Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

श्री नवनाथ भक्तिसार कथामृत - अध्याय ३९

Webdunia
सत्यलोकी चरपटीनाथ व नारद यांचें वास्तव्य
पुढें चरपटीनाथानें पृथ्वीवरील सर्व तीर्थयात्रा केल्यावर स्वर्ग, पाताळ या ठिकाणच्याहि तीर्थयात्रा कराव्या असें त्याच्या मनांत आले. मग त्यानें बदरिकाश्रमास जाऊन उमाकांताचें दर्शन घेतलें. तेथें त्यानें यानास्त्राचा प्रयोग सिद्ध करून भस्म कपाळास लावून स्वर्गी गमन केलें. तो प्रथम सत्यलोकास गेला व ब्रह्मदेवाच्या पायां पडून व हात जोडून जवळ उभा राहिला. तेव्हां हा योगी कोण कोठून आला, याची ब्रह्मदेव चौकशी करुं लागला असतां नारद तेथें होताच; त्यानें चरपटीनाथाचा जन्मापासुन सर्व वृत्तांत त्यास निवेदन केला. तो ऐकून घेऊन ब्रह्मदेवानें त्यास मांडिवर बसविलें नंतर येण्याचे कारण विचारल्यावर, तुमच्या दर्शनासाठी आलों असें चरपटीनाथानें सांगितले, मग ब्रह्मादेवाच्या आग्रहास्तव तो तेथें एक वर्ष राहिला. चरपटीनाथ व नारद एकमेकास न विसंबितां एक विचारानें राहात असत.
 
एके दिवशीं नारद अमरपुरीस गेला असतां ' यावें कळींचे नारद' असें इंद्राने सहज विनोदानें त्यास म्हटलें. तें शब्द ऐकतांच नारदास अतिशय राग आला. मग तो ( कळीचा ) प्रसंग तुजवर आणीन, असं मनांत योजून नारद तेथून चालता झाला. कांहीं दिवस लोटल्यानतंर चरपटीनाथाकडून इंद्राची फटफजिती व दुर्दशा करण्याचा नारदानें घाट घातला. एके दिवशीं फिरावया करितां नारद चरपटीनाथास बरोबर घेऊन इंद्राच्या बागेंत गेला. जातेवेळीं चरपटीनाथ हळू चालत होता. तेव्हा अशा चालण्यानें मजल कशी उरकेल, म्हणुन नारदानें त्यास म्हटल्यावर चरपटीनाथानें उत्तर दिलें की आमची मनुष्याची चालावयाची गति इतकीच. जलद जाण्याचा एखादा उपाय तुमच्याजवळ असल्यास तो योजून मला घेऊन चला. तेव्हां नारदानें त्यास गमनकला अर्पण केली. ती कला विष्णुनें नारदाला दिली होती; ती चरपटीनाथास अनायास प्राप्त झाली. तिचा गुण असा आहे. कीं ती कला साध्य असणार्‍याचा जेथें जावयाचें असेल तेथें ती घेऊन जाते व त्रिभुवनांत काय चाललें आहे, हें डोळ्यापुढें दिसतें. कोणाचें आयुष्य किती आहे. कोण कोठें आहे, मागें काय झालें, संध्यां काय होत आहे व पुढेहि काय होणार वगैरे सर्व कळतें. अशी ती गमनकला चरपटीनाथास प्राप्त होतांच त्यास अवर्पनीय आनंद झाला. मग ते उभयतां एक निमिषांत अमरपुरीस इंद्राच्या पुष्पवटिकेत गेले. तेथें मला येथील फळें खाण्याची इच्छा झाली आहे, असें चरपटीनथानें नारदास म्हटलें. मग तुला तसें करण्यास कोण हरकत करतो, असें नारदानें उत्तर दिल्यावर चरपटीनें यथेच्छा फळें तोडून खाल्ली. नंतर तेथील बरींच फुलें तोडून सत्यलोकास ब्रह्मदेव देवपूजेस बसले होते तेथें त्यांच्याजवळ नेऊन ठेवली; याप्रमाणें ते नित्य इंद्राच्या बागेंत जाऊन फळें खात व फुलें घेऊन जात.
 
त्यामुळें बागेचा नाश होऊं लागला. पण तो नाश कोण करतो, याचा इंद्राचे माळी तपास करीत असतांहि त्यांना शोध लागेना. ते एके दिवशीं टपून बसले. थोड्या वेळानें नारद व चरपटीनाथ हे दोघें बागेंत शिरले व चरपटीनाथानें फळें तोडण्यास हात लावला तोच रक्षकांनी हळुच मागून जाऊन नाथास धरिलें हें पाहून नारदा पळून सत्यलोकास गेला. मग रक्षकांनीं चरपटीनाथास धरुन खूप मारले. तेव्हां त्यास राग आला. त्यानें वाताकर्षण अस्त्राचा जप करुन भस्म फेकतांच रक्षकांच्या नाड्या आखडून ते विव्हळ होऊन पडले. त्याचें श्वासोच्छवास बंद झाले, डोळे पाढरे झाले व तोंडातुन रक्त निघाले. ही अवस्था दुसर्‍या रक्षकांनीं पाहिली व तें असे मरणोन्मुख कां झाले ह्याचा विचार करीत असतां चरपटीनाथ दृष्टीस पडला, मग ते मागच्या मागेंच पळुन गेले. त्यांनी इंद्रास जाऊन सांगितलें कीं, एक सूर्यासारखा प्रतापी मुलगा बागेंत बेधडक फिरत आहे व त्यानें आपल्या रक्षकांचा प्राण घेतला असून सर्व बागेची धूळदाणी करुन टाकिली आहे. आमच्या त्याच्यापुढें इलाज चालत नाहीं म्हणुन आपणांस कळविण्यासाठीं आम्हीं येथें आलों. हें ऐकून त्याच्याशीं युद्ध करुन त्यास जिंकण्याकरितां इंद्रानें सर्व देवांनां पाठविले. महासागराप्रमाणें देवांची ती अपार सेना पाहून चरपटीनाथानें वाताकर्षण अस्त्रानें सर्वांस मरणप्राय केलें.
 
युद्धास गेलेल्या देवसैन्याची काय दशा झाली ह्याचा शोध आणावयास इंद्रानें कांहीं दूत श्वासोच्छवास कोंडून मरावयास टेकल्याची बातमी इंद्रास सांगितली व ते म्हणाले कीं, तो येथें येऊन नगरी ओस पाडुन तुमचाहि प्राण घेईल. तो लहान बाळ दिसतो; परंतु केवळ काळासारखा भासत आहे. हें ऐकुन इंद्रास धसका बसला. त्यानें ऐरावत तयार करण्यास सांगितलें. तेव्हां हेर म्हाणाले, त्या बालकाच्या हातांत धनुष्यबाण नाहीं, कीं अस्त्र नाहीं कोणती गुतविद्या त्यास साध्य झाली आहे, तिच्या साह्यानें प्राणी तडफडुन मरण्याच्या बेतास येतो, आपण तेथें जाउं नयें, काय इलाज करणें तो येथुन करावा. नाहीं तर शंकरास साह्यास आणावें म्हणजें तो देवास उठवील.
 
हेरांचे तें भाषण ऐकुन इंद्र कैलासास गेला व शंकराच्या पायांपडून झालेला सर्व वृत्तांत सांगुन ह्या अरिष्टातुन सोडविण्याकरितां प्रार्थना करुं लागला. त्या समयीं तुझा शत्रु कोण आहे म्हणुन शंकरानें विचारल्यावर इंद्र म्हणाला, मीं अजुन त्यास पाहिलें नाहीं त्यानें माझ्या बागेचा नाश केल्यावरुन मी सैन्य पाठविलें. परंतु ते सर्व मरणप्राय झालें, म्हणुन मी पळून येथें आलों आहें. मग शत्रुवर जाण्यासाठीं शंकरानें आपल्या गणांस आज्ञा केली व विष्णुस येण्यासाठीसाहिं निरोप पाठविला. मग अष्टभैरव, अष्टपुत्र, गण असा शतकोटी समुदाय समागमें घेऊन शंकर अमरावतीस गेले. त्यांस पाहतांच चरपटीनाथानें वाताकर्षण मंत्रानें भस्म मंत्रुन फेंकलें; त्यामुळें शंकरासुद्धां सर्वांची मागच्यासारखिच अवस्था झाली. इंद्र शंकर व सर्व सेना मूर्च्छित पडलेली पाहून नारद इंद्राकडे पाहुन हंसु लागला. नरदास मात्र घटकाभर चांगलीच करमणुक झाली.
 
शिवाच्या दूतांनी वैकुंठीस जाऊन हा अत्यद्भुत प्रकार विष्णुला सांगितला. मग छप्पन्न कोटी गण घेऊन विष्णु अमरावतीस आला व शंकरासुद्धां सर्वांस अचेतन पडलेले पाहून संतापला. त्यानें आपल्या गणांस युद्ध करण्याची आज्ञा दिली. तेव्हां चरपटीनाथानें विष्णुच्या सुदर्शनाचा, गांडीवाचा व इतर शस्त्रास्त्रांचा उपयोग होऊं नये म्हणुन मोहनास्त्राची योजना केली. मग वाताकर्षण मंत्रानें भस्म फेंकतांच संपूर्ण विष्णुगणांची अवस्था सदरहूप्रमाणें झाली.
 
आपल्या गणांची अशी दुर्दशा झालेली पाहून विष्णुनें सुदर्शनाची योजना केली. विष्णुनें महाकोपास येऊन तें आवेशानें प्रेरिलें पण तें नाथाजवळ जातांच मोहनास्त्रांत सांपड्यामुळें दुर्बल झाले. पिप्पलायन हा प्रत्यक्ष नारायण; त्याचाच अवतार हा चरपटीनाथ अर्थात हा आपला स्वामी ठरतो; वगैरे विचार सुदर्शनानें करुन नाथास नमन केलें व तें त्याच्या उजव्या हातांत जाऊन राहिलं हातांत सुदर्शन आल्यामुळें चरपटीनाथ प्रत्यक्ष विष्णु असाच, भासूं लागला. शत्रुच्या हातांत सुदर्शन पाहून विष्णुस आश्चर्य वाटलें. मग विष्णु नाथाजवळ येऊं लागला. तेव्हां त्यानें वाताकर्षणास्त्राची विष्णुवर प्रेरणा केली. त्यामुळें विष्णु धाडकन जमिनीवर पडला. त्याच्या हातातली गदा पडली व शंख वगैरे आयुधेंहि गळाली. मग चरपटीनाथ विष्णुजवळ येऊन त्यास न्याहाळून पाहूं लागला. त्यानें त्याच्या गळ्यांतील वैजयंती माळ काढून घेतली. मुगुट, शंख, गदा हीं देखील घेतली. नंतर तो शंकराजवळ गेला व त्याची आयुधें घेऊन सत्यलोकास जाऊन ब्रह्मदेवासमोर उभा राहिला.
 
विष्णुचीं व शिवाची आयुधें चरपटीनथाजवळ पाहुन ब्रह्मदेव मनांत दचकला व कांहीं तरी घोटाळा झाला असें समजून चिंतेंत पडला. मग नाथास मांडीवर बसवुन ही आयुधें कोठून आणलींस असें त्यानें त्याला युक्तीनें विचारलें. तेव्हां चरपटीनें घडलेला सर्व वृत्तांत त्यास सांगितला. तो ऐकून ब्रह्मा घाबरला व त्यास म्हणाला बाळ ! विष्णु माझा बाप व तुझा आजा होता. महादेव तर सर्व जगाचें आराध्य दैवत होय. ते दोघे गतप्राण झाले तर पृथ्वी निराश्रित होऊन आपलें कांहीं चालणार नाहीं. यास्तव तूं लौकर जाऊन त्यांस उठीव किंवा मला तरी मारून टाक. तें भाषण ऐकून मी त्यांस सावध करतो. असें नाथानें ब्रह्मदेवास सांगितलें.
 
मग ते अमरपुरीसे गेले. तेथे विष्णु, शंकर आदि सर्व देव निचेष्टित पडलेले ब्रह्मदेवास दिसले. तेव्हां त्यानें त्यांस लौकर सावध करण्यासाठीं चरपटीनाथास सांगितलें. त्यानें वाताकर्षणास्त्र काढून घेतलें व जे गतप्राण झाले होते त्यास संजीवनीमंत्रानें उठविलें, मग ब्रह्मदेवानें चरपटीनाथास विष्णुच्या व शंकराच्या पायावर घातलें. त्यांनी हा कोण आहे म्हणून विचारल्यावर ब्रह्मदेवानें नाथाच्या जन्मपासुनची कथा विष्णुस सांगितली विष्णुची व शिवाची सर्व भूषण त्यांना परत देवविली. मग सर्व मडळीं आनंदानें आपापल्या स्थानीं गेली.
 
नंतर नारद गायन करीत इंद्रापाशीं गेला व नमस्कार करून त्यास म्हणाला, तुम्हाला जें इतकें संकटांत पडावें लागलें त्याचें कारण काय बरें ? आम्ही तुमच्या दर्शनास येतो व तुम्हीं आम्हांस कळलाव्या नारद म्हणतां. आजचा हा प्रसंग तरी आमच्या कळीमुळें नाहीं ना गुदरला ? तुम्हांस कोणी तरी चांगलाच हात दाखविलेला दिसतो ! हें नारदाचें शब्द ऐकून इंद्र मनांत वरमला. त्यानें नारदाची पूजा करुन त्यास बोळविलें व त्या दिवसापासुन त्यानें ' कळीचा नारद ' हे शब्द सोडून दिलें.
 
नंतर पर्वणीस ब्रह्मदेव चरपटीनाथास घेऊन मणिकर्णीकेच्या स्नानास गेले. एकवीस स्वर्गीचें लोकहि स्नानास आले होते. नंतर चरपटीनाथ सत्यलोकास वर्षभर राहोला. तेथुन पृथ्वीवर येऊन तो अन्य तीर्थ करुन पाताळांत गेला. त्यानें भोगावतीनें स्नान केलें. तसेंच सप्त पाताळें फिरुन बळीच्या घरीं जाऊन वामनास वंदन केले. त्याचा बळीनें चांगला आदरसत्कार केला. नंतर तो पृथ्वीवर आला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Mahalaxmi Pujan on Friday महालक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी शुक्रवारी करा हे 4 उपाय

आरती शुक्रवारची

Mahatara Jayanti 2025 राम नवमीला महातारा जयंती, देवी पूजेचा शुभ मुहूर्त जाणून घ्या

Ramnavami Special Panjiri Recipe : रामनवमीच्या नैवेद्यासाठी पंजीरी बनवा

महाकाली यात्रेला आजपासून सुरुवात, चंद्रपूर महानगरपालिका प्रशासनाने केली तयारी पूर्ण

सर्व पहा

नक्की वाचा

Ram Navami 2025 Recipe घरीच तयार करा आम्रखंड

प्रभू श्रीराम यांच्या जन्माचे ५ खरे पुरावे

बेडरूममधील या 3 चुकांमळे तुमचे वैवाहिक जीवन बिघडेल

कांदा खाल्ल्यानंतर तोंडाला दुर्गंधी येत असेल तर हे 10 सोपे उपाय करून पहा

बटाटे वाफवतांना कुकर काळे पडते? या सोप्या ट्रिक अवलंबवा

पुढील लेख
Show comments