Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

श्री परशुराम माहात्म्य अध्याय ३

Webdunia
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीरामचंद्राय नमः ॥
जय जय मायातीता अनंत ब्रह्मांडाच्या जीविता ब्रह्मादिका ज्ञानदाता विश्‍वव्यापका तूंचि एक ॥१॥
तूं अवतारुनि आपण करिशी भूभार निवारण भक्तासी देऊनि दर्शन पुनः गुप्त होसी ॥२॥
वेदव्यास अवतारपूर्ण भूत भविष्याचें परिमाण वदले वेदशास्त्र पुराण देते जाले भक्तासी ॥३॥
आतां सांगेन उत्तम संवाद ऐकतां होय ब्रह्मानंद अवतार धरुनि क्षत्रिय मद संहार केला परशुरामें ॥४॥
त्याचें कृत्य अपंरपारी ज्याचें वर्णन ब्रह्मयास भारी भीष्मासी ज्ञान परोपरी सांगीतलें भार्गवें ॥५॥
झाला ज्ञानी इच्छा मरणी धनुर्वेदीं निपूण रणीं भगवत् ज्ञान अंतःकरणीं वसू तोचि साक्षांत ॥६॥
परशुराम शिष्य अनेक महाज्ञानी भीष्म एक अद्यापि त्याचे बहुत सेवक आश्रम त्याचा महेंद्र पर्वतीं ॥७॥
ऐसें वाक्य ऐकतां ऋषींनीं प्रश्न केला कथेचा सूमनीं क्रमें भार्गव प्रताप कानीं श्रवणें इच्छा साद्यंत ॥८॥
सुत बोले अगाध महिमा । श्रवणें पावती मोक्ष धामा क्षत्रियांतक भक्तकामा पुरवी तोचि साक्षित्वें ॥९॥
ऐका ऋषी सावध चित्तें साद्यंत कथा तुह्मांतें सांगतों ऐकावी सुमतें ब्रह्मानंदीं पावाल ॥१०॥
सोमान्वयी गाधी भूपती त्याची कुमारी सत्यवती तीतें ऋचीक भार्व मागती गाधी गृहीं येउनी ॥११॥
ह्मणती अह्मा विवाह करणें हेचि कन्यादान अर्पणें ऐकोनि गाधी अनमानपणें विचार करी मनांत ॥१२॥
आर्या ॥ मत्कन्येला वर हा ॥ योग्य नसे यास काय सांगावें ॥
याला कधिं हीन मिळे ॥ दुस्तर ऐसेंचि शुल्क मागावें ॥१३॥
ओव्या ॥ एकसारिखे शाम कर्ण सहस्त्र अश्‍व देईल तुर्ण तरीच तुझा मनोरथ पूर्ण होईल निश्चयें द्विजवर्या ॥१४॥
अह्मीं थोर कौशिक धन्य इतुकेने हीन सोंमान्य परंतु तुह्मीं सत्पात्र ब्राह्मण ह्मणोनी मान्य जाहलों ॥१५॥
इतुकें ऐकूनि तपोज्योती गेला सत्वर वरुणाप्रती वरुणें नमोनी अतिप्रीतीं उच्चासनी बैसविला ॥१६॥
पूजा करुनी विनवी वरुण स्वामी येण्याचें सांगा कारण जें इच्छित असेल आपलें मन ते मज आज्ञा करावी ॥१७॥
विप्र ह्मणे विवाह योजिला सहस्त्र शामकर्ण देई मजला शब्द वरुणें मस्तकीं वंदिला अश्‍व सहस्त्र दीधले ॥१८॥
आर्या ॥ ज्याच्या दर्शन योगें ॥ पुण्य घडे पाप जाय हो परतें ॥
हरिला मान्य असे जे ॥ काय उणें त्या द्विजास इहपरतें ॥१९॥
ओव्या ॥ भार्गवें आणूनी राया प्रती देऊनि वरिली सत्यवती अति हर्षे विवाह पत्धती गौरविला ऋषीरायाने ॥२०॥
अपुले आश्रमीं ऋषी वर्तता सत्यवतीसह सत्यवती माता उभया ह्मणती ऋषी समर्था पुत्र व्हावे अंह्मातें ॥२१॥
एकोनी भार्ववें चरु दोनी सिद्ध केले अभिमंत्रूनी श्‍वश्रू चाक्षात्र मंत्रें करुनी ब्रह्ममंत्रें स्वरुचीचा ॥२२॥
ऐसे दोन चरु दोघांसी देऊनि गेले ऋषी स्नानासी तंव ते माता कल्पी मानसीं कन्येचा वरिष्ठ असेल ॥२३॥
आर्या ॥ या भावें कन्येला ॥ तव चरु मजदे असेंचि ते वदली ॥
बदलिती परस्परें मग । तीचा ही ती हिचा चरु अदली ॥२४॥ओव्या ॥ 
बैसती चरु भक्षुनी तंव ऋषी आले स्नान करुनी पहाती ध्यानीं विचारुनी ह्मणती विपरीत केलें गे ॥२५॥
स्त्रियेस ह्मणती दंडधर पुत्र होईल तुज भयंकर भ्राता ब्रह्मज्ञ चतुर प्रसवेल तव माता ॥२६॥
ऐकोनि प्रार्थी सत्यवती मज पुत्र व्हावा महामती संतोषोनी ऋषी ह्मणती होईल महान तंव पौत्र ॥२७॥
ब्रह्ममंत्रें चरु जो मंत्रिला तो कन्येच्या मातेनें भक्षिला तिला पुत्र विश्‍वामित्र झाला वेगळी कथा ते असे ॥२८॥
नवमास होतां सत्यवती जाली पुत्रातें प्रसवती, त्याला जमदग्नि असें ह्मणती सप्तऋषींच्या मंडळीं तो ॥२९॥
सत्यवती जाली सरिता कौशिकी नामें विभुता जीच्या जलें स्नान पान करितां पुनर्जन्मन विद्यते ॥३०॥
रेणुकारेणूची दुहिता ती जमदग्नीची होय कांता तिच्या पुत्रांत कनिष्ठता धरिते झाले श्रीहरी ॥३१॥
रेणुका पतिव्रता विशेषी सर्व दापत्यं तरि विष्णुसी ध्यान करी अतिभक्तीसी विष्णुरुप पती ह्मणतसे ॥३२॥
तीचें तप देखोनि अद्भुत प्रसन्न होवोनि विष्णु वर देत आह्मीं कारणीक होऊं तुझे सुत संकटीं तारावया ॥३३॥
वरदेउ नि देव अंतर्हित तंव ऋषी येउनि पुसत काय जालें नवल अत्यंत तुझे मनीं अश्चर्यका ॥३४॥
पतीनें पुसतां वृत्तांत सांगीतला तो ऐकोनि ह्मणत लीला तयाची अनंत भक्तासी कल्पतरु ॥३५॥
रेणुका गर्भवती जाली तेजें जैसी वीज प्रगटली अंतरखुणा ऋषीस कळली डोहळे काय विचारिती ॥३६॥
येरी ह्मणे शस्त्र धरुनी पृथ्वी नीःक्षत्रीय करुनी गोब्राह्मण प्रतिपाळुनी मग तपश्चर्या करावी ॥३७॥
ऐसें इच्छी माझें मानस ऐकोनि ऋषी पावे संतोष ॥ तंव भरले नवमास प्रसूतिसमय पातला ॥३८॥
आर्या ॥ प्रगटेल देव येथें ॥ ह्मणुनि विधी रुद्र इंद्र सुर्यादि ॥
ऋषीगण ही त्यासमयीं ॥ स्तविती येवोनि रेणुके आदि ॥३९॥
श्लोक त्यानंतरें स्तविती गर्भ कर द्विजाला ॥ त्यानंतरें सगुण गर्भगता अजाला ॥
देवस्तुती करुनि आपुलीया पदातें । जाती हरील वदती सकला पदातें ॥४०॥
ओव्या ॥ वैशाख शुद्ध पक्ष त्रितीयेसी पावला आदित्य अस्तमानासी रेणुका जमदग्नीच्या येसी पुत्ररुप प्रगटले ॥४१॥
देव दुंदुभी वाजविती पुष्पवृष्टी बहू करीती थैथैया अप्सरा नाचती गीत गाती गंधर्व ॥४२॥
मंद मंद गर्जे सागर सुगंध वाहे पुण्य समीर वैष्णवांसी आनंद अपार होता जाला ते काळीं ॥४३॥
सूती गृहीं तेज फाकलें जमदग्नीनें तें देखिलें ह्मणे विष्णुपुत्रत्वें प्रगटले जाणोनि केला बहूस्तव ॥४४॥
परी विष्णुमायेनें मोहिले ह्मणे पुत्रावण पाहिजे केलें ऋषिपत्‍न्यांहीं नाहाणें घातलें ऐसा उत्साह बहु केला ॥४५॥
जाता शौच फिटल्यावरी बालक घालोनी पालखांतरीं मंजुळस्वरें गाती नारी रामनाम ठेउनी ॥४६॥
आर्या ॥ अवतरला हा श्रीपती ॥ धरुनी व्यक्ती मनुष्य देहाची ॥
दंडुनि दुष्ट जनातें ॥ पददासा भक्तिमुक्ति देहाची ॥४७॥
ओव्या ॥ अनंत कोटी ब्रह्मांडनायका जो जो ह्मणती अश्चर्य ऐका पाळण्यांत घालूनि निका हे सर्व लीला तयाची ॥४८॥
वस्त्राभरणें पूजोनी रामा सच्चिदानंदा मेघश्यामा भक्त ह्मणती आत्मारामा नारायणा कृपा करी ॥४९॥
हा प्रादुर्भाव जे ऐकिती त्यांसी पुण्यासी नाहीं मिती पुत्रपौत्र धनसंपत्ती पूर्ण होती मनोरथ ॥५०॥
ज्यासी असे जन्म व्यथा त्याणें परशुराम जनन कथा वाचिलिया भक्तीनें यथार्था व्याधि नाश होतील ॥५१॥
हें परशुरामचरित्र केलें अमृताचें सत्र तृप्त व्हा श्रोते पवित्र सावधान परिसिजे ॥५२॥
स्वस्तिश्री परशुरामविजय कल्पतरु वर्णितां माहात्म्य अपारु ऐकतां निःपाप होती नरु तृतीयोध्याय गोड हा ॥३॥श्रीरेणुकानंदनार्पणमस्तु॥
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

श्री दत्तगुरुशरणाष्टकम्- दत्तात्रेया तव शरणं

उद्धरी गुरुराया, अनसूया तनया दत्तात्रेया

रावणाचा भाऊ कुंभकरण खरोखरच इंजिनिअर होता का?

मारुतीची निरंजनस्वामीकृत आरती

Maruti Aarti मारुतीच्या आरत्या संपूर्ण मराठी

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

पुढील लेख
Show comments