥ वस्त्रें घेऊनि धांवला हरी ॥ तैसीच परी हे जाहली ॥४८॥
ओपिले वस्त्रांचे भार ॥ मग दिधले अलंकार ॥ कोणासी शीसफुलें चंद्रकोर ॥ कोणासी गोंडें मूद राखडी ॥४९॥
कोणासी बिंद्या झुबकबाळ्या ॥ कोणासी घडांच्या मासेबाळ्या ॥ कोणासी गेठें खुंटबाळ्या ॥ रुक्मिणीवर देतसे ॥५०॥
चिंचपेट्या मुक्ताहार ॥ कोणासी देत मोहनमाळ ॥ दुल्लडी पुतळ्या घननीळ ॥ आपुले हातें देतसे ॥५१॥
कोणासी वेळा बाजुबंद ॥ मागे तयाचा पुरवी छंद ॥ पाटल्या दोरे गोविंद ॥ आपुल्या हातें वांटीतसे ॥५२॥
कोणासी कटिदोरा जरतारी ॥ वांकी सांकळ्या गुजर्‍या भारी ॥ कोणासी देतसे मुरारी ॥ जोडवीं विरोल्या अनवट ॥५३॥
कोणासी कुडक्या नागोत्रें कानीं ॥ निजांगें लेववी चक्रपाणी ॥ कंठ्या मुद्रिका कटिसूत्र जोडूनी ॥ रत्नकोंदणी वांटीतसे ॥५४॥
कौतुक दाखवी शारंगधर ॥ संतुष्ट केले नारीनर ॥ भक्तकार्यासी सादर ॥ अति उदार जाहलासे ॥५५॥
जैसा ज्याचा भाव पूर्ण ॥ तैसें यासी देत नारायण ॥ लेखकासी द्यावया एक पाषाण ॥ जगदुद्धारें आणिला ॥५६॥
निजांगें उचलोनि जगज्जीवन ॥ त्याचें मस्तकीं ठेविला जाण ॥ सकळ हांसती सभाजन ॥ लीला अद्भुत देखोनि ॥५७॥
मग काय बोलती समस्त जन ॥ तुझें प्रारब्ध फुटकें जाण ॥ कल्पतरुतळीं बैसोन ॥ भिक्षाटन इच्छिलें कीं ॥५८॥
कीं भस्मासुरासी गिरिजावर ॥ प्रसन्न जाहलिया साचार ॥ तयानें मागितला विपरीत वर ॥ तैसेंच तुज जाहलें कीं ॥५९॥
ऐसें बोलती सकळ जन ॥ दुराचारी लज्जितमन ॥ जीवनांत ढेंकूळ पडतां जाण ॥ जाय विरून तैशा रीतीं ॥६०॥
नरसी मेहेत्यासी नमस्कार ॥ सकळ घालिती वारंवार ॥ म्हणती पावला तुम्हांस शारंगधर ॥ कळलें साचार आम्हांसी ॥६१॥
यापरी करूनि फळशोभन ॥ विष्णुभक्त निघाला तेथून ॥ जुन्यागडीं घेऊनि दर्शन ॥ कृष्णमूर्तीचें घेतलें ॥६२॥
म्हणे रुक्मिणीकांता श्रीहरी ॥ आजि कष्टी जाहलासी थोरी ॥ अहेर घेउन मुरारी ॥ मजमागें आलासी ॥६३॥
मनांत म्हणे वैकुंठपती ॥ मीं वस्त्रें वांटिलीं लोकांप्रती ॥ परी नरसी मेहेत्यासी निश्चितीं ॥ नाहीं सर्वथा गौरविलें ॥६४॥
मग प्रसन्न होऊन तमालनील ॥ तुलसीमिश्रित सुमनहार ॥ निजांगें काढोनि सत्वर ॥ कंठीं घातला भक्ताचे ॥६५॥
अहेर घेऊन आला ब्राह्मण ॥ तो तेथेंच अदृश्य जाहला जाण ॥ नरसी मेहेत्याचे चरण ॥ सकळ जन वंदिती ॥६६॥
नित्य करितां हरिकीर्तन ॥ गळ्यांत हार येतसे जाण ॥ तों मंडुकराजयाकारण ॥ वर्तमान कोणीं सांगितलें ॥६७॥
राजा आला पाहावयासी ॥ मूर्ति पूजोनि उपचारेंसीं ॥ कृत्रिम म्हणोनि तयासी ॥ संशय चित्तीं वाटला ॥६८॥
मग सुई दोरा घेऊनि वेगीं ॥ आंगड्यासीं हार खिळिला अंगीं ॥ सक्रोधरूप होऊनि वेगीं ॥ नरसी मेहेत्यासी बोलत ॥६९॥
म्हणे कृत्रिमविद्येंकरूनि त्वरित ॥ भाविक जन भोंदिले बहुत ॥ आजि गळ्यांत हार न येतां येथ ॥ शिक्षा करीन तुजलागीं ॥७०॥
मग नरसी मेहेता ते अवसरीं ॥ टाळ वीणा घेऊनि करीं ॥ श्रीहरिनामाचे गजरीं ॥ सप्रेमभरीं नाचत ॥७१॥
बहुत वर्णिले हरीचे गुण ॥ परी हार गळां न येचि जाण ॥ मग दोन्ही कर जोडून ॥ देवासी विनंति करीतसे ॥७२॥
हरि त्वां मीनरूप धरून ॥ शंखासुर मारिला न लागतां क्षण ॥ आणि हार द्यावयाकारण ॥ उशीर आजि कां लाविला ॥७३॥
कूर्मरूप धरूनि वैकुंठपती ॥ चवदा रत्नें काढिलीं युक्तीं ॥ आणि हार द्यावया सत्वरगती ॥ उशीर निश्चितीं का केला ॥७४॥
वराहरूप धरूनि शारंगधर । हिरण्याक्ष मारिला सत्वर ॥ आणि हार द्यावया उशीर ॥ आजि कां लाविला गोविंदा ॥७५॥
प्रल्हाद गांजितांचि जाण ॥ निघालासी स्तंभ फोडून ॥ आणि हार द्यावयाकारण ॥ करुणा अजून कां न ये ॥७६॥
वामनरूप धरूनि आपण ॥ पादांत आटिलें त्रिभुवन ॥ आणि माझीं करुणावचनें ऐकोन ॥ दया तुज अजून कां न ये ॥७७॥
कामधेनु गांजिली म्हणून ॥ क्षत्रिय निवटिले परशु घेऊन ॥ आणि माझी करुणा ऐकोन ॥ दया अजून कां न ये ॥७८॥
देव बंदीं पडिले म्हणून ॥ मारिले रावण कुंभकर्ण ॥ आणि माझें संकट तुजकारण ॥ श्रुत नसे काय कळेना ॥७९॥
द्रौपदीसी गांजितां रुक्मिणीपती ॥ तैं तीस पावलासी सत्वरगती ॥ आजि माझें संकट ऐकोनि तुजप्रती ॥ करुणा चित्ती कां न ये ॥८०॥
हे करुणाशब्द ऐकूनि कानीं ॥ संतुष्ट न होसी चक्रपाणी ॥ अपशब्द बोलतां मजलागूनी ॥ हार काढूनि तैं देतां ॥८१॥
राजा म्हणे ते वेळां ॥ तुझा कृत्रिमभाव मज कळला ॥ म्हणोनि शिक्षा करावयाला ॥ सरसावला नृपनाथ ॥८२॥
ऐसें संकट देखोन ॥ नरसी मेहेता बोलिला वचन ॥ तेणें सुखावला जगज्जीवन ॥ तें परिसा सज्जन भाविक हो ॥८३॥
म्हणे पुष्पहार देतां मातें ॥ तुझ्या बापाचें काय जातें ॥ वचन ऐकोनि द्वारकानाथें ॥ संतोषयुक्त जाहले पैं ॥८४॥
अपार करुणा भाकिली पाहें ॥ परी ती देवाच्या मनासी न ये ॥ गाळी देतांचि लवलाहें ॥ हार गळ्यांत पातला ॥८५॥
राजा पाहे विलोकून ॥ टांचे तैसेचि असती जाण ॥ म्हणे हा धन्य वैष्णवजन ॥ अवतार पूर्ण शिवाचा ॥८६॥
नरसी मेहेत्याचे चरण प्रीतीं ॥ सद्भावें धरीतसे नृपती ॥ म्हणे माझे अपराधांची स्थिती ॥ ते न गणीं चित्तीं सर्वथा ॥८७॥
तूं निजभक्त वैष्णववीर ॥ हें नेणतां मी पामर ॥ ऐकूनि जनांचें उत्तर ॥ आलों साचार छळावया ॥८८॥
दुर्योधनें छळितां पांडवांप्रती ॥ अपयश पावला जैसा दुर्मती ॥ तेवीं छळितां तुज निश्चितीं ॥ तैसी गती मज जाहली ॥८९॥
नमस्कार घालूनिया त्वरित ॥ नगरासी गेला नृपनाथ ॥ नरसी मेहेता प्रेमयुक्त ॥ भजन करीत श्रीहरीचें ॥९०॥
पुढें द्वारकेहूनि निश्चितीं ॥ डाकुरासी येतील रुक्मिणीपती ॥ श्रोत्यांसी विनवी महीपती ॥ परिसा प्रीतीं स्वानंदें ॥९१॥
स्वस्ति श्रीभक्तविजय ग्रंथ ॥ ऐकतां तुष्टेल जगन्नाथ ॥ प्रेमळ ऐका भाविक भक्त ॥ त्रिंशत्तमाध्याय रसाळ हा ॥९२॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ श्रीरस्तु ॥

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

Avoid on Wednesday बुधवारी ही कामे करु नये

आरती बुधवारची

Margashirsha 2024 मार्गशीर्ष महिन्यात काय करावे?

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

पुढील लेख
Show comments