Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

श्री नवनाथ भक्तिसार कथामृत - अध्याय १४

Webdunia
बायकोच्या दुष्ट सल्ल्यानुसार गोपीचंदाने जालंदरनाथास खड्ड्यात पुरले.
जालंदरनाथाचा उपदेश मैनावतीने घेतल्यानंतर तिला झालेला आनंद पोटात मावेनासा झाला व आज जन्मास आल्याचे सार्थक झाले असे तिला वाटले. परंतु आपला पति त्रिलोचन ह्याच्या शरिराची स्मशानात जशी राखरांगोळी झाली तशीच आपला पुत्र गोपीचंद ह्याची व्हावयाची, म्हणून तिला परम खेदही झाला. म्हणून मुलाला दोन बोधाच्या गोष्टी सांगण्यासाठी ती बहुत दिवसपर्यंत संधि पाहात होती.
 
माघ महिन्यात एके दिवशी मैनावती महालाच्या गच्चीवर थंडीच्या निवारणासाठी उन्हात बसली होती. त्याच संधीस गोपीचंद राजा खालच्या बाजूस रत्‍नखचित चंदनाच्या चौरंगावर बसून अंगास स्त्रियांकडून सुवासिक तेले, अर्गजे लावून घेत होता. सभोवती दुसर्‍या सुंदर स्त्रियाहि होत्या. अशा मोठ्या चैनीमध्ये राजा स्नान करण्याच्या बेतात आहे, तो वरती मैनावतीला हे गोपीचंदाचे सुंदर शरीर नाश पावणार, म्हणून वाईट वाटले. तिला त्या वेळेस दुःखाचा उमाळा येऊन रडे लोटले, ते काही केल्या आवरेना. तिचे ते अश्रु राजाच्या अंगावर पडले तेव्हा राजा चकित होऊन ऊन पाणी कोठून पडले म्हणून इकडे तिकडे पाहू लागला. तेव्हा माडीवर आपली आई रडत बसली आहे, असे त्यास दिसले. त्या वेळी राजा चूळ भरून दात घाशीत होता, त्या वेळी राजा चूळ भरून दात घाशीत होता, तो तसाच उठला व मातोश्रीपाशी गेला, आणि तिच्या पाया पडून हात जोडून उभा राहिला. नंतर तिला म्हणाला, मातोश्री ! रडण्याचे कारण काय, ते मला कृपा करून लवकर सांगावे. तुला कोणी गांजिले, ते सांग. ह्या वेळेस त्याचे डोळे फोडून टाकितो ! जर मी तुझे दुःख निवारण न केले तर तुझ्या पोटी मी व्यर्थ जन्म घेतला. तुझ्या मनाला संतोष होण्यासाठी मी कोणतीही गोष्ट करीन. ती करताना प्रत्यक्ष प्राणावरहि बेतले तरी तुझे दुःख निवारण केल्यावाचून राहणार नाही.
 
गोपीचंद राजाचे हे भाषण ऐकून मैनावती म्हणाली की, महान प्रतापी अशा गोपीचंद राजाची मी माता असता, मला गांजील असा कोण आहे? परंतु मला दुःख होण्याचे कारण इतकेच की, तुझा बाप तुझ्यासारखाच स्वरूपवान होता; परंतु काळाने ग्रासिल्यानंतर त्याच्या देहाची क्षणात राखरांगोळी होऊन गेली. तुझ्या ह्या स्वरूपाची तरी तीच गत व्हावयाची म्हणून मला मोठे वाईट वाटते. शरिराची व्यर्थ माती न होऊ देता, कृतांतकाळापासून सोडविण्याची युक्ति योजावी हा मार्ग मला उत्तम दिसतो. आपले हित होईल तितके करून घ्यावे. गोपीचंदा, क्षणभंगुर ऐश्वर्यास न भुलता देहांचे सार्थक करून घे; पण सध्याच्या तुझ्या वृत्तीकडे पाहून मला तुझी काकुळता येते व ह्या करिताच रडे आले. एर्‍हवी माझा कोणाकडून उपमर्द झाला नाही.
 
मग राजाने सांगितले की, मातोश्री ! तुझे म्हणणे खरे आहे. पण सांप्रत असा गुरु मला कोठे मिळतो आहे? प्रथमतः तो अमर असला तर तो मला अमर करील. तर असा आजकाल आहे तरी कोण? तेव्हा मैनावती म्हणाली, बाळा ! जालंदरनाथ त्याच प्रतीचा असून तो सांप्रत आपल्या नगरात आला आहे. तरी तू त्यास कायेने, वाचेने व मनाने शरण जा आणि ह्या नाशिवंत ऐश्वर्याचा लोभ न धरिता त्याच्यापासून आपली काया अमर करून घे. हे ऐकून गोपीचंदाने सांगितले की त्याच्या उपदेशाने मी माझी बायकामुले, सुखसंपत्ति, राज्यवैभव आदिकरून सर्वांस अंतरेन ! ह्याकरिता आज एकाएकी माझ्याने योग घेववणार नाही, तर मला आणखी बारा वर्षे सर्व तर्‍हेचे विलास भोगू दे. मग मी गुरूस शरण जाऊन योगमार्गाचा स्वीकार करीन व उत्तानपाद राजाच्या पुत्राप्रमाणे ब्रह्मांडात कीर्ति करून घेईन. तेव्हा आई म्हणाली, मुला, ह्या देहाचा एका पळाचासुद्धा खात्रीने भरवसा देता येत नाही. असे असता तू एकदम बारा वर्षांची जोखीमदारी शिरावर घेतोस ! पण बाळा ! बारा वर्षे कुणी पाहिली आहेत? कोणत्या वेळेस कसा प्रसंग गुदरून येइल ह्याचा नेम नाही.
 
मैनावती गोपीचंद राजास करीत असलेला हा बोध त्याची पट्टराणी लुमावती दडून ऐकत होती. तो ऐकून तिला त्या वेळेस परम दुःख झाले. ती मनात म्हणू लागली की, ही आई नव्हे. वैरीण होय. हे राजाचे ऐश्वर्य भोगावयाचे सोडून त्याचा त्याग करावयास सांगणारी ही आपली सासू नसून एक विवशीच उत्पन्न झाली असे वाटते. आता ह्यास उपाय तरी कोणता करावा? अशा अनेक कल्पना तिच्या मनात येऊन ती आपल्या महालात गेली व तळमळत राहिली.
 
गोपीचंदाने मैनावतीचा उपदेश ऐकून उत्तर दिले की, मातोश्री ! ज्याअर्थी तुझी अशी मर्जी आहे, त्याअर्थी मीहि तुझ्या इच्छेविरुद्ध वागत नाही. पण त्या जालंदरनाथाचा प्रताप कसा आहे तो पाहून व त्याच्यापासून खचित माझे हित होईल अशी माझी खात्री झाली की, मी त्यास शरण जाऊन कार्यभाग साधून घेईन. आता तू हे सर्व मनातले दुःखमय विचार काढून टाकून खुशाल आनंदाने राहा; असे तिचे समाधान करून राजा स्नानास गेला.
 
इकडे राजाच्या प्रीतीतली मुख्य राणी लुमावती, हिला राजास मैनावतीने केलेला उपदेश न पटल्याने तिने निराळाच प्रयत्‍न चालविला. तिने आपल्या दुसर्‍या पाच सात सवतींना बोलावून व त्यांचा चांगला आदरसत्कार करून त्यांना मैनावतीचा राजास बिघडवून योग देण्याचा घाट कळविला. ती म्हणाली, गोपीचंद राजास जगातून उठवून लावण्याचा मैनावती मनसुबा करित आहे. जालंदर म्हणून कोणी एक ढोंगी गावात आला आहे व त्याचा अनुग्रह राजास देऊन त्याला जोगी बनविण्याची तिची इच्छा आहे मैनावतीचे ते बोलणे प्रत्यक्ष मी आपल्या कानांनी ऐकिले. तिच्या उपदेशाने राजाचेहि मन वळले आहे. त्याचे मन उदास झाल्यावर राजवैभव सर्व संपलेच म्हणावयाचे ! मग आपल्यास तरी जगून कोणता उपयोग घडावयाचा आहे? परचक्र येऊन सर्व वैभवाची धूळधाण होऊन जाईल. तरी असे न होऊ देण्यासाठी आताच एखादी युक्ति काढा म्हणजे त्याचा तो बेत आपणास मोडून टाकता येईल.
 
लुमावतीने सवतींच्या मनात अशा तर्‍हेने विकल्प भरवून त्यांची मने दूषित केली; परंतु कोणासहि चांगली युक्ति सुचेना. त्या अवघ्या जणी चिंतेत पडून रडू लागल्या. ते पाहून लुमावती हिने असा विचार केला की, मैनावतीवर खोटा आळ घेतल्याखेरीज प्रसंगातून सुटका नाही म्हणून राजास असे सांगावे की, जालंदर म्हणून जो वैरागी गावात आला आहे, त्याची बायकांवर वाईट नजर असून मैनावतीस कामविकार सहन होत नसल्यामुळे ती त्याच्या नादी लागली आहे. तसेच राजास बोध करून व त्यास योग देऊन तीर्थाटनास पाठवावे आणि जालंदरास राज्यावर बसवून आपण निर्धास्तपणाने त्या जालंदरसमागमे विषयविलासाचा उपभोग घ्यावा, असा त्या दोघांचा मतलब आहे, असे आपण राजास सांगून मनात विकल्प येउ दिला म्हणजे राजास अतिशय क्रोध येईल व तो जालंदराचा एका क्षणात नाश करील. तो बेत लुमावतीने इतर स्त्रियास सांगितला व त्याना तो पसंत पडून त्या सर्व आपापल्या महालात गेल्या.
 
त्या दिवशी राजा सर्व दिवसभर राजकीय कारभार पाहून रात्रीस भोजन झाल्यानंतर सर्वांसह मुख्य राणी जी लुमावती इच्या महालात गेला. तिने त्यास मंचकावर बसविल्यानंतर गोड गोड बोलून त्याच्या प्रेमास पाझर आणिला. तो पूर्ण प्रेमात आल्यावर ती हात जोडून म्हणाली की, माझ्या ऐकण्यात एक गोष्ट आली आहे, पण ती तुमच्यापाशी सांगावयास मला भीति वाटते व न बोलता तशीच गुप्त ठेविली तर मोठा अनर्थ घडून येईल; अशी मी दोहींकडून चिंतेत पडले आहे, तेव्हा राजा म्हणाला, तू मनात काही किंतु आणिल्याशिवाय निर्भयचित्ताने मला सांग. मग अभय वचन देत असाल तर बोलते, असे तिने त्यास सांगितल्यावर त्याने तिला अभय वचन दिले. नंतर तिने संकेत केल्याप्रमाणे वरील मजकूर त्यास समजाविला आणि म्हटले की आमच्या सौभाग्यसुखाचा बाध न येण्यासाठी तुम्ही बारकाईने दुरवर विचार करून जे बरे दिसेल ते करा.
 
तो मजकूर राजाने ऐकिल्यावर त्यास ते खरे वाटून रागाने तो अगदी लाल होऊन गेला. मग राजाने प्रधानास सांगून जालंदरास आणविले व एक मोठी खाच खणून तीत त्यास लोटून दिले. नंतर त्यावर घोड्याची लीद घालून खाच भरून टाकिली आणि जर ही गोष्ट कोणाकडून उघडकीस आली तर त्यास जिवे मारून टाकिन, अशी त्या वेळेस हजर असणारांना सक्त ताकीद दिली.
 
राजा प्राण घेईल त्या भीतीस्तव ही गोष्ट कोणी उघडकीस आणिली नाही व मध्यरात्रीच्या सुमारास कार्यभाग करून घेतल्यामुळे ही गोष्ट लोकांनाहि समजली नाही. दुसरे दिवशी सकाळी जालंदरनाथ कोठे निघून गेल्याची वार्ता गावभर झाली. तेव्हा तो बैरागी असल्यामुळे लोक त्याच्याविषयी अनेक तर्क योजू लागले. गुरुजी निघून गेल्याची वार्ता दासींनी मैनावतीस सांगितली, तेव्हा तिला फार दुःख झाले. पुत्रास अमर करून घेण्याचा तिने योजलेला बेत जागच्या जागी राहून गेला, हे पाहून मैनावतीस परम दुःख झाले. पण राजांना परमानंद झाला आणि गावकर्‍यास त्या साधूचे दर्शन अंतरले.
 
जालंदरनाथ त्या खड्ड्यात वज्रासन घालून आकाशास्त्राची योजना करून स्वस्थ बसून राहिला. आकाशास्त्र सभोवती असल्याने व त्यावर वज्रास्त्राची योजना केल्याने लीद वरच्यावर राहून गेली, ह्यामुळे त्यास खड्ड्यात निर्भयपणाने राहता आले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

Avoid on Wednesday बुधवारी ही कामे करु नये

आरती बुधवारची

Margashirsha 2024 मार्गशीर्ष महिन्यात काय करावे?

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

पुढील लेख
Show comments