Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

प्राणीमात्रांवर प्रेम करा

Webdunia
PR
संतांच्या जीवनात चमत्कार असलेच पाहिजेत, असा भाविकांचा आग्रह असतो. काही भाबडे लोक अशा चमत्कारांच्या कणभर कथा मणभर कल्पनेत घोळवून सांगतात. बहुतेक संतांच्या आयुष्यात लहानमोठे चमत्कार असतातच. पण ते चमत्कार म्हणजे संतांचे माहात्म्य नव्हे. संत जो उपदेश करतात, स्वत:च्या जीवनाने जे आदर्श निर्माण करतात, जो सन्मार्ग दाखवितात ते सर्वात अधिक महत्त्वाचे असते.

संत एकनाथ महाराजांनी रामेश्वराच्या कावडीचे पाणी तहानेने व्याकूळ झालेल्या गाढवाला पाजल्याची कथा वेगवेगळ्या प्रकारांनी सांगितली जाते. शंभर वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या एका ग्रंथात ही कथा थोडी वेगळ्याप्रकारे सांगितली आहे. एकनाथांचे चिरंजीव हरिपंडित हे विद्वान आणि संस्कृत भाषेचे अभिमानी होते. ते एकदा काशी यात्रेला गेले.

तिथून येतांना रामेश्वराला अभिषेक करण्यासाठी गंगेच्या पाण्याने भरलेली कावड खांद्यावर घेऊन आले. हरिपंडित आपल्या गावाजवळ म्हणजे पैठणजवळ आले हे कळताच पैठणमधील काही प्रतिष्ठित मंडळी त्यांना सामोरी गेली. पैठणपासून तीन कोस अंतरावर ही मंडळी हरिपंडितांना भेटली. दिवस उन्हाळ्याचे हेते, सगळीकडे दुष्काळी वातावरण होते आणि हरिपंडित खांद्यावर कावड घेऊन अनवाणी चालत येत होते. हरिपंडितांशी सगळ्यांच्या उराउरी भेटी झाल्या. सगळे मिळून गावाकडे येत असताना वाटेत एक तहानभुकेने व्याकूळ झालेले गाढव अगदी मरणासन्न अवस्थेत तडफडत होते. त्या गाढवाच्या तोंडात पेलाभर पाणी टाकावे तर आजूबाजूला पाण्याचे टिपूसही नव्हते. गाढवाची केविलवाणी तडफड पाहून नाथांचे मन कळवळले. एकनाथांनी दुसर्‍या कोणत्याही गोष्टीचा विचार न करता, उन्हाने तापलेल्या जमिनीवर बसून त्या गाढवाचे मस्तक आपल्या मांडीवर घेतले. नाथांची भूतदया, नाथांना प्राणिमात्रांबद्दल वाटणारे प्रेम सर्वांना माहीत होते. पण कर्मठ विचारांचे आणि सोवळ्या-ओवळ्याचे भान असलेले हरिपंडित मात्र नाथांच्या या कृत्याने बरेच अवघडल्यासारखे झाले. त्यांची मन:स्थिती नाथांनी बरोबर हेरली आणि नाथ हरिपंडितांनाच म्हणाले, 'तुझ्या कावडीत पाणी आहे ना, ते जरा या मुक्या प्राण्याच्या तोंडात ओत.' इतक्या प्रतिष्ठित मंडळींसमोर हरिपंडितांना काही उलट बोलताही येईना. त्यांनी निमूटपणेआपल्या कावडीमधील एक कुपी काढून नाथांच्या हाती दिली. नाथांनी त्या गाढवाच्या तोंडात पाणी घातले आणि काय आश्चर्य, ते गाढव नाथांच्या स्पर्शाने आणि त्यांच्या हातून मिळालेल्या पाण्याने लगेच ताजेतवाने होऊन उठूनही बसले. नाथांना ब्रह्मानंद झाला. आपले कावड आणण्याचे परिश्रम व्यर्थ गेले महणून हरिपंडित नाराज झाले. पण आश्चर्य असे की, त्याच दिवशी पैठणमधील एका बाईला रामेश्वराचा दृष्टांत झाला.

ती बाई आपला नवस फेडण्यासाठी म्हणून रामेश्वराला जाण्याचा बेत आखत होती. श्रीरामेश्वराने तिला स्वप्नात येऊन सांगितले, 'तू इतक्या दूर येण्याचे श्रम घेऊ नकोस, पैठणमधील हरिपंडित यांनी पवित्र गंगोदकाच्या सहस्त्र कावडी मला नुकत्याच समर्पण केल्या आहेत, त्यांचा पुण्यसंचय फार मोठा झाला आहे. तू त्यांनाच माझ्या जागी समज आणि त्यांचेच दर्शन घे म्हणजे तुझा नवस तू फेडलास असे होईल.' दृष्टांताप्रमाणे बाई हरिपंडितांच्या दर्शनाला गेली. तिने दृष्टांताचा वृत्तांत हरिपंडितांना सांगितला. हरिपंडित तर आपण एवढ्या परिश्रमाने आणलेली कावड आपल्या वडिलांमुळे म्हणजे एकनाथांमुळे व्यर्थ गेली, याच दु:खात होते. त्यांना प्रत्यक्ष रामेश्वराने दिलेल्या या दृष्टांताबद्दल फार आश्चर्य वाटले आणि आपल्या वडिलांच्या अलौकिक थोरवीची साक्ष पटली. मुक्या प्राण्यांवर प्रेम करणे आणि त्यांना दयाबुद्धीने वागविणे हीच परमेश्वराची खरीखुरी भक्ती होय, हा या कथेमधून मिळणारा संदेश महत्त्वाचा आहे.

ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर

11 Maruti Temples समर्थांनी स्थापन केलेले 11 मारुती

Hanuman Jayanti शुभ योग घडत असल्यामुळे या 3 राशींना मिळणार आर्थिक लाभ !

श्री हनूमत् पञ्च चामरम्

हनुमान जयंती प्रसाद इमरती रेसिपी Imarti Recipe

मंगळवारी हनुमान मंत्राचा जाप केल्याने सर्व कष्ट होतील दूर

मुंबईत इमारतीच्या 40 फूट खोल सेप्टिक टँकमध्ये पडून दोन कामगारांचा मृत्यू

वंदे भारत गाड्यांमध्ये अर्धा लिटर पाण्याच्या बाटल्या मिळणार

उद्धव ठाकरेंच्या 'अभद्र' वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं सडेतोड उत्तर

कोटक महिंद्रा बँकेवर RBI ची कारवाई, क्रेडिट कार्ड जारी करण्यास बंदी

75 फूट उंचीवरून महिला थेट ज्वालामुखीत पडली, मृत्यू

Show comments