Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तुका म्हणे : भूत भविष्य कळों यावें वर्तमान।

Webdunia
भूत भविष्य कळों यावें वर्तमान।

हें तों भाग्यहीन त्याची जोडी।।1।।

आम्ही विष्णुदासी देव घ्यावा चित्ते।

होणार ते होते प्रारब्धेंची ।।2।।

जगरूढीसाठी घातले दुकान।

जातो नारायण अंतरूनि।।3।।

तुका म्हणे हा हो प्रपंच गाढा।

थोरली ती पीडा रिद्धि सिद्धी।।4।।

तुकारामांनी भविष्कथनाची गरज नसल्याचे प्रतिपादन केले आहे. भूतकाळाचे ज्ञान, वर्तमानकाळ जाणणे आणि भविष्काळाबद्दल उत्सुकता याबद्दलची ओढ ही निर्दैवी माणसाची जोड आहे असे ते म्हणतात. त्या गोष्टी अप्रत्क्षपणे जाणून घेणे हा भाग्यहिनांच्या दृष्टीने लाभ होय. विष्णूदासांनी मनामध्ये देवाचेच ध्यान करायचे असते. भूत-भविष्य सांगणार्‍या लोकांनी जगरूढीसाठी दुकान घातलेले आहे. बाजार मांडलेला आहे. त्यांच्या आहारी जाणे म्हणजे ईश्वरापासून दूर जाणे होय. तेव्हा भविष्य जाणून घेण्याचा अट्टाहास कशासाठी? जे काही व्हायचे ते प्रारब्धानुरुप होईल. बरे भविष्य जाणून घेतले तर सत्य ठरेल हे तरी कशावरून? जी मंडळी भविष्य कथन करतात ती तरी कुठे ज्ञानी, अभ्यासू असतात? अशाही मतीतार्थाने तुकारामांनी या अभंगात विचार मांडला.

भविष्य सांगणार्‍यांनी व्यवसाय सुरू केला. ज्योतिषी, भविष्यवाले, शुभाशुभाचा बोलबाला करणारे यांच्याकडे ज्ञानाची उणीव तर असतेच. पण समस्यांनी   वेढलेल्या हवालदिल होऊन त्यांच्याकडे आलेल्यांचे ते भावनिक व आर्थिक शोषण करतात. स्वत:ला कालत्राचे ज्ञाते समजतात. काहीजण शकुनाचे ज्ञान बाळगतात. काही भविष्कथन करून ग्रहांची शांती, अंगठी आणि अन्य उपायही सुचवितात. त्यांच्या ज्योतिषशास्त्राचा अभ्यास तोकडा नि ज्ञानही अपुरे असते. परिणामी अंदाज, सावधगिरीने केलेले कथन, पूर्व माहिती घेणे व त्यावरून भूतकाळाबद्दल बोलून विश्वासार्हता मिळविणे आणि पैसे घेऊन भविष्याची व्यवहार्य अभ्यास व निरीक्षणातून माहिती देणे घडते. तुकारामांना त्यांचा कंटाळा तर आहेच. भविष्य कथन करणार्‍यांवर विश्वास ठेवू नये. असे तुकाराम  सांगतात. त्यांना डोळ्यांनी पाहण्याचीदेखील तुकारामांना इच्छा नाही.

भविष्य हा पोटार्थी धंदा आणि भविष्य सांगून सामान्य माणसांना दैववादी बनविण्याचा हा खोटारडा व्यवसाय तुकारामांना अमान्य आहे. त्यांनी या   अभंगातून अगदी मोजक्या शब्दात आपला तिटकारा प्रभावी पद्धतीने व्यक्त करतात. लोकांनी भविष्य सांगणार्‍यांकडे फिरकू नये. कारण ही मंडळी लोकांना फसवून पैसे उकळतात. तुकारामांनी सावधानता बाळगणे गरजेचे आहे हे अप्रत्क्षपणे सुचविले. प्रपंच हा गुंतागुंतीचा व मोठा आहे. प्रपंचात समस्या येणारच. उद्या काय होईल यांची चिंता वाटते. पण त्यासाठी भविष्य सांगणार्‍याकडे जाण्याची गरज नाही.

रिद्धी-सिद्धी पीडा नको याचा अर्थ समजून घ्यावा लागेल. कारण तुकारामांनी त्या नाकारल्या आहेत. रिद्धी-सिद्धी या विठ्ठलाच्या दासी आहेत. त्यांना  काही कमी नाही. त्या बोलावले नसतानाही भक्तांना शोधत येतात. तुकारामांना वाटते की, विठ्ठलश्रेष्ठ. त्याची भक्ती केल्याने सर्व समाधान प्राप्त होते. 

मग सिद्धीच्या मोहाला बळी पडण्याची काय गरज? खरा भक्त सिद्धीच्या मागे धावत नाही, असेही एका अभंगात सांगितले आहे. आजची दुर्दैवावस्था म्हणजे महाविद्यालयीन अभ्यासक्रमात ज्योतिष विज्ञानाचा समावेश करण्याचा डावपेच आखला गेला. शैक्षणिक धोरण म्हणून ज्योतिष विषय अभ्यासक्रमामध्ये   समावेश करण्याचा हा विचारच फुले-शाहू-आंबेडकर यांच्या पुरोगामी वैचारिक चळवळीस घातक ठरणारा आहे. म्हणून तुकाराम अभ्यासणे ही काळाची गरज आहे..

डॉ. लीला पाटील     

11 Maruti Temples समर्थांनी स्थापन केलेले 11 मारुती

Hanuman Jayanti शुभ योग घडत असल्यामुळे या 3 राशींना मिळणार आर्थिक लाभ !

श्री हनूमत् पञ्च चामरम्

हनुमान जयंती प्रसाद इमरती रेसिपी Imarti Recipe

मंगळवारी हनुमान मंत्राचा जाप केल्याने सर्व कष्ट होतील दूर

मुंबईत इमारतीच्या 40 फूट खोल सेप्टिक टँकमध्ये पडून दोन कामगारांचा मृत्यू

वंदे भारत गाड्यांमध्ये अर्धा लिटर पाण्याच्या बाटल्या मिळणार

उद्धव ठाकरेंच्या 'अभद्र' वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं सडेतोड उत्तर

कोटक महिंद्रा बँकेवर RBI ची कारवाई, क्रेडिट कार्ड जारी करण्यास बंदी

75 फूट उंचीवरून महिला थेट ज्वालामुखीत पडली, मृत्यू

Show comments