कॉंग्रेस आणि मुस्लिम लीग या दोघांची बाजू न्याय्य असल्याचा विचार आपण करत असल्याचे पाहून मी तर चकित झालो आहे, आणि म्हणूनच कदाचित तुम्ही जिना यांच्या मागणीला जास्त महत्त्व देत आहात. माझे स्पष्ट मत आहे की हे शक्य नाही. तुलनाच जर करायची असेल तर सातत्यतेशी करा. तुम्हाला कायदे आझम जीना कॉंग्रेसच्या तुलनेत जास्त समजूतदार आणि न्यायप्रिय वाटत असतील, तर मग तुम्ही मुस्लिम लीगच्या नेत्यांशीच सल्ला मसलत केली पाहिजे. आणि मुक्तपणे त्यांची धोरणे स्वीकारली पाहिजे.
कायदे आझम जीना यांना अनुकूल अशा पद्धतीने कॉंग्रेसचे मंत्री सरकार चालवत नसल्याने, जीना तुम्हाला पंधरा ऑगस्टपर्यंत सत्ता हस्तांतरणाला विरोध करतील, असा इशारा तुम्ही दिला आहे. माझ्यासाठी चिंता आणि आश्चर्याचे मिश्रण असलेले हे वृत्त आहे. मी सुरवातीपासूनच फाळणीला विरोध केला आहे. फाळणीची सूचना करणे ही ब्रिटिश साम्राज्याने सुरवातीलाच केलेली घोडचुक आहे. याही क्षणी तुम्ही ही चुक सुधारू शकता. पण मनातील किल्मिष आणि कटूता वाढविणे हे काही योग्य नाही.
इंग्रजांच्या उपस्थितीत विभाजन न झाल्यास बहुसंख्याक हिंदू मुसलमानांना गुलाम बनवून राज्य करतील आणि त्यांना कधीच न्याय मिळणार नाही, या आपल्या धारणेने मी तिसर्यांदा चकित झालो आहे. आपल्या मनातील ही धारणा निराधार आहे. हिंदूंची संख्या येथे महत्त्वाची नाही. एक लाखापेक्षा कमी असलेल्या इंग्रजांनी चाळीस कोटी भारतीयांवर दडपशाही करून राज्य केलेच ना. ठीक आहे, आपल्या विचारार्थ मी पाच सूचना पाठवत आहे.
- कॉंग्रेसने अनेकदा जाहीरपणे सांगितले आहे, की कोणत्याही प्रांताला जबरदस्तीने भारतात सामील करण्यात येणार नाही. - जातीपातीत विभागलेल्या हिंदू समाजात एवढी ताकद नाही की ते दहा कोटी मुसलमानांवर दडपशाही करू शकतील. - मोगलांनीही इंग्रजांप्रमाणेच हिंदूस्थानावर मोठ्या कालखंडात राज्य केले आहे. - मुसलमानांनी आपल्याबरोबर हरीजन आणि आदिवासींना आपल्याबरोबर आणण्याचा प्रयत्न केला आहे. - जे मुसलमांवर दडपशाही करू शकतात, अशी भीती व्यक्त केली जाते, ते सवर्ण हिंदू संख्येने अगदी नगण्य आहेत. यातील राजपुतांमध्ये अद्याप राष्ट्रीयतेचा उदय झालेला नाही. ब्राह्मण आणि वैश्यांना शस्त्र पकडताही येत नाही. त्यांची सत्ता असलीच तर ती नैतिक आहे. शूद्र हरीजनांमध्ये गणले जातात. असा हिंदू समाज केवळ बहुसंख्याक असल्याने मुसलमानांवर दडपशाही करून त्यांना समूळ नष्ट करून टाकेल, ही अगदी कपोलकल्पित कहाणी आहे.
त्यामुळे आपल्या हे लक्षात आले असेल की सत्य आणि अहिंसेच्या नावावर मी एकटाच उरेल. आणि अहिंसेचा अधार असलेल्या पुरूषापुढे अणूशक्तीसुद्धा क्षुद्र असते. तेथे नौदलाची काय कथा. मी हे पत्र माझ्या मित्रांना दाखविलेले नाही.