Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

श्री नवनाथ भक्तिसार कथामृत - अध्याय ३५

Webdunia
रेवणनाथास सिद्धिची प्राप्ति; त्याची तपश्चर्या व वरप्राप्ति; सरस्वती ब्राह्मणाच्या मृत पुत्राकरिता यमलोकीं गमन.
रेवणनाथानें एका सिद्धिकलेस भूलून दत्तात्रयेयास परत पाठविल्यानंतर रेवणनाथ शेतांत गेला. दत्तात्रेयानें त्याची त्या वेळेची योग्यता ओळखूनच एक सिद्धकलेवर त्यास समाजावून वाटेस लाविलें होतें. रेवणनाथ शेतांत गेला व काम झाल्यावर तो मंत्रप्रयोगाचें गाणें गाऊं लागला. तेव्हां सिद्धि प्रत्यक्ष येऊन उभी राहिली व कोणत्या कार्यास्तव मला बोलाविलें म्हणून विचारूं लागली. प्रथम त्यानें तिला नांव विचारलें तेव्हां मी सिद्धि आहे, असें तिनें सांगितलें. ज्या वेळेस दत्तात्रेयानें रेवणनाथास सिद्धि दिली होती, त्या समयीं त्यानें तिच्या प्रतापाचें वर्णन करून सांगितलें होतें की, सिद्धि काम करावयास प्रत्यक्ष येऊन हजर राहिल व तूं सांगशील तें कार्य करील. जेवढे उपभोग घेण्याचे पदार्थ पृथ्वीवर आहेत तेवढे सर्व ती एका अर्ध क्षणांत पुरवील. सारांश, जें जें तुझ्या मनांत येईल तें ती करील; यास्तव जें तुला कार्य करावयाचें असेल तें तूं तिला सांग. अशी तिच्या पराक्रमाची परस्फुटता करून दत्तात्रयानें त्यास बीजमंत्र सांगितला होता. ती सिद्धि प्राप्त झाल्याचें पाहून रेवणनाथस किंचित गर्व झाला. परंतु स्वभावानें तो निःस्पृह होता.
 
एके दिवशीं तो आनंदानें मंत्रप्रयोग म्हणत शेतांत काम करीत असतां महिमा नांवाची सिद्धि जवळ येऊन उभी राहिल्यानें त्यास परमानंद झाला. त्यानें हातांतील औत व दोर टाकून तिला सांगितलें कीं, जर तुं सिद्धि आहेस तर त्या पलीकडच्या झाडाखालीं धान्याची रास पडली आहे ती सुवर्णाची करून मला चमत्कार दाखीव; म्हणजे तूं सिद्धि आहेस अशी माझी खात्री होईल. मग मला जें वाटेल तें काम मी तुला सांगेन. त्याचें भाषण ऐकून महिमा सिद्धि म्हणाली, मी एका क्षणांत धान्याच्या राशी सुवर्णाच्या करून दाखवीन. मग तिनें धान्याच्या राशीं सुर्वणाच्या डोंगराप्रमाणें निर्माण करून दाखविल्या. त्याची खात्री झाली. मग तो तिला म्हणाला, तुं आतां माझ्यापाशीं रहा. तुं सर्व काळ माझ्याजवळ असलीस , म्हणजे मला जें पाहिजे असेल तें मिळण्यास ठीक पडेल. त्यावर ती म्हणाली, मी आतां तुझ्या संनिध राहीन; परंतु जगाच्या नजरेस न पडतां गुप्तरूपानें वागेन. तूं माझ्या दर्शनासाठी वारंवार हेका धरुन बसुं नको. तुझें कार्य मी ताबडतोब करीत जाईन. रेवणनाथानें तिच्या म्हणण्यास रुकार दिल्यावर ती सुवर्णाची रास अदृश्य करुन गुप्त झाली.
 
 
मग रेवणनाथ सांयकाळपर्यंत शेतांत काम करून घरीं गेला. त्यानें गोठ्यांत बैल बांधिले व रात्रीस स्वस्थ निजला. दुसरे दिवशीं त्यानें मनांत आणिलें कीं, आतां व्यर्थ कष्ट कां म्हणुन करावे ? मग दुसरे दिवशी तो शेतांत गेलाच नाहीं. त्यामुळें सुमारें प्रहर दिवसपर्यंत वाट पाहून त्याचा बाप सहनसारुक हा त्यास म्हणाला, मुला ! तूं आज अजूनपर्यंत शेतांत कां गेला नाहींस ? हें ऐकून रेवणानाथानें उत्तर दिलें कीं, शेतांत जाऊन व रात्रंदिवस कष्ट करुन काय मिळवयाचें आहे ? त्यावर बाप म्हणाला, पोटासाठी शेतांत काम केलें पाहिजे. शेत पिकलें की, पोटाची काळजी करावयास नको, नाहीं तर खावयाचे हाल होतील व उपाशी मरावयाची पाळी येईल. यावर रेवणनाथ म्हणाला, आपल्या घरांत काय कमी आहे म्हणुन शेतांत जाऊन दिवसभर खपून पोट भरण्यासाठी धान्य पिकवावें ? आतां मेहनत करण्याचें कांहीं कारण राहिलें नाहीं. तें ऐकून बापानें म्हटलें, आपल्या घरांत अशी काय श्रीमंती आहे ? मी एक एक दिवस कसा लोटीत आहें, हें माझें मलाच ठाऊक. तें ऐकून रेवणनाथ म्हणाला, उगीच तुम्हीं खोटें बोलतां सारें घर सोन्याचें व धान्यानें भरलेलें आहे. मी बोलतों हें खरें कीं खोटें, तें एकादां पाहून तरी या; उगीच काळजी कां करतां ? मग बाप पाहूं लागला असतां घरांत सोन्याच्या व धान्याच्या राशीच्या राशी पडलेल्या दिसल्या. त्यावेळेस त्यास मोठेंच आश्चर्य वाटले. मग हा कोणी तरी अवतारी पुरुष असावा, असें त्याच्या मनांत ठसलें व तो रेवणनाथाच्या तंत्रानें वागूं लागला.
 
रेवणनाथाचा बुंधुलगांव मोठा असून रहदरीच्या रस्त्यावरच होता, ह्यामुळें गांवांत नेहमी पांथस्थ येत असत. रेवणनाथास सिद्धि प्राप्त झाल्यानंतर गांवांत येणार्‍या पांथस्थास रेवणनाथ इच्छाभोजन घालूं लागला. ही बातमी सार्‍या गांवांत पसरली. मग लोकांच्या टोळ्याच्या टोळ्या त्याच्या घरीं जाऊं लागल्या. वस्त्र, पात्रं, अन्न, धन आदिकरुन जें ज्यास पाहिजे तें देऊन रेवणनाथ त्याचे मनोरथ पुरवीत असे. रोगी मनुष्याचे रोगाहि जात असत. मग ते त्याची कीर्ति वर्णन करुन जात. यामुळें रेवणनाथ जिकडे तिकडे प्रसिद्ध झाला. सर्व लोक त्यास ' रेवणसिद्ध ' असें म्हणू लागले.
 
 
इकडे मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करीत फिरत असतां बुंधुलगांवांत येऊन धर्मशाळेंत उतरला. मच्छिंद्रनाथ श्रीगुरुंचें चिंतन करीत आनंदानें बसला असतां कित्येक लोक त्या धर्मशाळेंत गेले. त्यांनी त्यास भोजनासाठीं रेवणनाथाचें घर दाखवून दिलें व त्यानें विचारल्यावरुन लोकांनीं रेवणसिद्धिची समूळ माहिती सांगितली. ती ऐकून रेवणनाथ चमसनारायाणाचा अवतार आहे, असें मच्छिंद्रमनांत समजला. नंतर जास्त माहिती काढण्याकरितां रेवननाथास कोन प्रसन्न झाला म्हणुन मच्छिंद्रनाथानें लोकांस विचारलें. परंतु लोकांस त्याच्या गुरुची माहिती नसल्यामुळें त्याचा गुरु कोण हें कोणी सांगेना.
 
मग मच्छिंद्रनाथानें कांहीं पशु, पक्षी, वाघ, सिंह निर्माण करुन त्यांस तो आपल्या अंगाखांद्यावर खेळवून एके ठिकाणीं खावयास घालूं लागला. हा चमत्कार पाहून हा सुद्धां कोणी ईश्वरी अवतार असावा असें मच्छिंद्रनाथाविषयीं लोक बोलू लागले. हा प्रकार लोकांनीं रेवणसिद्धाच्या कानांवर घातला व हा अद्‌भुत चमत्कार प्रत्यक्ष पाहावयास सांगितला. हें वृत्त ऐकून रेवणसिद्ध तेथें स्वतः पाहावयास गेला. सिंह, वाघ, आदिकरून हिंस्त्र जनावरें, तसेंच पशुपक्षीसुद्धां मच्छिंद्रनाथाच्या अंगाखांद्यावर निवैर खेळत आहेत, असें पाहुन त्यास फार चमत्कार वाटला.
 
रेवणनाथ घरीं गेला व दत्तमंत्रप्रयोग म्हणतांच प्रत्यक्ष सिद्धि येऊन प्रविष्ट झाली. तिनें कोणत्या कारणास्तव बोलावलें म्हणुन विचारतां तो म्हणाला, मच्छिंद्रनाथाप्रमाणें पशुपक्ष्यांनीं माझ्या अंगाख्याद्यांवर प्रेमानें खेळावें व माझ्या आज्ञेंत असावें, असें झालें पाहिजे. तें ऐकून तिनें सांगितलें कीं, ही गोष्ट ब्रह्मवेत्त्यावांचुन दुसर्‍याच्यानें होणार नाहीं, या सर्व गोष्टी तुला पाहिजे असल्यास प्रथन तूं ब्रह्मवेत्ता हो. मग रेवणासिद्धानें तिला सांगितलें कीं, असें जर आहे तर तुं मला ब्रह्मवेत्ता कर. तेव्हां तिनें सांगितलें कीं तुझा गुरु दत्तात्रेय सर्वसमर्थ आहे; ह्यास्तव तूं त्याची प्रार्थना कर; म्हणजे तो स्वतः येऊन तुझ्या मनासारखें करील. असें सिद्धीनें सांगितल्या वर तसें करण्याचा त्यानें निश्चय केला.
 
मग ज्या ठिकाणी पूर्वी दत्तात्रेयाची भेट झाली होती, त्याच ठिकाणीं रेवणनाथ जाऊन तपश्चर्येंस बसला. दत्तात्रेयाची केव्हां भेट होते असें त्यास झालें होतें. त्यानें अन्नपाणीसुद्धां सोडलें व झाडांची उडून आलेली. पानें खाऊन तो निर्वाह करूं लागला. तेणेंकरून त्याच्या हांडांचा सांगडामात्र दिसूं लागला.
 
रेवणनाथाचा गुरु कोण हें मच्छिंद्रनाथाच्या लक्षांत नव्हतें त्याच्या गुरुनें अर्धवट शिष्य कां तयार केला म्हणुन मच्छिंद्रनाथास आश्चर्य वाटत होतें. त्यानें रेवणनाथाबद्दल चौकशीं केली. पण त्याचा गुरु कोण ही माहीती लोकांस नव्हती; ते फक्त त्याची बरीच प्रशंसा करीत. उपकार करण्यात, अन्न्‌उदक व द्रव्य देण्यास रेवणनाथ मागेंपुढें पाहत नसे, यावरुन कोणत्या तरी गुरुच्या कृपेनें, ह्यास सिद्धि प्राप्त झाली असावी, असें मनांत येऊन मच्छिंद्रनाथानें तो शोध काढण्यासाठीं अणिमा, नरिमा, लघिमा, महिमा इत्यादि आठहि सिद्धिस बोलाविलें. त्या येतांच त्याच्या पायां पडल्या. त्या वेळेस नाथानं त्यास विचारलें कीं, रेवणसिद्धाच्या सेवेस कोणत्या सिद्धिची कोणी योजना केली आहे हें मला सांगा.त्यावर महिमासिद्धीनें उत्तर दिलें कीं, त्याच्या सेवेस राहण्यासाठीं श्रीदत्तात्रेयाची मला आज्ञा झाली आहे.
 
मग हा रेवणनाथ आपला गुरुबंधु होतो असें जाणुन त्यास साह्य करावें, असें मच्छिंद्रनाथाच्या मनांत आलें त्यानें लगेच तेथून निघुण गिरीनापर्वती येऊन श्रीदत्तत्रेयाची भेट घेतली व रेवणसिद्धिचा सर्व मजकूर कळविला आणि त्याच्या हितासाठीं पुष्कळ रदबदली केली. मच्छिंद्रनाथ म्हणाला, महाराज ! रेवणसिद्ध हा प्रत्यक्ष चमसनारायणाचा अवतार होय. तो तुमच्यासाठीं दुःसह क्लेश भोगीत आहे. तर आपण आतां त्यावर कृपा करावी. ज्या ठिकाणीं तुमची भेट झाली त्याच ठिकाणी तो तुमच्या दर्शनाची इच्छा धरून बसला आहे.
 
तें ऐकून मच्छिंद्रनाथास समागमें घेऊन दत्तात्रेय यानास्त्राच्या साह्यानें रेवणनाथापाशीं आले. तेथें तो काष्ठाप्रमाणें कृश झालेला पाहिल्यावर दत्तात्रेयास कळवळा आला व त्यांनी त्यास पोटाशीं धरिलें रेवणनाथानें दत्तात्रेयास पायांवर मस्तक ठेविलें. तेव्हां दत्तानें त्याच्या कानांत मंत्रोपदेश केला. तेणेकरून त्याच्या अज्ञान व द्वैत यांचा नाश झाला. मग वज्रशक्ति आराधून दत्तानें रेवणनाथाच्या कपाळीं भस्म लाविले; त्यामुळें तो शक्तिवान् झाला. नंतर त्यास बरोबर घेऊन दत्तात्रेय व मच्छिंद्रनाथ गिरीनारपर्वतीं गेले. तेथें त्यास पुष्कळ दिवस ठेवुन घेऊन शास्त्रास्त्रासुद्धां सर्व विद्यांत निपुण केलें. तेव्हां, आतां आपण एकरूप झालों, असें रेवणनथास भासूं लागलें. त्याचा द्वैतभाव नाहिंसा होतांच सर्व पशुपक्षी निवैर होऊन रेवणनाथाजवळ येत व त्याच्या पायां पडत. दत्तानें रेवणनाथास नाथपंथाची दीक्षा देऊन मच्छिंद्रनाथाप्रमाणेंच शस्त्रास्त्रादिसर्व विद्यांत निपूण करून त्यास त्याच्या स्वाधीन केलें. मग ते उभयतां मार्तंडपर्वतीं गेलें. तेथें त्यांनी नागेंश्र्वर स्थान पाहून देवदर्शन घेतलें व वर मिळवून साबरींमंत्र सिद्ध केले.
 
सर्व विद्येंत परिपूर्ण झाल्यानंतर गिरीनारपर्वती येऊन तेथें मावंदें घालण्याचा रेवणनाथानें बेत केला. त्या समारंभास विष्णु, शंकर आदिकरून सर्व देवगण येऊन पोंचले. चार दिवस समारंभ उत्तम झाला. मग सर्व देव रेवणनाथास वर देऊन आपापल्या स्थानीं गेले. रेवणनाथहि दत्तात्रेयाच्या आज्ञेनें तीर्थयात्रा करावयास निघाला.
 
त्या कालीं माणदेशांत विटे तीर्थयात्रा गांवांत सरस्वती या नावांचा एक ब्राह्मण राहात असे. त्याच्या स्त्रीचें नांव जान्हविका. त्यांची एकमेकांवर अत्यंत प्रीति. त्यांस मुलें होत, पण तीं वांचत नसत; आठ दहा दिवसांतच तीं मुलें मरत. ह्याप्रमाणें त्याचें सहा पुत्र मरण पावले. सातवा पुत्र मात्र दहा वर्षेपर्यंत वांचला होता व आतां यास भय नाहीं असें जाणुन सरस्वती ब्राह्मणानें अतिहर्षानें ब्राह्मणभोजन घेतलें. त्यासमयीं पंचपक्कान्ने केलीं होतीं व प्रयोजनाचा बेत उत्तम ठेविला होता. त्याच दिवशीं त्या गांवात रेवणनाथ आला. तो भिक्षा मागवयास फिरत असतां त्या ब्राह्मणाकडे गेला. त्यास पाहतांच हा कोणी सत्पुरुष आहे, अशी ब्राह्मणाची समजुत झाली. तेव्हां ब्राह्मणानें त्यास जेवून जाण्याचा आग्रह केला व त्याच्या पायां पडून माझी इच्छा मोडूं नये असें सांगितलें. त्यास रेवणनाथानें सांगितलें कीं, आम्हीं कनिष्ठ वर्णाचें व तूं ब्राह्मण आहेस, म्हणुन आमच्या पायां पडणें तुला योग्य नाहीं, हें ऐकून तो म्हणाला, ह्या कामीं जातीचा विचार करणें योग्य नाहीं. मग त्याचा शुद्ध भाव पाहून रेवणनाथानें त्यांचें म्हणणें मान्य केलें.
 
मग रेवणनाथ त्याच्याबरोबर घरांत गेल्यावर सरस्वती ब्राह्मणानें त्यास पात्रावर बसविलें व त्याचें भोजन होईपर्यंत आपण जवळच बसून राहिला. जेवतांना त्यानें करून त्यास भोजनास वाढिलें व नाथाची प्रार्थना केली कीं, महाराज ! आजचा दिवस येथें राहून उदईक जावें. त्याची श्रद्धा पाहून रेवणनाथानें त्याच्या म्हणण्यास रुकार दिला व तो दिवस त्यानें तेथें काढिला. रात्रीस पुनः भोजनासाठीं सरस्वती ब्राह्मणानें नाथास आग्रह केला, परंतु दोनप्रहरीं भोजन यथेच्छ झाल्यानें रात्रीं क्षुधा लागली नव्हती; यास्तव नित्यनेम उरल्यानंतर नाथानें तसेंच शयन केलें. त्या वेळीं तो ब्राह्मण नाथाचे चरण चुरीत बसला. मध्यरात्र झाली असतां अशी गोष्ट घडली कीं, आईजवळ असलेल्या त्याच्या मुलाचे प्राण सटवीनें झडप घालून कासावीस केले. त्या वेळेस मोठा आकांत झाला. बायको नवर्‍यास हाका मारूं लागली, तेव्हां तो तिला म्हणाला, आपण पूर्वजन्म केलेल्या पापाचें फळ भोगीत आहों, यास्तव आपणांस सुख लाभणार कोठून ? आतां जसें होईल तसें होवो. तूं स्वस्थ राहा. मी उठून आलों तर नाथाची झोंप मोडेल, यास्तव माझ्यानें येववत नाहीं. जर झेंप मोडली तर गोष्ट बरी नाहीं. इतकें ब्राह्मण बोलत आहे तो यमाच्या दूतांनीं पाश टाकून मुलाच्या प्राणाचें आकर्षण केलें व मुलाचें शरीर तसेंच तेथें पडून राहिलें.
 
मुलगा मरण पावला असें पाहून जान्हवी मंद मंद रडूं लागली. तिनें ती रात्र रडून रडून काढिली. प्रातःकाळ झाला तेव्हा नाथास रडका शब्द ऐकूं येऊं लागला. तो ऐकून त्यानें कोण रडतें म्हणुन सरस्वती ब्राह्मणास विचारिलें. त्यानें उत्तर दिलें कीं, मुलाचे प्राण कासावीस होत आहेत म्हणुन घरांत माझी बायको अज्ञपणनें रडत आहे. तें ऐकुन मुलास घेऊन ये, असं नाथानें विप्रास सांगितलें. त्यावरुन तो स्त्रीजवळ जाऊन पाहतो तों पुत्राचें प्रेत दृष्टीस पडलें. मग त्यानें नाथास घडलेलें वर्तमान निवेदन केलें. ही दुःखदायक वार्ता ऐकून नाथास यमाचा राग आला. तो म्हणाला, मी या स्थळी असतां यमानें हा डाव साधून कसा घेतला ? आतां यमाचा समाचार घेऊन त्यास जमीनदोस्त करून टाकितों, असें बोलून मुलास घेऊन येण्यास सांगितलें. मग सरस्वती ब्राह्मणानें तो मुलगा नाथापुढें ठेविला. त्या प्रेताकडे पाहून नाथास परम खेद झाला. मग तुला एवढास मुलगा कीं काय, असें नाथानें त्यास विचारल्यावर, हें सातवें बालक म्हणुन ब्राह्मणानें सांगितलें व म्हटलें, माझीं मागची सर्व मुलें जन्मल्यानंतर पांचसात दिवसांतच मेली; हाच फक्त दहा वर्ष वांचला होता. आम्ही प्रारब्धहीन ! आमचा संसार सुफळ कोठून होणार ! जें नशिबीं होतें तें घडलें. याप्रमाणें ऐकून रेवणनाथानें सरस्वतीस सांगितलें कीं, तूं तीन दिवस या प्रेताचें नीट जतन करून ठेव. हें असेंच्या असेंच राहील, नासणार नाहीं. आतां मी स्वतः यमपुरीस जाऊन तुझीं सातहि बाळें घेऊन येतो. असें सांगुन नाथानें अमरमंत्रानें भस्म मंत्रुन मुलाच्या अंगास लाविलें व यानास्त्राच्या योगानें तो ताबडतोब यमपुरीस गेला.
 
रेवणनाथास पाहतांच यमधर्म सिंहासनावरून उतरला व त्यास आपल्या आसनावर बसवून त्यानें त्याची षोडशोपचारांनीं पूजा केली आणि अति नम्रपणानें येण्याचें कारण विचारलें. तेव्हा रेवणनाथानें म्हटलें, यमधर्मा ! मी सरस्वती ब्राह्मणाच्या घरीं असतां तूं तेथें येऊन त्याच्या मुलास कसा घेऊन आलास ? आतां न घडावी ती गोष्ट घडली तरी चिंता नाहीं. परंतु तूं त्याचा पुत्र परत दे आणि त्याचे सहा पुत्र कोठें ठेविलें आहेस. तेहि आणुन दे. हें न करशील तर माझा राग मोठा कठीण आहे; तुझा फडशा उडून जाईल. तेव्हा यमधर्मानें विचार केला कीं, ही जोखीमदारी आपण आपल्या अंगावर घेऊं नये. शंकराकडे मुखत्यारी आहे, असें सांगून त्यास कैलासास धाडावें; मग तिकडे पाहिजे तें होवो. असें मनांत आणुन तो म्हणाला, महाराज ! माझें म्हणणें नीट लक्ष देऊन ऐकून घ्यावें. विष्णु, शंकर व ब्रह्मदेव हे तिघे या गोष्टीचे अधिकारी आहेत आणी हा सर्व कारभार त्यांच्याच आज्ञेनें चालतों. या कामाचा मुख्य शंकर असून आम्ही सारे त्याचे सेवक आहों. यास्तव मारण्याचें वा तारण्याचें काम आमच्याकडे नाहीं, सबब आपण कैलासास जावें व शंकरापासून ब्राह्मणाचे सात पुत्र मागुन न्यावे. ते तेथेंच त्यांच्याजवळ आहेत. त्याचें मन वळवून आपला कार्यभाग साधून घ्यावा. ते ऐकून रेवणनाथ म्हणाल, तूं म्हणतोस, हें काम शंकराचें आहे, तर मी आतां कैलासास जातो. असें म्हणुन रेवणनाथ तेथून उठून कैलासास शंकराकडे जावयास निघाला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Saubhagya Panchami 2024 : आज मनापासून शिव - शंभूची पूजा करा, सर्व इच्छा पूर्ण होतील.

Chhath Pooja 2024 : छठ पूजा म्हणजे काय? चार दिवसांच्या सणाबद्दल संपूर्ण माहिती

संकष्टनाशनविष्णुस्तोत्रम्

आरती बुधवारची

वराहस्तोत्रम्

सर्व पहा

नक्की वाचा

Tulsi Vivah 2024: भगवान विष्णूने तुळशीशी लग्न का केले? जाणून घ्या तुळशी विवाहाचे नियम आणि पद्धत

तुळशीच्या रोपाजवळ शिवलिंग किंवा गणेश मूर्ती ठेवावी की नाही?

हे सुपर फूड 35 पेक्षा जास्त वयाच्या महिलांसाठी खूप महत्वाचे असतात

हार्मोनल मुरुमांच्या समस्येने त्रस्त असाल तर हा उपाय अवलंबवा

ओठांवर जास्त लिपस्टिक लावल्याने होऊ शकतात या 3 समस्या, वेळीच सावध व्हा

पुढील लेख
Show comments