Festival Posters

तुकाराम महाराजांनी नित्यपाठासाठी स्वार्गाहून पाठविलेले अभंग

Webdunia
जन्माचे तें मूळ पाहिलें शोधून । दु:खासी कारण जन्म घ्यावा॥१॥
पापपुण्य करूनी जन्मा येतो प्राणी । नरदेही येऊनी हानी केली ॥ २ ॥
रजतमसत्व आहे ज्याचे अंगी । याच गुणॆं जगी वाया गेला ॥ ३॥
तम म्हणिजे काय नर्कचि केवळ । रज तो सबळ मायाजाळ ॥ ४॥
तुका म्हणे येथें सत्याचे सामर्थ्य । करावा परमार्थ अहर्निशी ॥ ५॥
 
अहर्निशी सदा परमार्थ करावा} पाय न ठेवावा आडमार्गी ॥ १॥
आडमार्गी कोणी जन जे जातील । त्यांतून काढील तोचि ज्ञानी ॥ २॥
तोचि ज्ञानी खरा दुजीयासी । वेळोवेळां त्यासी शरण जावे ॥ ३ ॥
आपण तरेल नव्हें ते नवल । कुळॆं उद्धरील सर्वांची ती ॥ ४ ॥
शरण गेलियानें काय होतें फळ । तुका म्हणें कुळ उद्धरिले ॥ ५ ॥
 
उद्धरीले कूळ आपण तरला । पूर्ण तोचि झाला त्र्यैलोक्यात ॥ १॥
त्र्यैलोक्यात झाले द्वैतची निमाले । ऐसे साधियेले साधन बरवें ॥ २॥ 
बरवें साधन सुखशांति मना । क्रोध नाही जना तीळभरी ॥ ३॥
तीळभरी नाही चित्तासी तो मळ । तुका म्हणे जळ गंगेचे ते ॥ ४ ॥
 
जैसी गंगा वाहे तैसे त्याचे मन । भगवंत जाण त्याचेजवळी ॥ १ ॥ 
त्याचे जवळी देव भक्तीभावे उभा । स्वानंदाचा गाभा तया दिसे ॥ २॥
तया दिसे रूप अंगुष्ठ प्रमाण । अनुभवी खूण जाणती हे ॥ ३॥
जाणती जे खूण स्वात्मअनुभवी । तुका म्हणे पदवी ज्याची त्याला ॥ ४ ॥
 
ज्‍याची त्‍याला पदवी इतरां न साजे । संताला उमजे आत्‍मसूख ॥१॥
आत्‍मसूख घ्‍यारे उघडा ज्ञानदृष्‍टी । याविण चावटी करु नका ॥२॥
करु नका काही संतसंग धरा । पूर्विचा जो दोहरा उगवेल ॥३॥
उगवेल प्रारब्‍ध संतसंगे करुनी । प्रत्‍यक्ष पुराणी वर्णियेले ॥४॥
वर्णियेले एका गुणनामघोषं । जातील रे दोष तुका म्हणे ॥ ५॥
 
दोष हे जातील अनंत जन्‍मीचे । पाय त्‍या देवाचे न सोडावे ॥१॥
न सोडावे पाय निश्‍चय तो करा । आळवा शारंगधरा भावबळे ॥२॥
धरुनि केशव आणा भावबळे । पापियां न कळे काहि केल्‍या ॥३॥
न कळे तो देव संत संगावाचुणी । वासना जाळोनि शुध्‍द करा ॥४॥
शुध्‍द करा मन देहातित व्‍हावे । वस्‍तुती ओळखावें तुका म्‍हणे ॥५॥
 
ओळखारे वस्‍तु सांडारे कल्‍पना । नका आडराना जावूं झणी ॥१॥
झणी जाल कोठे बुडवाल हीत । विचारी मनांत आपुलिया ॥२॥
आपुलिया जीवे शिवासी पहावे । आत्‍मसुख घ्‍यावे वेळोवेळा ॥३॥
घ्‍यावे आत्‍मसुख स्‍वरुपी मिळावे । भूती लीन व्‍हावे तुका म्‍हणे ॥४॥
 
भूती जीन व्‍हावे सांगावे न लगेचि । आता अहंकाराची शांती करा ॥१॥
शांती करा तुम्‍ही ममता नसावी । अंतरी वसावी भूतदया ॥२॥
भूतदया ठेवा मग काय उणे । प्रथम साधन हेचि असे ॥३॥
असो हे साधन ज्‍यांचे चित्‍ती वसे । मायाजाळ नासे तुका म्‍हणे ॥४॥
 
मायाजाळ नासे या नामें करुनि । प्रिती चक्रपाणि असो द्यावी ॥१॥
असो द्यावी प्रिती साधूचे पायंशी । कदा किर्तनासी सोडू नये ॥२॥
सोडू नये पुराणश्रवण किर्तन । मनन निदिध्‍यास साक्षात्‍कार ॥३॥
साक्षात्‍कार झालिया सहज समाधि । तुका म्‍हणे उपाधी गेली त्‍याची ॥४॥
 
गेली त्‍याची जाण ब्रह्म तोचि झाला । अंतरी निवाला पूर्णपणे ॥१॥
पूर्णपेणे झाला राहतो कैशा रीती । त्‍याचि स्थिती सांगतो मी ॥२॥
सांगतो मी तुम्‍हा ऐका मनोगत । राहतो मूर्खवत जगामाजी ॥३॥
जगात पिशाश्‍च अंतरी शहाणा । सदाब्रह्मी जाणा निमग्‍न तो ॥४॥
निमग्‍न तो सदा जैसा मकरंद । अंतर्बाहय भेद वेगळाले ॥५॥
वेगळाले भेद किर्ती त्‍या असती । ह्र्यदगत त्‍याची गति न कळे कवणाला ॥६॥
न कळे कवणाला त्‍याचे हेचि वर्म । योगी जाणे वर्म खुण त्‍याची ॥७॥
खुण त्‍याची जाणे जे तैसे असती । तुका म्‍हणे भ्रांती दुजीयाला ॥८॥
 
दुकजियाला भ्रांति भाविकाला शांति । साधुची ती वृत्‍ती लिन झाली ॥१॥
लीन झाली वृत्‍ती ब्रह्माते मिळाले । जळांत आटले लवण जैसे ॥२॥
लवण जैसे पुन्‍हा जळाचे बाहेरी । येत नाही खरे त्‍यातुनिया ॥३॥
त्‍या सारिखे तुम्‍ही जाणा साधुवृत्‍ती । पुन्‍हा न मिळती मायाजाळी ॥४॥
मायाजाळ त्‍यांना पुन्‍हा रे बाधेना । सत्‍य सत्‍य जाणा तुका महणे ॥५॥
 
स्‍वर्ग लोकांहूनी आले हे अभंग । धाडियले सांग तुम्‍हांलागी ॥१॥
नित्‍यनेमे यांसी पढतां प्रतापें । जळतील पापे जन्‍मांतरीची ॥२॥
तया मागे पुढे रक्षी नारायण । मांदिल्‍या निर्वाण उडी घाली ॥३॥
बुद्धिचा पालट नासेल कुमती । होईल सदभक्ति येणे पंथे ॥४॥
सदभक्ति झालिया सहज साक्षात्‍कार । होईल उध्‍दार पूर्वजांचा ॥५॥
साधतील येणे इहपरलोक । सत्‍य सत्‍य भाक माझी तुम्‍हां ॥६॥
परोपकारासाठी सांगीतले देवा । प्रासादिक मेवा ग्रहण करा ॥७॥
येणे भवव्‍यवथा जाईल तुमची । सख्‍या विठ्ठलाची आण मज ॥८॥
टाळ आणि कंथा धाडिली णिशाणी । घ्‍यारे ओळखोनी सज्‍जन हो ॥९॥
माझे दंडवत तुम्‍हा सर्व लोकां । देहा सहित तुका वैकुंठासी ॥१०॥
 
 
सत्य सत्य जाणा त्रिवाचा नेम हा । अनुभव पहा पदोपदी ॥१॥
पदोपदी पहा श्रीमुख चांगलं । प्रत्यक्ष पाऊली विठोबाची ॥२॥
विठोबाचे भेंटी हरेल बा चिंता । तुम्हालागी आता सांगितले ॥३॥
सांगितले खरे विश्वाचिया हीता । अभंग वाचिता जे का नर ॥४॥
ते नर पठणी जीवन्मुक्त झाले । पुन्हा नाही आले संसारासी ॥५॥ 
संसार उडाला संदेह फिटला । पूर्ण तोचि झाला तुका म्हणे ॥६॥
 
पांच कोटी एक लक्षाचा शेवट । चौतीससहस्त्र स्पष्ट सांगितले ॥१॥
सांगितले हे तुका कथुनियां गेला । बारा अभंगाला सोडू नका ॥२॥
सोडूं नका तुम्हा सांगितलें वर्म । भवपाशकर्मे चुकतील ॥३॥
चुकती यातायाती विठोबाची आण । करा हें पठण जीवेभावे ॥४॥
जीवेभावें करितां होईल दर्शन । प्रत्यक्ष सगुण तुका म्हणे ॥५॥ 

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Varuthini Ekadashi 2026 वरुथिनी एकादशी व्रत कधी? जाणून घ्या अचूक तारीख, शुभ मुहूर्त आणि पूजेची पद्धत

Gajkesari Yog On Akshaya Tritya अक्षय तृतीयेला गजकेसरी योग, या ३ राशींसाठी प्रचंड आनंदाचा क्षण

आरती मंगळवारची

मंगळवारी लाल रंगाचे कपडे परिधान करण्यामागील कारण काय? या दिवशी कोणत्या देवाची आणि कोणत्या ग्रहाची पूजा कशा प्रकारे करावी?

महिल गरुड पुराण वाचू शकतात का?

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

पुढील लेख
Show comments