Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

श्री नवनाथ भक्तिसार कथामृत - अध्याय १

Webdunia
शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2024 (13:11 IST)
श्री नवनाथ भक्तिसार कथामृत - अध्याय १
मंगलाचरण, नऊ नारायणांपैकी मच्छिंद्रनाथाचा जन्म, त्यांची तपश्चर्या
ग्रंथारंभी मालुकवि म्हणतात- कलियुगास प्रारंभ झाला त्यावेळी लक्ष्मीकांताने नवनारायण यांना द्वारकेस बोलावून आणण्याकरिता आपल्या सेवकास पाठविले. त्यावेळ सुवर्णाच्या सिंहासनावर लक्ष्मीकांत बसला होता. जवळ उद्धवहि होता. इतक्यात कवि, हरि, अंतरिक्ष, प्रबुद्धि, पिप्पलायन, अविर्होत्र (ऐरहोत्र), चमस, द्रुमिल, (ध्रुवमीन) आणि करभाज असे नऊ नारायण तेथे येऊन दाखल झाले. त्यास पाहताच हरीने सिंहासनाखाली येऊन मोठ्या गौरवाने त्यांस आलिंगन देऊन आपल्या सुवर्णाच्या सिंहासनावर बसविले. नंतर त्यांनी षोडशोपचारांनी पूजा केली. तो मोठा समारंभाचा थाट पाहून कोणत्या कारणास्तव आम्हास बोलावून आणिले, असे नवनारायणांनी हरीस विचारिले. तेव्हा त्यांने त्यास सुचविले की, आपणा सर्वांना कलियुगात अवतार घ्यावयाचे आहेत. जसे राजहंस एका जुटीने समुद्राच्या उदकात जातात, त्याप्रमाणे आपण सर्व एकदम अवतार घेऊन मृत्युलोकात प्रगट होऊ. हरीचे असे भाषण ऐकून ते म्हणाले, जनार्दना ! आपण आम्हांस अवतार घ्यावयास सांगता, पण अवतार घ्यावयाचा तो कोणत्या नावाने हे कळवावे. त्यांचे हे म्हणणे ऐकून द्वारकाधीशाने सांगितले की, तुम्ही सर्वांनी अवतार घेऊन संप्रदाय स्थापन करून दीक्षा देऊन उपदेश करीत जावा. तुम्ही कदाचित असे म्हणाल की, आम्हासच अवतार घ्यावयास सांगता, असे मनात आणू नका. तुमच्याबरोबर दुसरी बहुत मंडळी मृत्युलोकी अवतार घेणार आहेत, प्रत्यक्ष कवि वाल्मीकि हा तुळसीदास होऊन येईल. शुकमुनि हा कबीर, व्यासमुनि तो जयदेव व माझा अति आवडता जो उद्धव तो नामदेव होईल. जांबुवंत हा नरहरी या नावाने अवतार घेउन प्रसिद्धीस येईल. माझा भाऊ बलराम हा पुंडलिक होईल. मीसुद्धा तुमच्याबरोबर ज्ञानदेव या नावाने अवतार घेऊन येणार आहे. कैलासपति शंकर हा निवृत्ति होईल. ब्रह्मदेव हा सोपान या नावाने अवतार घेऊन प्रसिद्धीस येईल. आदिमाया ही मुक्ताबाई होईल. हनुमंत हा रामदास होईल. मजशी रममाण होणारी जी कुब्जा ती जनी दासी या नावाने उघडकीस येईल. मग आपणाकडून होईल तितके आपण कलीमध्ये भक्तिमहात्म्य वाढवू.
 
अवतार कोणत्या ठिकाणी व कशा रीतीने घेऊन प्रगत व्हावे ते सविस्तर कळविण्याविषयी नवनारायाणांनी पुन्हा विनंति केली. तेव्हा हरीने त्यांस सांगितले की, पराशर ऋषीचा पुत्र जो व्यास मुनि त्याने भविष्यपुराणात हे पूर्वीच वर्णन करून ठेविले आहे. पूर्वी ब्रह्मदेवाचा वीर्यापासून अठ्यांयशी हजार ऋषि निर्माण झाले. त्याप्रसंगी वीर्याचा काही भाग ठिकठिकाणी पडला आहे; पैकी थोडासा भाग तीनदा यमुनेत पडला. त्या तीन भागापैकी दोन भाग द्रोणात पडले व एक भाग यमुनेतील पाण्यात पडला. ते वीर्य लागलेच एका मच्छीने गिळिले तिच्या उदरात कवि नारायणाने जन्म घेऊन मच्छिंद्रनाथ या नावाने जगात प्रगट व्हावे. शंकराने तृतीय नेत्रापासून अग्नि काढून जाळून टाकिलेला जो काम तो अग्नीने प्राशन केला आहे; यास्तव अंतरिक्ष नारायणाने त्याच्या जठरी जन्म घेऊन जालंधर नावाने प्रसिद्ध व्हावे. ते अशा रीतीने की, कुरुवंशात जनमेजय राजाने नागसत्र केले आहे, त्याच्याच वंशात बृहद्रवा राजा हवन करील; तेव्हा द्विमूर्धन (अग्नि) गर्भ सांडील. त्या प्रसंगी जालंदराने त्या यज्ञकुंडात प्रगट व्हावे. अठ्यायशी हजार ऋषी झाले तेव्हा ब्रह्मदेवाच्या वीर्याचा काही अंश रेवातीरी सुद्धा पडला आहे, तेते चमसनारायण याने रेवणसिद्ध या नावाने प्रगट व्हावे. त्याच वीर्यापैकी थोडासा अंश एका सर्पिणीलाहि मिळाला होता. तो तिने प्राशन केला. मग जनमेजय राजाच्या सर्पसत्रात ब्राह्मणांनी सार्‍या सर्पांची आहुति दिली; त्या समयी हिच्या उदरात ब्रह्मबीज आहे, असे जाणल्यावरून त्या सर्पिणीला आस्तिक ऋषीने वडाच्या झाडाखाली लपवून ठेविले. पूर्ण दिवस भरल्यानंतर ती अंडे तेथेच टाकून निघून गेली. ते अंडे अजून तेथे होते तसे आहे, त्यात आविर्होत्र नारायणाने जन्म घेऊन वटसिद्ध नागनाथ या नावाने प्रसिद्ध व्हावे. मच्छिंद्रनाथ याने सूर्यरेत प्राप्तीस्तव मंत्र म्हणून दिलेले भस्म उकिरड्यावर पडेल, त्यात सूर्य आपले वीर्य सांडील, ते उकिरडामय असेल; त्यात हरिनारायण याने गोरक्ष या नावाने प्रगट व्हावे. दक्षाच्या नगरात त्याची कन्या पार्वती हिला लग्नसमारंभसमयी पाहून ब्रह्मदेवाचे वीर्य गळाले; त्यासमयी त्यास परम लज्जा उत्पन्न झाली. मग ते वीर्य रगडून चौफेर केले, त्यावेळी ते एके बाजूस साठ हजार ठिकाणी झाले, त्याचे साठ हजार वालखिल्य ऋषी झाले. दुसर्‍या अंगाचे केराबरोबर भागीरथी नदीमध्ये पडले ते कुश बेटात गेले; ते अद्यापि तेथे तसेच आहे. यास्तव पिप्पलायन नारायणाने तेथे प्रगट होऊन चरपटीनाथ नावाने प्रसिद्ध व्हावे. भर्तरी या नावाने भिक्षापात्र कैलीकऋषीने आंगणात ठेविले होते; त्यात सूर्याचे वीर्य अकस्मात पडले; ते त्याने (भर्तुहरि) तसेच जपून ठेविले आहे. त्यात धृवमीन नारायणाने संचार करून भर्तरी या नावाने अवतीर्ण व्हावे. हिमालयाच्या अरण्यात सरस्वतीचे उद्देशाने ब्रह्मदेवाची वीर्य गळाले; त्यातले थोडेसे जमिनीवर पडले. त्यावरून वाघ चालल्यामुळे त्याच्या पायात राहिले व थोडेसे हत्तीच्या कानात पडले. त्यात प्रबुद्धाने संचार करून कानिफा या नावाने प्रगट व्हावे. गोरक्षाने चिखलाचा पुतळा केला, त्यात करभंजनाने संचार करावा. अशा रीतीने, कोणी कोठे व कसे जन्म घ्यावयाचे, ह्याही नवनारायणांना खुलासेवार समजूत करून दिली. मग ते आज्ञा घेऊन तेथून निघाले व मंदराचलावर गेले, तेथे शुक्राचार्यांच्या समाधीजवळ समाधिस्त होऊन राहिले. पुढे हे नऊ व शुक्राचार्य असे दहा जण निघाले.
 
एके दिवशी शिव-पार्वती कैलास पर्वतावर असता, 'तुम्ही जो मंत्र जपत असता, त्याचा मला अनुग्रह द्यावा,' असे पार्वतीने शंकरास म्हटले. हे ऐकून तो तिला म्हणाला, 'मी तुला त्या मंत्राचा उपदेश करीन; पण यासाठी एकांतस्थान पाहिजे. तर चल, आपण ते कोठे आहे त्याचा शोध करू. असे म्हणून ती उभयता एकांतस्थान पाहावयास निघाली. ती फिरत फिरत यमुनेवर आली. तेथे मनुष्याचा वास नव्हता. यामुळे ते स्थान त्यांनी पसंत केले व तेथे ती उभयता बसली. तेथे पार्वतीस सुंदर मंत्रोपदेश करू लागले. पण ज्या एका मच्छाने ब्रह्मवीर्य गिळून यमुनेत प्रवेश केला होता, ती गर्भिणी जवळच उदकात होती. तिच्या उदरातील गर्भ तो मंत्र ऐकत होता. तेणे करून त्यास शुद्ध ज्ञान प्राप्त झाले व द्वैतभाव नाहीसा होऊन तो ब्रह्मरूप झाला.
 
उपदेश संपल्यावर उपदेशाचे सार काय समजलीस म्हणून शंकराने पार्वतीस विचारले, इतक्यात मच्छिंद्रनाथ गर्भातून म्हणाला की, सर्व ब्रह्मरूप आहे. हा ध्वनि ऐकून शंकराने तिकडे पाहिले. तेव्हा मच्छीच्या उदरी कविनारायणाने संचार केल्याचे समजले. मग त्यास शंकराने सांगितले की, तुला माझा उपदेश ऐकल्याने पुष्कळ लाभ झाला; परंतु हाच उपदेश मी तुला दत्तात्रेयाकडून करवीन. यास्तव तू पुढे बदरिकाश्रमास ये; तेथे मी तुला दर्शन देईन. असे सांगून पार्वतीसह शंकर कैलासास गेले.
 
मच्छींद्रनाथ मच्छीच्या उदरामध्ये तोच मंत्र जपू लागला. पूर्ण दिवस भरल्यानंतर त्या मच्छीने अंडे नदीतीरी टाकून आपण उदकात निघून गेली. पुढे काही दिवसांनी कितीएक बकपक्षी मासे धरावयास यमुनातटी आले. त्यांनी ते अंडे पाहिले व लागलेच आपल्या तीक्ष्ण चोचींनी फोडिले. तेव्हा त्याची दोन शकले झाली व एका शकलात ते बालक पाहून व त्याच्या कर्कश रडण्याचा शब्द ऐकून ते भिऊन पळून गेले. पुढे तो शिंपला कामिक नावाच्या कोळ्याने पाहिला. त्यात सूर्यासारखा दैदीप्यमान बालक पाहून त्याचे अंतःकरण कळवळले आणि कोणी तरी सावज या कोमल बालकास मारील असे त्यास वाटले. इतक्यात आकाशवाणी झाली की, हा साक्षात कविनारायणाचा अवतार आहे. ह्या बालकास तू आपल्या घरी घेऊन जा. नीट संरक्षण कर व ह्याचे नाव मच्छिंद्रनाथ असे ठेव. ह्याच्याविषयी तू मनात किमपि संशय आणू नको. ते ऐकून कोळ्याने त्यास घरी नेऊन आनंदाने आपल्या शारद्धता स्त्रीस दिले व मुलगा आपणाला ईश्वराने दिला म्हणून सांगितले. तिने त्यास घेऊन अति आनंदाने स्तनाशी लाविले, तो पान्हा फुटला. मुलगाहि दूध पिऊ लागला. मग मुलास न्हाऊ-माखू घालून पाळण्यात निजविले. आधीच त्या उभयताना मूल व्हावे म्हणून आशा सुटली होती; तशात अवचित पुत्ररत्न हाती आल्याने त्यांस अनुपम आनंद झाला.
 
मच्छिंद्रनाथाचे वय पाच वर्षाचे झाल्यावर एके दिवशी त्यास समागम घेऊन त्याचा बाप कामिक, मासे मारण्यासाठी यमुनेवर गेला. तेथे त्याने मासे मारण्यासाठी जाळे पसरिले आणि पुष्कळ मासे त्यात आल्यावर ते बाहेर मच्छिंद्रनाथाजवळ आणून ठेवून पुन्हा जाळे घेऊन तो पाण्यात गेला. ते बापाचे कृत्य पाहून आपल्या मातृकुळाचा नाश करावयास हा उद्युक्त झाला आहे; असे मच्छिंद्रनाथाच्या मनात आले. तसेच आपण असता बाप हे कर्म करीत आहे, हे स्वस्थ बसून पाहणे चांगले नाही व आस्तिक ऋषीने सर्व प्रकारे उपकार करू जनमेजय राजाच्या सर्पसत्रात नागकुळाचे जसे रक्षण केले त्याचप्रमाणे आपण कसेहि करून ह्याचा हा उद्योग हा उद्योग बंद केला पाहिजे, असे मच्छिंद्रनाथाने मनात आणले. मग तो एक एक मासा उदकात टाकू लागला. ते पाहून त्याच्या बापास इतका राग आला की, तो लागलाच पाण्याबाहेर आला आणि त्यास बर्‍याच चपराका मारून म्हणाला, मी मेहनत करून मासे धरून आणितो व तू ते पुन्हा पाण्यात सोडून देतोस; तर मग खाशील काय? भीक मागावयाची असेल अशा लक्षणानी ! असे बोलून तो पुन्हा उदकात शिराल.
 
त्या माराच्या तिरिमिरीसमसे मच्छिंद्रनाथास फार दुःख होऊन भिक्षेचे अन्न पवित्र असते व तेच आता आपण खावे, असा विचार करून व बाप पाण्यात शिरलासे पाहून त्याची दृष्टि चुकवून मच्छिंद्रनाथ तेथून निघाला व फिरत फिरत बदरिकाश्रमास गेला. तेथे त्याने बारा वर्षै तपश्चर्या केली. ती इतकी कठीण की, त्याच्या हाडांचा सांगाडा मात्र राहिला.
 
इकडे श्रीदत्तात्रेयाची स्वारी शिवालयात गेली व शंकराची स्तुति करताच शंकराने प्रसन्न होऊन प्रत्यक्ष भेट देऊन आलिंगन दिले व जवळच बसविले. नंतर उभयतांनी एकमेकांस नवल वर्तमान विचारले. तेव्हा बदरिकाश्रमाचे अत्यंत रमणीय अरण्य पाहाण्याची दत्तात्रेयाने आपली इच्छा असल्याचे शंकरास कळविले. मग त्यास बरोबर घेऊन शंकर अरण्यात गेला. त्याच समयी मच्छिंद्रनाथाचा उदयकाल होण्याचे दिवस आल्याकारणाने तो योगायोग घडून येण्यासाठीच दत्तास अरण्य पाहाण्याची वासना होऊन त्यास शंकराचा रुकारहि मिळाला. ते उभयता बदरिकावनातील शोभा पाहून आनंद पावले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

नारायणस्तोत्रम्

Tulsi Vivah 2024 Katha तुळशी विवाह कथा

Tulsi Vivah Mangalashtak तुळशी विवाह मंगलाष्टके

आरती बुधवारची

Dev Diwali 2024: देव दिवाळीला कधी, कुठे आणि किती दिवे लावायचे?

सर्व पहा

नक्की वाचा

Bhishma Panchak 2024 : आजपासून भीष्म पंचक व्रत, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

Sun Transit 2024: सूर्याचे वृश्चिक राशीत संक्रमण, 3 राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल

Guru Nanak Jayanti 2024: गुरु नानक जयंती कधी ? प्रकाश पर्व कसे साजरे करायचे जाणून घ्या

पतीच्या घोरण्यामुळे झोप मोड होतेय ? कारणे आणि घोरणे थांबवण्यासाठी 5 घरगुती उपाय

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा

पुढील लेख
Show comments