Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

श्री नवनाथ भक्तिसार कथामृत - अध्याय ४

Webdunia
देवीच्या भैरवांची व दासींची फजिति; देवीचे दर्शन
मच्छिंद्रनाथाने सेतुबंधरामेश्वरास मारुतीशी सख्यत्व केल्यानंतर तो हिंगळादेवीच्या दर्शनास जावयास निघाला. ती ज्वालामुखी भगवती महाप्रदीप्त आदिशक्ति होय ! जेव्हा मच्छिंद्रनाथ देवीच्या प्रचंड दरवाजाशी पोचला, तेव्हा दरवाजावर महाप्रबळ अष्टभैरव उभे होते; त्यांनी मच्छिंद्रनाथास पाहाताच ओळखिले व साबरी मंत्राने नागपत्र अश्वत्थाच्या झाडाखाली नाथाने सर्व देव अनुकूल करून त्यांच्यापासून वरदाने मागून घेतली आहेत, तो ह्याचा कार्यभाग कितपत सिद्धीस गेला आहे, ह्याची प्रचीति पाहाण्याचे त्याच्या मनात आले. म्हणून ते भैरव आपली रूपे पालटून संन्यासी बनले आणि दाराशी उभे राहिल्यावर, तुम्ही कोठे जात अवगैरे मच्छिंद्रनाथास ते विचारू लागले. तेव्हा त्याने सांगितले की, देवीचे दर्शन घ्यावयाचे माझ्या मनात आहे म्हणून मी आत जात आहे. असे सांगून मच्छिंद्राने त्यांस विचारले की, तुम्ही संन्यासी आहा, तुमची मर्जी आत जावयाची आहे की काय? त्यावर ते म्हणाले, आम्ही येथले द्वारपाळ आहो. येथे दाराशी उभे राहून जे कोणी देवीच्या दर्शनास येतात त्यांच्या पापपुण्याची चौकशी करून मग जो पुण्यवान व मनापासून दर्शनाची इच्छा करणारा असेल त्यास आम्ही आत जाऊ देतो. यास्तव तुझ्या पापपुण्याचा आम्हांस झाडा देऊन मग तू आत जावे कोणी विषयविलासाचे दुष्कृत्य जर लपवून ठेविले, तर आत प्रवेश करतेवेळेस तो मध्येच दारात अडकतो. कारण, त्या वेळेस दार अतिशय अरुंद होते. मग खोटे बोलून अडकला आहे असे पाहाताच आम्ही त्यास मागे ओढून शिक्षा करितो. याकरिता तुमच्या हातून जी जी कर्मै झाली असतील, ती ती सर्व सांगून येथे झडती द्यावी व मग दर्शनास जावे.
 
अष्टभैरवांचे असे भाषण ऐकून घेऊन मच्छिंद्रनाथ म्हणाला मी पापपुण्य काही एक जाणत नाही, मजकडून आजपर्यंत जी जी कर्मै घडली, ती ती सारी ईश्वराप्रीत्यर्थ केली आहेत, तशात आम्ही पापपुण्यापासून अलिप्त आहो. हे भाषण ऐकून ते संन्यासरूपी अष्टभैरव चकित झाले व म्हणाले, जन्मास आल्यानंतर तू केलेली कामे छपवून ठेवलीस तर येथे तुझा निभाव लागावयाचा नाही, मार खाऊन परत जावे लागेल. ह्याकरिता काही वाईट असेल ते सांगून आत जावे, म्हणजे अंबाबाई कृपा करील व तुला दर्शन देईल. अशा प्रकारचा बराच संवाद होऊन शेवटी मच्छिंद्रनाथ म्हणाला, की, प्राण्यांना शासन करण्याकरिता मी अवतार घेतला आहे, मजपुढे तुम्हा मशकांचा प्रताप अद्भूत आहे असे माझ्याने म्हणवेल तरी कसे? हे ऐकून अष्टभैरवास राग आला व ते त्रिशूळ, फरस, गांडीव, तरवारी, अंकुश, बरची, गदा, भाले, कुर्‍हाडी, अशी तीव्र शस्त्रे घेऊन युद्ध करण्यास सिद्ध झाले. मच्छिंद्रनाथाने 'जयजय श्रीदत्तगुरुराज' म्हणत हातात भस्म घेतले आणि मंत्रून म्हटले की, मित्रा वरुणीदेवा ! माझ्या कार्यासाठी तयार रहा. अग्निनी, वरुणी, अग्नि, वायु, इंद्रादि देव, गण, गंधर्व आदिकरून सर्वांनी कार्यामध्ये साह्य करण्यासाठी तयार रहावे, तुम्हा सर्वांना मी नमस्कार करितो. अशा रीतीने सर्वांना युद्धाचे आमंत्रण करून मंतरलेले भस्म दाही दिशांस फेकले. नंतर वज्रपंजरप्रयोग म्हणून विभूति अंगास लाविल्यानंतर त्याचे शरीर वज्राहून कठीण झाले. नंतर मच्छिंद्रनाथाने भैरवास सांगितले की, तुम्ही आता आळस करून विलंब करू नका. युद्ध करण्यास तयार व्हा, न कराल तर तुम्हास मातापित्यांची शपथ आहे. ते ऐकून अष्टभैरवांनी रागाने तीव्र शस्त्रे सोडली, परंतु मच्छिंद्रनाथाने त्यास जुमानिले नाही. ती त्यास गवताच्या काड्यांप्रमाणे वाटली, परंतु त्या योगाने तिन्ही लोकात थरकाप होऊन गेला. त्यावेळी वासवशक्ति सोडण्यात आली, तिच्या आवाजाने ब्रह्मांड दणाणून गेले. तो अंबेने ऐकताच शोध करण्यासाठी आपल्या लावण्याखाणी दासी पाठविल्या. त्यांनी हा प्रळय पाहिल्यानंतर दुसर्‍या असंख्य दासी मदतीस आणून शस्त्रास्त्राचा मजबूत मारा चालू केला. परंतु मच्छिंद्रनाथाने त्या सर्वांचे निवारण केले आणि भुलविणारे मोहिनी अस्त्र कामशरामध्ये योजून प्रेरितांच त्या अस्त्राने दासीच्या देहात गुप्त संचार करून पिशाच्यासमान सर्वात भ्रमविले. या प्रकारचा चमत्कार चालला असता, विद्यागौरव अस्त्राच्या योगाने त्याने सर्वांस नग्न करून त्यांची वस्त्रे आकाशात उडवून दिली. नंतर मायाअस्त्राच्या योगाने मच्छिंद्राने हजारो पुरुष त्या स्त्रियांपुढे निर्माण केले आणि स्मरण अस्त्राच्या योगाने त्या सर्व स्त्रियांस शुद्धीवर आणिले त्या वेळी, समोर हजारो पुरुष व आपण वस्त्ररहित असा प्रकार पाहून त्या दासी परम लज्जित होऊन रानोमाळ पळत सुटल्या.
 
अशा स्थितीमध्ये त्या पळत असता, भैरव कंठी प्राण धरून अत्यवस्थ पडलेले त्यांनी पाहिले. मग त्या पळून भगवतीजवळ गेल्या. त्यांची अवस्था पाहून अंबेला आश्चर्य वाटले. तिने काय प्रकार घडला म्हणून विचारता दासी म्हणाल्या, सुकृत सरल म्हणून ही दशा प्राप्त झाली ! कोणीएक जोगी आला आहे, त्याने ह्या रितीने आमची दुर्दशा करून टाकिली. त्यानेच भैरवाचा प्राण कासावीस केला आहे. आता तुम्ही आपला गाशा गुंडाळून येथून कोणीकडे तरी पसार व्हा नाही तर तुम्हावर हाच प्रसंग येऊन गुदरेल असे आम्हांस दिसते. अशा प्रकारे त्या दासी कावर्‍या बावर्‍या होऊन भगवतीस सांगू लागल्या, त्या भिऊन गेल्यामुळे थरथरा कापत होत्या व त्यांच्या डोळ्यांपुढे तो जोगी दिसत असल्यामुळे भयाने 'आला आला !' असा शब्द त्या करीत होत्या.
 
हा सर्व प्रकार भवानीने ऐकून घेतल्यानंतर तिला परम आश्चर्य वाटले. मग तो कोण आहे हे ती अंतर्दृष्टीने पाहू लागली, तेव्हा मच्छिंद्रनाथ या नावाने कविनारायणाने अवतार घेतला असल्याचे तिच्या लक्षात आले. नंतर तिने सर्वास वस्त्रे दिली आणि त्यांसह अंबा मच्छिंद्रनाथाजवळ गेली तिने अतिप्रेमाने त्यास ह्रदयी धरिले. तेव्हा तो जगन्मातेच्या पाया पडला. अंबेने त्यास मांडीवर बसविले व प्रताप करून दाखविल्यावर तिने त्याची तारीफ केली. शेवटी तिने त्यास भैरवांना सावध करावयास सांगितल्याबरोबर त्याने वात आकर्षण अस्त्र काढून घेतले. भैरव सावध होऊन पाहू लागले तो अंबा मच्छिंद्रनाथास मांडीवर घेऊन बसली आहे असे त्यांच्या दृष्टीस पडले. त्यांनी देखील मच्छिंद्रनाथाची तारीफ करून त्याला शाबासकी दिली व नाग अश्वथाखाली संपूर्ण दैवते प्रसन्न होऊन त्यास आशीर्वाद दिल्याबद्दलचा मूळचा सादंत मजकूर अंबेला कळविला.
 
तो ऐकून माझ्या मनात तुझा पराक्रम पाहावा असे आले आहे, म्हणून अंबेने नाथास सांगितले. त्यावेळी तू सांगशील तसे मी तुला करून दाखवितो, असे नाथाने म्हटल्यावर तिने पर्वत आकाशात उडवून पुनः जागच्या जागी आणून ठेवावयास सांगितले. हे ऐकून त्याने वातास्त्र योजून व मंत्र म्हणून भस्म पर्वतावर फेकले. तेव्हा पर्वत आकाशात भ्रमण करू लागला. मग तिने त्याची पाठ थोपटून वाखाणणी केली आणि पर्वत उतरावयास सांगितले. तेव्हा त्याने वायुअस्त्र काढून घेऊन पर्वत जागच्या जागी आणून ठेविला. ते पाहून अंबेस संतोष वाटला. मग नाथास घेऊन अंबा आपल्या स्थानास गेली. नाथ तेथे त्रिरात्र राहिले. जातेसमयी अंबेने प्रसन्न होऊन त्यास सप्रास्त्र आणि भिन्नास्त्र अशी दोन अस्त्रे प्रसादादाखल दिली. त्यांचा स्वीकार करून मच्छिंद्रनाथा अंबेस नमस्कार करून निघाला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

टिटवाळा येथील महागणपती

आरती बुधवारची

इंदुकोटी तेजकिरण स्तोत्र

Akhuratha Sankashti Chaturthi 2024: अखुरथ संकष्टी चतुर्थी या दिवशी या मंत्राचा जप करा, जीवनातील सर्व संकटे दूर करा

श्री दत्तगुरुशरणाष्टकम्- दत्तात्रेया तव शरणं

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

पुढील लेख
Show comments