Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

श्री नवनाथ भक्तिसार कथामृत - अध्याय १३

Webdunia
जालंदरनाथाची मैनावतीस भेट, मैनावतीस उपदेश
पुढे शंकर व विष्णु हे जालंदरनाथ व कानिफा यांसह बदरिकाश्रमास गेले. ते सर्वजण जालंदरनाथाची शक्ति पाहून थक्क झाले त्यांच्या आपापसात गोष्टी चालल्या असता, दैवतांची विटंबना जालंदराने केल्यामुळे ते त्यांची वाहवा करू लागले. व आजपर्यंत त्यांना हात दाखविणारांमध्ये असा वस्ताद कोणीहि मिळाला नव्हता असेहि उद्गार बाहेर पडले. नंतर शंकराने जालंदरास सांगितले की, तू नागपत्रअश्वत्थाच्या ठिकाणी जाऊन यज्ञ कर व तेथेच कवित्व करून दैवतापासून वर मिळवून घे. वेदविद्येचे मंत्र पुष्कळ आहेत. अस्त्रविद्या महान प्रतापी खरा, परंतु कलियुगात तिचे तेज पडणार नाही. मंत्रविद्येचा लोकांस काडीचासुद्धा लाभ व्हावयाचा नाही. ह्यास्तव कविता सिद्ध करून ठेव. आणि त्या सर्व विद्या कानिफास शिकव. ह्या कानिफाचे उदारपण दांभिकपणाचे आहे, परंतु कारणपरत्वे उपयोगी पडण्यासाठी ह्याची ही वृत्ति ठीक आहे, हजारो शिष्य करील, ह्याला सर्व विद्या अवगत असतील, येणेकरून ह्याचे वर्चस्व सर्व जगात राहील. पूर्वी साबरी ऋषीने हा मंत्रविद्येचा मार्ग शोधून काढिला, परंतु ती विद्या थोडी असल्यामुळे तिजपासून जनाला म्हणण्यासारखा लाभ होण्याचे चिन्ह दिसत नाही. शंभर कोटि कविता पाहिजे ती नऊ नाथांनी करावी. सर्व खटपट परोपकारासाथी करावयाची आहे. तुम्ही सर्वज्ञ आहा ! तुम्हास सांगावयास पाहिजे असे नाही. जारण, मारण, उच्चाटणादिकांवरहि कविता करावी. असे शंकराने जालंदरनाथास सांगून कानिफाबद्दल दोन शब्द सुचविले की, ह्यास तपास बसवून समर्थ कर. हे शंकराचे सर्व म्हणणे जालंदराने मान्य केले.
 
मग जालंदर व कानिफा या उभयतांनी बारा वर्षे तेथे राहून चाळीस कोटि वीस लक्ष कविता तयार केल्या. ते पाहून शंकर प्रसन्न झाला. मग त्याने नाग अश्वत्थाखाली ते प्रयोग सिद्ध करून घेण्यासाठी त्यांस बोध केला. त्यावरून उभयता तेथे गेले. तेथे हवन करून प्रयोग सिद्ध करून घेतले. सूर्यकुंडाचे उदक आणून बावन वीरावर शिंपडून त्यांची अनुकूलता करून घेतली. ते पुनः बदरिकाश्रमास परत आले, तेथे जालंदराने कानिफास तपश्चर्येस बसविले आणि आपणहि तपश्चर्येस गेला. तेथे गोरक्षनाथहि तपश्चर्या करीत होता, पण त्याना परस्परांविषयी माहिती नव्हती.
 
इकडे जालंदरनाथ तीर्थयात्रा करीत फिरत होता. तो आपल्या मस्तकावर गवताचा भारा घेऊन अरण्यातून गावात जाई व तेथे तो गायीस चारीत असे. त्याने मस्तकावर भारा घेतला असता त्यास त्यापासून भार वाटून त्रास होऊ नये म्हणून वायु तो भारा मस्तकापासून काही अंतरावर वरच्यावर झेलून धरून ठेवी. याप्रमाणे जालंदरनाथ गवताचा भारा मस्तकावर घेऊन फिरत फिरत गौडबंगाल देशांतील हेलापट्टनास गेला, तेव्हा गवताचा भारा मस्तकाच्या वर आधारावाचून कसा राहिला ह्याचे तेथील लोकांस मोठे नवल वाटू लागले. त्यांना हा कोणी तरी सिद्ध आहे, असे वाटून ते त्याच्या दर्शनासहि जाऊ लागले. तो गावातील घाणेरड्या जागेत राही व आपला उदरनिर्वाह भिक्षा मागून चालवीत असे.
 
त्रिलोचन राजाचा पुत्र गोपीचंद हा त्या काळी तेथचा राजा होता. गोपीचंद राजाची आई मैनावती ही मोठी सद्‌गुणी स्त्री होती ती एके दिवशी राजमहालाच्या गच्चीवरून शहराचा रमणीय देखावा पहात असता, तिने जालंदरास पाहिले. आधारावाचून डोक्याच्या वर मोळी घेऊन जाणारा असा तो जोगी पाहून तिला आश्चर्य वाटले व हा कोणी प्रतापी पृथ्वीवर उतरला आहे, असे तिच्या मनात आले. मग त्यास गुरु करून आपल्या देहाचे सार्थक करून घ्यावे, असा तिने मनाचा निग्रह करून आपल्या दासीस बोलाविले. ती दासी तर चतुरच होती. ती येताच हात जोडून उभी राहिली आणि मोठ्या अदबीने का बोलाविले, म्हणून विचारू लागली. तेव्हा मैनावती तिला म्हणाली, माझे एक फार नाजुक काम आहे, ते मी तुला करावयास सांगत आहे, यास्तव ही गोष्ट अगदी बाहेर फुटता कामा नये. का की, प्रसंगवशात जिवावर येऊन बेतणार म्हणून सावध राहिले पाहिजे. असे बोलून तिने तिला तो जोगी कोठे जात आहे, त्याचा पक्का शोध, गुप्त रीतीने करून येण्यास सांगितले.
 
जालंदरनाथास पाहून दासी चकित झाली व आपण जाउन त्याचा अनुग्रह घ्यावा व जन्ममरणापासून मुक्त व्हावे, असा तिने मैनावतीस चांगला बोध केला. नंतर तो जोगी कोठे उतरतो ते ठिकाण पाहण्यासाठी ती दासी त्याच्या पाठोपाठ चालली. अस्तमान झाला तेव्हा एका घाणेरड्या ठिकाणी निवांत जागा पाहून जालंदर वस्तीस राहिला. ते ठिकाण दासीने परत येऊन मैनावतीस सांगितले.
 
मग मैनावतीने एका ताटात फळफलावळ व पक्वान्ने घेतली आणि अर्धरात्रीस दासीस बरोबर घेऊन ती जालंदरनाथाजवळ गेली तेव्हा तो ध्यानस्थ बसला होता. त्या दोघीजणी त्याच्या पाया पडून हात जोडून उभ्या राहिल्या. त्या वेळी मैनावतीने त्याची पुष्कळ स्तुति केली. मैनावतीने केलेली स्तुति जालंदराने ऐकिली, पण तिचा निग्रह पाहण्यासाठी त्याने तीचा पुष्कळ छळ केला. तो तिजवर रागाने दगड फेकी, शिव्या देई. मैनावतीने धैर्य खचू दिले नाही. ती त्याची विनवणी करीतच होती. ह्याच्या हाताने जरी मरण आले तरी मी मोक्षास जाईन अशी तिची पुरी खात्री झाली होती म्हणून त्याच्या छळणुकीने तिचे मन किंचितसुद्धा दुखावले नाही. मग तू कोणाची कोण व येथे येण्याचे कारण काय म्हणून त्याने तिला विचारिले. तेव्हा ती म्हणाली, योगिराज ! महाप्रतापी त्रिलोचन राजाची मी कांता आहे, परंतु त्यास कृतांतकाळाने गिळून टाकिल्यामुळे मी सांप्रत वैधव्यदुःखसागरात बुडून गेले आहे. ही जन्ममरणाची जगाची रहाटी पाहून मी भिऊन गेले आहे व ह्या योगाने मला पश्चात्ताप झाला आहे. काळाने पतीची जी अवस्था केली, तोच परिणाम माझा व्हावयाचा ! असे ऐकून तो म्हणाला, जर तुझा पति निर्वतला आहे, तर तू हल्ली कोणाजवळ असतेस ? तो प्रश्न ऐकून ती म्हणाली, माझा मुलगा गोपीचंद राजा ह्याच्या जवळ मी असते, पण आता ह्या वाटाघाटीचा विचार करण्याची जरुरी नाही. कृपा करून मला तुम्ही कृतांतकाळाच्या भीतीपासून सोडवावे अशी माझी हात जोडून चरणापाशी विनंति आहे. तेव्हा त्याने सांगितले की, कृतांताच्या पाशाचे बंधन मोठे बिकट आहे, ते मजसारख्या पिशाच्च्याकडुन तुटावयाचे नाही, यास्तव तु येथून लवकर निघून आपल्या घरी जा. जर ही गोष्ट तुझ्या पुत्राच्या समजण्यात आली तर त्याच्याकडून मोठा अनर्थ घडून येईल. इतका प्रकार होईपर्यंत उजाडले, तेव्हा ती त्यास नमस्कार करून आपल्या घरी गेली. तिला सारा दिवस चैन पडले नाही. मग रात्र झाल्यावर दासीस बरोबर घेउन ती पुन्हा जालंदरनाथाकडे गेली व पाया पडून हात जोडून उभी राहिली. पण नुसते उभे राहण्यात काही हशील नाही व थोडी तरी सेवा घडावी म्हणून ती पाय चेपीत बसली. नंतर सूर्योदय होण्याची वेळ झाली असे पाहून त्यास नमस्कार करुन आपल्या घरी आली. अशा रीतीने सहा महिनेपर्यंत तिने जालंदरनाथाची सेवा केली.
 
एके दिवशी फार काळोख पडला आहे, अशी संधि पाहून मैनावती त्याजकडे गेल्यानंतर त्याने एक मायीक भ्रमर उत्पन्न केला व आपण गाढ झोपेचे ढोंग करून स्वस्थ घोरत पडला. तो भ्रमर तिच्या मांडीखाली शिरला व त्याने तिची मांडी फोडून रक्तबंबाळ करून टाकिली; तरी तिने आपले अवसान खचविले नाही. असा तिचा दृढनिश्चय पाहून जालंदरनाथाने प्रसन्न होऊन मंत्रोपदेश केला. तेणेकरून तिची कांति दिव्य झाली. तिने त्याच्या पायांवर मस्तक ठेविले व मी जन्मास आल्याचे आज सार्थक झाले असे ती म्हणाली. नंतर त्याने संजीवनी मंत्राची तिच्या देहात प्रेरणा केली, तेणेकरून मैनावती अमर झाली, जसा रामचंद्राने बिभीषण अमर केला, तद्वत जालंदराने मैनावती अमर केली. पुढे तिची भक्ति दिवसेंदिवस अधिकाधिक वाढत चालली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

मल्हारी मार्तंड विजय अध्याय अठरावा

मल्हारी मार्तंड विजय अध्याय सतरावा

मल्हारी मार्तंड विजय अध्याय सोळावा

मल्हारी मार्तंड विजय अध्याय पंधरावा

मल्हारी मार्तंड विजय अध्याय चौदावा

सर्व पहा

नक्की वाचा

Yearly Numerology Prediction 2025 सर्व 9 मूलांकांसाठी महिन्याप्रमाणे अंक ज्योतिष भविष्य एका क्लिकवर

Khandoba Navratri 2024 मार्तंडभैरव षडरात्रोत्सव महत्त्व आणि खंडोबाची आरती

Mulank 4 Numerology Prediction 2025 मूलांक 4 अंक ज्योतिष 2025

Mulank 3 Numerology Prediction 2025 मूलांक 3 अंक ज्योतिष 2025

Mulank 2 Numerology Prediction 2025 मूलांक 2 अंकज्योतिष 2025

पुढील लेख
Show comments